श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


विश्वरुप - अभंग २० ते २२

२०

एके दिनी नवल जालें । ऐकवें भावें वहिलें ॥१॥

घरीं असतां श्रीकृष्ण । योगीयाचें निजध्यान ॥२॥

नंद पूजेसी बैसला । देव जवळी बोलाविला ॥३॥

शाळीग्राम देखोनि । मुखांत घाली चक्रापाणी ॥४॥

नंद पाहे भोवतालें । एका जनार्दनी बोले ॥५॥

२१

म्हणे कृष्णराया शाळीग्राम देई । येरू लवलाही वदन पसरी ॥१॥

चवदा भुवनें सप्त तीं पाताळें । देखियलीं तात्काळें मुखमाजीं ॥२॥

स्वर्गीचे देव मुखामाजी दिसती । भुलली चित्तवृत्ति नंदराव ॥३॥

एका जनार्दनी नाठवें भावना । नंद आपणा विसरला ॥४॥

२२

घालुनी माया म्हणे नंदराया । भजे यादव राया कायावाचा ॥१॥

संसारसुख भोगाल चिरकाळ । परब्रह्मा निर्मळ तया भजे ॥२॥

नंद म्हणे देव दूर आहे बापा । आम्हांसी तो सोपा कैसा होये ॥३॥

ऐकातांचि वचन काय करी नारायण । प्रगटरुप जाण दाखविलें ॥४॥

शंख चक्र गदा पद्म तें हस्तकीं । मुगुट मस्तकीं शोभायमान ॥५॥

ऐसा पाहतां हरी आनंद पैं झाला । एका जनार्दनी भेटला जीवेंभावें ॥६॥