श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७

२७२

ॐ कारा परतें निर्गुणा आरुतें । भक्तांसी निरुतें गोकुळीं वसे ॥१॥

सांवळें सगुन चैतन्य परिपुर्ण । संवगदियासी जाण क्रीडा करी ॥२॥

आदि मध्य अंत न कळे ज्या रुपाचा । तोचि बाळ नंदाचा म्हणताती ॥३॥

एका जनार्दनीं वेगळाचि पाहीं । हृदयीं धरुनी राही सांवळियासी ॥४॥

२७३

सांवळा श्रीकृष्ण राखितो गाई । वेधियलें मन आमुचें तें पायीं ॥१॥

नवल लाघव न कळे ब्रह्मादिकां । वेदश्रुतीं शिणल्या ठक पडलें सकळिकां ॥२॥

साही दरुशनें वेडावलीं जयासाठीं । खांदी घेऊनी कांबळा गोधन राखी जगजेठी ॥३॥

एका जनार्दनीं ब्रह्मा गोकुळीं उघडें । पाहतां चित्त तेथें वेधलें ॥४॥

२७४

निर्गुण सगुण श्रुतीसी वेगळें । तें रुप सांवळें गोकुळीं वसे ॥१॥

डेळियांची धनी पाहतां न पुरे । तयालागीं झुरे चित्त माझें ॥२॥

वेडावलीं दरुशनें भांडती अखंड । वेदांचे तें तोंड स्तब्ध जाहलें ॥३॥

एका जनार्दनीं सांवळें सगुण । खेळतसे जाण वृदांवनीं ॥४॥

२७५

ब्रह्मादिकां न कळे तें रुप सुंदर । गोकुळीं परिकर नंदाघरीं ॥१॥

रांगणां रांगतु बाळलीले खेळतु । दुडदुडां धांवतु गायीपाठीं ॥२॥

गौळणीचे घरीं चोरुनि लोणी खाये । पिंलंगतां जाये हतीं न लगे ॥३॥

एका जनार्दनी त्रैलोक्यां व्यापक । गाई राखे कौतुक गौळियांसी ॥४॥

२७६

जाणते नेणते होतु ब्रह्माज्ञानी । तयांचे तो ध्यानी नातुडेची ॥१॥

सुलभ सोपारे गोकुळामाझारीं । घरोघरीं चोरी खाय लोणी ॥२॥

न कळे ब्रह्मादिकां करितां लाघव । योगियांची धांव खुटें जेथें ॥३॥

एका जनार्दनीं चेंडुवाचे मिसें । उडी घालितसे डोहामाजीं ॥४॥

२७७

विश्वाचा व्यापक विश्वंभर साक्षी । नये अनुमानासी वेदशास्त्रां ॥१॥

नवल गे माय नवल गे माय । चोरुनियां खाय नवनीत ॥२॥

धरिती बांधती गौळणी बाळा । वोढोअनि सकळां आणिताती ॥३॥

एका जनार्दनीं येतो काकुलती । न कले ज्यांची गति वेदशास्त्रां ॥४॥

२७८

मेळवीं संवगडे खेळतसे बिन्दी । शोभतसे मांदी गोपाळांची ॥१॥

सांवळां सुंदर वैजयंती हार । चिन्मय परिकर पीतांबर ॥२॥

मुगुट कुंडले चंदनाचा टिळा । झळके हृदयस्थळी कौस्तुभमणी ॥३॥

एका जनार्दनीं वेधलेंसे मन । नाही भेद भिन्न गौळणीसी ॥४॥

२७९

मिळती सकळां गौळणी ते बाळा । लक्ष लाविती डोळां कृष्णमुखा ॥१॥

धन्य प्रेम तयांचे काय वानुं वाचें । न कळे पुण्य त्यांचे आगमानिगमां ॥२॥

आदरें गृहा नेती मुख पैं धृताती । जेवूं पै घालिती दहींभात ॥३॥

एका जनार्दनीं प्रेमाची पैं लाठी । धांवुनी इठी मिठी घेतो बळें ॥४॥

२८०

पाहुनी कृष्णासी आनंद मानसी प्रेमभरित अहर्निशीं कृष्णनामें ॥१॥

आजीं कां वो कृष्ण आला नाहीं घरां । करती वेरझारा नंदगृहीं ॥२॥

भलतीया मिसें जातीं त्या घरासी । पाहतां कृष्णासी समाधान ॥३॥

एका जनार्दनीं वेधल्या गौळणी । तटस्थ त्या ध्यानीं कृष्णाचिया ॥४॥

२८१

वेधल्या त्या गोपी नाठवे आपपर कृष्णमय शरीर वृत्ति जाहली ॥१॥

नाठवे भावना देह गेह कांहीं । आपपर त्याही विसरल्या ॥२॥

एका जनर्दनीं व्यापला हृदयीं । बाहेर मिरवी दृष्टिभरित ॥३॥

२८२

जगाचें जीवन ब्रह्मा परिपुर्ण । जनीं जनार्दन व्यापक तो ॥१॥

तो ह्री गोकुळीं रांगणा नंदाघरीं । गौळणी त्या सुंदरीं खेळविती ॥२॥

वेद गीतीं गातीं शास्त्रें विवादतीं । खुंटलीसे मति शेषादिकांची ॥३॥

एका जनार्दनी चहूं वाचां परता । उच्छिष्ट सर्वथा भक्षी सुखें ॥४॥

२८३

परब्रह्मा सगुण असे परात्पर । वेदादिकां पार न कळे ज्याचा ॥१॥

पाहतां पाहतां वेधलेसें मन । नये अनुमोदन शास्त्रादिकां ॥२॥

एका जनार्दनी व्यापुनी वेगळा । त्यासी गौळणी बाळा झकविती ॥३॥

२८४

आकार निराकार विश्वरुपाचा ॐकार । तो हा सर्वेश्वर बाळरुपें ॥१॥

रांगणारांगतु हळुच पिलंगतुं । आनंदभरितु नंदराय ॥२॥

अंगणीं धांवतु सर्वेंचि बैसतु । अचोज दावितु भक्तालागीं ॥३॥

एका जनार्दनीं नित्य निरामय । न कळे वो माया काय बोलूं ॥४॥

२८५

चहुं वाचांपरता चहुं वेदां निरुता । न कळे तत्त्वतां चतुर्वक्त्रा ॥१॥

चौबारा खेळतु सौगंडी सांगातु । लोणी चोरुं जातु घरोघरीं ॥२॥

चौसष्ट वेगळा चौदांसी निराळा । अगम्य ज्याची लीळा सनकादिकां ॥३॥

एका जनार्दनीं चहुं देहावेगळा । संपुष्टी आगळा भरला देव ॥४॥

२८६

लक्षांचे जें लक्ष तो दिसे अलक्ष । तो असे प्रत्यक्ष नंदाघरीं ॥१॥

बाळरुप गोजिरें वाळे वांकी साजिरें । पाहतां दृष्टीचे पुरे कोड सर्व ॥२॥

ध्यानाचें निज ध्यान मनाचें अधिष्ठान । व्यापक विधान महेशाचे ॥३॥

एका जनार्दनीआं शब्दाची नातुडे । गौळणी वाडेंकोडें जेवाविती ॥४॥

२८७

अबोलणें बोल कुंठीट पै जाहलें । तें निधान देखिलें नंदाघरीं ॥१॥

अधिष्ठान मुळ व्यापक सकळ । जगाचें तें कुअळ कल्पद्रुम ॥२॥

एका जनार्दनीं बिंबी बिंबाकार । सर्वत्र श्रीधर परिपुर्ण ॥३॥

२८८

शेषादिक श्रमले न कळे ज्याचा पार । आगमानिगमा निर्धार न कळेची ॥१॥

तें हें बाळरुप यशोदे वोसंगा । पाहतां दोषभंगा जाती रया ॥२॥

करितसे चोरी खोडी नानापरी । यशोदा सुंदरी कोड वाटे ॥३॥

बांधिती गळिया धांवोनी दाव्यानें । नका नका म्हणे दीनवाणी ॥४॥

त्रिभुवनासी ज्याचा धाक तो ब्रह्मांडी । त्यासी म्हणती भांडी आला बाऊ ॥५॥

भिऊनियां लपे यशोदे वोसंगा । ऐशा दावी सोंगा भाविकांसी ॥६॥

एका जनार्दनीं दावितो लाघव । ब्रह्मादिकां माव न कळे ज्यांची ॥७॥

२८९

तिहीं त्रिभुवना ज्याची सात्त वाहे । तो चोरी करिताहे घरोघरीं ॥१॥

न कळे न कळे लाघव तयाचें । ब्रह्मादीक साचे वेडावती ॥२॥

वेद शास्त्र श्रुती कुठित पै होती । तया गौळणी बांधिनी धरुनियां ॥३॥

योग मुद्रा साध्न योगी साधिताती । तयांसि नाहे प्राप्ति हेंचि रुप ॥४॥

तें बाळरुप घेउनि वोसंगा । हालविती पई गा बाळकृष्णा ॥५॥

जयाचेनि होय तृप्ति पैं सर्वांसी । तो मागे यशोएसी दहींभात ॥६॥

दहींभात लोनी खाउनी न धाय । घरोघरीं जाय चोरावया ॥७॥

एका जनार्दनीं न कळे वैभव । दावितसे माव भोळ्या जना ॥८॥

२९०

रखितो गोध्नेआं मनाचेनी मनें । न पुरे अवसरु धावण्यां धावणें ।

कुंठित जाहली गति पवनाची तेणें । तो हा नंदाचा नंदन यशोदेचें तान्हें ॥१॥

देखिला देखिला मंडित चतुर्भुज । वैकुठींचा भूपति तेजःपुंज ।

पहातांचि तय नावडे काहीं दुजें । ऐसें लाघव याचें सहज ॥२॥

चित्त चैतन्य पडिली मिठी । कामिनी मनमोहना जगजेठी ।

तुझ्या वेधे ध्यानस्थ धुर्जटी । ऐसा गोवळु योगीयांसीनोहे भेटी ॥३॥

एका जनार्दनी शब्दवेगळा । आंगमांनिगमां कांहीं न काळे लीळा ।

सोहं कोहं शब्दावेगळा । पहा पहा परब्रह्मा पुतळा ॥४॥

२९१

सानुले तानुले राम आणि कृष्ण । गोकुळीं विंदान दाविताती ॥१॥

गाई राखिताती लोनी चोरिताती । अकळ खेळताती नानापरी ॥२॥

एका जनार्दनी नये अनुमाना । ब्रह्मादिक चरणा वंदिताती ॥३॥

२९२

धन्य भाग्य गोकुळींचे राज्य । जेथें क्रीडा केली यादवराजें ॥१॥

काय तें वानुं सुख आनंदु । सुख संतोष गोकुळीं परमानंदु ॥२॥

एका जनार्दनीं जगाचे जीवन । मूर्ति पाहता दिसे सगुण निर्गुण ॥३॥

२९३

योगी शिणताती साधनकपाटीं । तया नोहे भेटीं कांही केल्या ॥१॥

तो हरी गोकुळीं बाळवेषे खेळे । पुरती सकळ मनोरथ ॥२॥

गोपिका तयासी कडेवरी घेती । वालादुला म्हणती माझे माझें ॥३॥

एका जनार्दनीं जया जैसा हेत । तैसा पुरवीत देवराव ॥४॥

२९४

यशोदेचा हरी जाय यमुनातीरीं । वाजवीतो मुरली पोवा नानापरी ॥१॥

छंदे छंदे वाजे वृंदावनीं फुजें । वेधलें मन माझें नाठवें कांहीं ॥२॥

ऐसें येणें पिसें लाविलें गे माये । एका जनार्दनीं पाहिला यादवराय ॥३॥

२९५

रूपें सुंदर सांवळा गे माये । वेणू वाजवीं वृदांवना गोधनें चारिताहे ॥१॥

रुणझुण रुणझुण वाजवी वेणु । वेधीं वेधलें आमुचें तनमुन वो माये ॥२॥

गोधनें चारी हातीं घेऊनी काठी । वैकुंठीचा सुकुमार गोपवेषें जगजेठी ॥३॥

एका जनार्दनीं भुलवी गौळणी । करिती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

२९६

आदि नाटक सर्व व्यापक व्यापुनी निराळा । गोप गोधनें गौळणीयांसी लाविला चाळा ॥१॥

मनमोहन कृष्ण यशोदेचा बाई । चोरी करी नानापरी धरितां न सांपडे बाई ॥२॥

जयाचे विंदान न कळे ब्रह्मादिकां वो माये । ठकविलें देवा आपणाचि काला खाये ॥३॥

एका जनार्दनीं ऐसा चौदेहा वेगळा । पुराणें वेडावलीं न कळे अगम्य ज्याची लीला गे माये ॥४॥

२९७

पांघुरला घोंगडे काळें । वृदांवनीं गोपाळा माजीं खेळे ।

काला वाटीं निजांगें गोपाळ । खेळ खेळे नानापरी ॥१॥

पाहती देव बैसोनि विमानीं । ब्रह्मादिक ध्याती जया मनीं ।

आराध्यदैवत सनकादिकांचे हृदयभुवनीं । शिवादि पायावणी वंदिती ॥२॥

नानापरी विटीदांडु चेंडु । हमामा हुमरी लगोर्‍या मांडुं ।

नव लक्ष मिळावे सवंगडु । यमुनेथडी कळंबातळीं ॥३॥

गोंधने ठाई ठाईं बैसविले । गोपाळ सवंगडे भोवते शोभले ।

मध्येम घननीळ ते सांवळें । नंदरायाचें गोठुलें गे माये ॥४॥

एका जनार्दनींशरण । पाहतां देहीं विरालें देहपण ।

संपुर्ण जनीं जनर्दन । पाहतां पाहतां गेलों भुलोन गे मायें ॥५॥

२९८

चतुर्भुज शामसुंदर । गळां गुण्जींचे हार ।

निढळीं चंदन शोभे परिकर । मिरवे नंदरायाचा किशोर ॥१॥

हातीं काठी खांदी कांबळीं । गाई राखे यमुनेचे पाबळी ।

नाचती गोपाळ धुमाळी । पृष्टी जाळी दहींभात ॥२॥

जे निगमांचे ठेंवणें । सनकसनंदाचे घोसुलें येणें ।

शंभुचे आराध्यदैवत केणें । तें चरित गोधनें नंदाची ॥३॥

ऐसा अकळ नाकळें हरी । वेणु वाजवी छंदे नानापरी ।

एका जानार्दनी गोपेवेषें निर्धारीं । वाटी शिदोरी गोपाळं ॥४॥

२९९

खेळे कान्हा यमुनेचे तटीं । राखितो गोधनें घेउनी हातीं काठी ॥१॥

पांघुरला घोंगडें रत्नजडित गे माये । नंदरायाचा खिल्लारी तो होय ॥२॥

गोप गोंधनें सवंगडे नानापरी । दहींभात काला वांटितो शिदोरी ॥३॥

एका जनार्दनीं खेळे नानापरी । वेधोनि नेलें मन नाठवे निर्धारी ॥४॥

३००

लाहे लाहे सोडीत गोधनें । भोंवतें गोपाळ वेष्टित तारांगणें ।

शोभला तो बाळवेषें परिपुर्ण । वेधु लाविला आम्हांसी तेणें वो ॥१॥

छंदे छंदें वाजवितो वेणु । आमुचा गुंतला तेथे जीवप्राणू ।

नाठवे दुजा हेत कांहीं आनु । तो हा नंदनंदुनु यशोदचा ॥२॥

खेळे खेळे यमुनेचे तटीं । सुकुमार सांवळा जगजेठी ।

खांदा घोगडें शोभे हातीं काठी । गोपाळांसी वळत्या दे सये घाली मिठी ॥३॥

एका जनार्दनीं कळंबातळीं । मिळोनियां गोपाळमंडळीं ।

काला मांडियेला मिळोनि सकळीं । लाहे लाहे वाटी शिदोरी ॥४॥

३०१

राखीत गोधनें भक्ताचियां काजा । उणीव सहजा येवो नेदी ॥१॥

आपुलें थोरपणा सारुनी परतें । भक्तांचे आरुतें काम करी ॥२॥

उच्छिष्ट काढणें सारथ्य करणें । उच्छिष्टं तें खाणें तयांसवें ॥३॥

चुकतां वळती आपण वोळणें । एका जनार्दनीं पुण्य धन्य त्यांचें ॥४॥

३०२

नीच कामें न धरी लाज । धांवें देखोनि भक्तांचे काज ।

ऐसा सांवळां चतुर्भुज । रुप धरी गोजिरें ॥१॥

उच्छिष्ट गोपाळांचे खाये । वळत्या त्यांचे देणे आहे ।

राखुनी गोधनें माय । मागें मागें हिंडतसे ॥२॥

काला करी यमुनेतीरीं । स्वयें वाटितो शिदोरी ।

उच्छिषाटाचि भारी । हाव अंगें स्वीकारी ॥३॥

ऐसा कृपेचा कोंवळा । उभा यमुनेचे पाबळा ।

एका जनार्दनी लीळा । अगम्य ब्रह्मादिकां ॥४॥

३०३

न देखतां कृष्णवदन । उन्मळती तयांचे नयन ।

न घेती अन्नजीवन । कृष्णमुख न पाहतां ॥१॥

कोठें गुंतला आमुचा कृष्ण । ऐशी जया आठवण ।

गायी हुंबरती अधोवदन । कृष्णमुख न पाहतां ॥२॥

सवंगडे ठायीं ठायीं उभे । कृष्णीं दृष्टी ठेवुनी लोभें ।

आजी कृष्ण कांहो नये । आम्हांशी खेळावया ॥३॥

ऐशी जयांची आवडी । तयां पदो नेदी सांकडी ।

एका जनार्दनी उडी । अंगे घाली आपण ॥४॥

३०४

सांवळा देखिला नंदाचा । तेणें आनंदाचा पुर झाला ॥१॥

काळीं घोंगडी हातामध्यें काठी । चारितो यमुनातटीं गोधनें तो ॥२॥

एका जनार्दनीं सावंळा श्रीकृष्ण । गौळणी तल्लीन पाहतां होती ॥३॥

३०५

पाहिला नंदाचा नंदन । तेणें वेधियलेम मन ॥२॥

मोरमुकुट पितांबर । काळ्या घोंगडीचा भार ॥२॥

गोंधनें चारी आनंदे नाचत । करी काला दहीं भात ॥३॥

एका जनार्दनीं लडीवाळ बाळ तान्हा । गोपाळांशीं कान्हा खेळे कुंजवना ॥४॥

३०६

जयांचे उदारपण काय वानुं । उपमेसी नये कल्पतरु कामधेनु ।

वेधीं विधियेलें आमुचें मनु । तो हा देखिला सावळा श्रीकृष्ण ॥१॥

मंजुळ मंजुळ वाजवी वेणु । श्रुतीशास्त्रा न कळें अनुमानु ।

जो हा परापश्यंती वेगळा वामनु । तया गोवळा म्हणती कान्हू ॥२॥

रुप अरुपाशीं नाहीं ठाव । आगमीनिगमां न कळे वैभव ।

वेदशास्त्रांची निमाली हांव । एका जनार्दनीं देखिला स्वयमेव ॥३॥

३०७

गोकुळी गोपाळसवें खेळतसे देव । ऐक प्रेमभाव तयांचा तो ॥१॥

गोधनें राखणें उच्छिष्ट खादणें । कालाहि करणे यमुनेतीरी ॥२॥

सवंगडियांचे मेळी खेले वनमाळी । घोंगडी ते काळी हातीं काठी ॥३॥

त्रैलोक्यांच्या धनीं वाजवी मुरली । भुलवी गौळणी प्रेमभावें ॥४॥

घरोघरीं चोरी करितो आदरें । एका जनार्दनीं पुरे इच्छा त्यांची ॥५॥

३०८

त्यांचिया इच्छेसारखें करावें । त्यांच्या मागें जावे वनांतरीं ॥१॥

वनासी जाऊनी नानापरी खेळे । हमामे हुतुतु बळें गडी घेती ॥२॥

सर्वांघडी संतां सर्वावरिष्ट देव । तयावरी डाव गाडी घेती ॥३॥

अंगावरी डाव आला म्हणती गोपाळ । देई डाव सकळ आमुचा आम्हां ॥४॥

पाठीवरी बैसती देवतें म्हणती । वांकरे श्रीपति वेंगीं आतां ॥५॥

एका जनार्दनी गडियांचे मेळीं । खेळें वनमाळी मागें पुढें ॥६॥

३०९

मागें पुढें उभा हातीं घेउनी काठी वळत्या धांवे पाठीं गाईमागें ॥१॥

गोपाळ बैसती आपण धांवे राणा । तयांच्या वासना पूर्ण करी ॥२॥

वासना ते देवें जाया दिली जैशी । पुरवावी तैसी ब्रीद साच ॥३॥

ब्रीद तें साच करावें आपुलें । म्हणोनियां खेळे गोपाळांत ॥४॥

एका जनार्दनीं खेळतो कन्हया । ब्रह्मादिकां माया न कळेची ॥५॥

३१०

तिहीं त्रिभुवनीं सत्ता जयाची । तो गोपाळाचि उच्छिष्टे खाय ॥१॥

खाउनी उच्छिष्ट तृप्तमय होय । यज्ञाकडे न पाहे वांकुडे तोंडे ॥२॥

ऐसा तो लाघव गोपाळांसी दावी । एका जनार्दनीं काहीं काळों नेदी ॥३॥

३११

न कळे लाघव तया मागें धांवे । तयांचे ऐकावे वचन देवें ॥१॥

देव तो अंकित भक्तजनांचा सदोदित साचा मागें धावें ॥२॥

गोपाळ आवडीं म्हणती कान्हया । बैसे याची छाया सुखरुप ॥३॥

सुखरुप बैसे वैकुंठींचा राव । भक्तांचा मनोभाव जणोनियां ॥४॥

जाणोनियां भाव पुरवी वासना । एका जनार्दनी शरण जाऊं ॥५॥

३१२

भक्तांचा पुरवी लळा । तो सांवळा श्रीकृष्ण ॥१॥

उचलिला पर्वतगिरी । नाथिला काळ्या यमुनेतीरीं ॥२॥

अगबग केशिया असुर । मारिला तो कंसासुर ॥३॥

उग्रसेन मथुरापाळ । द्वारका वसविलीं सकळ ॥४॥

द्वारकेमाजीं आनंदघन । शरण एका जनार्दनी ॥५॥

३१३

कमळगभींचा पुतळा । पाहतां दिसे पूर्ण कळा । शशी लोपलासे निराळा । रुपवासही ॥१॥

वेधक वेधक नंदनंदनु । लाविला अंगीं चंदनु । पुराणपुरुष पंचाननु । सांवळां कृष्ण ॥२॥

उभे पुढे अक्रुर उद्धव । मिळाले सर्व भक्तराव । पाहाती मुखकमळभाव । नाठवे द्वैत ॥३॥

रुप साजिरें गोजिरें । दृष्टि पाहतां मन न पुरे । एका जनार्दनीं झुरे । चित्त तेथे सर्वदा ॥४॥

३१४

द्वारकेभीतरीं । कामधेनु घरोघरीं ॥१॥

कैशी बरवेपणाची शोभा । पाहतां नयनां निघती जिभा ॥२॥

घरोघरीं आनंद सदा । रामकृष्न वाचे गोविंदा ॥३॥

ऐशी द्वारकेपरी । एका शरण श्रीहरी ॥४॥

३१५

जगांचे जीवन भक्तांचे मोहन । सगुण निर्गुण ठाण शोभतसे ॥१॥

तें रुप गोकुळीं नंदाचिये घरीं । यशोदे मांडिवरी खेळतसे ॥२॥

इंद्रादी शंकर ध्यान धरती ज्यांचें । तो लोणी चोरी गौळ्यांचे घरोघरीं ॥३॥

सर्वावरी चाले जयाची ते सत्ता । त्यांची बागुल आला म्हणतां उगा राहे ॥४॥

एकाचि पदें बळीं पाताळी घातला । तो उखळीं बांधिला यशोदेनें ॥५॥

जयाचेनी तृप्त त्रिभुवन सगळे । तो लोणीयाचे गोळे मागुन खाय ॥६॥

एका जनार्दनी भरुनी उरला । तो असें संचला विटेवरी ॥७॥

३१६

खेळसी तुं लीळा । तुझी अनुपम्य काळा ।१॥

बारवा बरवा श्रीमुकुंद । गाई गोपाळी लावला वेध ॥२॥

खेळसी बाळपनीं । बांधीताती तुज गौळणी ॥३॥

ऐसा नाटकी हरी । उभा ठेला विटेवरीं ॥४॥

विटे उभा समचरणीं । शरण एका जनार्दनीं ॥५॥

३१७

अर्जुनाचे रथीं श्रमला जगजेठी । म्हणोनि कर ठेउनी कंटीं उभा येथें ॥१॥

धरुनी गोवर्धन उभा सप्तदीन । म्हणोनि कर जघन ठेउनी उभा ॥२॥

कंसादी मल्ल मारी जरासंध । ते चरणरविंद उभे विटे ॥३॥

धर्माघरीं उच्छिष्टपात्र काढी करें । म्हणोनि श्रमें निर्धारें ठेविले कटीं कर ॥४॥

पुंडलीक भक्त देखोअनि तल्लीन जाला । एका जनार्दनीं ठेविला कटाई कर ॥५॥