श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


पंढरी माहात्म्य - अभंग ४०१ ते ४१०

४०१

पतित पातकी खळ दुराचारी । पाहतां पंढरी मोक्ष तयां ॥१॥

स्वमुखं भक्तां सांगतों आपण । नका अनुमान धरुं कोणी ॥२॥

चंद्रभागा दृष्टी पाहतां नरनारी । मोक्ष त्यांचे घरीं मुक्तिसहित ॥३॥

चतुष्पाद पक्षी कीटकें अपार । वृक्ष पाषाण निर्धार उद्धरती ॥४॥

एका जनार्दनीं न घ्यावा संशय । दरुशनें जाय पापताप ॥५॥

४०२

राहुनी पंढरीये जाण जो नेघे विठठलदरुशन ॥१॥

महापातकी चांडाळ । त्याचा न व्हावा विटाळ ॥२॥

जिताची भोगी नर्क । जो विठ्ठला विन्मुख ॥३॥

न करी स्नान चंद्रभागे ॥ तो कुष्टी सर्वागें ॥४॥

नेघे पुंडलीकदरुशन । एका जनार्दनीं तया बंधन ॥५॥

४०३

पापाची वस्ती जाणा । पंढरीसी नाहीं कोण्हा ॥१॥

अवघे भाग्याचे सदैव । तेथें वसे विठ्ठल देव ॥२॥

माहेर भाविका । देखिलीया पुडलिका ॥३॥

जनार्दनाचा एका म्हणे । पंढरी पेणें सुखवस्ती ॥४॥

४०४

पूर्व सुकृताची गांठोडी पदरीं । तरीच पंढरी वास घडे ॥१॥

कोटी यज्ञफळ भीमरथी पाहतां । मोक्ष सायुज्यता ततक्षणीं ॥२॥

पृथ्वीचे दान असंख्या गोदानें । पंडलीक दरुशनें न तुळती ॥३॥

एका जनार्दनीं विठ्ठलाचे भेटी । वेरझारा तुटी जन्मोजन्मीं ॥४॥

४०५

पढरीचा महिमा । आणिक नाहीं त्या उपमा ॥१॥

धन्य धन्य जगीं ठाव । उभा असे देवराव ॥२॥

साक्ष ठेवुनी पुंडलिका । तारितसे मुढ लोकां ॥३॥

एका जनार्दनी देव । उभाउभीं निरसी भेव ॥४॥

४०६

अविनाश क्षेत्र पंढरी सर्वथा । आणीक ती वर्ता नये मना ॥१॥

सर्व तीर्थ मार्ग विधियुक्त आहे । येथें उभा पाहे पांडुरंग ॥२॥

आटणी दाटणी मुंडणी सर्वथा । नाहीं पैं तत्त्वतं यया तीर्थो ॥३॥

करावें तें स्नान पुंडलीक वंदन । देखावें चरण विठोबाचे ॥४॥

जनार्दनाचा एका पंढरी सांडुनी । न जाय अवनीं कवण तीर्थीं ॥५॥

४०७

भाविकांसी नित्य नवें हें सोपारें । पंढरी उच्चार करितां वाचें ॥१॥

हो कं अनामिक अथवा शुद्ध वर्ण । ज्ञातीसी कारण नाहीं देवा ॥२॥

एका जनार्दनीं भलती ज्ञाती असो । परी पांडुरंग वसो हृदयमाजीं ॥३॥

४०८

पिकली पंढरी पिटिला धांडोरा । केणें आलें घरा सभागियांच्या ॥१॥

चंद्रभागे तीरीं उतरले बंदर । आले सवदागर साधुसंत ॥२॥

वैष्णव मिळोनि केला असे सांठा । न घेतो करंटा अभागीया ॥३॥

एका जनार्दनीं आलें गिर्‍हाईक । वस्तु अमोलिक सांठविली ॥४॥

४०९

सप्तपुर्‍यांमांजीं पढरी पावन । नामघोष जाण वैष्णव करिती ॥१॥

देव तो विठ्ठल देव तो विठ्ठल । आहे सोपा बोल वाचेम म्हणतां ॥२॥

आणिक कांहीं नको यापरतें साधन । विठ्ठल निधान टाकुनियां ॥३॥

एका जनार्दनीं विठ्ठला वांचुनी । आन नेणें मनीं दुजें कांहीं ॥४॥

४१०

धन्य चंद्रभागा धन्य वाळूवंट । तेथें सभादाट वैष्णवांची ॥१॥

ठायीं ठायीं कीर्तन होत नामघोष । जळाताती दोष जन्मातरींचे ॥२॥

पहा तो नारद उभा चंद्रभगेंत । गायन करीत नामघोष ॥३॥

धन्य विष्णु पहा धन्य वेणुनाद । क्रीडा करी गोविंद सर्वकाळ ॥४॥

पौर्णिमेचा काला वेणुनादीं जाहला । वांटिती सकळीं पाडुरंग ॥५॥

स्वगींचे सुरवर प्रसाद इच्छिती । नाहीं त्यांसी प्राप्ति अद्यापवरी ॥६॥

तुम्हां आम्हां येथें कैसें सांपडले । उपकार केलें पुडलीके ॥७॥

धन्य ते पद्माई धन्य ते पद्माळ । येऊनी सकळ स्नाने करिती ॥८॥

धन्य दिंडीर वन रम्य स्थळ फर । रखुमाई सुंदर वास करिती ॥९॥

चोखोबानें वस्तीं केली ऐलथडी । उभारिली गुढी स्वानंदाचे ॥१०॥

धन्य पुंडलीक भक्त शिरोमणी । तेणें चक्रपाणी उभा केला ॥११॥

मायाबापाची सेवा तेणें केली सबळ । म्हणोनी घननीळा आतुडला ॥१२॥

लोह दंड क्षेत्र पंढरपुर । उभा विटेवर पांडुरंग ॥१३॥

त्रैलोक्याचा महिमा आणिला तया ठाया । तीर्थ व्रतें पायां विठोबाच्या ॥१४॥

तिहीं लोकीं पाहतीं ऐसें नाहीं कोठें । परब्रह्मा नीट विटेवरी ॥१५॥

एका जनार्दनीं ब्रह्मा पाठीं पोटीं । ब्रह्मानिष्ठा येती तया ठायां ॥१६॥