श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


हुतुतु - अभंग २१८ ते २३१

२१८

माडियेला डाव पोरा हुतुतुतुतु । नको घालुं फेरा पोरा हुतुतुतुतु ॥१॥

लक्ष चौर्‍याशींचा डाव खेळ मांडियेला । लक्ष जाणे तोचि तेंथोनि सुटला ॥२॥

सहा चार अठरा यांचे पडों नको । एका जनार्दनी संता शरण जाई ॥३॥

२१९

विवेक वैराग्य दोघें भांडती । ज्ञान अज्ञान पाहाती रे । आपुले स्वरुपीं होऊनि एक चित्त झाली सकळ सृष्टी रे ॥१॥

हुतुतुतुतु खेळूं रे गडिया हुतुतुतुतु खेळू रें । रामकृष्ण गोविंद हरी नारायण निशिदिनीं भजन करा रे ॥धृ॥

हिरण्यकश्यप प्रल्हादपुत्र खेळतां आले हातघाई रे । बळेंचि आला फळी फोडुनी गेला पित्यासी दिधलें डायीं रें ॥२॥

राम रावण सन्मुख भिडता बरवा खेळ मांडिलां रे । कुंभकर्ण आखया इंद्रिजितासी तिघांसी पाडिले डायीं रे ॥३॥

कौरव पांडव हुतुतु खेळती खेळिया चक्रपाणी रे । कामक्रोध जीवें मारिला उरुं दिला नाहीं कोणी रे ॥४॥

एका जनार्दनीं हुतुतु खेळतां मन जडलें हरी पायी रे । विवेक सेतु त्यांनी बांधिला उतरुन गेलें शायीं रे ॥५॥

२२०

आंगीचिया बळें खेळसी हुतुतु । वृद्धपण आलिया तोंडावरी थुथुथु ॥१॥

कासया खेळसी वायां भजें गुरुराया । चुकविल डाया हुतुतुतु ॥२॥

एका जनार्दनीं हुतुतु नको भाई । मन जिंकुनियां लागे कान्होबाचे पायीं ॥३॥

२२१

गाई राखतां दिससी साना । तैं म्हणों यशादेचा कान्हा ॥

आतां न मानिसी अवघ्या गगना ।तुं ना कळसी ध्यानामना रे कान्होबा ॥१॥

कान्होबा आमुचा सखा होसी । शेखीं नीच नवा दिससा रे कान्होबा ॥धृ॥

गाई राखितां लागली संवे । तैं जेऊं आम्हीं तुजसवें ।

तुं मिटक्या मारिसी लाघवें । तुझीं करणी ऐशी होये ॥२॥

धांगडतुतु खेळुं सुरक्या । डायीं आलीया मारुं बुक्या ।

आतां महिमा ये देख्या । काय कीर्ति वर्णावी सख्या ॥३॥

तूं ठायींचा खादाड होसी । तुं शोकिली बा मावसी ।

आतां माया गिळुं पाहासी । उबगलों तुझ्या बा पोटासी ॥४॥

तुज लक्षिता पारुषे ध्यान । ध्यातां ध्येय हारपलं मन ।

एका अवलोकीं जनार्दन । तुझें हुंबलीनें समाधान रे कान्होबा ॥५॥

२२२

माडियेला खेळ हमामा हुंबरी । मारुनी हिरण्यकश्यपु प्रल्हाद खेळिया करी ॥१॥

हुतुतुतु हुमरी हुतुतुतु हुमरी ॥धृ॥

जाउनी लंकेवरी खेळ मांडियेला । रावण कुंभकर्ण वधोनि शरणगत रक्षिला ॥२॥

माडियेला खेळ खेळें अर्जुनाचे रथीं । मारुन कौरव खेळे नानापरींची गती ॥३॥

धरुनी गोपेवेष मरियेला कंसमामा । नानापरी खेळ खेळे गोपाळांसी हमामा ॥४॥

येउनी पंढरेपुरा पुंडलिकासाठीं । एका जनार्दनीं कर ठेवुनीं उभा राहिला काटीं ॥५॥

२२३

हमामा हुबरी खेळती एक मेळा । नानापरींचें गोपाळ मिळती सकळां ॥१॥

एक धावें पुढें दुजा धावे पाठीं । एक पळें एकापुढें एक सांडोनि आटी ॥२॥

ऐसें गुतलें खेळा गाई धांवती वनीं । परतेनाची कोण्हा एका जनार्दनीं ॥३॥

२२४

अगम्य तुझा खेळ न कळे अकळ । ब्रह्मादिक वेडे जाले तेथें आम्हां कैचें बळ ॥१॥

कान्होबा भला भला तुं होसी । चोरी करुनि दिसों न देसी रे कान्होबा ॥२॥

चोरुनी शिदोर्‍या आमुच्या खासी । शेखी वळतीया धाडिसी रे कान्होबा ॥३॥

एका जनार्दनीं आमुचा होंसी । दास्यात्व करुनी दिसों न देसी कान्होबा ॥४॥

२२५

बहु खेळतं खेळ । कळॊं आले सकळ । शेवटीं तें निर्फळ । जालें बाळकृष्ण ॥१॥

कान्होबा पुरे पुरे आतां खेळा । येता जातां श्रम जाला रे कान्होबा ॥धृ ॥

आम्हीं न खेळु विटिदांडुं । भोवरं लागोर्‍या रे चेंडु ।

एकीबेकीतें सांडुं । मीतूपण अवघें खंडुं रे कान्होबा ॥२॥

लक्ष लावुं तुझे खेळा । न गुंतु आणिका चाळा ।

एका जानर्दनीं पाहुं डोळां तुझ्या खेळाची अगम्य लीला रे कान्होबा ॥३॥

२२६

तुझिया खेळा बहु भ्याले । नेणों ब्रह्मादिक ठकले ॥१॥

कान्होबा आमुचा तुं गडी । न सोडिसी आपुली खोडी ॥२॥

चोरी करितां गौळणी बांधिती । तुझी न कळे वेदशास्त्रं गती ॥३॥

एका जनार्दनीं शरण । आम्हीं न सोंडुं तुझे चरण रे कान्होबा ॥४॥

२२७

गाई चारी कान्होबा । गोपाळ सांगाती उभा । अनुपम्य त्याची शोभा । नाचती प्रेमानंदें ।

गाताती भोगिता छंदे । मन वेधिलें परमानंदें रे कान्होबा ॥१॥

भला कान्होबा भला । भला कान्होबा भला ॥धृ॥

गौळियांची आंधळीं पोरें । गाईपाठीं धांवतीं सैरें । हरि म्हणे रहा स्थिरें ।

तुमची आमची बोली । पहिलीच आहे नेमिली । त्वा बरीच ओळखी धरली रे कान्होबा ॥२॥

तुझीं संगती खोटी । आम्हां धाडिसी गाईचे पाठीं । तुं बैससी जगजेठी ।

तिझें काय केलें आम्हीं । तुं जगाचा हा स्वामी ।

तुझा महिमा आगमनिगमीं । काहीं न कळे रे कान्होबा ॥३॥

माझी गाय आहे दुधाची । तुला सांपडली फुकाची । मला चोरी काय लोकांची ।

कां पडलासी आमुचे डायीं । भिन्न भेद नाहीं । एक जनार्दनीं मन पायी रे कान्होबा ॥४॥

२२८

कान्होबा सांभाळी आपुली गोधनें तुझ्या भिडेनें कांहीं न म्हणे ॥१॥

तुं बैसासी कळंबाखाली । वळती देतां आमुचे पाय गेली ॥२॥

तुझीं गोधनें बा अचाट । धांवती देखोनी विषय हिरवट ॥३॥

तूं बैसोनी करिसी काला । आमुच्या शिदोर्‍या करुनी गोळा ॥४॥

खातोसी दहीं भाताचा गोळा । आम्हाकदे न पहासी उचलोनी डोळा ॥५॥

वेधिलें आमुचे जीवपण । ठकविलें आम्हाकारण ॥६॥

एका जनार्दनीं परमानंद । आम्ही भुललों तुज गोविंदा ॥७॥

२२९

नको तु आमुचे संगतीं । बहु केलीसे फजिती ।

हें तुज सांगावें पा किती । ऐकती तुं नायकासी रे कान्होबा ॥१॥

जाई तु आपुली निवडी गोधनें । आम्हां न लगे तुझें येणें जाणे रे कान्होबा ॥धृ॥

तुझी संगती ठाउकी आम्हां । त्वां मारिला आपुला मामा ।

मावशी धाडिली निजधामा । जाणों ठावा आहेसी आम्हा रे कान्होबा ॥२॥

तुझें संगती नाश बहु । पुनः जन्मा न येऊं ।

एका जनार्दनीं तुज ध्याऊं । आवडीनें लोणीं खाऊं रे । कान्होबा ॥३॥

२३०

गडी मिळाले सकळ । यमुनेतटीं खेळ खेळती ॥१॥

धांवती ते सैरावैरा । खेळ बरा म्हणती ॥२॥

विसरलें तहान भुक । देखोनी कौतुक खेळांचे ॥३॥

भुललें संवगडी देखोनी । एका जनार्दनीं म्हणतसे ॥४॥

२३१

ऐकतां वचन कान्हया म्हणती गडी । काय खेळायाची आतां न धरुं गोडी ॥१॥

लावियेला चाळा त्वा जगजेठी । आतां आम्हां सांगसी तुं ऐशा गोष्टी ॥२॥

एका जनार्दनीं कान्होबा खेळ पुरे आतां । मांडु रे काला आवडी आनंता ॥३॥