निवडक अभंग संग्रह

निवडक अभंग संग्रह


प्रारब्धपर अभंग

जे जे असेल प्रारब्धी । ते न चुके कर्मकधी । होणार्‍या सारिखी बुद्धी । कर्मरेषा प्रगटे ॥१॥
न कळे पुढील होणार । भूत भविष्य हा विचार । कर्म धर्म तदनुसार । भोगणे लागे सर्वर्था ॥२॥
ऎसा लिहुनि गेला विधाता । मग कासया कारावी ते चिंता । आपुलीया संचिता । कर्मरेषा प्रमाण ॥३॥
जैसे असेल आचरण । घडले  असेल पाप पुण्य । तैसे सानुकुल होतील कर्म । मान अपमान जन करित ॥४॥
काळ अनुकुल अथवा प्रतिकूल । परि सोडू नये आपुले धैर्यबळ । अनाचारी मन केवळ । नये बाटवूं सर्वथा ॥५॥
अखंड वाणी हरिस्मरणी । सुखी विश्रांती कीर्तनी । खेचर विसोबा म्हणे प्राणी । मनुष्य देह दुर्लभ ॥६॥
*
संचित प्रारब्ध क्रियमाण । न सुटे प्राणिया भोगिल्याविण । यालागी कारावे हरिचे स्मरण । तुटेल बंधन मग त्याचे ॥१॥
सत्कर्म करितां विधियुक्त । माजी निषेधाचा पडे आघात । सांग अथवा व्यंगा होत । होय ते संचित निश्र्चयेसी ॥२॥
उत्तम अधम कर्मे घडती । जाणतां नेणतां पदरी पडती ।  तेचि संचित होऊनि जाती । पुढे भोग द्यावया ॥३॥
पापपुण्यात्मक कर्में घडली । भोगितां उर्वरीत जी राहिली । फ़ळ द्यावया उभी ठाकली । प्रारब्धे लाभालाभ दायके ॥४॥
क्रियमाणे जे आतां आचरे । सत्कर्मे अथवा अकर्माकारे । जे जे निपजे नित्य व्यवहारे । क्रियमाण ऎसे बोलिजे ते ॥५॥
आतां तिहींचेही निस्तरण । घडे जेणे ते ऎक खुण । संचिते घडे  जन्ममरण । उत्तम अधम योनिव्दारे ॥६॥
जे जे योनी धरी जो जन्म । तेथीचे विहित तोचि त्य स्वधर्म । सांग नव्हतां भोगणे कर्म । नव्हेचि सुटिका कल्पांती ॥७॥
आतां  भलतेही योनि जन्म होतां । अनुतापें भजे जो भगवंता । नामे त्याची गातां वानितां । दहन संचिता भक्तियोगे ॥८॥
यावरी प्रारब्धे भोग येती अंगा । भोगितां स्मरे जो पांडुरंगा । निस्तरे प्रारब्धा तो वेगा । पावो अंतरंगा श्रीहरिते ॥९॥
जे जे नित्याने आचरत । ते ब्रह्मार्पण जो करित । अहंकृति न धरी फ़ळ काम रहीत । क्रियामाण जाळीत निष्कामता ॥१०॥
याचि लागी निळा म्हणे । कर्मपाश तुटती येणे । विठोबाच्या नामस्मरणे । यातायाती चुकती ॥११॥
*
झळझळीत सोनसळा । कळस दिसतो सोज्वळा ॥१॥
बरवे बरवे पंढरपूर । विठोबा रायाचे नगर ॥२॥
हे माहेर संताचे । नामयास्वामी केशवाचे ॥३॥