श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


गार्‍हाणीं - अभंग ४८ ते ७७

४८

उठोनि प्रातःकाळीं गोपी येती घरा । आवरीं आवरीं यशोदे आपुलिया पोरा ॥१॥

थोर पीडीयेलें सांगतां नये आम्हां । दहीं दूध तूप लोनी नासिलें सीमा ॥२॥

लेकी सुना पोरें वेडाविलीं सकळ । चोरी करिताती भुलविलें सबळ ॥३॥

एका जनार्दनीं आवरीं आपुला कान्हा । तुझा तुज गोड वाटे हांसतीस मना ॥४॥

४९

येकीपुढें येक सरसावोनि गोपिका । सांगतो गाह्माणीं तुज नाहीं ठाऊका ॥१॥

रात्री मंचकावारी पहुडतां साजणी । अवचित येऊनी बांधी दाढी आणि वेणी ॥२॥

नाहतां आपुलेअ अंतसदनीं । येऊनियां पुढें बैसें शारंगपाणी ॥३॥

ऐसा कटाळा आणियला येणें । एका जनार्दनीं तुझें आवडतें तान्हें ॥४॥

५०

दुजी येऊनी पुढें बोले ऐकें वो बाई । घुसळण घुसळितां डेरां फोडिला पाहीं ॥१॥

धांवुनि आलीं सासु मारितसें मजला । हांसतसे आपण तेथोनि पळाला ॥२॥

वांसुरें तीं साडीं मुला चिमुरे घेतो । द्या रे नवनीत म्हणोनि तया मारितो ॥३॥

लपविलें ठायीं उरों नेदी कांहीं । एका जनार्दनीं पुरें आतां बाई ॥४॥

५१

धांवुनीं तिजी गोपिका म्हणे वो बाई । येथें रहावया लाग उरला नाहीं ॥१॥

जात होतें पाण्यां यमुने पहाटीं । अविचित येऊनियां पाठी थापटी ॥२॥

एका जनार्दनीं आणियला त्रास । नको हें गोकुळ आम्हीं जाऊ मथुरेस ॥३॥

५२

एकी पुढें एक सांगतीं गार्‍हणीं । लिहितां पृथ्वीं न पुरेचि धूणी ॥१॥

म्हणे यशोदा कृष्णा काय हें कैसें । खोडी नको करुं हरि बोलतसे ॥२॥

मज नेती गृहांत दहा पांच मिळती । नग्न होऊनियां मज पुढें नाचती ॥३॥

म्हणती रे पोरा तु दिससी साना । हृदयी धरुनी करी देती स्तना ॥४॥

ऐसे यांचे तुज सांगु म्हनतां माते । एका जनार्दनी नवल वाटे तुंते ॥५॥

५३

मिळोनि धमकटी दहीं दूध ते खाती । मी खेळतां राजबिंदीं घरांत नेतीं ॥१॥

नग्न होऊनियां नाहती अबळा । डोळें झांक म्हणती मज त्यां सकळां ॥२॥

न झांकितां डोळे लोणी देती । मजसी खादलें म्हणोनि सांगती तुजासी ॥३॥

एका जनार्दनी बोलतां हांसतीं बाळा । रागावुनी मग बोला बोलती सकळां ॥४॥

५४

काय याचें बोलें तुज वाटतसे कोडे बोलते सांवळा अवघे वितंड ॥१॥

पुरें तुझें गाव नको आतां वस्ती । आम्हीं जाऊं सर्व मिळुनि मथुरेप्रती ॥२॥

नाहीं तसे बोल बोलतसे वायां । एका जनार्दनीं हा तुझा कान्हया ॥३॥

५५

नको करुं आतां कृष्णा तु खोडीं । नाहीं म्हणोनियां दोनी हात जोडी ॥१॥

काल इचे गृहीं थोडें खादले नववीत । म्हणोनि राधिकेचे स्तनी ठेवी हात ॥२॥

येवढाचि गोळा कढिला बाहेरी । सत्य म्हणोनिया आण वाहतो हरी ॥३॥

एका जनार्दनीं विश्वव्यापक सांवळा । न कळे ब्रह्मादिकां याची अगम्य कळा ॥४॥

५६

हासोनिया राधा बोले यशोदेशी । यह ओ हा चोर बोल विश्वासी ॥१॥

आण वाहतसे लटकीची मामिसे । याचिया वचनीं सर्वास विश्वासे ॥२॥

खोडी न करी ऐशी वाहे तू आण । गोरसांवांचुनि चोरी न करीं तुझी आण ॥३॥

एका जनार्दनीं बोले विनोद वाणी । यशोदेसह हांसती गौळणीं ॥४॥

५७

घरोघरीं चोरी करितो हृषीकेश । गार्‍हाणे संगिती येऊनी यशोदेसी ॥१॥

भली केली गोविंदा भली केली गोविंदा । निजभक्तालागीं दखाविसी लीला ॥२॥

कवाड उघडोनि शिंके वो तोडिलें । दहीं दुध भक्षूनि ताक उलंडिलें ॥३॥

अंतर बाहेर मज व्यापियलें माया । एका जनार्दनी म्हणे न सोडी पायां ॥४॥

५८

मिळोनि अबळा बैसती परसद्वारी । येरे येरे कृष्णा म्हणोनि बाहाती व्रजनारी ॥१॥

ऐशा लांचावल्या नंदनंदना । घरींच बैसती लक्ष लावीत कान्हा ॥२॥

वेदश्रुतीसी न कळे जयांची शुद्धी । तो नवनीत खावया लाहे लाहे घरामाधी ॥३॥

एका जनार्दनी ब्रह्मा परिपूर्ण । पूर्ण वेधे वेधिलें आमुचे मनाचें मन ॥४॥

५९

मार्गी जातां विस्मय करी । कैसें विंदान केले नवल परी । आम्हीं अबला घालितो अचोरी । श्रीहरी परापश्यंती वेगळा ॥१॥

नवल जाहलें काय सांगू माये । चोरी करितां धरिला पाहे । घरां घेऊनि जातां उभा आहे । न कळे विंदान सये काय सांगू ॥२॥

एका जनार्दनी परिपूर्ण । व्यापाक सर्वाठायीं संपूर्ण । जनींवनीं जनार्दनी । पाहतां महिमान न कळे ॥३॥

६०

ऐसें नानापरी सांगती गार्‍हाणे । ऐकता घडे कोटी अश्वमेध यज्ञ ॥१॥

पुनरपी संसार नवेची मागुती । शंख चक्र गदा पद्म ऐसे जन्म होती ॥२॥

एका जनार्दनी ऐकतां चोरीकर्म । कर्म आणि धर्म पावती विश्राम ॥३॥

६१

जो न कळे वेदशास्त्र गे माये । तो गोकुळी चोरुनी लोणी खाये ॥१॥

ऐशी भाविकांची आवडी देखा । टाकुनी आला वैकुंठ सुखा ॥२॥

एका जनार्दनीं ब्रह्मा परिपूर्ण । तया घालिती यशोदा भोजन ॥३॥

६२

बाळ कृष्ण रांगे नंदाघरीं । चोरी करी घरोघरीं गौळणी धरूनिया करीं । घेऊन नंदमंदिरा आली ॥१॥

गार्‍हाणे सांगती अबला नवलविंदान तयाची ती कळा । हांसत उभा यशोदे जवळा पाहूनियां बाळा चाकाटली ॥२॥

राहिलें बोलणें चालणेंनिवांत । कृष्णरुपी वेधलें चित्त । एका जर्नादनीं समाधिस्त । द्वैताद्वैत विसरली ॥३॥

६३

एकमेका गौळणी करिती विचार । चोरी करी कान्हा नंदाचा कुमर ॥१॥

नायके वो बाई करुं गत काई । धरू जातां पळुन जातो न सांपडेचि बाई ॥२॥

दहीं दूध लोणी चोरी करुनियां खाये । पाहूं जातां कवाड जैसे तैसे आहे ॥३॥

एका जनार्दनी न कळें लाघव तयाचें । न कळेची ब्रह्मादिकां वेडावले साचें ॥४॥

६४

काय सांगू यशोदेबाई । आम्ही घरांत बैसलों पाहीं । कृष्ण आला लवलाही । म्हणे मज भूक लागली ॥१॥

ऐसा लाघवी हा हरी । खोडी करी नानापरी । धारितां न धरवे निर्धारीं । जातों पळुनिया दुरी ॥२॥

माझी सुन एकली घरीं । नाहात होती परसद्वारीं । आपण येउनि झडकरी । उभा पुढें राहिला ॥३॥

तवं ती म्हणे का आलासी । कृष्ण म्हणे तूं परियेसी । मी खेळत होतों बिदीसीं । चेंडु उडोनियां आला ॥४॥

तंव ती म्हणे पाहे कृष्णा । क्रियाहीन नष्ट तूं कान्हां । घाली मिठी धरी स्तना । कां गे चेंडू देईना ॥५॥

तव ती म्हणे परतां सर । कृष्ण म्हणे दे चेंडूं सत्वर । एका जनार्दनीं निर्धार । परा भक्ति हे साचार ॥६॥

६५

आम्हीं असतां माजघरीं । रात्र झाली दोन प्रहरीं । मी असतां पतिशेजारीं । अवचित हरी तुझा आला ॥१॥

काय संगु सखये बाई । वेदशास्त्रां अगम्य पाहीं । आगमनिगमां न कळे कांहीं । मन पवन पांगुळलें गे बाई ॥२॥

आम्हीं असतां निदसुरी । मुंगुस घेउनी आपुले करीं । सोडियलें अदोघा माझारीं । तंव तें बोचकरी आम्हांतें ॥३॥

आम्हीं भ्यालों उभयतां । चीर फिटलें बाई तत्त्वतां । नग्नाचि जाहलें मी सर्वथा । भूतभूत म्हणोनि भ्यालें ॥४॥

ऐसें करुनि आपण पळाला । जाउनी माये आड लपला । एका जनार्दनी म्हणे भला । आतां सांपडतां न सोडी त्याला ॥५॥

६६

गौळणी बारा सोळा । हो उनी येके ठायीं मेळा । म्हणती गे कृष्णांला । धरुं आजीं ॥१॥

कवाड लाउनीं । बैसल्या सकळजणी । रात्र होतांचि माध्यांनी । आला कृष्ण ॥२॥

दहीं दुध तुप लोणी । यांची भोजनें आणुनी । रितीं केली तत्क्षणीं परी तयां न कळें ॥३॥

थोर लाघव दाविलें । सकळां निद्रेनें व्यापिलें । द्वार तें नाहीं उघडिलें । जैसें तैसेंची ॥४॥

खाउनी सकळ । मुखा लाविलें कवळ । आपण तात्काळ । पळे बाहेरी ॥५॥

एका जनार्दनी ऐशी करुनि करणी । यशोदे जवळी येउनी । वोसंगा बैसे ॥६॥

६७

उदय सुर्याचा जाला । मिळाला गौळणीचा मेळा । धाउनी सकळां । आलीया अंगणीं ॥१॥

बोलती आणि संक्रोधें । थोर पीडेलें बाळकें ।चोरी करुनियां देखे । आला पळोनि ॥२॥

आमुचीं फोडिलीं भाजनें । दहीं दुध खादलें येणें । एका जनार्दनी तान्हें । यशोदे तुझें ॥३॥

६८

येणें कृष्णें आमुचें खादलं दुध दहीं । फोडोनि टाइलें भाजनें पाहीं ॥१॥

आवरी आवरी बाई आपुला कान्हा । न कळे याची कारणी ब्रह्मादिकां नये ध्याना ॥२॥

घेऊनियां पोरें घरामध्यें येतो पाहे । चोरी करुनियां पळुनी जातो लवलाहें ॥३॥

एका जनार्दनीं किती सांगू गार्‍हाणें । पुन्हां आलिया यासी शोक लावीन सत्य जाणे ॥४॥

६९

गौळणी सांगती गार्‍हाणीं । रात्री आला चक्रपणी ।

खाऊनी दहीं दूध तूप लोणी । फोडिली अवघीं विरजणीं ॥१॥

हा गे बाई कोणासी आवरेना । यशोदा बाळ तुइझा कान्हा ।

कोठवर सांसुद धिंगाणा ॥धृ०॥

दुसरी आली धांवत । याने बाई काय केली मात ।

मुखाशीं मुखचुंबन देत । गळ्यामधी हात घालीत धरुं जातां सांपडेना ॥२॥

तिसरी आली धांउनी । म्हणे गे बाई काय केली करणी ।

पतीची दाढ़ी माझी वेणी । दोहीसी गांठ देउनी । गांठ बाई कोणा सुटेना ॥३॥

मिळोनि अवघ्या गौळणी । येती नंदाच्या अंगणीं ।

जातों आम्हीं गोकुळ सोडोनी । आमुच्या सुना घेउनी । हें बाई आम्हांसी पहावेना ॥४॥

ऐशीं ऐकतां गार्‍हाणीं । यशोदानयनीं आलें पाणीं ।

कृष्ण खोड दे टाकुनी एका जनार्दनीं चरणीं । प्रेम तया आवरेना ॥५॥

७०

गौळणी गार्‍हाणे सांगतो यशोदेसी । दहीं दुध खाऊनियां पळुनी जातो हृषीकेशी ॥१॥

लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे । याच्या खोडी किती सांगु महीपत्र सिंधु आटे ॥२॥

मेळवानि गोपाळ घरामध्यें शिरे कान्हा । धरुं जातां पळुनि जातो यादवांचा राणा ॥३॥

ऐसें मज याने पिंसे लावियसे सांगु काई । एका जनार्दनी कायावचामनें पायी ॥४॥

७१

यशोदेसी गौळणी सांगती गार्‍हाणे । नट नाटक कपटी सांभाळ आपुले तान्हें ।

किती खोडी याच्या सांगु तुजकारणें ॥१॥

सहस्त्रमुख लाजला । निवांतचि ठेला । वेद परतला ।गाती अनुछंदे ।

वेध लाविला गोविंदे । परमानंदे आनंदकंदें ॥धृ॥

एके दिवशी मी गेलें यमुनातट जीवना । गाई गोप सांगतें घेऊनि आला कान्हा ।

करीं धरी पदरा न सोडी तो जाणा । एकांत घातली मिठी ।

न सुटे गांठीं तो पाहिला दृष्टी । नित्य आनंदु वेध लाविला ॥२॥

माझ्या घरासी एकदां आले शारंगपाणी । दहीं दुध भक्षुनी रितीं केली दुधाणीं ।

अज्ञान मडकीं टाकिलें निपटुनी । पाहिला हरी पळाला दुरी । घरा भीतरीं बाई यशोदे । वेध लाविला ॥३॥

किती खोडी याच्या सांगू तुज साजणी । गुण यांचे लिहितां न पुरे मेदिनी ।

रुप सुंदर पाहतां न पौरे नयनी । एका जनार्दनीं देखिला ।

ध्यानी धरिला । मनीं बैसला । सच्चिदानंद ॥ वेध लाविला ॥४॥

७२

ऐके ऐके बाई यशोदे । नवल केलें तुझ्या गोविंदे । आमुची मुलें तुडविली पदें । आतां यासी बांधीना ॥१॥

आवरीं आवरीं आपुला कान्हां । नाशियल्या आमुच्या सुना । अझुनि नये तुझ्या मना ॥ तुझा तुला गोड वाटे कान्हा ॥२॥

येतो आमुचे घरासी । धमकावितो लेकीसुनासी । कोठें लोणी सांग आम्हांसी । न सांगतां वासुरें सोडी बिदीसी ॥३॥

आपण खातो दहीं दुध लोणीं । हात पुसतो सुनेच्या मुखालागुनीं । एका जनर्दनी करी करणी । जातो पळोनि तेथोनी ॥४॥

७३

मिळोनि गौळणी । देती यशोदे गार्‍हाणीं । खोडी करी आमुचे घरा । दारीं यशोदे ॥१॥

परां आला आमुचे घरा । दारी निजला होता म्हातारा । घेऊनि ताकाचा ही डेरा । फोडिला सैरा त्यावरीं ॥२॥

दुसरी बोले बाई यशोदे । कांही सांगते तुझिया मुकुंदें । आमचेंघरा येऊनि गोविंदे । नवल केलें साजणी ॥३॥

सुन होती माझी गर्भिणी । तीस पुसे चक्रपाणी । कैसी जाहलीली हो गर्भिणी । तव ती हांसु लागली ॥४॥

जवळा बैसला जाऊनी । पोट आहे चांचुपनी । न कळे इश्वराची करणी । तंव ती झिडकावी ॥५॥

ऐशा खोडी नानापरी । किती म्हणोनि सांगु सुंदरी । ऐका जनार्दनीं आवरी । आपुलीयां कृष्णांतें ॥६॥

७४

गोकुळीं चोरी करितो चक्रपाणी गवळणी येउनी सांगती गार्‍हाणीं ।

येणेंमाझें भक्षिलें दहीं दूध लोणी । पळोनियां येथें आला शारंगपाणी वो ॥१॥

आवरीं आवरीं यशोदे आपुला कान्हा । याच्या खोडी किती सांगु जाणा ।

याचें लाघव न कळे चतुरानना । यासी पाहतां मन नुरे मीपणा वो ॥२॥

एके दिवशीं मी आपुलें मंदिरीं । मंथन करितां देखिला पुतनारी ।

जवळी येवोनि रवीदंड धरी । म्हणे मी घुसळितोम तु राहें क्षणभरी वो ॥३॥

परवां आमुचे घरासी आला । संगे घेउनी गोपाळांचा मेळा ।

नाचले ऐकत धरें पाहें अचला । धरूं जातां तो पळोनियां गेला वो ॥४॥

ऐसें बहु लाघव केलें येणें । किती सांगावें तुज गार्‍हाणें ।

एका जनार्दनीं परब्रह्मा तान्हें । यासी ध्याता खुंटलें येणे जाणे वो ॥५॥

७५

माझा कृष्ण देखिला काय । कोणी तरी सांगा गे ॥ धृ ॥

हाती घेऊनिया फूल । अंगणीं रांगत आलें मूल । हातें सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥१॥

माथां शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण । त्याला म्हणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती ॥२॥

संगे घेऊनि गोपाळ । बाळ खळॆ आळुमाळ । पायीं पोल्हारे झळाळ । गळां माळ वैजंयती ॥३॥

एका जनार्दनीं माय । घरोघरांप्रती जाय । कृष्णा जाणावें तें काय । कोणी सांगा गे ॥४॥

७६

नानापरी समजवितें न परी राहे श्रीहरी ।

दहींभात कालवोनि दिला वेगीं झडकरीं । कडेवरी घेऊनियां फिरलें मी द्वारोद्वारीं ।१॥

राधे राधे राधे राधे घेई शामसुंदरा । नेई आतां झडकरीं आपुलिया मंदिरा ॥धृ॥

क्षणभरी घरीं असतां करी खोडी शारंगपाणी । खेळावया बाहेरीं जातां आळ घेती गौळणी ।

थापटोनि निजवितां पळोनि जातो राजद्वारा ॥२॥

राधा घेउनि हरिला त्वरें जात मंदिरीं । हृदयमंचकीं पहुडाविला श्रीहरीं ।

एका जनार्दनीं हरीला भोगी राधा सुंदरीं ॥३॥

७७

करूं देईना मज दुध तुप बाई । मथितां दधि तो धरी रवीं ठायीं ठायीं ।

हट्टे का कदापि नुमजे समजाविल्यास काई । समजाउनी यातें तुझ्या घरांत नेई नेई ॥१॥

राधे हा मुकुंद कडिये उचलोनि घेइ घेई । रडतानां राहिना करुं यांस गत काई काई ॥धृ॥

हरिसी आनंदे राधा मृदु मृदु बोलवीते । पाळण्यांत तुला कृष्णा निजवोणी हालवितें ।

गुह्मा नेऊनियां दही भात कालवितें । यशोदेसी सोडीं कान्हा माझ्याजवळी येई येई ॥२॥

हट्ट मोठा घेतो मला छळितो गे राधे पाहाणें । असाच हा नित्य राधे हरि घरा नेता जाणें ।

उगाचि हा निश्चळ कैसा राहे त्वां समजावल्यानें । तुझी धरिते हनुवटी यासी गुहां नेई नेई ॥३॥

गोविंदा गोपाळा कृष्ना मुकुंदा शेषशाई । जगज्जीवना गोकुळभुषणा गोपी भुलवणा बाई ।

उगा नको रडुं कृष्णा यशोदेसी सोडीं तूंही । एका जनार्दनीं शरण राधे । घेऊन यासी जाई जाई ॥४॥