श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


पंढरी माहात्म्य - अभंग ३६१ ते ३७०

३६१

प्रयागादि तीर्थे आहेत समर्थ । परी पुरती मनोरथ पंढरीये ॥१॥

बहुत ते साक्ष देती या स्थळासी । सदा तो मनासी शिव ध्याये ॥२॥

आनंद सोहळा त्रैलोक्य अगाध । पंढरीये भेदाभेद नाहींसत्य ॥३॥

एका जनार्दनी क्षेत्रवासी जन । देवा ते समान सत्य होती ॥४॥

३६२

समुद्रवलयांकित पृथ्वी पाहतां । ऐसें तीर्थ सर्वथा नाहीं कोठें ॥१॥

भाविकांचें माहेर जाणा पंढरपुर । विठ्ठल विटेवर उभा असे ॥२॥

एका जनार्दनीम तयाचाचि ठसा । भरुनि आकाशा उरलासे ॥३॥

३६३

उत्तम तें क्षेत्र उत्तम तें स्थळ । धन्य ते राऊळ पाहतां डोळां ॥१॥

एक एक तीर्थ घडती कॊटी वेळां । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥२॥

गंगा प्रदक्षिणा समुद्राचे स्नान । परी हें महिमान नाहीं कोठें ॥३॥

वैष्णवांचा मेळ करिती गदारोळ । दिंडी पताका घोळ नोहे कोठें ॥४॥

एका जनार्दानी सारांचे हें सार । पंढरी मोहरे भाविकांसी ॥५॥

३६४

देव भक्त दोन्हीं तीर्थ क्षेत्र नाम । ऐसा एक संभ्रम कोठें नाहीं ॥१॥

प्रयागादी तीर्थ पहाती पाहतां । न बैसे तत्त्वतां मन माझें ॥२॥

पंढरीची ऐसा आहे समागम । म्हणोनि भवभ्रम हरलासे ॥३॥

एका जनार्दनीं पाहतां विठ्ठल देव । फिटला तो भेव संसाराचा ॥४॥

३६५

सकळीक तीर्थे पाहतां डोळा । निवांत नोहे हृदयकमळा ॥१॥

पाहतां तीर्थे चंद्रभागा । सकळ दोष गेले । भंगा ॥२॥

पाहती विठ्ठल सांवळा । परब्राह्मा डोळां देखियेलें ॥३॥

एका जनार्दनीं पाहोनी ध्यान । भुललें मन त्या ठायीं ॥४॥

३६६

पावन क्षेत्र पंढरपुर । पावन तीर चंद्रभागा ॥१॥

पावन संत पुडलीक । पावन देख श्री विठ्ठल ॥२॥

पावन देह गेलीया तेथें । होती जीवनमुक्त सर्व जीव ॥३॥

एका जनार्दानीं पावन । पावन पंढरी अधिष्ठिन ॥४॥

३६७

अवघें आनंदाचें । क्षेत्रं विठ्ठल देवांचे ॥१॥

अवघें हे पावन । तीर्थ चंद्रभागा स्नान ॥२॥

अवघे संतजन । पुंडलिकासी वंदन ॥३॥

अवघा विठ्ठल देव । एका जनार्दनीं भाव ॥४॥

३६८

अवघें परब्रह्मा क्षेत्र ।अवघें तेथें तें पवित्र ॥१॥

अवघा पर्वकाळ । अवघे दैवाचे सकळ ॥२॥

अवघीयां दुःख नाहीं । अवघे सुखाचि तया ठायीं ॥३॥

अवघे आनंदभरित । एका जनार्दनीं सदोदित ॥४॥

३६९

अवघें क्षेत्र पंढरी । अवघा आनंद घरोघरीं ॥१॥

अवघा विठ्ठलचि देव । अवघा अवघिया एक भाव ॥२॥

अवघे समदृष्टी पहाती । अवघे विठ्ठलाचि गाती ॥३॥

अवघे ते दैवाचे । एका जनार्दनीं साचे ॥४॥

३७०

नाभीकमळी जन्मला ब्रह्मा । तया न कळे महिमा ॥१॥

पंढरी क्षेत्र हें जुनाट । भुवैकुंठ साजिरीं ॥२॥

भाळे भोळे येती आधीं । तुटती उपाधी तयांची ॥३॥

एकपणें रिगतां शरणा । एक जनर्दनीं तुटे बंधन ॥४॥