श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


विठ्ठलमाहात्म्य - अभंग ६११ ते ६२०

६११

आदि पुरुष सबरा भरीत भरला । भरुनि उरला पंढरीये ॥१॥

आतळ वितळ सुतळ रसातळ । सप्ताहि पाताळें भरुनि उरला ॥२॥

वैंकुंठ कैलास चतुर्दश लोक । भरलासे व्यापक दशदिशां ॥३॥

एका जनार्दनीं स्थावर जंगमीं । भरलाअसे व्योमीं आदि अंतीं ॥४॥

६१२

वेडावला वेडावला । उभ ठेला मौन्यची ॥१॥

ब्रह्मादिकां अंत न कळे रुपाची । तो माझे माझे साचा भक्ता म्हणें ॥२॥

कमळाचरणीं विनटलीं न कळें तीस थोरी । ते चरण विटेवरी देखियेले ॥३॥

एका जनार्दनीं विश्वव्यापक हरी । सबाह्म अभ्यंतरीं कोंदलासे ॥४॥

६१३

समचरणीं उभा चैतन्याचा गाभ । त्रैलाक्याची शोभ पांडुरंग ॥१॥

भक्तांचे जीवन साधकांचे साधन । सुखाची विधान पाडुंरग ॥२॥

मुक्ति कल्पद्रुम महाफळ उत्तम । गोपिकांचा काम पाडुंरग ॥३॥

एकाएकी विनटला । तो सदा संचला । एका जनार्दनीं भेटला पांडुरंग ॥४॥

६१४

कैसी समचरणीं शोभा । अवघा जगीं विठ्ठल उभा ॥१॥

येणें विठ्ठले लाविलें पिसें । जिकडे पाहे तिकडे दिसे ॥२॥

पहाते पाहाणीया माझारी । पहाते गेलें पाहाण्यापरी ॥३॥

एका जनार्दनीं एकु । विठ्ठल अवलोकी लोकु ॥४॥

६१५

सुखकर मुर्ति रुप रेखेवीण । उभा असे व्यापुन ब्रह्मांडी गे माय ॥१॥

वेधला जीऊ तयाचिया गुणा । क्षणभरी न बिसंबे दिवकीनंदना ॥२॥

सकळ विश्रांती घर चंद्रभागा तीर । एका जनार्दनीं मनोहर गोमटें गे माय ॥३॥

६१६

देवो न कळे अभाविकां । उघड पंढरीसी देखा ।

भोळे सकळाम भाविकां । ठाऊका असे ॥१॥

न कळे तयांचे विंदान । भेटी जातां वेधी मन ।

तोडित बंधन । संसाराचें क्षणार्धें ॥२॥

रुप पाहतां गोजिरें । आवडे डोळियां साजिरें ।

चित्त क्रोध । अवघा तो परमानंद ॥३॥

नुरे काम आणि क्रोध । अवघाअ तो परमानंद ।

एक जनार्दनी गोविंद । अभेदपणें पाहतां ॥४॥

६१७

भक्तांचिया गांवा येशी पै धांवत । न बोलतां तिष्ठत उभा पुढें ॥१॥

न बैससी खालीं न पाहे माघारें । मौन पं निर्धारें धरुनि उभा ॥२॥

एका जनार्दनी भक्त वचनाधीन । बोलती पुराणें सत्य देवा ॥३॥

६१८

अनन्य शरण विठोबासी निघाले । ते जीवन्मुक्त जाले याचि देहीं ॥१॥

देहीं याचि देवो विटेवरी पाहे । सबाह्म उभा आहे कर कटीं ॥२॥

कर कटीं उभा लावण्याचा गाभा । श्रीमुखाची शोभा काय वानुं ॥३॥

कोटी रवीतेज वोवाळवे चरणीं । एका जनार्दनीं धन्य तोची ॥४॥

६१९

त्रिभुवनामाजी सोपें । चुकती खेपे पाहतां ॥१॥

तो हा बाळ दिगंबर । परात्पर सोयरा ॥२॥

आलियासी देतो मुक्ती । नामस्मृति तात्काळ ॥३॥

एका जनार्दनीं रुपं । गोमटें अमूप श्रीविठ्ठल ॥४॥

६२०

उभा विटेवरी । कट धरुनिया करीं । भीमा ती सामोरी । वहात आहे ॥१॥

जाऊं तया ठाया । आनंद तेणे काया । वैष्णवांचिया पायां ॥ लोटागंणी ॥२॥

कर्मोकर्म नाहीं वाद । भेदभ्रम नाहीं भेद । वैष्णवंचा छंद । नाम गाती आनंदे ॥३॥

सुख अनुपम्य अभेदें । एका जनार्दनीं छंदे । गातां नाचतां आल्हादें । प्रेम जोडे ॥४॥