श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


वनक्रीडा - अभंग १३९ ते १४७

१३९

उठोनि एके दिनीं म्हणे यशोदा कान्हया । गोधनें घेऊनियां जाई वनासी लवलाह्मा ॥१॥

सवें मिळालें चिमणे सवंगडी । शिदोरी काठी कांबळी जाळी घेती आवडी ॥२॥

एका जनार्दनी गाई सोडिल्या सार्‍या । रामकृष्ण सवंगडीया देव येती पहावया ॥३॥

१४०

घेऊनि गोधनें जाती यमुने तटीं । नानापरी खेळ खेळताती जगजेठी ॥१॥

मेळेवोनि गोपाळ मध्यें खेळे कान्हा । न कलेचि महिमान ऐसा यादवांचा राणा ॥२॥

नानापरींचे खेळ खेळती गोपाळ । नाचती गदारोल मिळोनी सकळ ॥३॥

एका जनार्दनी खेळे मदनपुतळा । नंदरायाचा कुमरु म्हणतात सांवळा ॥४॥

१४१

आनंद सोहळा वृंदावनीं पाहों । नंदजीचा कृष्ण तेणें केला नवलावो ॥१॥

धाकुले संवंगडे गौलणींचा थाट । वेणु पावां वाजविती नाचती दाट ॥२॥

एका जनार्दनीं वेधलें मन । पाहतां पाहतां चित्त जालें उन्मन ॥३॥

१४२

सैराटगोधनें चालती वनां । तयामागें चाले वैकुंठीचा राणा ॥१॥

सांवळे चतुर्भुज मेघःश्याम वर्ण । गाईगोपाळां समवेदा खेळे मनमोहन ॥२॥

यमुनेचे पाबळीं मिळोनियां सकळीं । खेळें चेंडुफळी गाडियांसम ॥३॥

एका जनार्दनीं मदनपुतळा । देखियेला डोळां नंदरायाचा ॥४॥

१४३

विष्णुमूर्ति चतुर्भुज शंख चक्र हातीं । गदा पद्म वनमाळा शोभती ॥१॥

गाई गोपाळ सवंगडे वनां । घेऊनीयां जाय खेळे नंदाचा कान्हा ॥२॥

विटी दांडु चेंडु लागोरी नानापरी । खेळ मांडियेला यमुनेचे तीरीं ॥३॥

एका जनार्दनीं पाहतां तन्मय । वेधलें मन वृत्तिसहित माय ॥४॥

१४४

जो परिपुर्ण परब्रह्मा व्यापक गे माये । तो गोकुळीं गाई चारिताहे ॥१॥

पहा हो भुलला भक्ति प्रेमासी । शिदोर्‍या चोरुनी खाये वेगेंसी ॥२॥

एका जनार्दनी व्यापक देखा । तो गोकुळीम चोरी करी कौतुका ॥३॥

१४५

जयाच्या दरुशनें शिवादिकां तृप्ती । योगी हृदयीं जया ध्याती ।

सहा चारा अठरा जया वर्णिता । सहस्त्रमुखा न कळे जायाची गती ॥१॥

तो हा नंदनंदनु यशोदेचा तान्हा । संवगदे गोपाळ म्हणती कान्हा ।

पराश्ययंती मध्यमा वैखरी नातुडे जाणा । वेडावले जया ठायी रिघाले साधना ॥२॥

आष्टांग साधन साधितां अटी । नोहे नोहे मुनिजना ज्यांची भेटी ।

एका जनार्दनी हातीं घेऊनी काठी । गोधनें चारी आवडीं जगजेठी ॥३॥

१४६

परब्रह्मा सांवळा खेळे यमुना तीरीं । सर्वें घेउनी गायी गोपवत्स नानापरी ॥१॥

कान्होबा यमुनेसी जाऊं । आदरें दहीभात खाऊं ॥२॥

नाचती गोपाळ एक एकाच्या आवडी । परब्रह्मा सांवळा पहातसे संवगडी ॥३॥

एका जनार्दनी ब्रह्मा सारांचे सार । धन्य भाग्य गौळियांचे कृष्ण खेळे परिकर ॥४॥

१४७

उठोनि प्रातःकाळीं म्हणे यशोदा मुरारी । गोपाळ वाट पाहती उभे तुझ्या द्वारीं । शिदोरी घेउनि वेगीं जाय रानीं ॥१॥

यमुनेचे तीरीं खेळ खेळतो कान्हा । नानापरी क्रीडा करी यादवांचा राणा ॥धृ॥

मागे पुढे गोपाळ मध्यें चाले हरी । सांवळा सुकुमार वाजवीं मुरलीम अधरीं । पुच्छे वर करुनी गाई नाचती नाना ॥२॥

मुरलीचा नाद समाय त्रिभुवनीं । किती एक नादें भुलल्या गौळणी । देह गेह सांडोनि चालताती वनीं ॥३॥

खग मृग गायी व्याघ्र नसे दुजा भाव । सकळीं उच्चारण एक कॄष्ण नांव । काया वाचा मनें शरण एका जनार्दनीं ॥४॥