श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


विठ्ठलमाहात्म्य - अभंग ५३१ ते ५४०

५३१

एकाच्या कैवारें । कली मारिले सर्व धुरे । तयांसे ते बरे । आपणापाशीं ठेवी ॥१॥

ऐसा कृपावंत स्नेहाळ । भरलें कीर्ति भूमंडळ तया स्मरे हळाहळ । निशीदिनीं ॥२॥

भक्ति भावचेनि प्रेमें द्वारपाळ जाहला समें । अद्यापि तिष्ठे नेमें । वचन तें नुल्लुमीं ॥३॥

अंकितपणे तिष्ठत उभा । एका जनार्दनीं धन्य शोभा । पुडंलिकाच्या लोभा । युगें अठ्ठावीस ॥४॥

५३२

देतो मोक्ष मुक्ति वाटितसे फुका । ऐसा निश्चयो देखा करुनी ठेलो ॥१॥

सांवळें रुपडें गोजिरें गोमटें । उभें पुडंलीके पेठें पंढरीये ॥२॥

वाटितसे इच्छा जयासी जे आहे । उभारुनी बाह्म देत असे ॥३॥

एका जनार्दनीं देतां न सरे मागे । जाहली असतीं युगें अठ्ठावीस ॥४॥

५३३

कल्पतरु दाता पुंडलीक मुनी । तयासाठीं परब्रह्मा तिष्ठे अझुनी ॥१॥

नवलाव गे माय नवलाव गे माय । विटे ठेऊनी पाय उभा असे ॥२॥

शेष श्रमला शास्त्र भागलें । वेवादिती वाहिली अठरा ज्यासी ॥३॥

आदि अंत कोना न कळे जयाचा । मौनावली वाचा वेदादिकीं ॥४॥

तो डोळेभरी पहिला श्रीहरी । एका जनार्दनी वेरझारी खुंटली देवा ॥५॥

५३४

क्षीरसागरीचें निजरुपडें । पुंडलिकाचेनि पडिपाडें । उभें असे तें रोंकडें । पंढरीये गोजिरें ॥१॥

पहा पहा डोळेभरी । शंख चक्र मिरवे करीं । कास कसिली पिंताबरीं । हृदयावरी वैजयंती ॥२॥

भीमरथी वाहे पुढां । करित पापाचा रगडा । पुंडलिकाचे भिडा । उभा उगा राहिला ॥३॥

शरण एका जनार्दनीं । त्रैलोक्याचा धनी । नाचतो कार्तनीं । भक्तांमागें सर्वदा ॥४॥

५३५

कोटी कंदर्प सांडा वोवाळुनी । ऐसा जगदानीं पंढरीये ॥१॥

हेळु लोपला तेजें जें देखतां मन निवे । दरुशनें भागलें हेवा करता गे गाय ॥२॥

मदन मनमोहन सनकासनंदन वंद्य । सर्वाठायीं व्यापुनी उभे विटे आनंद ॥३॥

सुखाची सुखमूर्ति पूडांलिकाचे भक्ति । एका जनार्दनी सगुण व्यक्तिसी आला ॥४॥

५३६

येऊनियां पंढरपुरा । उभा सामोरा पुडलिका ॥१॥

उभारुनी बाह्मा हात । भक्ता इच्छिलें तें देत ॥२॥

भलते याती नारी नर । दरुशनें उद्धार सर्वांसी ॥३॥

साक्ष भीमरथी आई । एका जनार्दनीं पाही ॥४॥

५३७

बहुती वर्णिला बहुतीं ध्याईला । परी तो पाहिल्यां पुंडलिका ॥१॥

करुनी कैवाड उभा केला नीट । धरुनी दोन्ही कट करीं देखा ॥२॥

पंचमहापातकी येताती ज्या भावें । दरुशनें त्या द्यावें वैकुंठ पद ॥३॥

एका जनार्दनीं भक्तांचा अंकीत । उभाचि तिष्ठत अठ्ठावीस युगें ॥४॥

५३८

सखी पुसे सखियेसी । युगें जालीं अठ्ठावीसी । उभा ऐकिला संतामुखीं ।

अद्यापीं वर । कटावरी कर । भीवरी तीर । वाळूवंटीं संतसभा सभा ॥१॥

देव काहां विटेवरी उभा उभा ॥धृ॥

पुंसु नका बाई । वेदासी काई । कळलेंचि नाहीं ।

शेष शिणला जाहल्या द्विसहस्त्र जिभा जिभा ॥२॥

जेथें करीताती गोपाळाकाला । हरिनामी तयांचा गलबला ।

देवभावाचा भुकेला । मिळले संत मदनारी । तो हरी आला तयांचिया लोभा ॥३॥

हरी वैकुंठाहुनी । आला पुंडलिका लागुनी । उभा राहिला अझुनी ।

युगानुयुगें भक्तासंगें । एका जनार्दनीं संतशोभा शोभा ॥४॥

५३९

श्यामसुंदर मूर्ति विटेवरी साजिरी । पाउलें गोजिरीं कोवळीं तीं ॥१॥

ध्वजवज्रांकुश चिन्हें मिरवती । कटीं धरीले कर अनुपम्य शोभती ॥२॥

ऐसा देखिला देव विठठलु माये । एका जनार्दनीं त्यासी गाये ॥३॥

५४०

चतुर्भुज साजरी शोभा । चुन्मात्र गाभा साकार ॥१॥

शंख चक्र गदा कमळ । कांसे पीतांबर सोज्वळ ॥२॥

मुगुट कुंडलें मेखळा । श्रीवत्स शोभे वक्षस्थळां ॥३॥

निर्गुण सगुण ऐसें ठाण । एका जनार्दनीं ध्यान ॥४॥