श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


पंढरी माहात्म्य - अभंग ४२१ ते ४३०

४२१

पंढरीये पांडुरंग । भोवंता संग संतांचा ॥१॥

चंद्रभागा वाळुवंट । आहे नीट देव उभा ॥२॥

पुडलीक वेणुनाद । होतो आनंद अखंड ॥३॥

पद्मतळें गोपाळपुर । संत भार आहे तेथें ॥४॥

वैष्णवांचा गजर मोठा । आषाढी चोहटा नाचती ॥५॥

जाऊं तेथें लोतागणीं । फिटेल आयणीं गर्भवास ॥६॥

भाळे भोळे येती भक्त । आनंदें नाचत वाळुवंटी ॥७॥

लोंटागण घालूं चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥८॥

४२२

त्रैलोक्याचा जो धनी । समचरणीं पंढरीये ॥१॥

धरुनियाबाळरुपी । उभाचि पहा पा विटेवरी ॥२॥

शोभताती संतभार । करतीं जयजयकार नामघोष ॥३॥

पुढें दक्षिनवाहिनी भीमा । ऐसा महिमा तेथीचा ॥४॥

एका जनार्दनीं वेधलें मन । लागलें ध्यान विठोबाचें ॥५॥

४२३

धन्य ते भाग्याचे । वास करिती पंढरीचे ॥१॥

करती नित्य प्रदक्षिणा । स्नान चंद्रभागे जाणा ॥२॥

पुंडलिकाची भेटी । वेणुनाद पाहती दृष्टी ॥३॥

करिती एकादशी । जाग्रण आनंदें मानसीं ॥४॥

तया पुण्या नाहीं लेखा । म्हणे जनार्दनीं एका ॥५॥

४२४

हरिचे ते दास । ज्यांचा पंढरीसी वास ॥१॥

येती नेमें पंढरीसी । दरुशन घेती विठ्ठलासी ॥२॥

करिती चंद्रभागे स्नान । पूर्वजा उद्धरतीं जाण ॥३॥

करिती गोपाळकाला । गोपाळपुरी मिळोनी मेळा ॥४॥

ऐसा जया घडे नेम । एका जनार्दनी निष्काम ॥५॥

४२५

तुम्हीं पढरीये जातां । तरी मी पाया लागेन आतां ।

चरणरजें जाली साम्यता । तुमचे पाऊल माझे माथां ॥१॥

जेथें जेथें पाउल बैसे । एका एकपणेंविण असे ॥धृ॥

पंढरीचे वाटे । पसरिले ते मी गोटे ।

पाया लागेन अवचटे । तें सुख आहे मल मोठे ॥२॥

जेथें पाउलांचा माग । तेथें माझें अखंड अंग ।

चरणरज आम्हां भोग । काय करशील वैकुंठ चांग ॥३॥

संत भेटतील वाडेंकोडें । तरी मी आहे पायांपुढे ।

हेही आठवण न घडे । तरी मी वाळवंटीचें खडे ॥४॥

यात्रा दाटेल घसणीं । लागेन अवघियां चरणीं ।

एका जनार्दनीं कीर्तनीं । आठवा आसनीं शयनीं ॥५॥

४२६

उभा कर ठेऊनी कटीं । अवलोकी दृष्टी पुंडलीकं ॥१॥

न्या मज तेथवरी । या वारकारी सांगातें ॥२॥

पाहीन डोळे भरुनी हरी । दुजी उरी ठेविना ॥३॥

मीपणाचा वोस ठाव । पाहतां गांव पंढरी ॥४॥

वारकारी महाद्वारी । कान धरुनी करीं नाचती ॥५॥

शरण एका जनार्दनीं । ते संत पावन पतीत ॥६॥

४२७

देव भक्त उभे दोन्हीं एके ठायीं । चला जाऊं पायीं तया गांवा ॥१॥

आवडीचा हेत पुरेल मनाचा । उच्चारितां वाचा विठ्ठल नाम ॥२॥

करुनियां स्नान पुंडलिकांची भेटी । नाचुं वाळुवंटीं वाहु टाळी ॥३॥

अजाऊ महाद्वारीं पाहुं तो सांवळा । वोवाळुं गोपाळा निबलोण ॥४॥

एका जनार्दनीं मनोरथ पुरे । वासना ते नुरे मांगे कांहीं ॥५॥

४२८

निबलोण करुं पंढरीया सुखा । आणि पुडंलिका भक्तराया ॥१॥

परलोकींचे येती परतोनि मागुती । सर्व सुख येथें पहावया ॥२॥

अष्ट महासिद्धि जयाचिये द्वारीं । होऊनि कामारी वोळंगतीं ॥३॥

मुक्तिपद देतां न घे फुकासाठीं । ते हिंडे वाळुवंटी दीनरुप ॥४॥

एका जनार्दनीं करे निभलोण । विटेसहित चरण ओवाळावें ॥५॥

४२९

दक्षिण द्वारका पंढरी । शोभतसे भीमातीरीं ॥१॥

चला जाऊं तया ठायां । वंदू संताचिया पायां ॥२॥

नाचुं हरुषें वाळुवंटीं । पुंडलिक पाहुनी दृष्टी ॥३॥

एका जनार्दनीं मागत । येवढा पुरवी मनींचा हेत ॥४॥

४३०

आम्हीं मागतों फुकांचे । तुम्हां देतां काय वेंचे ॥१॥

संतसंग देई देवा । दुजा नको कांहीं गोवा ॥२॥

पंढरीसी ठाव द्याव । हेंचि मागतसें देवा ॥३॥

एका जनार्दनीं मागत । येवढा पुरवी मनींचा हेत ॥४॥