श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


लगोरी - अभंग १९१ ते १९२

१९१

खेळ मांडिला लगोरी । खेळताती नानापरी । चेंडु घेउनि अपुलें करीं । खेळताती एकमेक ॥१॥

देती आपुलाला डाव । ज्याचा जैसा आहे भाव । तोचि जिंकीतसे वैभव । आणिक पहाती उगे वाव ॥२॥

बरोबर करुं गडी । नाहीं विषमता जोडी । चेंडु हाणती तांतडी । येती हरिया बैसती गडी ॥३॥

एका जनार्दनी कान्होबा भला । खेळा गोविलें कीं सकळां । आपण असेचि निराळा । नवल कळा पाहे डोळा ॥४॥

१९२

त्रिगुणात्मक माडियेला डाव । सहा चार अठरा गडी वांटिले एका त्यांचे नाव ॥१॥

कान्होबा खेळूं लागोरीचा खेळ । तुम्ही आम्ही मिळूं एका ठायीं सहज होईलमेळा ॥२॥

चौदा बारा सोला पंचविसाचा करुनी मेळ । एक एका पुढे पळती अवघा हलकलोळ ॥३॥

एका जनार्दनीं म्हणे कन्होबा खेळ अतु आवरीं । खेळ खेळतां शिणलों आम्हीं पुरे बा वेरझारी ॥४॥