७२४
शिवाचे हृदयीं नांदसी श्रीरामा ।
काय वर्णुं महिमा न कळे आगमानिगमां ॥१॥
वेदशास्त्रें मौनावलीं पुरणें भांबावलीं ।
श्रुति म्हणती नेति नेति शब्दे खुंटली ॥२॥
वाच्य वाचक जगन्नथ स्वयें शिवाचा आत्माराम ।
एका जनार्दनीं सुख तयांसी गातां निष्काम ॥३॥
७२५
मानवा रामनामीं भजें । तेणें तुझें कार्य होतें सहजें ॥१॥
अनुभव घेई अनुभव घेई । अनुभव घेई रामनामीं ॥२॥
शंकारादि तरले वाल्मिकादि उद्धरले । तें तूं वहिलें घेईं रामनाम ॥३॥
एक जनार्दनीं नामाच्या परिपाठीं । दोष पातकें पळती कोटी ॥४॥
७२६
कासयासी हटयोग धूम्रपान । घालुनी आसन चिंती वेगीं ॥१॥
सोपा रे मंत्र राम अक्षरें दोनी । जपतां चुके आयणी चौर्यांशीची ॥२॥
मागें बहुतांचा उपदेश हाची । तरले रामनामेंची पातकी जन ॥३॥
एका जनार्दनीं रामनाम ख्याती । जाहलीपै विश्रांती शंकरासी ॥४॥
७२७
देवांचें हें गूज सकळ मंत्रमय । जें कां निजध्येय शंकराचें ॥१॥
तें हें रामनाम सेविती सर्वभावें । रामरुप व्हावें निश्चयेंसीं ॥२॥
नष्ट अजामेळाचें पतितत्व गेलें । दिव्यरुप जालें वाल्मिकीचें ॥३॥
शरीर संपत्ती बळें अपूर्व सकळ । जाला द्वारपाळ एका जनार्दनीं ॥४॥
७२८
सुख रामनामें अपार । शंकर जाणें तो विचार ॥१॥
गणिका जाणें रामनाम । गजेंद्र उद्धरिला राम ॥२॥
शिळा मुक्त केली । रामनामें पदा गेली ॥३॥
तारिले वानर । रामनामें ते साचार ॥४॥
रामनामें ऐसी ख्याती । एका जनार्दनीं प्रीती ॥५॥
७२९
भवभयनाशक रामनाम तारक । शंकर राजा सुख जाणतसे ॥१॥
योगयाग नको आणिक साधनें । नामपरतें पेणें आणिक नाहीं ॥२॥
कालीमाजीं श्रेष्ठ रामनाम निज । यापरतें बीज आणिक नाहीं ॥३॥
एका जनार्दनीं नाम तारक थोर । तुटे वेरझार रामनामें ॥४॥
७३०
आणीकाचें नामें कोण हो तरला । ऐसें सांगा मला निवोडोनी ॥१॥
या रामनामें पातकी पतीत । जीव असंख्यात उद्धरीले ॥२॥
जुनाट हा पंथ शिवाचें हें ध्येय । रामनाम गाये स्मशानीं तो ॥३॥
गिरजेसी आवडी रामनामें गोडी । एका जनार्दनीं जोडी हेंचि आम्हां ॥४॥
७३१
रामनाम उच्चार होटीं । संसाराची होये तुटी ॥१॥
संसार तो समुळ जाय । राम उच्चारुनी पाहे ॥२॥
मागें अनुभवा आलें । गजेंद्रादि उद्धरिलें ॥३॥
शिव ध्यातो मानसीं । रामनाम अहर्निशीं ॥४॥
एका जनार्दनीं राम । पूर्ण परब्रह्मा निष्काम ॥५॥
७३२
श्रीराम जयराम वदतां वाचे । पातकें जाती कोटी जन्मांची ॥१॥
जयजय राम जयजय राम । तुमचें नाम गाये शंकर उमा ॥२॥
नाम थोर तिहीं लोकीं साजे । उफराटे वदतां पातक नासलें वाल्हाचें ॥३॥
एका जनार्दनीं नाम सारांचे सार । नामस्मरण तुटें भवबंध वेरझार ॥४॥
७३३
रामनाम जपे शिव तो स्मशानीं । वाल्मिक तो मुनी नाम जपे ॥१॥
गणिका तारिली रामनाम घेतां । पातकी तत्त्वतां उद्धरिले ॥२॥
रामनाम सुख शिव जाणें तत्वतां । येरांसी महत्व न कळे नाम ॥३॥
साधनांचे सार नाम मुखी गात । रामनाम म्हणतां कार्यसिद्धि ॥४॥
एका जनार्दनीं रामनाम जप । वैकुंठीचा सोपा मार्ग तुम्हां ॥५॥
७३४
नाम उत्तम चांगलें । त्रिभुवनीं तें मिरविलें ।
जें शंभुनें धरिलें । निजमानसीं आदरें ॥१॥
धन्य मंत्र रामनाम । उच्चारितं होय सकाम ।
जन्म कर्म आणि धर्म । होय सुलभ प्राणियां ॥२॥
एका जनार्दनीं वाचे । ध्यान सदा श्रीरामांचे ।
कोटाई तें यज्ञांचे । फळ तात्काळ जिव्हेसी ॥३॥
७३५
एक नाम वाचे । सदा जपे श्रीरामचे ॥१॥
तेणें तुटेल बंधन । आन नाहीं पै साधन ॥२॥
नामा परतें साधन । नाहीं नाहीं उत्तम जाण ॥३॥
नाम जपे चंद्रमौळी । जपी तपी ते सकळीं ॥४॥
एका जनार्दनीं नाम । हेंची मोक्ष निजधाम ॥५॥
७३६
शिव सांगे गिरजेप्रती । रामनामें उत्तम गती ॥१॥
असो अधम चांडाळ । नामें पावन होय कुळ ॥२॥
नाम सारांचें पैं सार । भवसिंधू उतरी पार ॥३॥
नाम श्रेंष्ठांचे पईं श्रेष्ठ । एका जनार्दनीं वरिष्ठ ॥४॥
७३४
जयतां रामनामावळी । महदोषां होय होळी ॥१॥
ऐसा महिमा नामाचा । किती वर्णावा पै वाचा ॥२॥
बैसोनि स्मशानीं । शंभु जपे ध्यानीं मनीं ॥३॥
गिरजेसी वारंवार । सांगे रामनाम शंकर ॥४॥
तें हें उत्तम रामनाम । एका जनार्दनी निजधाम ॥५॥
७३८
अहर्निशी ध्यान शंकर धरींज्याचेंआ । तो श्रीराम वाचे कां रे नाठविसी ॥१॥
रामनाम म्हणतां तुटेल बंधन । होईल खंडन कर्माकर्मी ॥२॥
रामनामें गणिका नेली मोक्षपदा । तुटती आपदा गर्भवास ॥३॥
रामनाम जप नित्य ती समाधी । एका जनार्दनीं उपाधि तुटोनि गेली ॥४॥
७३९
योगियांचा मुकुट म्हणती धूर्जटी । तोही रामनाम कंठी जपताहे ॥१॥
स्पशानी तो राहे रामनाम गाये । भोवतें उभे पाहे ऋषी सर्व ॥२॥
सदा समाधिस्त रामनामें रंगला । वाचे सदा चाळा रामनाम ॥३॥
एका जनार्दनीं श्रीरामावांचुनीं । दुजा छंद मनीं नाही त्याचे ॥४॥
७४०
रामनामेंसुख अत्यंत जें आहे । म्हणोनि मना ध्याये नित्य नाम ॥१॥
सुखाचिया गोडी जया नाहीं ठावीं । ते ते नर असोनिया देहीं प्रेतवत ॥२॥
शंकर जाणोनि स्मशानीं राहिला । अनुभव तो त्याला तोचि जाणें ॥३॥
एका जनार्दनीं सुखाचेंजें सुख । रामनाम देख पवित्र मुखीं ॥४॥