श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


पंढरी माहात्म्य - अभंग ३७१ ते ३८०

३७१

बहुता काळाचें हें क्षेत्र । सकळ देवांचें माहेर । सकळ संतांचे निजमंदिर । तें हें पंढरपुर जाणावें ॥१॥

धन्य पंढरीचा महिमा । नाहीं आणीक उपमा । जेथें वास पुरुषोत्तमा । रुक्मिणीसहित सर्वदा ॥२॥

धन्य भक्त पुंडलीक । सकळ संताचा नायक । एका जनार्दनीं देख । श्रीविठ्ठल आवडी ॥३॥

३७२

महाक्षेत्र पंढरपुर । नांदे विठ्ठ्ल सचार ॥१॥

तया ठायीं सुख आहे ।संत जाणती तो लाहें ॥२॥

विश्रांतीचें स्थान । भावाभाव समान ॥३॥

दुःख दरिद्र नाहीं । वाचे म्हणतां विठाबाई ॥४॥

नोहे बाधा काळाची । ऐसी मर्यादा संताची ॥५॥

जनार्दनाचा एक म्हणे । घ्यावें पेणें तेथींचें ॥६॥

३७३

ऐसें पंढरीचें स्थान । याहुनी आणिक आहे कोण ॥१॥

विष्णसहित कर्पूरगौर । जेथे उभे निरंतर ॥२॥

पुढें भीवरा शोभती । पुंडलिकांची वसती ॥३॥

ऐसें सांडोनी उत्तम स्थळ । कोठें वास करुं निर्मळ ॥४॥

म्हणे जनार्दनाचा एका । प्रेमळ संत नांदती देखा ॥५॥

३७४

ऐसे विश्रांतींचे स्थान । आणिके ठायीं नाहीं जाण ॥१॥

तें हें जाणा पंढरपुर । मुक्त मुमुक्षुचें माहेर ॥२॥

जगीं ऐसें स्थळ । नाहीं नाहीं हो निर्मळ ॥३॥

एका जनार्दनीं निकें । भूवैकुंठं नेटकें ॥४॥

३७५

वेदाभ्यासं श्रमलें । पुराण वक्ते ते भागले ॥१॥

तया विश्रांतीस स्थान । अधिष्ठान पंढरी ॥२॥

शास्त्राभ्यास नेहटीं । वादावाद दाटोदाटीं ॥३॥

एका जनार्दनीं शरण । पंढरी स्थान ऐशिया ॥४॥

३७६

ज्या सुखा कारणें योगाभ्यास । शरीर दंड काय क्लेश । तें उभें आहे अपैस । भीमातीरीं वाळुवंटीं ॥१॥

न लगे दंडन मुंडनी आटी । योगायागाची कसवटी । मोकळी राहाटी । कुंथाकुंठी नाहीं येथें ॥२॥

न लगे अष्टांग धूम्रपान । वायु आहार पांचग्र्नि साधन । नग्न मौन एकांत स्थान । आटाआटी न करणे ॥३॥

धरुनियां संतसंग । पाहें पाहे पांडुरंग देईन । सुख अव्यंग । एका जनार्दनीं निर्धारें ॥४॥

३७७

जप तपें तपता कोटीं । होती हिंपुटी भाग्यहीन ॥१॥

तया विश्रांतीसी स्थान । पंढरी जाण भुमंडली ॥२॥

योगयाग धूम्रपान करिती । नोहे प्राप्ति तयासी ॥३॥

तो उभा कटीं कर ठेवुनी । समचरणीं विटेवरी ॥४॥

एका जनार्दनीं पाहातां । दिठीं कंदर्प कोटी वोवाळिजे ॥५॥

३७८

दुस्तर मार्ग आटाआटी । पंढरी सृष्ती तारक ॥१॥

कोणा न लगे दंडन । कायापीडन कष्ट ते ॥२॥

नको उपवास विधीचा पडदा । शुद्ध अशुद्धा न पहावें ॥३॥

मुगुटमणीं पुंडलीक । दरुशनें पातक हरतसे ॥४॥

एका जनर्दनीं निर्मळ । पंढरी स्थळ सर्वांसी ॥५॥

३७९

जें देवा दुर्लभ स्थान । मनुष्यासी तें सोपें जाण ॥१॥

या ब्रह्माडांमाझारीं । सृष्टी जाणावी पंढरी ॥२॥

एक एक पाऊल तत्त्वतां । घडे अश्वमेध पुण्यता ॥३॥

एका जनार्दनीं ठसा । विठ्ठल उभाची सरसा ॥४॥

३८०

उभा देव उभा देव । निरसी भेव भविकांचे ॥१॥

न लगे कांही खटाटेप । पेठ सोपी पंढरी ॥२॥

नको नको वेदपाठ । सोपी वाट पंढरी ॥३॥

शास्त्रांची तो भरोवरी । सांडी दुरी पंढरीचे ॥४॥

योगयाग तीर्थ तप । उघडती अमुप पंढरीये ॥५॥

एका जनार्दनीं स्वयं ब्रह्मा । नांदे निष्काम पंढरीये ॥६॥