श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


विठ्ठलमाहात्म्य - अभंग ५११ ते ५२०

५११

सकळीं ध्याइला सकळीं पाहिला । परी असे भरला जैसा तैसा ॥१॥

युगानुयुगीं मीनले व्यापारी । परी न पवेचि सरी पुंडलीका ॥२॥

मापें केलीं परी नये अनुमाना । योगियांच्या ध्याना वोथबंला ॥३॥

एकाजनार्दनीं मापचि आटचें । मोजणें खुंटविलें पुंडलिकें ॥४॥

५१२

पुंडलिकें उभा केला । भक्त भावाच्य आंकिला ॥१॥

युगें जालें अठठावीस । उभा मर्यादा पाठीस ॥२॥

सम पाउलीं उभा । कटीं कर कर्दळीगाभा ॥३॥

गळां वैजयंती माळ । मुगुट दिसतो तेजाळ ॥४॥

एकाजनार्दनीं शोभा । विठ्ठल विटेवरी उभा ॥५॥

५१३

ध्वज वज्रांकुश शोभती चरणीं । तो उभा रंगणीं वैष्णवांचें ॥१॥

झळकतसे हातीं पद्म आणि गदा । पुंडलिक वरदा उभा विटे ॥२॥

चरणीं भागीरथीं गंगा ती शोभली । भक्तांची क्षाळिलीं महात्पापें ॥३॥

एका जनार्दनीं सकळ तीर्थराव । उभा राह प्रभव विटेवरी ॥४॥

५१४

सुकुमार हरीची पाउलें । सुंदर हरीचीं पाउलें ॥१॥

भीमातटीं देखिलें । वोळलें तें पुंडलिका ॥२॥

शेषशयनीं जी पाउलें । लक्ष्मीकरीं तीं पाउलें ॥३॥

गरुडपृष्ठी जी पाउलें । बळीयागीं तीं पाउलें ॥४॥

विटेवरीं जी पाउलें । एका जनार्दनीं तीं पाउलें ॥५॥

५१५

या पाउलासाठीं लक्ष्मी पिसी । सनकादिक वेडावले मानसीं ॥१॥

सुख जोडलें पुंडलिकासी । विटेवरी हृषिकेशी ॥२॥

म्हणे जनार्दनाचा एका । धन्य धन्य पुंडलीका ॥३॥

५१६

चरण गोमटे माय । पाहतां पाहतां मन न धाय ।

पुनरपि फिरुनी तेथें जाय । ऐसा वेध होय तयाचा गे माय ॥धृ॥

नवल गे माय न कले वेदां । आचोज विवाद शास्त्रंचिया ॥१॥

पुराणें भागलीं दरुशनें विडावलीं । कांही केलिया न कळे तया ॥२॥

तो पुडलिकाचे आवडीं विटे धरुनी मीस । युगें अठठावीस उभा असे ॥३॥

परे परता परात्पर पश्यंती न कळे विचार । मा मध्यमा वैखरींचा निर्धार थकीत ठेला ॥४॥

एका जनार्दनीं आहे तैसा देखिला । सबाह्म भरला हृदयीं गे माय ॥५॥

५१७

जें या चराचरीम गोमटें । पाहतां वेंदां वाट न फूटे ।

तें पुंडलिकाचे पेठे । उभें नीट विटेवरी ॥१॥

सोपारा सोपारा झाला आम्हां । शास्त्रें वर्णिती महिमा ।

नकळे जो आगमा निंगमां । वंद्य पुराणा तिहीं लोकीं ॥२॥

सहस्त्र मुखांचें ठेवणें । योगीं ध्याती जया ध्यानें ।

तो नाचतो कीर्तनें । प्रेमभक्त देखोनी ॥३॥

एका जनार्दनीं देखा । आम्हां झाला सुलभ सोपा ।

निवारुनी भवतापा । उतरीं पार निर्धारें ॥४॥

५१८

आनंदाचा कंद उभा पाडुरंग । गोपाळांचा संघ भोवतां उभा ॥१॥

चंद्रभागा तीरीं शोभे पुंडलीक । संत अलोकिक गर्जताती ॥२॥

भाळे भोळे जन गाती तेंसाबडें । विठ्ठला आवदे प्रेम त्यांचे ॥३॥

नारीनर मिलाले आनंदें गजर । होत जयजयकार महाद्वारी ॥४॥

एका जनार्दनीं प्रेमळ ते जन । करिती भजन विठोबाचें ॥५॥

५१९

आनंताचे गुण अनंत अपार । न कळेचि पारश्रुतीशास्त्रीं ॥१॥

तो हा महाराज विटेवरी उभा लावण्याचा गाभा शोभतसे ॥२॥

कटावरी कर ठेवी जगजेठी । पाहे कृपादृष्टी भक्तांकडे ॥३॥

पुंडलिकाचे तेजें जोडलासे ठेवा । एका जनार्दनी सेवा देई देवा ॥४॥

५२०

सुंदर तें ध्यान मांडिवर घेउनी । कौसल्या जननी गीतीं गाये ॥१॥

सुंदर तें ध्यान नंदाच्या अंगणीं । गोपाळ गौळनी खेळताती ॥२॥

सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटीं । पुंडलिकापाठीं उभे असे ॥३॥

सुंदर ते ध्यान एका जनार्दनीं । जनीं वनीं मनीं भरलासे ॥४॥