श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


श्रीकृष्णाचा वेध - अभंग १०३ ते ११८

१०३

येणें छंदे छंद लागली नव्हाळी । हा कान्हो वनमाळी वेध याचा ॥१॥

सरितां सरेना बैसला हृदयीं । तो आतां ठाईचें ठायीं जडलासे ॥२॥

एका जनार्दनी नोहेची परता । संपूर्ण पुरता भरला देहीं ॥३॥

१०४

चंद्राहुनी शीतळ रवीहुनी सोज्वळ तेणे मज केवळ वेधियलें ॥१॥

वेध कैसा मज लागला वो बाई ॥धृ॥

अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदु । रुपेंविण आनंद देखिला बाई ॥२॥

ऐका जनार्दनी आनंदु परिपूर्ण । काया वाचा मनें वेधिलें वो बाई ॥३॥

१०५

दुडीवरी दुडी गौळणी सातें निघाली । गौळणी गोरस म्हणों विसरली ॥१॥

गोविंदु घ्या कोनी दामोदरु घ्या गे । तंव तंव हांसती मथुरेच्या गे ॥२॥

दुडीया माझारी कान्होंबा झाला भरी । उचंबळे गोरस सांडे बाहेरी ॥३॥

एका जनार्दनी सबलस गौळणी । ब्रह्मानदु न समाये मनीं ॥४॥

१०६

गौळणीचा थाट निघाला मथुरे हातालागीं । तें देखोनि जगदीश धांवला गोप घेऊनी वेगीं ॥१॥

कान्हयां सरसर परता नको आरुता येऊं । तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊं ॥धृ॥

सासुरवासिनी आम्ही गौळणी जाऊं दे रे हरी । बहु वेळ लागतां सासु सासरे कोपतील घरीं ॥२॥

आम्हीं बहुजनी येकला तु शारंगपाणी दिससी येथें । हृदयमंदिरीं ठेऊनी तुंतें जाऊं मथुरांपथें ॥३॥

एका जनार्दनी ब्रह्मावादिनी गोपिका बरवटां । कृष्णापदीं त्या लीन झाल्या पूर्णपणें तन्निष्ठा ॥४॥

१०७

ऐक एक सखये बाई नवल;अ मी सांगुं काई । त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई ॥१॥

देवकीने वाईला यशोदेनें पाळिला । पांडवाचा बंदिजन होऊनियं राहिला ॥२॥

ब्रह्माडाची साठवन योगीयाचें निजधन । चोरी केली म्हणऊनी उखळासी बंधन ॥३॥

सकळ तीर्थें जया चरणीं सुलभ हा शूलपाणी । राधिकेसी म्हणे तुझी करीन वेणीफणी ॥४॥

शरण एका जनार्दनीं कैवल्याचा मोक्षदानीं । गाई गोप गोपीबाळां मेळवीले आपुलेपणीं ॥५॥

१०८

भिंगाचे भिगुलें खांद्यावर आंगुलें । नाचत तान्हुलें यशोदेचें ॥१॥

येती गौळणी करीती बुझावणी । लागती चरणी कान्होबाच्या ॥२॥

गोविंद बाळिया वाजविती टाळिया । आमुचा कान्हया देवराज ॥३॥

कडदोरा बिंद्ली वाघनखें साजिरी । नाचत श्रीहरी यशोदेचा ॥४॥

पायीं घागरीया वाक्य साजरीया । कानीच्या बाळ्या ढाळ देती ॥५॥

एका जनार्दनी एकत्व शरण । जीवें निबंलोण उतरती ॥६॥

१०९

कृष्णमूर्ती होय गे काळी आली सोयं गे । प्राणाचाही प्राण पाहतां सुख सांगुं काय गे ॥१॥

तुळशी माळ गळां गे कस्तुरीचा टिळा गे । आर्धांगी रुक्मिणी विंझणे वरित गोपी बाळा गे ॥२॥

पीतांबराची कास गे कसिली सावकाश गे । नारद तुंबर गायन करती पुढें निजदास गें ॥३॥

भक्त कृपेची माय गे वोळखिली विठाई गे । एका जनार्दनीं विटे जोदियेले पाय गे ॥४॥

११०

ब्रह्मा कैसें वेडावलें गे बाइये ॥धृ॥

निर्गुण होतें सगुणा आलें । त्रिभुवन उद्धारित्ने बाईयें ॥१॥

घेऊनि वसुदेव गोकुळा नेलें । यशोदेने खेळविलें गे बाईये ॥२॥

एका एकपण तेंही नेलें । जनीं जनार्दनें केलें गे बाईये ॥३॥

१११

कृष्णाला भुलविलें गोपीने ॥धृ॥

यशोदे तुझा हा कान्हा राहीना । मी मारीन क्रोधाने ॥१॥

नंदजी तुमचा कृष्ण लाडका हाका मरितो मोठ्यानें ॥२॥

वेताटी घेउनी नावेंत बैसला । वांचविले देवानें ॥३॥

एका जनार्दनी पूर्ण कृपेनें । नाहीं ऐकिलें मातेनें ॥४॥

११२

देखिला अवचिता डोळा सुखाचा सागरु । मन बुद्धी हारपला झाले एककारु । न दिसे काया माय कृष्णी लागला मोहरु ॥१॥

अद्वया आनंदा रे अद्वया आनंदा रे । वेधियल्या कामिनी अद्वया आनंदा रे ॥२॥

खुटले येणें जाणें घर सासुर । नाठवे आपपर वेधियलें सुंदर । अति सब्राह्म व्यापिलें कृष्ण पराप्तर नागर वो ॥३॥

सावजी कळलें आतां लोधलें निर्गुणा । एका जनार्दनीं कृपा केली परिपुर्णा । गगनीं गिळियलें येणें उरी नुरेचि आपणा ॥४॥

११३

दिव्य तेज झळकती रत्नकीळा फांकती अगणीत लावण्या तेज प्रभा दिसती गे माये ॥१॥

कानडा वो सुंदर रुपडा गे । अंतरीं बाहेरीं पाहतां दिसे उघडा गे ॥२॥

आलिंगनालागीं मन उताविळ होय । क्षेम द्तां माझें मीपण जाय ॥३॥

मागें पुढें चहुकडे उघडे पाही । पाहावयासी गेलें मजला ठक पडले बाई ॥४॥

बाहेरी पाहुं जातां आतंरी भासे । जें जें भासेम तें तें येकीयेक समरसें ॥५॥

एका जनार्दनीं जिवीचा जिव्हाळा । एक पणें पाहतां न दिसे दृष्टीवेगळा ॥६॥

११४

सुंदर बाळका म्हणती गोपिका यशोदा रोहिणी सन्मुखा । आदि नाटका नाच व्यापका मिळालिया अनेका ।

सर्व पाळका सकळ चाळका सुखदाता सकळिका । धिमी धिमी बाळा नाचे वहिला म्हणती मायादिका ॥१॥

कृष्णा नाव रे व्यापका । म्हणाताती गोपिका ॥धृ॥

दणदण मेदनी वाजत वाम चरणनिघातें । थोंगीत थोंगीत थाक तोडीत चित्त अनुकारें संगीतें ।

टाळछंदें मन वेधें टाळी वाजे अनुहातें । धिम धिम धिमतांग थोंकीत ताळछंदें सांवळें नाचतें ॥२॥

गुप्त प्रगटीत थाक दावित स्थुळ सुक्ष्म आनंदें । धिगीतां धिगीतां वाजती गजरें शास्त्राचेनी विवादें ।

घटतन घटतनं शब्दे बोलती तार्किक गेले भेदें । गर गर गर गर भोवरी देत अवतार संबंधे ॥३॥

रणुझुणु रणझुणु वाजती श्रुति नेति नेति उअच्चारी । आत्मा हा व्यापक नाटक त्रैलोक्य पडलें फेरी ।

यशोदा रोहिणी वृद्ध गौळणी नाचत देह विसरी । पक्षी चारा विसरलें पवन मुख पसरे अंबरी ॥४॥

देव विमानीं पहाती गगनीं ब्रह्मा नाचताहे येउनी । इंद्र ऐरावत नाचत जवळील ब्रह्मास्पती तो मुनी ।

गण गधर्व देव सर्व तेहतीस कोटी मिळोनी । कुबेर पोटा नाचत मोठा कृष्णांछंन घेउनी ॥५॥

शेष वासुकि नाचत वेंगीं चवदा भुवनें माथां । वराह गाढा पृथ्वी दाढां नाचे विसरुनि चिंता ।

तृणें तरुवरें पर्वत कुंजर लाचावले अनंता । सगुण निर्गुण अजंगम स्थावर वेधले अच्युता ॥६॥

घुळु घुळु घुळु घुळु कंकण वाजती बाहुभूषित भूषणां । तो परात्पर त्रैलोक्य सुंदर जगाचिया जीवना ।

खुण खुण संतबोलती संत घांगुरले हरिचरणा । दृष्टी देखिला सबाह्म निवाला एकशरण जनार्दना ॥७॥

११५

गोकुळीं लाघव दावितो चक्रपाणी । भोवंत्या वेष्टित बैसल्या अवघ्या गौळणी ।

मध्येम सुकुमार सांवळा शारंगपाणी । चिमणी पितांबर पिवळा ।

गळां वैजयंती माळा । घवघवीत घनसांवळा । पाहे नंदराणी ॥१॥

नाच रे तू कृष्णा मज पाहुं दे नयनी ॥धृ॥

नाचतो सांवळा सुंदर निमासुर वदन । वाळेघोळ घागरीयांच्या क्षणत्कार पूर्ण ।

आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुनी भुले मदन । हातीच्या मुद्रिका झळकती ।

क्षुद्र किंकणी सुस्वर गती । वाकी नेपुरे ढाळा देती । पहाती गौळणी ॥२॥

सप्तही पाताळें नाचती हरिचिया गण गंधर्व देव सर्व अक्षर हरिपदें ।

वैकुंठ कैलास नाचती । चंद्र सुर्य रसनायक दीप्ति । ऋषिमंडळ धाक तोडिती । अदभुत हरिकिरणी ॥३॥

नाचती सर्वही फणीपाळ । परिवारेस नाचती पृथ्वेचे भूपाळ । मेरू पर्वत भोगी नायक ।

वनस्पती नाचती कौतुक । वेदशास्त्र पुराण पावक । नाचत शुळपाणी ॥४॥

नाचती गोपाळा गोपिका सुंदर मंदिरें । उखळें जाती मुसळें पाळीं आणि देव्हारें ।

धातुमुर्ति नाचुं लागल्या एकसरें । गौळणी अवघ्या विस्मित ।

देहभाव हरपला समस्त । यशादेसी प्रेम लोटत । धरिला धांउनि ॥५॥

शिणलासी नाचतां आतां पुरें करी हरी । विश्वरुप पाहतां गोपी विस्मित अंतरीं ।

यशोदेनें कृष्ण घेतला कडियेवरी । एका जनार्दनी भक्तिभाव ।

अनन्य भक्ता दावी लाघव । निज भक्तांचे काज सर्व । करितां शिण न मानीं ॥६॥

११६

न माये चराचरीं त्रैलोक्य उदरीं । तो यशोदेचे कडेवरी शोभतो कैसा ॥१॥

गोपवेष मिसें ब्रह्माया लाविलें पिसें । तो गोपावत्सवेंषेम शोभतो कैसा ॥२॥

एके घटिकेवरी सोळा सहस्त्र घरीं । नोवरा श्रीहरी शोभतो कैसा ॥३॥

आंगनंविण अंगे गोपी भोगिल्या श्रीरंगें । तो कृष्ण निजांगें शोभतो कैसा ॥४॥

सच्चिदानंदाघन तान्हुलें आपण । एका जनार्दन शोभतो कैसा ॥५॥

११७

प्रथम मत्स्यावतारीं तुमचें अगाध चरित्र । न कळे ब्रह्मादिकां वैष्णव गाती पवित्र ॥१॥

उठोनि प्रातःकाळीं गौळणीं घुसळन घुसळिती । गाती कृष्णाचे पोवाडे हृदयीं परोपरी ध्याती ॥२॥

द्वितीय अवतारीं आपण कच्छरुप झाला । सृष्टी धरुनी पृष्ठी शेवटी सांभाळ केला ॥३॥

तृतीय अवतारीं आपण वराहरुप झाला । धरणी धरुनी दाढे हिरण्याक्ष वधिला ॥४॥

चतुर्थ अवतारीं आपण नरहरि रुप । रक्षुनि प्रल्हाद वधिला हिरण्यकश्यप ॥५॥

पांचवें अवतारीं आपाण वामन झाला । बळी घालुनि पाताळीं शेखीं द्वारपाळ ठेला ॥६॥

सहावे अवतारीं आपण परशुराम झाला । धरुनी परशु हातीं सहस्त्रभुजा वध केला ॥७॥

सातवें अवतारी आपण दाशरथी राम । वधोनी राव्ण कुंभकर्ण सुखी देव परम ॥८॥

आठवें अवतारी आपण अवसुदेवाघरीं । वधोनि कंसादिक असुर मारिले भारीं ॥९॥

नववे आवतारीं आपन बौद्धरुप झाला । धरुनियां मौन भक्तघरीं राहिला ॥१०॥

दहावए अवतारीं आपण झालासें वारु । एका जनार्दनीं वर्णिला त्याचा बडिवारु ॥११॥

११८

अविद्या निशींचा लोटला पहार । रजेंसी लोपला तम अंधकार ।

सत्व शोधित शुद्ध सुमनहार । प्रबोध पाहतां परतला कृष्ण वीरवो ॥१॥

आला रे आला रे म्हणती पहा कृष्ण । जैसा निर्जीवा मीनला जीवप्राण ।

श्रुती परतल्या आत्मासाक्षात्कार देखोनि । तैशा विव्हळ गोपिका हरि पाहुन वो ॥२॥

कृष्णापाशीं मिनल्या व्रजनारी । कां हो निष्ठुर तूं जालासी हरी ।

स्नेह धरिती तयासी होसी दुरी । लोभु सांडीती त्यापाशी निरंतरी वो ॥३॥

थोर शिणलाती तुम्हीं मजविण । माझे स्वरुपीं ठेविला जीव प्राण ।

माझे भेटीसी तंव नाहीं खंडन । सब्राह्मा अंतरी माझे अधिष्ठान वो ॥४॥

ऐसें वचन ऐकोनि हरिमुखें थोर चकल्या वियोगाचे दुःखे ।

आम्हांमारिले शस्त्राविण वचन तिखें । शेखी हें ना तें केले संगदोषें वो ॥५॥

कृष्णां गोपिका वेधल्या एका मनें । माना मुरडिती प्रीति प्रेमाचें रुसणं ।

जेवी श्रुति परतल्या नेति या वचनें । एका जनार्दनी धरुनी ठेल्या मौन्ये वो ॥६॥