श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


विठ्ठलमाहात्म्य - अभंग ६३१ ते ६४०

६३१

आजी नीलवर्ण कुसुमसम । देखिला मेघ शाम विटेवरी ॥१॥

अतसीकुसुम रंग रंगला श्रीरंग । भोंवाता शोभे संग संतजन ॥२॥

निळीय भासत तो रंग दिसत । शामंकित शोभत विठ्ठल देव ॥३॥

एका जनार्दनीं नीलवर्ण रुपडें । पाहतां चहुकडे कोंदाटलें ॥४॥

६३२

पाहतां विठ्ठल रुप । अवघा निवारिला ताप ॥१॥

ध्यानीं आणितां तें रुप । अवघा विराला संकल्प ॥२॥

बैसलासे डोंळा । एका जनार्दनीं सांवळा ॥३॥

६३३

आणिकाचें मतें सायास न करणें । आम्हांसी पाहुणे पंढरीराव ॥१॥

डोळां भरुनिया पाहिलें देवासी । तेणें चौर्‍यायंशी चुकली सत्य ॥२॥

एका जनार्दनी देवाधिदेव । देखिला स्वयमेव विटेवरी ॥३॥

६३४

स्वर्गासुख आम्ही मानुं जैसा ओक । सांडुनियां सुख पंढरीचें ॥१॥

पंढरीं पावन चंद्रभागा स्थान । आहे तो निधान विठ्ठल देव ॥२॥

मध्यस्थळीं राहे पुंडलीक मुनी । तयाचे दरुशनी पातक हरे ॥३॥

दोनी कर कटीं उभा जगजेठी । एका जनार्दनीं भेटी सुख होय ॥४॥

६३५

कैसे चरण गोमटे । देखिले विटे पंढरीये ॥१॥

पाहतांचि वेधलें मन । जाहलें समाधान जीवाशीवां ॥२॥

विश्रांतीचें विश्रांतिघर । आगम निगमांचे माहेर ॥३॥

म्हणे एका जनार्दनी । काया कुर्वडी करुनी ॥४॥

६३६

आगमी निगमीं पाहतां तो सुगमीं । वेदादिकां दुर्लभ आम्हां तो सुगमीं ॥१॥

नवचे वाचे बोल बोला तो वेगळा । व्यापुनी ब्रह्मांडी आहे तो उगला ॥२॥

सार मथिल कोढोनि चैत्यन्य गाभा । पाहतां दिसे त्याची अनुपभ्य शोभा ॥३॥

सांकडे नव्हें भेटी जातां लवलाहे । उभारुनि बाह्मा आलिंगी लाहे ॥४॥

एका जनार्दनीं सर्व सारांचे सार । उभा विटेवरे परब्रह्मा निर्धार ॥५॥

६३७

ऊंचा उंचपणा नीचा नीचपणा । तें नाहीं कारण विठ्ठलभेटी ॥१॥

उंच नीच याती असो भलते जाती । विठ्ठल म्हणतां मुक्ती जड जीवां ॥२॥

उभारुनि बाह्मा कटीं कर उभा । एका जनार्दनीं शोभा विटेवरी ॥३॥

६३८

काळें ना सांवळें गोरें नापिवळें । वर्ण व्यक्ति वेगळें विटेवरी ॥१॥

आनंद स्वानंद नित्य परमानंद । आनंदाचा कंद विटेवरी ॥२॥

निगुण सगुण चहुं वांचावेगळा । आदि अंत पाहतां डोळां न दिसे कांहीं ॥३॥

एका जनार्दनीं देखिला तो डोळा । त्रिगुणा वेगळा विटेवरी ॥४॥

६३९

जें जें देखिलें तें तें भगलें । रुप एक उरलें विटेवरी ॥१॥

डोळियाची धनी पाहतां पुरलीं । परी वासना राहिली चरणाजवळील ॥२॥

एका जनार्दनीं विश्वास तो मनीं । संतांचें चरणी सदा बैसों ॥३॥

६४०

चित्त वेधियलें नदांच्या नंदनें । मोहियलें ध्यानें योगीराज ॥१॥

सगुण सुंदर पाहतां मनोहर । सबाह्म अभ्यंतर व्यापियेलें ॥२॥

एका जनार्दनीं सांवळें चैतन्य । श्रीगुरुची खुण विटेवरी ॥३॥