श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


रामनाममहिमा - अभंग ७८१ ते ७९०

७८१

पापपुण्य दोन्हीं समानची गांठी । नाम जपा होटीं श्रीरामांचें ॥१॥

तुटेल बंधन खुटेल पतन । नाम तें पावन श्रीरामाचें ॥२॥

भोग रोग नासे कल्पना दूर देशे । श्रीराम मुखी वसे प्राणीयांसी ॥३॥

एका जनार्दनीं नामींच विश्वास । ठेवितां निश्चयास दोष भंगे ॥४॥

७८२

रकारासी कान्हा मकारपुढती । स्मरतां होय मुक्ति सर्व जनां ॥१॥

नारी अथवा नर हो कां दुराचारी । वाचे म्हणतीं हरी सर्व मुक्त ॥२॥

सायास तो नाहीं अनायासें काम । वाचे रामनाम सदां गावें ॥३॥

एका जनार्दनीं धरा हेतू मनीं । श्रीराम वदनीं उच्चारावा ॥४॥

७८३

कायाक वाचीक मानसीक । सदां वसे राम एक ॥१॥

तो नर अथवा नारी । हो कां पतीत दुराचारी ॥२॥

सदा वसे राम ध्यानीं । आणिक कांही नाहीं मनीं ॥३॥

एका जनार्दनी जनीं । राम पाहें मनी ध्यानीं ॥४॥

७८४

नाम गोड श्रीरामांचें । अमृत फिकें जाहले साचें ॥१॥

हो कां उत्तम चांडळ । अधम खळांहुनी खळ ॥२॥

रामनाम वदतां वाचे । पवित्रपणें तोचि साचें ॥३॥

एका जनार्दनीं नाम । मुक्ति सायुज्य निष्काम ॥४॥

७८५

संसार तो गज । राम पंचानन सहज ॥१॥

शब्द ऐकतां तातडी । रज जैसा सोडी ॥२॥

धाके पळे महाभूत । राम म्हणे नित्यानित्य ॥३॥

न लगे जप माळ । राम वदे सर्व काळ ॥४॥

एका जनार्दनीं राम । अखंड जपे हृदयधाम ॥५॥

७८६

सदोदीत गाय श्रीराम गुण । धन्य तो पावन नरदेहीं ॥१॥

नरदेहीं आलीया रामनाम गावें । तरीच जन्मा यावें गुरुपुत्रा ॥२॥

नरदेह उत्तम लागलासे हातीं । रामनामें विश्रांती देहीं याची ॥३॥

कन्यापुत्र माझे न करी सायास । रामनामें उदास वृत्ती करी ॥४॥

वृत्ती करी सदा समाधान । रामनामचिंतन निशिदिनीं ॥५॥

निशिदिनीं ध्यान एका जनार्दनीं । काया वाचा मनीं रामनामा ॥६॥

७८७

रामनामें तृप्त जे नर जाहले । पुनरावृत्ती न आले संसारासी ॥१॥

जाणार जाणार सर्व हें जाणार । रामनाम साचार जप करीं ॥२॥

अभ्राची छाया मृगजळाचें जळ । तैसा हा देह केवळ मिथ्या असे ॥३॥

मिथ्याचें सत्य मनिती गव्हार । रामनामीं विसर पडोनि ठेला ॥४॥

विसरुनी राम करिशी प्रपंच धंदा । भुललासी मतिमंदा नाशिवंता ॥५॥

नाशिवंतासाठी रडतोसी काह्मा । एका जनार्दनीं पाया शरण रिघे ॥६॥

७८८

आयुष्य जातें मागुतें येतें । रामनामें सरतें होय मुख ॥१॥

देह जातें मागुतें होतें । रामनामें सरतें होय मुख ॥२॥

आकार जातें मागुतें होतें । रामनामीं सरतें होय मुख ॥३॥

एका एकपण नाहीं जातें । एका जनार्दनीं सरतें होय मुख ॥४॥

७८९

रामनामें गणिका नेली वैकुंठासी । कलीमाजीं जनांसी तारक हेंची ॥१॥

म्हणोनि आळस न करा वाचे । उच्चारण नामाचें करा वेंगीं ॥२॥

न लगे मान धन सोपें हें साधन । तुटतें पतन जन्मोजन्मीं ॥३॥

एका जनार्दनीं न करा आळस । रामनाम सौरस घ्यावें वाचे ॥४॥

७९०

नको नको आळस करुं । वाचे श्रीराम उच्चारुं ।

तेणें सुफळ संसारुं । होय जनीं जाणिजे ॥१॥

कां रे न करिसी उच्चार । किती सांगुं तुज विचार ।

न धरसी निर्धार । मनामाजीं पामरा ॥२॥

जासी भलतीया वाटा । पडसी दारीं आणि दरकुटा ।

नामावांचुनीं सुटका । एका जनार्दनीं नोहेची ॥३॥