श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


विठ्ठलनाममहिमा - अभंग ७११ ते ७२३

७११

स्थिर करुनियां मन । वाचें गावा जनार्दन ॥१॥

तुटती बंधनें । यमयातनेची ॥२॥

ऐशी विठ्ठल माऊली । वाचे स्मरा वेळोवेळी ।

कळिकाळाची चाली । होऊं नेदी सर्वथा ॥३॥

कापालिया काळ । येथें न चले त्यांचे बळ ।

वाउगा पाल्हाळ । सांडा सांडा परता ॥४॥

धरा विश्वासा दृढ मनीं । लक्ष लावावें चरणीं ।

शरण एका जनार्दनीं । नुपेक्षी तो सर्वथा ॥५॥

७१२

जग तरिलें कीर्तनीं । श्रीविठ्ठल नामवानी ॥१॥

ऐसा मंत्र अक्षरी । विठ्ठल विठ्ठल निर्धारीं ॥२॥

एका जनार्दनीं । विठ्ठल पाहे ध्यानीं मनीं ॥३॥

७१३

लाहो करा लाहो करा । वाचे स्मरा विठ्ठल ॥१॥

तुटेल बंधन उपाधी । बाधों न शके आधीव्याधी ॥२॥

न लगे खटपट पसारा । वाचे विठ्ठल उच्चार ॥३॥

एका जनार्दनीं सोपें । विठ्ठल म्हणतां नुरतीं पापें ॥४॥

७१४

एकविध भावें हरी । वाचे उच्चारी सर्वदा ॥१॥

सर्व साधनांचे सार । विठ्ठलमंत्राचा उच्चार ॥२॥

असा सदा हेंचि ध्यान । विठ्ठलनामाचे चिंतन ॥३॥

एका जनार्दनीं जपा । विठ्ठलमंत्रसोपा ॥४॥

७१५

एक वेळ गाय विठ्ठलाचें नाम । मोक्ष मुक्ति सकाम पुढे उभें ॥१॥

आवडीने घाली तया लोटागण । संताचें चरण वंदी माथां ॥२॥

पंढरेची वारी संतांचा सांगात । पुरती सर्व हेत निश्चयेंसी ॥३॥

एका जनार्दनीं धरुनि विश्वास । संतांचा दास होय आधी ॥४॥

७१६

बैसोनि एकांतीं । सदा ध्यावी विठ्ठलमूर्ती ॥१॥

तेणें चुके रे बंधन । आन न करी साधने ॥२॥

हेंचि वेदशास्त्रांचें सार । आगमनिमांचा पसर ॥३॥

एका जनार्दनीं रुप । पाहतां आमुप उद्धार ॥४॥

७१७

विठ्ठल म्हणतां विठ्ठलाचि होसी । संदेह येविशीं धरुं नको ॥१॥

सागरीं उठती नाना पईं तरंग । सिंधु तो अभंग विठ्ठल एक ॥२॥

तैसे मन करी द्वैत न धरी । सर्व चराचरी विठ्ठल एक ॥३॥

एका जनार्दनी विठ्ठलावांचुनी । दुजा नेणो कोणी स्वप्नी आम्हीं ॥४॥

७१८

उघडा हा मंत्र विठ्ठल वदा वाचे । अनंता जन्माचे दोष जाती ॥१॥

न करी आळस आल्या संसारीं । वदा निरंतरी विठ्ठलानाम ॥२॥

साधेल साधन तुटती बंधने । विठ्ठलनाम जाण जप करीं ॥३॥

एका जनार्दनीं असनीं शयनीं । विठ्ठल निशिदिनीं जप करी ॥४॥

७१९

अखंडित वाचे । विठ्ठल वदा साचें ॥१॥

तेणें चुकतीं बंधन । कर्माकर्मीं नाहीं पतन ॥२॥

सदा विठ्ठल ध्यानी मनीं । तोचि पुण्यपावन जनीं ॥३॥

जननी पवित्र तयांची हाव । एका जनार्दनीं धन्य सुख ॥४॥

७२०

सांडी परापवाद खोडी । घेई विठ्ठलस्वरुपी गोडी ॥१॥

व्यर्थ टवाळाचे बोल । बोलुं नका म्हणा विठ्ठल ॥२॥

विठ्ठल विठ्ठल नेटका । भावें म्हणतां ब्रह्मा फुका ॥३॥

एका जनार्दनीं साचें । विठ्ठल विठ्ठल म्हणतां वाचे ॥४॥

७२१

अचुक साधन कष्ट नाहीं कांहीं । वाचे विठ्ठलरखुमाई म्हणे सुखें ॥१॥

जन्ममरणाच्या तुटतील खेपा । सोपा होय बापा मार्ग तुज ॥२॥

बहुत मार्ग बहुत साधन । परी वाचा जाण शीण दुर्गम तें ॥३॥

एका जनार्दनीं कष्ट ना सायास । म्हणा वाचे विठ्ठलास जीवेंभावें ॥४॥

७२२

ज्ञान होय आधीं संतां शरण जातां । मग वोळखितां कळे रुप ॥१॥

नामांचे जें मुळ रुपांचें रुपस । पंढरीनिवास हृदयीं धरी ॥२॥

प्रपंचीं परमाथीं तारक हें नाम । ब्रह्मानंद प्रेम सर्व वसे ॥३॥

सच्चिदानंद खूण एका जनार्दनीं । स्वयं ब्रह्म जाण नाम असे ॥४॥

७२३

गायन तें सोपें गाऊं । वाचे ध्याऊं विठ्ठल ॥१॥

तेणें सर्व होय सिद्धि । तुटे उपाधि जन्मजरा ॥२॥

साधनांचा न करुं श्रम । गाऊं नाम आवडीं ॥३॥

शुकादिक रंगले रंगीं । त्याची मार्गीं आम्हीं आऊं ॥४॥

एका जनार्दनीं धणीवरी । उच्चारुं हरी संतसंगें ॥५॥