श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


पिंगा - अभंग १७७ ते १७८

१७७

पिंगा बाई पिंगा गे । अवघा धांगडधिंगा गे ॥१॥

सांडोनी संतांची गोडी गे । कासया पिंगा जोडी गे ॥१॥

नको घालूं पिंगा गे । तुम्हींरामरंगी रंगा गे ॥३॥

एका जनार्दनीं पिंगा गे । कायावाचा गुरुचरणीं रंगा गे ॥४॥

१७८

निराकाराचा आकार झाला । त्यांतच माझा पिंगा जन्मला । निराकारासी घेऊन आला ॥१॥

माझा पिंगा घालितो धिंगा ॥धृ॥

पिंग्यापासुन शंकर झाला । ढवळ्या नदींवर बसुन आला । माझ्या पिंग्यानें धक्का दिला । माझा ॥२॥

पिंग्यापासुन मच्छ झाला । शंकसुराचा प्राण घेतला । चारी वेद घेउनी आला ॥माझा ॥३॥

पिंग्यापासुन कूर्म झाला । पर्वत पाठीवर घेतला । चौदा रत्‍नें घेऊन आला ॥माझा ॥४॥

पिंग्यापासुन वराह झाला । हिरण्याक्षाचा प्राण घेतला । पृथ्वी वरती घेऊन आला ॥ माझा ॥५॥

पिंग्यापासुन नरसिंह झाला । हिरण्यकश्यप दैत्य वधिला । प्रह्लाद भक्त रक्षिला ॥ माझा ॥६॥

पिंग्यापासुन वामन झाला । बलीदान मांगु लागला ॥ बळी पाताळीं घातला ॥ माझा ॥७॥

पिंग्यापासुन भार्गव झाले । मातेचें शिर छेदियेलें । अवघे राजे नाहीसे केलें ॥ माझा ॥८॥

पिंग्यापासुन राम झाले । पितृवचन सांभाळिलें । रावण कुंभकर्ण मरिले ॥ माझा ॥९॥

पिंग्यापासुन कृष्ण झाला । कंसाचा प्राण घेतला ॥ गोकुळ सोडुन मथुरेसी आला ॥ माझा ॥१०॥

पिंग्यापासुन बौद्ध झाला । दिलें जगन्नाथ नांव त्याला । भक्तांनी दहींभात चारिला ॥ माझा ॥११॥

ऐसा निराकाराचा पिंगा । त्यांत माझा श्रीरंगा । एका जनार्दनीं पाडुरंग । माझा पिंगा घालितो धिंगा ॥१२॥