श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


पंढरी माहात्म्य - अभंग ४५१ ते ४६०

४५१

पंढरीसी जा रे आधीं । कृपानिधी तो पाहा ॥१॥

संसाराअचीअ तुटेल बेडी । उबगे घडी पंढरीये ॥२॥

गाताती भाळे भोळे । प्रेमें सांवळें नाचत ॥३॥

कुंचे पताका गरुड टके । वैष्णवा निके मेळ मिळे ॥४॥

दिंडी कथाजाग्रह । एका जनार्दनीं ते पावन ॥५॥

४५२

पंढरीसी जा रे सदा । पुंडलीक वरदा येथें उभा ॥१॥

तुम्हीं कारा हाचि नेम । धरा संतसमागम ॥२॥

देतो सकळांसि मोक्ष । न लगी ध्येय ध्यान लक्ष ॥३॥

जनार्दनें शिकविलें । एका जनार्दनीं लाधलें ॥४॥

४५३

गाती नाचती आनंदे वैष्णवजन । ते दाखवा भुवन पंढरी ॥१॥

आदरें येती वारकारी । नानापरी संवगडे ॥२॥

नरनारी एके ठायीं । पाहतीं वीठ्ठल रखुमाई ॥३॥

सुख अदभुत विश्रांती । एका जनार्दनीं धरा चित्ती ॥४॥

४५४

संसारा आलिया जा रे पंढरीपुरा । पाडुरंग सोयरा पहा आधीं ॥१॥

पुरती मनोरथ इच्छिले ते सांचे । अनंत जन्माचे दोष जाती ॥२॥

करितां स्नान भीमरथी तटीं । पुंडलीक दृष्टी लक्षुनियां ॥३॥

वेणुनाद गया पिडंदान फळ । गोपाळपूर सकळ देखिलिया ॥४॥

एका जनार्दनीं सारांचेआं तें सार । पंढरी माहेर सकळ जीवां ॥५॥

४५५

जन्मासी येऊनि पहा रे पंढरी । विठ्ठल भीमातीरीं उभा असे ॥१॥

ठेविले चरण दोन्ही विटेवरी । आलियांसी तारी दरुशनें एका ॥२॥

पंचक्रोशी प्रानी पुनीत पै सदा । ऐशी ही मर्यादा पंढरीची ॥३॥

एका जनार्दनीं कीर्तनगजर । ऐकतां उद्धार सर्व जीवां ॥४॥

४५६

हरी म्हणोनी टाकी पाय । तया लाभा उणें काय ॥१॥

नेमें जाती पंढरीसी । आषाढी कार्तिकी वारीसी ॥२॥

घनदाट पिकली पेठ । आलें चोखट ग्राहीक ॥३॥

वस्तु अमोल विटेवरी । एका जनार्दनी अंगिकरी ॥४॥

४५७

निर्धारीतां सुख पंढरीसी आहे । म्हणोनि उभारिती बाह्मा वेदशास्त्रें ॥१॥

साधन पसारा न करी सैरावैरा । जाया तु निर्धारा पंढरीये ॥२॥

एका जनार्दनीं धरुनी विश्वास । विठोबाचा दास होय वेगें ॥३॥

४५८

स्वहित हित विचारीं मानसीं । कां रे नागविसी देहासी या ॥१॥

साव्धान हो पाहे बा पंढरी । धरीं तु अंतईं संतसंग ॥२॥

नको पंडुं फेरी चौर्‍यायंशीं आवृत्ती । गाय तुं किर्ती वैष्णवांची ॥३॥

तरले बहुत तरती भरंवसा । विश्वास हा बापा धरी ऐसा ॥४॥

सुगम सोपा चुकती जेणें खेपा । एका जनार्दनीं जपा विठ्ठल नाम ॥५॥

४५९

करा करा लागपाठ । धरा पंढरीची वाट ।

पुंडलिकांची पेठ । सोपी आहे सर्वांसी ॥१॥

नाहीं कोठें गोवा गुंती । दुजा नको रे सांगातीं ।

एका चित्तवृत्ति । दृढ करीं मानसीं ॥२॥

नको माझें आणि तुझें । टाकी परतें कीं रे वोझें ।

संतचरण रज । सेवीं कां रे आदरें ॥३॥

तुटतीं भक्तिजाळ गुंती । सहज होतसे विरक्ति ।

एका जनार्दनीं प्रीती । धरा संतचरणीं ॥४॥

४६०

श्रीपांडुरंगाचे दरुशन । वास पंढरीसी जाण ।

कोटी यागांचे पुण्य । तया घडे नित्यची ॥१॥

हाचि माना रे विश्वास । धरा संतवचनीं निजध्यास ।

मोक्षाचा सायास । न लगे कांहीं अनुमात्र ॥२॥

न रिघा तपांचे हव्यासें । साधनाचे नको फांसे ।

कीर्तन सौरसें । प्रेमें नाचा रंगणीं ॥३॥

नका माझें आणि तुझें । टाका परतें उतरुनी वाझें ।

एका जनार्दनीं सहजें । विठ्ठलनामें मुक्त व्हां ॥४॥