श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४९१ ते ५००

४९१

डोळियाची भुक हारपली । पाहतां श्रीविठ्ठल माउली ॥१॥

पुंडलिकें बरवें केलें । परब्रह्मा उभें ठेलें ॥२॥

अठ्ठावीस युगें जालीं । आद्यापि न बैसें खालीं ॥३॥

उभा राहिला तिष्ठत । आलियासीं क्षेम देत ॥४॥

ऐसा कृपाळु दीनाचा । एका जनार्दनीं साचा ॥५॥

४९२

युगें आठ्ठावीस जालीं । परी न बैसें तो खालीं ॥१॥

कोण पुण्य न कळे माय । विटे लाधलें या विठ्ठलाचें पाय ॥२॥

नाहीं बोलाचालीअ मौन धरियलें । कैसें चाळविलें पुंडलिकें ॥३॥

एका जनर्दनीं विटेवर । दोन्हीं कटीं ठेविलें कर ॥४॥

४९३

म्हणती दक्षिण द्वारका । पुण्यभुमी वैकुंठीं देखा । पाहुनियां पुंडलीका । राहिलासे उभा विटेवरी ॥१॥

काय वर्णावा महिमा । न कळेचि आगम निगमं । वेदादिक पावले उपरमा । जयासी पैं वर्णितां ॥२॥

तो आला आपुले पायीं । भक्त इच्छा धरुनी हृदयीं । एका जनार्दनीं सायी । सर्वावरी सारखी ॥३॥

४९४

तारावया भोळे भक्त । कृपावंत पंढरीनाथ ॥१॥

करुनी मीस पुंडलीकांचे । उभा उगाचि विटेवरी दिसे ॥२॥

ऐसा भक्तांसी भुलला । तारावया उभा ठेला ॥३॥

जनीं जनार्दनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥

४९५

उभा पुंडलिकांपुढें । कटीं कर ठेउनी रुपडें ॥१॥

पाहतां वेडावलें मन । शिवा लागलेंसे ध्यान ॥२॥

सनकादिक वेडावले । ते पुंडलिके भुलविले ॥३॥

भक्ता देखोनि भुलला । एका जनार्दनीं सांवळां ॥४॥

४९६

आला पुडंलिंकासाठी । उभा सम पाय विटीं ॥१॥

विठु मदनाचा पुतळा । भुलवणा तो सकळा ॥२॥

अराध्य दैवत शिवाचें । कीर्तनीं उघदाची नाचे ॥३॥

एका जनार्दनीं मन । वोवाळावें पायांवरुन ॥४॥

४९७

सर्वांचे जे मूळ सर्वांचे जें स्थळ । तें पद्ययुगलु विटेवरी ॥१॥

साजिरें साजिरें कर दोन्हीं कटीं । उभा असे तटीं भीवरेच्या ॥२॥

नये ध्याना मना आगमाच्या खुणा । कैलासीचा राणा ध्यात जया ॥३॥

एका जनार्दनी पुरे परता दुरी । पुंडलीकांचे द्वारीं उभा विटे ॥४॥

४९८

ॐकार सह मकार आदि अंत नाहीं जया । तें पुंडलिक भुलवोनि आणिलें या ठायां ॥१॥

भुललें वो माय पुंडलिकांप्रीतीं । उभाचि राहे परी खेद न करी चित्तीं ॥२॥

अथरा पुराणांसी वाडशास्त्रें वेदादती ॥ तो सांवळा श्रीकृष्ण उभा विटे पुंडलिकाचे भक्ति ॥३॥

वेद वेदांतरें मत मतांतरें न कळे श्रुती पैं वेवादती । तोएका जनार्दनांचे ह्रुदयी सांवळा घेउनि बुंथीं ॥४॥

४९९

अकार तो अकारु मकार तो मकारु । उकाराचा पालाऊ शोभे गे माय ॥१॥

आदि अंत नसे ज्या रुपा वेगळें । तें कैसें वोळलें पुंडलिका गे माय ॥२॥

वेद उपरमला पुराणें कुंठीत । शास्त्रांची मती नेणत तया सुखा गे माय ॥३॥

जाणते नेणते सर्व वेडावले । ठकलेचि ठेलें सांगुं काय गे माय ॥४॥

या पुंडलिकें वेडविलें चालवुनि गोविलें । एका जनार्दनीं उभें केलें विटेवरी गे माय ॥५॥

५००

अकार उकार मकारांपरता सर्वेश्वर । कटीं धरुनी कर उभा विटे ॥१॥

नीरा भीवरा संगम पुंडलीक मुनी । नारद वेणुनाद ऐसेंस्थळ लक्षुनी ॥२॥

योगियां हृदयींचें ठेवणें गोमटें । जोडलें उद्भटे पुंडलीका ॥३॥

आषाढी कार्तिकी आनंद सोहळा । संताचा मेळा घनवट ॥४॥

एका जनार्दनीं जनार्दन एकपणीं । त्रैलोक्यांचा धनी विटेवरी ॥५॥