श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


श्रीकृष्ण आळ - अभंग १८ ते १९

१८

निळी कांच भूमीं खेळे वनमाळी । पाहिलें प्रतिबिंब कृष्णं तया न्याहाळीं ॥१॥

रडूं घेतलें रडूं घेतलें । समजावी यशोदा परी रडूं घेतलें ॥२॥

दे मज खेळावया भानु । आन नको कांही दुजा छंद मनु ॥३॥

एका जनार्दनीं देव छंद धरी गा । समजावी यशोदा परी न राहे उगा ॥४॥

१९

शुद्ध स्फटिके आपुलें रुप देखे । कृष्ण तेणें हारिखें डोलतसे ॥१॥

देहाविदेहा आलिंगन स्वानंदें चुंबन । तये संधीं मन हारपत ॥२॥

स्वस्वरुपीं भेटीं थोर उल्हास पोटीं । उन्मळींत दाष्टी निजरुप पाहें ॥३॥

हें जाणोनि माया धावे लावलाह्मा । उचलोनि कान्हाया दृश्य दावी ॥४॥

माझें रुप मज देई घालितो लोळणी । जननी नानागुणी बुझावीत ॥५॥

माया मोहं गुणाचे खेळणें । येथें कृष्ण म्हणे जीवेभावें ॥६॥

देह घटाबाहेरी न वचें मी मुरारी । श्रद्धा उष्ण भरी तावितसे ॥७॥

विषय पंचधारा देइन बा साकर । नाथिली करकर कां करिसी ॥८॥

घेई स्तनपान वोरसु इंद्रियां गोरसु । मायेसी उदासू रुसूं नको ॥९॥

इच्छा माउलीची साय सावकाश खाय । गोगोरसाची माय मज चाड नाहीं ॥१०॥

तो तंव ठाईच्या ठाई म्यां तव काहीं नेले नाहीं । निजरुप पाही जैंसे तैसें ॥११॥

तुझी पडलीया पडसाई असतांचि जालें नाहीं । नास्तिक तेचि डोई सबळ जाले ॥१२॥

तुझिया सांगातें करणें आणि भुतें । अहंकारें थिते चोरुनि नेलीं ॥१३॥

दुजेपणें पाहतां धरितां नये हातां । निजरुपा तत्त्वतां काढोनि देई ॥१४॥

होसी चक्रचाळ घाइसी आळ । बाळलीळा खेळ निर्वाणीचा ॥१५॥

मज मायावेगळा नवचे बा गोपाळा । आपरुपीं खेळा खेळू नको ॥१६॥

नेणों कैशी आवडी माया म्हणसी कुडी । भूली नव्हें खोडी तान्हुलिया ॥१७॥

हें नायके उत्तर म्हणे परती सर । निजरुपी साचार दावीं मज ॥१८॥

यापरी कान्हया स्वरुपीं थाया । बुझावितां माया वेढोनि गेली ॥१९॥

आपुलैया स्वप्रभा आपण पावे शोभा । सबाह्म कृष्ण उभा एकपणें ॥२०॥

माया मोहकता गुणाची वार्ता । कृष्णापणीं एकत्वेंची ॥२१॥

एक जनार्दनी निजीं निज मिळणी । सगुणी निर्गुणीं कृष्ण एक ॥२२॥