श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


रासक्रीडा - अभंग १६६ ते १७३

१६६

वनमाजीं नेती गोपिका तयासीं । राम क्रीडा खेळावयासी एकांती ॥१॥

जैसा जया चित्ती हेत आहे मनीं । तैसा चक्रपाणी खेळतसे ॥२॥

जया जैसा भाव तैसा पुरविणें । म्हणोनि नारायणें अवतार ॥३॥

एका जनार्दनी घेऊनी अवतार । भक्ताचे अंतर जैसें तैसें ॥४॥

१६७

जैसा केला तैसा होय आपोआप । संकल्प विकल्प न धरी कांहीं ॥१॥

न म्हणे उंच नीच यातीकुळ । वर्ण व्यक्ति शील न पाहेची ॥२॥

उच्छिष्ट तें प्रिय गौळियांचे खाये । हमामा हुंबरी नाचतसे घायें ॥३॥

एका जनार्दनीं सांडोनियां थोरपणा । खेळतांहीं न्युन न बोलें कांहीं ॥४॥

१६८

चला बाई वृंदावनीं रासक्रीडाम पाहुं । नंदाचा बाळ येणें केला नवलाऊ ॥१॥

कल्पनेची सासु इचा बहुताचि जाचु । देहभाव ठेऊनी पायां ब्रह्मापदीं नाचुं ॥२॥

सर्व गर्व सोडूनी बाई चला हरेपाशीं । द्वैतभाव ठेवुनी पायीं हरिरुप होसी ॥३॥

एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहतां अवघें स्वप्नवत वाव ॥४॥

१६९

पहा हो पहा वृदांवनीं आनंदु । क्रीडा करी यशोदेचा बाळ मुकुंद ॥१॥

गोपाळ गौळिणी मिळवोनि गोधनें । काला वाटी हमामा खेळे मांडोनि देहुंडें ठाणे ॥२॥

रासमंडळ रची आडवितसे गौळणी । जाऊनियां धरी राधिकेची वेणी ॥३॥

एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहतां अवघें स्वप्नवत वाव ॥४॥

१७०

खांद्यावरे कांबळी हातामधीं काठी । चारितसे धेनु सांवळा जगजेठी ॥१॥

राधे राधे राधे राधे मुकुंद मुरारी । वाजवितो वेणु कान्हा श्रीहरी ॥२॥

एका एक गौळनी एकएक गोपाळा । हातीं धरुनि नाचती रासमंडळा ॥३॥

एका जनार्दनी रासमडळ रचिलें । जिकडे पाहे तिकडे अवघें ब्रह्मा कोंदलें ॥४॥

१७१

गोपिका त्या बोल बोलती आवडी । एकताती गडी संभोवतें ॥१॥

सभोंवतें तया न कळेची खूण । पहाती विंदान श्रीहरींचें ॥२॥

गोपिका कामातुर त्या मनीं । जाणोनि चक्रपाणी रास खेळे ॥३॥

षण्मास खेळ खेळती अबला । एका जनार्दनीं कळा न कळे कोण्हा ॥४॥

१७२

रासक्रीडा खेळ खेळॊनिया श्रीहरी येती परोपरी गोकुळासी ॥१॥

न कळेची कवणा कैसें हें विंदान । वेदादिकां मौन पडिलेंसे ॥२॥

तें काय कळे आणिकां जीवांसी । ऋषी मुनी तापसी धुंडीताती ॥३॥

एका जनार्दनीं ऐसा खेळे खेळां । परब्रह्मा पुतळा नंदाघरीं ॥४॥

१७३

रासक्रीडा करुनी आलिया कामिनी । कृष्णी लांचावल्या आन न रिघे मनीं ॥१॥

जें जें दृष्टी दिसे तें तें कृष्ण भासे । गोपिका समरसे नित्य बोधु ॥२॥

आसनीं शयनीं भोजनीं गमनागमनीं सर्व कर्मीं सदा कृष्णमय कामिनी ॥३॥

एका जनार्दनी व्याभिचार परवडी । गोपिका तारिल्या सप्रेम आवडीं ॥४॥