श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


रामनाममहिमा - अभंग ८४१ ते ८५०

८४१

श्रीराम श्रीराम सदा ज्याचे वाचा । त्या प्राणियासी साचा दंडवत ॥१॥

घेईन पायवणी वंदीन मस्तकीं । देईन हस्तकीं क्षेम त्यासी ॥२॥

तयाचा भार वाहे अंकीतपणें । नोहेचि उत्तीर्ण जन्मोजन्मीं ॥३॥

एका जनार्दनीं श्रीराम वाचे । वदतां पातक नासें कोटी जन्मांचें ॥४॥

८४२

गाणे बाणे मुर्तीकडें । राम अध ऊर्ध्व मागें पुढें ॥१॥

मुखीं उच्चारितां नाम । जिव्हेंमाजीं वसे राम ॥२॥

श्रुति मृदंग टाळ घोळ । ते नाद राम सकळ ॥३॥

एका जनार्दनीं नित्य गात । श्रोता वक्ता जनार्दन तेथें ॥४॥

८४३

देहीं असोनियां विदेही प्रकार । रामनाम उच्चार ज्याचें मुखीं ॥१॥

तोचि तरेल ऐसा नाहीं बोल । दरुशनें तारील मूढ जनां ॥२॥

देहीं तो विदेहीं समाधिस्थ सर्वदा । रामनाम मुखीं सदा जया असे ॥३॥

एका जनार्दनीं नित्य गात । श्रोता वक्ता जनार्दन तेथें ॥४॥

८४४

शुचि अथवा अशुचि । परि श्रीरामनाम ज्याचे मुखीं ॥१॥

तोचि त्रैलोकी पावन । तिन्हीं देवांसि समान ॥२॥

त्यांचे होतां दरुशन । घडे त्रिवेणीचें स्नान ॥३॥

एका जनार्दनी देहीं । सदासर्वदा तो विदेही ॥४॥

८४५

अवचट मुखीं म्हणतां राम । सर्व दुरितें होती भस्म ॥१॥

नामापुढें पाप रहे । ऐसा कोण वदताहे ॥२॥

घडतां पातकांच्या राशी । तोही नेला वैकुंठासी ॥३॥

भाविकांशी वर्म सोपें । राम मुखें जपावें ॥४॥

जनीं वनीं निरंजनीं । शरण एका जनार्दनीं ॥५॥

८४६

आंबे केळीं द्राक्ष घडु । रामनामापुढें अवघें कडू ॥१॥

नाम गोड नाम गोड । हरी म्हणता पुरे कोड ॥२॥

गूळ साखर कायसी निंकीं । अमृताची चवी जाली फिकी ॥३॥

एका जनार्दनीं पडली मिठी । चवी घेतली ती कधीच नुठी ॥४॥

८४७

देठीचें फळ देठी पिके । न तोडितां जो चवी चाखे ॥१॥

गोड साखरसें साखरसें । रामनाम रसे चवी आलें ॥२॥

न तोडी न फोडी सगळेंची सेवी । ब्रह्मादिकां तो वाकुल्या दावी ॥३॥

एका जनार्दनीं घेतली गोडी । जीव गेला तरी चवी न सोडी ॥४॥

८४८

जीवामाजीं घालुनी जीव । परिसी अर्थ तोगौरव ॥१॥

तैं सिद्धि पावे कार्य सर्व । भव विभव निवारें ॥२॥

व्यापक तो सर्वदेशीं । भरुनी उरला सर्व साक्षी ॥३॥

राम व्यापकु सर्वदेशीं । ऐशीं कल्पना जयासी ॥४॥

जळीं स्थळीं राम भरला । एका जनार्दनीं देखिला ॥५॥

८४९

लोह परिसासी झगटे । मग काळिमा कैची भेटे ॥१॥

तैसें विनटो रामनामा । पहिलेंपण कैंचें आम्हां ॥२॥

गंगा मीनली सागरीं । ती परतेना ब्रह्मागिरि ॥३॥

नीच रतली रायासी । तिची कोण म्हणेल दासी ॥४॥

हरिभक्तांचे संगतीं । अभक्तांही उपजे भक्ति ॥५॥

एक जनार्दनी भेटी । चौदेहांची सुटें गांठी ॥६॥

८५०

रामनामावांचुनी । श्रेष्ठ नाहीं दुजें कोणही ॥१॥

हाचि अनुभव मना । घेई घेई सत्य जाणा ॥२॥

नको वाउगी खटपट । एका जनार्दनी सोपी वाट ॥३॥