श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


रामनाममहिमा - अभंग ७५१ ते ७६०

७५१

श्रुतिशास्त्रां अति दुरी । तो परमात्मा श्रीहरि । तो दशरथाचे घरीं । क्रीडतु राम ॥१॥

क्षण एक नमस्कारा । नातुडे सुरवरा । तो रिसां आणि वानर क्षेम देतो राम ॥२॥

चरणीं शिळा उद्धरी । नामें गणिका तारी ।तो कोळियाचे घरीं । पाहुणा राम ॥३॥

शिवाचें निजध्येय । वाल्मिकाचें गुह्मा । तो भिल्लणीचीं फळें खाय । श्रीराम ॥४॥

न कळे ध्यानी मनीं । तो नातुडे जो चिंतनीं । तो वानरांच्या कानीं । गोष्टी सांगे राम ॥५॥

एका जनार्दनीं एका । श्रीराम निजसखा । वानरें वनचरें फुका । तारियेलीं ॥६॥

७५२

श्रीरामानामें तारिलें पाषाण । नामाचें महिमान कोण जाणें ॥१॥

उफराट नामें तारियेला कोळी । दोष जाहले होळी रामनामें ॥२॥

तारियेली गणिका तारियेली देखा । पवित्र तो चोखा रामनामें ॥३॥

एका जनार्दनीं रामनाम जप । पवित्र तें देख रामनाम ॥४॥

७५३

रामनाम पावन । यापरतें थोर कोण ॥१॥

जडशिळा ते सागरीं । नामें तरल्या निर्धारीं ॥२॥

राम जप सदा । नोहे काळाची ती बाधा ॥३॥

नाम घेतां निशिदिनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥

७५४

चरणरज लागुनी उद्धरली अहिल्या बाळा । रामा तुझेनि प्रतापें तरली भवसागर शीळा ॥१॥

जयजय रामरामा शामा भवभंजन नांवें । तुझे रुप ध्यातां उमा शिवे निवे ॥२॥

रामनामें कळिकाळ कापती सदा । रामनामें गणिका नेली निजपदा ॥३॥

रामनामें उद्धरले सुर नर वानर । एका जनार्दनी सदा समाधि स्थिर ॥४॥

७५५

राम सर्वाघटीं व्यापक संचला । जैसा भाव तया तैसा भेटला ॥१॥

रीस आणि वानर राक्षसहि पहाती । सर्वां एकची मुक्ति रामसंगे ॥२॥

वैर अथवा सख्य वाचे वदे नाम । मुक्ति आम्हां राम स्वयें देती ॥३॥

एका जनार्दनीं वदतां निष्काम । स्वर्गसुख द्त राजाराम ॥४॥

७५६

वैकुंठा जावया न लगे ते सायास । रामनामें पाश दृढ तुटती ॥१॥

तारिलें वानर वनचरे रामें । गोपिका त्या कामें मुक्त केल्या ॥२॥

गोपाळ सवंगडे नामेंचि तारिलें । जडजीव उद्धरिले कलियुगीं ॥३॥

एका जनार्दनीं सांगांवें तें किती । रामनामें मती न लगे याची ॥४॥

७५७

राम राम म्हणतां वाचे । रामरुप होय साचें ॥१॥

रामें तारिली शबरी । नित्य राम ती उच्चारी ॥२॥

रामें तारिली गणिका । केल्या अजामेळ सखा ॥३॥

शिळा तारिल्या सागरीं । राम अहिल्या उद्धरी ॥४॥

एका जनार्दनीं । राम भरला जनीं वनीं ॥५॥

७५८

पक्षी जाला स्वयें जें वायु लेकरुं । त्याच्या क्रिया पारुं केल्या रामें ॥१॥

शबरीची फळे उच्छिष्ट तीं खायें । कैसा राम होय सर्वपाणीं ॥२॥

एका जनार्दनीं श्रीराम सखा । भक्त अभक्तं निका सोडवण ॥३॥

७५९

जयजय राम नाम दो अक्षरीं । सहस्त्र नामावरी ब्रीद गाजे ॥१॥

उफराटें अक्षरीं वाल्मिक वैखरी । सहस्त्र नामावरी उच्चारिलें ॥२॥

पुंसा पढवितां नाम दो अक्षरीं । सहस्त्र नामावली सिद्ध झालें ॥३॥

अहं महि षासुर भेदिला जिव्हारीं । नामें दो अक्षरीं निर्दाळिला ॥४॥

सदगुरु नारदें उफराटें केलें । बोधिलें लाधिलें वाल्मिकासी ॥५॥

एका जनार्दनीं रामनाम घोष । त्रैलोकीचे दोष सरते जालें ॥६॥

७६०

पूर्वीपासूनी ज्यांचें देणें । वाल्मीका पेणें रामनामें ॥१॥

अजामेळ पापराशी । नामेंची त्यासी उद्धार ॥२॥

गणिका व्याभिचारिणी नारी । सरती करी रामनामें ॥३॥

एका जनार्दनीं नाम । जया निष्काम गोमटें ॥४॥