श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


रामनाममहिमा - अभंग ८९१ ते ९००

८९१

जपजाप्य मंत्र नको यंत्र तंत्र । वर्णिजें जगत्र रामनाम ॥१॥

पाउला पाउली घडतसें यज्ञ । तेणें सर्व पुण्य हातीं जोडे ॥२॥

संतांची संगतीं नामाचा निजध्यास तेणें । जोडे सौरस हातीं मग ॥३॥

होई सावधान म्हणे जनार्दन । एकनाथ पूर्ण होईल धन्य ॥४॥

८९२

सांगेन तें धरा पोटी । वायां चावटीं बोलुं नये ॥१॥

एक नाम वदतां वाचे । कोटी जन्माचें सार्थक ॥२॥

चुके जेणें वेरझार । करी उच्चार रामनाम ॥३॥

एका जनार्दनीं साधन सोपें । संगतों जपें श्रीराम ॥४॥

८९३

सकामासी स्वर्गप्राप्ती । ऐशी बोले वेदश्रुती ॥१॥

हाचि घेई अनुभव । सकाम निष्कम भजे देव ॥२॥

भजतां निष्काम पैं देवा । स्वर्ग मोक्ष कोणे केवा ॥३॥

एका जनार्दनीं निष्काम । वाचे वदे रामनाम ॥४॥

८९४

मुळींच पापाचा नाहीं लेश । ऐसा घोष नामाचा ॥१॥

ब्रह्माहत्या मात्रागमन । दारूण कठीण पाप हें ॥२॥

तेंही नासें नामें कोटी । उच्चारी होटीं रामनाम ॥३॥

नामें नासे पाप । एका जनार्दनीं अनुताप ॥४॥

८९५

वोखद घेतलिया पाठी । जेवीं होय रोग तुटी ॥१॥

तैसें घेतां रामनाम । नुरे तेथें क्रोध काम ॥२॥

घडतां अमृतपान । होय जन्माचें खंडन ॥३॥

एका जनार्दनीं जैसा भाव । तैसा भेटे तया देव ॥४॥

८९६

वाचे म्हणा रामनाम । तेणें निवारे क्रोध काम । संसाराचा श्रम । नुरे कांहीं तिळमात्र ॥१॥

न लगे वेदविधि आचार । सोपा मंत्राचा उच्चार । अबद्ध अथवा शुचि साचार । राम म्हणा सादर ॥२॥

एका जनार्दनीं धरूनी भाव । वाचे वदा रामराव । भवसिंधूचें भेव नुरे तुम्हां कल्पातीं ॥३॥

८९७

अवघे रामराम वदा । नाहीं कळिकाळाची बाधा ॥१॥

अवघें वदतां नाम । नाममात्रें निष्काम ॥२॥

अवघे रंगुनी रंगले । अवघें नामें उद्धरिलें ॥३॥

अवघियां भरंवसा । एका जनार्दनीं ऐसा ठसा ॥४॥

८९८

न करी आळस रामनाम घेतां । वाचे उच्चारितां काय वेंचे ॥१॥

न लगे द्रव्य धन वेचणेंचि कांहीं । रामनाम गाई सदा मुखीं ॥२॥

सोहळे आचार न लगे विचार । पवित्र परिकर नाम मुखीं ॥३॥

शुद्ध याति कुळ अथवा चांडाळ । स्त्री अथवा बाळ हो कां नीच ॥४॥

एका जनार्दनीं नाहीं यातीचें कारण । वाचे उच्चारण तोचि शुचि ॥५॥

८९९

कळिकाळ बापुडें नामापुढें दडे । ऐसे थोर पोवाडे श्रीरामाचे ॥१॥

ऐसे वर्म सोपें सांडोनी शिणती । वायां हीन होती हांव भरी ॥२॥

असोनियां देहीं फिरती ते वायां । वाउगाचि तया शीण होय ॥३॥

एका जनार्दनीं आत्माराम देहीं । आसोनी न कळे कांहीं शिणती वायां ॥४॥

९००

जन्म कर्म अवघें व्यर्थ । ज्ञाते विवेकीं घेती अर्थ ॥१॥

हरि हाचिधर्मा मुख्य । रामकृष्ण उच्चारी मुखें ॥२॥

दिन जाऊं नेदी वाउगा जाण । काळाचें जनन रामकृष्ण ॥३॥

एका जनार्दनीं जन्म कर्म धर्म । ब्रह्मार्पण वर्म हेंचि खरें ॥४॥