श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


विठ्ठलमाहात्म्य - अभंग ६५१ ते ६६०

६५१

कृपाळु उदार । उभा कटीं ठेवुनी कर ॥१॥

सर्व देवांचा हा देव । निवारीं भेव काळांचें ॥२॥

निघतां शरण काया वाचा । चालवी त्याचा योग क्षेम ॥३॥

दृढ वाचे वदतां नाम । होय निष्कामसंसारीं ॥४॥

एका जनार्दनीं ठेवणें । खंरे तें जाणें पंढरीं ॥५॥

६५२

प्रत्यक्ष पहा रे जाऊन । विटेवरी ठेविले चरण ॥१॥

रुप सुंदर गोजिरें । कानीं कुंडलें मकराकारें ॥२॥

पुढें शोभे चंद्रभागा । मध्यें पुंडलीके उभा ॥३॥

ऐसें उत्तम हे स्थळ । भोळ्या भाविकां निर्मळ ॥४॥

तया ठायीं भेद नुरे । एका जनार्दनीं झुरे ॥५॥

६५३

काया वाचा मन एकविध करी । पाहे तो श्राहरी पंढरीये ॥१॥

ब्रह्मादिका जया ध्याती शिवादि वंदिती । ती विटेवरी मूर्ति पांडुरंग ॥२॥

वेद पै भागले शास्त्रें वेवादती । पुराणांसी भ्रांती अद्यापवरी ॥३॥

नेति नेति शब्दें श्रुति त्या राहिल्य । न कळे तयाला पार त्याचा ॥४॥

एका जनार्दनीं भक्तालागीं सोपा । भीमातटीं पाहें पां विठ्ठलासी ॥५॥

६५४

परब्रह्मा मूर्ति विठ्ठल विटेवर । चंद्रभागेतीरीं उभा असे ॥१॥

तयाचे चरण आठवी वेळो वेळां । सर्व सुख सोहळा पावशील ॥२॥

अविनाश सुख देईल निश्चयें । करी पा लवलाहेंलाहो त्याचा ॥३॥

श्रीविठ्ठलचरणीं शरण तूं जाई । एका जनार्दनीं पाही अनन्यभावें ॥४॥

६५५

अनंता जन्मीचें पुण्य बहुत । तैं देखे पंढरीनाथ ॥१॥

वायं शिणताती बापुडी । काय गोडी धरुनी ॥२॥

पाहतं विठ्ठलाचें मुख । हरे सर्व पाप निवारें दुःख ॥३॥

एका जनार्दनीं विठ्ठल उभा । त्रैलोक्याचा गाभा विटेवरी ॥४॥

६५६

हृदयस्थ अत्माराम नैणती । मूर्ख ते फिरती तीर्थाटणी ॥१॥

काय त्या भ्रंती पुडलीसे जीवा । देवाधिदेवा विसरती ॥२॥

विश्वाचा तो आत्मा उभा विटेवरी । भक्ताकाज कैवारी पांडुरंग ॥३॥

प्रणवा पैलीकडे वैखरीये कानडे । भाग्य तें केवढें पुंडलिकांचें ॥४॥

तयाचिया लोभा गुंतूनि राहिले । अठ्ठवीसे युग जालें न बैसे खालीं ॥५॥

सन्मुख चंद्रभागा संतांचा सोहळा । एका जनार्दनी डोळा पाहूं चला ॥६॥

६५७

भीमा दक्षिनवाहिनी । मध्यें पुंडलीक मुनी । विठ्ठल विटे समचरणी । भक्तालांगीं तिष्ठत ॥१॥

न म्हणे लहान थोर कांहीं । याती वर्णा विचार नाहीं । प्रेम भाव पायीं । येवढेंचि पुरे तेथें ॥२॥

दृढ धरुनी विश्वास । पाहे पंढरीनिवास । एका जनार्दनी दास । सर्वभावें अंकित ॥३॥

३५८

भलते भावें शरण येतां । निवारी जन्ममरण चिंता ।

उदार लक्ष्मीचा दाता । साक्ष पुंडलीक करुनी सांगे ॥१॥

येथें या रे लहान थोर । भावें नारी अथवा नर ।

मोक्षाचा विचार नकरणें कवणाही ॥२॥

एका दरुशनें मुक्ति । पुन्हां नाहीं जन्मावृत्ती ।

एका जनार्दनीं चित्तीं । सदोदित तें सुख ॥३॥

६५९

उदार उदार । सखा पांडुरंग उदार ॥१॥

ठेवामन त्याचे पायीं । तुम्हं उणें मग कायी ॥२॥

दुजीयासी कींव । कां रें भाकितसां जीव ॥३॥

तीं काय देतील बापुडीं । एका जनार्दनीं धरा गोडी ॥४॥

६६०

आणिकासीं जाता शरण । हें तों तुम्हां उणीवपण ॥१॥

दास विठोबाचें व्हावें । तिहीं सर्व सुख भोगावें ॥२॥

एका जनार्दनीं म्हणा दास । तुमची आस पुरवील ॥३॥