श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


पंढरी माहात्म्य - अभंग ३९१ ते ४००

३९१

नित्य घडे चंद्रभागे स्नान । श्रीविठ्ठलदरुशन ॥१॥

त्याच्या पुण्या नोहे लेखा । पहा द्रुष्टी पुंडलिका ॥२॥

उजवें घेतां राऊळासी । जळती पातकांच्या रासी ॥३॥

संतांसवें कीर्तन करितां । आनंदे टाळी वाजवितां ॥४॥

मोक्ष जोडोनियां हात । तयाची वाट तो पहात ॥५॥

धन्य पंढरीचा संग । एक जनार्दनीं अभंग ॥६॥

३९२

भागीरथी आणि भीमरथी वदतां । समान तत्वतां कलीमाजीं ॥१॥

प्रातःकाळीं नमस्मरण जो गाय । तीर्थीं सदा न्हाये पुण्य जोडे ॥२॥

वदतां वाचें नाम घडतां एक स्नान । पुनरपि न आगमन मृत्यूलोकमें ॥३॥

एक जनार्दनीं भीमरथीं वदतां । प्रयागीं समता सरी न पवे ॥४॥

३९३

चंद्र पौर्णिमेचा दिसे पा सोज्वळ । तैसा श्रीविठ्ठल पंधरीये ॥१॥

क्षीरसिंधुसम भीवरा ती वाहे । स्नान करितां जाय महत्पाप ॥२॥

सनकसनंदनसम पुंडलीक । शोभा आलोलिक वर्णु काय ॥३॥

लक्ष्मी प्रत्यक्ष रखुमाई राही । एका जनार्दनीं पायीं लीन जाला ॥४॥

३९४

पुष्पावती चंद्रभागे । करितां स्नान भंगे दोष ॥१॥

पाहतां पुंडलीक नयनीं । चुके जन्म नये अयनीं ॥२॥

घेतां विठ्ठलदरुशन । होती पातकी पावन ॥३॥

करितां प्रदक्षिना । पुन्हा जन्म नाहीं जांणा ॥४॥

एका जनार्दनीं शरण । कळस पाहतां मुक्त जाण ॥५॥

३९५

अवलोकितां चंद्रभागा । सकळ दोष जाती भंगा ॥१॥

स्नान करितं भीवरेसी ॥ तरती पातकी अपैसी ॥२॥

दृष्टीं पाहतां विठठल देव न राहे काळाचें भेव ॥३॥

हरुषें वाहातां टाळीं । एका जनार्दनी मुक्त केलीं ॥४॥

३९६

दृष्टी पाहतां भीमातरी । स्वर्गीं वास तया निरतरां ॥१॥

ऐसा तेथीचा महिमा । आणिक नाहीं दुजी उपमा ॥२॥

दक्षिन द्वारका पंढरी । वसे भीवरेचे तीरीं ॥३॥

जेथें वसे वैकुंठ देवो । एका जनार्दनीं गेला भेवो ॥४॥

३९७

जयां आहे मुक्ति चाड । तयांसी गोड पंढरी ॥१॥

देव तीर्थ क्षेत्र संत । चहूंचा होत मेळा जेथ ॥२॥

कृष्णरामादि नामगजर । करिती उच्चार अट्टाहास्ये ॥३॥

स्त्रियाआदि नर बाळें । कौतुक लीळे नाचती ॥४॥

एका जनार्दनीं तयांसंगीं । विठ्ठलरंगी नाचतुसे ॥५॥

३९८

त्रिविधपातें तापलें भारी । तया पंढरी विश्रांती ॥१॥

आणिके सुख नाही कोठें । पाहतां नेटें कोटि जन्म ॥२॥

कालाचेहि न चले बळ । भुमंडळ पंडरीये ॥३॥

भुवैकुंठ पंढरी देखा । ऐसा लेखा वेदशास्त्री ॥४॥

एका जनार्दनी धरुनि कास । पंढरीचा दास वारकरी ॥५॥

३९९

तापत्रयें तापलीया पंढरीसी यावें । दरुशनें मुक्त व्हावें हेळामात्रें ॥१॥

दुःखाची विश्राती सुखाचा आनंद । पाहतां चिदानंद विठ्ठल देव ॥२॥

संसारीं तापलें त्रितापें आहाळले । विश्रांतीये आले पंढरीसी ॥३॥

सर्वांचे माहेर भाविकंचे घर । एका जनार्दनी निर्धान केला असे ॥४॥

४००

तिहीं त्रिभुवनीं पातकी पीडिले । ते मुक्त जाहले पंढरीसी ॥१॥

पाहतां सांवळा अवघीयां विश्रांती । दरुशनें शांतीं पातकीयां ॥२॥

एका जनार्दनीं पाहतां रुपडे । कैवल्य उघडे विटेवरी ॥३॥