श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५

१००८

धरी अवतार विश्व तारावया । अत्रीची अनूसुया गरोदर ॥१॥

ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी । शुक्लपक्ष दिनीं पूर्णतिथी ॥२॥

तिथि पूर्णिमा मास मार्गशीर्ष । गुरु तो वासर उत्सवकाळ ॥३॥

एका जनार्दनीं पूर्ण अवतार । निर्गुण निराकार आकारलें ॥४॥

१००९

अव्यक्त परब्रह्मा न्हाणी पायांवरी । अभेद नरनारी मिळोनियां ॥१॥

पीतांबर पदरें पुशिला घननीळा । निजविला निर्मळ पालखांत ॥२॥

निंब कातबोळ त्रिगुण त्रिखुंडी । प्रेमाचे आवडी सेवी माय ॥३॥

एका जनार्दनीं दत्त पाळण्यांत घातिला । हालविती त्याला अनुसुया ॥४॥

१०१०

जो जो जो जो रे निज आया । हालविती अनुसुया ॥धृ॥

पालख पुरुषार्थ चौकोनी । भक्तिनाडी गुंफोनी । दोरी प्रेमाची लाउनी । शांती गाती गाणीं ॥१॥

करितां उप्तत्ति शिणलासी । विश्रांति आलासी । निज रे ब्रह्माया तपलासी । कमळोद्भव जालासी ॥२॥

लक्ष्मीपति निज हो घनःश्यामा । सांडोनि वकुंठधामा । प्रतिपाळ करी हो जीव नामा । दर्शन दिलें आम्हां ॥३॥

पार्वतीरमण शिवा निज आतां । संहारक जीवजंता । निजरुप निगमा हो आदिनाथा । एका जनार्दनीं दाता ॥४॥

१०११

दत्त वसे औदुंबरीं । त्रिशुळ डमरु जटाधारी ॥१॥

कामधेनु आणि श्वान । उभे शोभती समान ॥२॥

गोदातीरीं नित्य वस्ती । अंगीं चर्चिली तिभुती ॥३॥

काखेमाजीं शोभे झोळी । अर्धचंद्रं वसे भाळीं ॥४॥

एका जनार्दनीं दत्त । रात्रंदिनीं आठवित ॥५॥

१०१२

दत्त माझा दीनानाथ । भक्तालागीं उभा सतत ॥१॥

त्रिशुळ घेऊनियां करीं । उभा असे भक्ताद्वारी ॥२॥

भाळीं चर्चिली विभुती । रुद्राक्षाची माळ कंठी ॥३॥

जवळी असे कामधेनु । तिचा महिमा काय वानुं ॥४॥

एका जनार्दनीं दत्त । रुप राहिलें हृदयांत ॥५॥

१०१३

हातीं कमंडलु दंड । दत्तमुर्ति ती अखंड ॥१॥

ध्यान लागो माझे मना । विनवितो गुरुराणा ॥२॥

अंगीं चर्चिली विभुती । हृदयीं वसे क्षमा शांती ॥३॥

तोचि चित्तांत आठव । गुरुराज दत्त देव ॥४॥

एका जनार्दनीं दत्त । तद्रुप हें झालें चित्त ॥५॥

१०१४

आयुष्य जाय माझे व्यर्थ । दत्त समर्थ महाराज ॥१॥

धांव धांव लवकरी । करुणा करी गुरूराया ॥२॥

मी तंव अनाथ अपराधी । हीनबुद्धि स्वामीया ॥३॥

काळ घाला पडिलावरी । धांव श्रीहरी लवलाह्मा ॥४॥

दत्ता पतित पावना । शरण एका जनार्दना ॥५॥

१०१५

धांवे पावे दत्तराजा । महाराजा गुरुराया ॥१॥

अनाथासी संभाळावें । ब्रीद पाळावें आपुलें ॥२॥

तुजविण सोडवितां । नाहीं त्राता दुसरा ॥३॥

महादोषी पतितालागीं । करा वेगी उद्धार ॥४॥

एका जनार्दनीं दत्ता । अवधुता माया बापा ॥५॥

१०१६

दत्त माझी माता दत्त माझा पिता । बहिणी बंधु चुलता दत्त माझा ॥१॥

दत्त माझा गुरु दत्त माझा तारु । मजशीं आधारु दत्तराज ॥२॥

दत्त माझे जन दत्त माझें मन । सोइरा सज्जन दत्त माझा ॥३॥

एका जनार्दनीं दत्त हा विसांवा । न विचारित गांवा जावें त्याच्या ॥४॥

१०१७

वेधोनि गेलें माझें मन । हारपलें दुजेंपण ॥१॥

ऐसी ब्रह्मामूर्ति दत्त । वोतलीसे आनंदभरीत ॥२॥

तयाविण ठाव । रिता कोठें आहे वाव ॥३॥

एका जनार्दनीं भरला । सबाह्म अभ्यंतर व्यापिला ॥४॥

१०१८

ऐसी जगाची माऊली । दत्तनामें व्यापुनि ठेली ॥१॥

जीवें जिकडें तिकडे दत्त । ऐशी जया मति होत ॥२॥

तया सांकडेंचि नाहीं । दत्त उभा सर्वा ठायीं ॥३॥

घात अघात निवारी । भक्तां बाहे धरी करीं ॥४॥

ऐशीं कृपाळु माऊली । एका जनार्दनीं देखिली ॥५॥

१०१९

लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा । देखिलासे डोळा दत्तराव ॥१॥

चरणीं घातली मिठी प्रेम दुनावें पोटीं । पाहतां हारपली दृष्टी दुजेपणा ॥२॥

मन माझें वेधलें परिपुर्ण भरलें । एका जनार्दनीं सांठविलें हृदयीं दत्त ॥३॥

१०१९

लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा । देखिलासे डोळां दत्तराव ॥१॥

चरणीं घातली मिठी प्रेम दुणावें पोटीं । पाहतां हारपली दृष्टी दुजेपणा ॥२॥

मन माझें वेधलें परिपुर्ण भरलें । एका जनार्दनीं सांठविलें हृदयीं दत्त ॥३॥

१०२०

दत्त माझी माय । आम्हां अनाथांची गाय ॥१॥

प्रेमपान्हा पाजी वेगीं । गुरुमाउली आम्हालांगी ॥२॥

आम्हां प्रीतीची साउली । श्रीगुरु दत्तराज माउली ॥३॥

आमची जीवींची जीवलगी । आम्हांलागीं घे वोसंगीं ॥४॥

एका जनार्दनीं । दत्तराज मायबहिणी ॥५॥

१०२१

दत्त माझी माय । आम्हां सुखा उणें काय ॥१॥

नित्य प्रीति दत्तनामीं । दत्त वसे गृहरामीं ॥२॥

दत्ताविण नसे दुजें । दत्त मायबाप माझें ॥३॥

दत्तात्रय दत्तात्रय । नाहीं कळिकाळाचें भय ॥४॥

एका जनार्दनीं दत्त । नित्य देख हृदयांत ॥५॥

१०२२

आमुचें कुळींचे दैवत । श्रीगुरुदत्तराज समर्थ ॥१॥

तोचि आमुचा मायबाप । नाशी सकळ संताप ॥२॥

हेंचि आमुचें व्रत तप । मुखी दत्तनाम जप ॥३॥

तयाविण हे सुटिका । नाहीं नाहीं आम्हां देखा ॥४॥

एका शरण जनार्दनीं । दत्त वसे तनमनीं ॥५॥

१०२३

माझी माता दत्तगुरु । मज तिचाचि आधारु ॥१॥

तियेविण मजलागीं । कोण रक्षील सर्वांगी ॥२॥

दत्त माझा आधार । त्यासी चिंतीं वारंवार ॥३॥

निर्विकार निरंजन । स्वामी माझा दत्त जाण ॥४॥

एका जनार्दनीं दत्त । नित्य देखे ध्याना आंत ॥५॥

१०२४

आत्मज्ञानें बिंबलें हृदयीं । दत्त वोळखिला ठायीं ॥१॥

पारिखेपणा दुर केला । अवघा दत्तचि गमला ॥२॥

नामें पवन चराचरें । तें दत्तनाम दोन अक्षरें ॥३॥

एका जनर्दनीं छंद । दत्तनामें लागला वेधु ॥४॥

१०२५

श्रीगुरुकृपें दत्त वोळखिला । हृदय डोल्हार्‍यावरी बैसविला । अभेद पुर्ण चांदवा तेथें दिला । शुद्ध भक्तीनें दत्त पुजियेला ॥१॥

दत्तचरणीं मज लागलीसे गोडी । भवभयाची तुटोनी गेली बेडी ॥धृ॥

सोहं गुढी तेथें उभारिली । मंत्र उपदेशें देहबुद्धी गेली । पुर्ण निवृत्ति प्रवृत्तिहि धाली । सहज पुर्णनंद पूर्णता जालीं ॥२॥

जिकडे पाहे तिकडे चक्रपाणी । बोलावयाची राहिली शिराणी । जनीं वनीं एकात्मता खाणी । एका जनार्दनीं रंगलीसे वाणी ॥३॥

१०२६

स्वानंदे आवडी दत्त पाहुं गेलों डोळां । तंव चराचर अवघें श्रीदत्तची लीला ॥१॥

विस्मयो दाटला आतां पाहुं मी कैसें । देखता देखणें अवघे दत्तचि दिसे ॥२॥

असे आणि नसे हा तंव विकल्प जनांत । जनीं जनार्दन निजरुपें दत्त ॥३॥

एका जनार्दनीं तेथें अद्वय नित्य । सबाह्म अभ्यंतरी दत्त नांदत ॥४॥

१०२७

मनासी स्थिरता नामें दत्त वेध । दुजा नाहीं छंद आणीक कांहीं ॥१॥

म्हणोनि संकल्प दृढ झाला पायीं । दत्तावाचुनी ठायीं नोहे कांहीं ॥२॥

पाहतां पाहणें परतलें मन । पाहण्याचें विंदान विसरलें ॥३॥

एका जनार्दनीं परब्रह्मा पुतळा । दत्त देखिला डोळां आत्मदृष्टी ॥४॥

१०२८

माझिया मनींचा फिटलासे बिहो । पाहुनियां देवो दत्तराव ॥१॥

फिटला संकल्प तुटली वासना । आन नाहीं कल्पना दुजी कांहीं ॥२॥

एका जनार्दनीं दत्त वेगळा जाण । नोहे माझा प्राण क्षणभरी ॥३॥

१०२९

त्रिगुणात्मक त्रिमूर्ति वेगळा । पाहे तो सांवळा दत्तरावो ॥१॥

मन माझे वेधलें दत्ताचे चरणीं । नाहीं आन मनीं दुजा छंद ॥२॥

परात्पर पहावा हृदयीं तैसा ध्यावा । एका जनार्दनीं सांठवावा दत्त मनीं ॥३॥

१०३०

माझी दत्त माऊली । प्रेमपान्हा पान्हावली ॥१॥

कुर्वाळुनी लावी स्तनीं । नोहे निष्ठुर क्रोध नाहीं मनीं ॥२॥

भक्तांसी न विसंबे । सदा वाट पाहे बिंबे ॥३॥

एका जनार्दनीं निश्चित । दत्तनामें पावन पतीत ॥४॥

१०३१

एकाएकीं एकला काशीवासा गेला । स्वलीला श्रीदत्त स्वयें प्रगटला ॥१॥

दत्त देव आला दत्त देव आला । स्वभाव सांडोनी भेटावया चला ॥२॥

मुक्त मंडपामाझारीं निजनाम नगरी । दत्त प्रगटला कीर्तनामाझारीं ॥३॥

भेटणें भेटीं उठी दत्ता आली भेटी । सांगणें ऐकणें दत्त होऊनि उठी ॥४॥

कीर्तनी आतौता नाम श्रीदत्त दत्ता । निजकीर्ति ऐकोनि डोळे तत्त्वतां ॥५॥

जळा सबाह्म आंतरी मनकर्णिका तीरीं । दत्त स्नान करी आत्ममुद्रेवरी ॥६॥

दत्त जंगमीं स्थावरी विश्वी विश्व धरी । तोचि दत्त घरोघरीं नित्य भिक्षा करी ॥७॥

एका जनार्दनीं दत्तवचनें देख । प्रपंच परमार्थ मीच चालवी एक ॥८॥

१०३२

दुर्लभ नरदेह पावला । प्राणी देवासी विसरला ॥१॥

सुख मानिलें संसारी । जाऊनि पडीला अघोरीं ॥२॥

संसारसिंधुसी तारक । स्वामी दत्तराज एक ॥३॥

त्याचें नाम आठवितां । चुकली भवार्णवाची वार्तां ॥४॥

एका जनार्दनीं दत्त । भवसिंधु तारक समर्थ ॥५॥

१०३३

परमर्थीं राखितां भावो नवल नव्हे पहाहो । भक्त परिग्रहो चालवी दत्तदेवो ॥१॥

कृपाळु श्रीदत्त कृपाळु श्रीदत्त । अहर्निशीं स्वयें पाळिती निजभक्त ॥२॥

वत्सालागीं जैसी व्याली धेणु धांवे । निजभक्तांकारणें दता तैसा पावे ॥३॥

भक्त कीर्तनें तोषला दत्त संतोषला । हरिजागरीं स्वयें सिद्ध प्रगटला ॥४॥

निजात्मास्थिति लीला मनीं सुमनमाळा । एका जनार्दनीं दत्त घाली गळां ॥५॥

१०३४

लागूनियां पायां जना विनवीत । मुखीं बोला दत्त वारंवार ॥१॥

तेणें तुम्हां सुख होईल अपार । दत्त दयासागर आठवावा ॥२॥

स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा । तेणें तुं अघोरा पावशील ॥३॥

एका जनार्दनीं चित्तीं दत्तपायां । दत्तरुप काया झाली त्याची ॥४॥

१०३५

वेळोवेळां सांग जना । मागें दाना सर्वांसी ॥१॥

मंगल श्रीदत्तराज । स्मरा गुरुराज समर्थ ॥२॥

आयुष्य जाय पळ पळ । करा बळ चिंतना ॥३॥

एका जनार्दनीं लोकां । विसरुं नका सांगतों ॥४॥

१०३६

वाचे बोला दत्त दत्त । होय सकळ परमार्थ ॥१॥

दत्तरुपीं लागतां दृष्टी । दत्तरुप अवघी सृष्टी ॥२॥

दत्तकथा वसे कानी । दत्तमुर्ति ध्यानीं मनीं ॥३॥

दत्तालागीं आलिंगना । कर समर्थ हें जाणा ॥४॥

एका जनार्दनीं दत्त । सदा वसे हृदयांत ॥५॥

१०३७

धन्य धन्य तेचि नर । दत्तनामीं जे तत्पर ॥१॥

त्याचे होतां दरुशन । पतित होताती पावन ॥२॥

तयालागीं शरण जावें । काया वाचा आणि जीवें ॥३॥

शरण एका जनार्दनीं । त्याचें पाय आठवी मनीं ॥४॥

१०३८

उदार दयाळ गुरुदत्त । पुरवी हेत भक्तांचा ॥१॥

त्याचे चरणीं लीन व्हावें । शुद्धभावें करुनी ॥२॥

मुखीं स्मरा गुरुदत्ता । नाहीं दाता दुसरा ॥३॥

पायीं करा तीर्थयात्रा । गुरुसमर्था भजावें ॥४॥

म्हणे एका जनार्दनीं । जनीं वनीं दत्त हा ॥५॥

१०३९

कलियुगी तारक । स्वामी दत्तराज एक ॥१॥

त्याचें नाम नित्य गावें । भवसिंधुसि तरावें ॥२॥

दत्तमूर्ति हृदयीं ध्यातां । पावे मोक्ष सायुज्यता ॥३॥

दत्त वसे जया मनीं । तया दत्त जनीं वनीं ॥४॥

एका जनार्दनीं दत्त । सबाह्म स्वानंदभरित ॥५॥

१०४०

त्रिगुणाविरहित नाम दत्तात्रेय । गातां वदतांह होय आनंद चित्ता ॥१॥

पालटेल मन संसारभावना । अंती ते चरणा भेटी होय ॥२॥

योगयाग कसवटी वाउगी रहाटी । दत्त म्हणतां होटी सव जोडे ॥३॥

एका जनार्दनीं वदतां दत्त वाचे । अनंत यागांचे पुण्य जोडे ॥४॥

१०४१

आठवितां दत्तात्रय । नासताती तापत्रय ॥१॥

प्राप्त होय ऋद्धिसिद्धि । दत्तनामें ती समाधी ॥२॥

योगयागादि साधन । गुरुभक्त पावे जाण ॥३॥

विवेक वैराग्य शमादी । हस्ती व्यसे निष्कर्मसिद्धि ॥४॥

एका जनार्दनीं दत्त । सदा हृदयीं तिष्ठत ॥५॥

१०४२

दत्तात्रेय नाम । नित्य जपे जो निष्कामा ॥१॥

तया नाहीं द्वैतभाव । दृष्टी दिसे गुरुराव ॥२॥

दत्ताविण नसे स्थान । दत्तरुप जन वन ॥३॥

ध्यानीं मनीं दत्तराज । दत्तविण नाही काज ॥४॥

एका जनार्दनीं जपा । दत्तनाम मंत्र सोपा ॥५॥

१०४३

दत्त ध्यावा दत्त गावा । दत्त आमुचा विसांवा ॥१॥

दत्त अंतर्बाह्म आहे । दत्तविण कांही नोहे ॥२॥

दत्त जनीं दत्त वनीं । दत्तरुप हें अवनीं ॥३॥

दत्तरुपी लीन वृत्ती । एका जनार्दनीं विश्रांती ॥४॥

१०४४

खुंटलासे शब्द बोलतां आनंद । सर्व बह्मानंद कोंदाटला ॥१॥

तें हें दत्तनाम आवडी आदरें । उच्चारी सोपारें सर्वकाळ ॥२॥

कलिमाजीं सोपें दत्तनाम घेतां । संसाराची वार्ता उरी नुरे ॥३॥

एका जानार्दनीं लागलासे छंद । दत्तनामे आनंद सर्वकाळ ॥४॥

१०४५

दत्त देतां आलिंगन । कैसे होताहें अभिन्न ॥१॥

स्वलीला स्वरुपता । तिन्हीं दावी अभिन्नता ॥२॥

लाघवी श्रीदत्त । देवभक्त आपणचि होत ॥३॥

मीचि जनार्दन मीचि एका । दत्तस्वरुपीं मीच मी देखा ॥४॥

एका जनार्दनीं दत्त पुढें मागें । सगुन निर्गुण रुपें लागला संगे ॥५॥

१०४६

दत्त नामाचा उच्चार । मुखीं वास निरंतर ॥१॥

तयापाशी शांति क्षमा । प्राप्त होय निजधामा ॥२॥

सर्व सुखें तयापाशी । ऋद्धिसिद्धि त्याच्या दासी ॥३॥

भुक्ति मुक्ति लोटांगणीं । लागताती त्या चरनीं ॥४॥

म्हणे एका जनार्दनीं । मना लागलेंसे ध्यान ॥५॥

१०४७

दत्त दत्त म्हणतां वाचे । तेणें सार्थक जन्मांचें ॥१॥

मनें चितावा श्रीदत्त । अंतर्बाह्म पूर्ण भरित ॥२॥

दत्तरुप पाहे डोळां । तेणें भय कळिकाळा ॥३॥

एका जनार्दनीं जपा । मंत्र द्वयाक्षरीं हा सोपा ॥४॥

१०४८

सर्व पर्वकाळ दत्त वदतां वाचे । आणिक सायासाचें मुळ खुंटें ॥१॥

म्हणा दत्त दत्त म्हणा दत्त दत्त । म्हणा दत्त दत्त वेळोवेळां ॥२॥

काळ वेळ कांहीं न लगे तत्त्वतां । नाम उच्चिरितां दरुशनं ॥३॥

भोळ्या भावीकांसी जप मंत्रावळी । दत्तनाम माउली सोपा जप ॥४॥

एका जनार्दनीं नामाचा प्रताप । निवारे भवताप दरुशनें ॥५॥

१०४९

म्हणता दत्त दत्त । दत्त करी गुणातीत ॥१॥

दत्तनामाचा निजंछंद । नामें प्रगटे परमानंद ॥२॥

निज भाव समर्थ । जेथें नाम तेथें दत्त ॥३॥

एका जनार्दन दत्त । दत्त करी देहातीत ॥४॥

१०५०

प्राणियासी मंत्र सोपा । दत्त दत्त वाचे जपा ॥१॥

आणीक लगे साधन । दत्तनामें घडे ज्ञान ॥२॥

न लगे योगयाग पाही । दत्तावांचुन नेणें कांहीं ॥३॥

एका जनार्दनीं वेधलें मन । मनचि जालें उन्मन ॥४॥

१०५१

दत्त दत्त म्हणे वाचे । काळ पाय वंदी त्याचें ॥१॥

दत्तचरणीं ठेवी वृत्ती । होय वृत्तीची निवृत्ती ॥२॥

दत्तरुप पाहे डोळां । वंद्य होय कळिकाळा ॥३॥

एका जनार्दनीं दत्त । हृदयीं वसे सदोदित ॥४॥

१०५२

श्रीदत्त ऐसी ज्याची वाचा पढे । पोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥

ऐसी प्रचीत पहा देहीं । व्यापुनी असे देही विदेही ॥२॥

एका जनार्दनीं दत्त । सबाह्म आनंदभरीत ॥३॥

१०५३

दत्त दत्त वदतां वाचे । होय जन्माचें सार्थक ॥१॥

ऐसा जया नामीं वेधु । परमानंदु हृदयीं ॥२॥

दत्त आलिंगनीं समाधान । तेणें नासे मीतूपण ॥३॥

एका जनार्दनीं वेधु । दत्तनामें लागला छंदु ॥४॥

१०५४

दत्तात्रय नाम ज्याचे नित्य मुखीं । तया समसुखीं नाहीं दुजा ॥१॥

भावें दत्त दत्त म्हणतसे वाचे । कळिकाळ त्याचे पाय वंदी ॥२॥

दत्ताचें पैं रुप ज्याचे वसे नेत्रीं । आहिक्य परत्री तोचि सुखी ॥३॥

गुरु दत्ताराया देई आलिंगन । तयासी वंदन करिती सर्व ॥४॥

दत्तरायाची जे करिताती यात्रा । त्याचेनीं पवित्र होते तीर्थ ॥५॥

ज्याचे चित्तीं वसे गुरुदत्त ध्यान । त्याचेनि पावन तिन्ही लोक ॥६॥

दत्तालागीं अपीं तन मन धन । परब्रह्मा पुर्ण तोचि झाला ॥७॥

दत्तचरण तीर्थ जो का नित्य सेवी । उगवितो गोवी प्रपंचाची ॥८॥

दत्तावरुनियां कुरवंडी काया । तयाचिया पाया मोक्ष लागे ॥९॥

एका जनार्दनीं मुखीं दत्तनाम । हरे भवश्रम क्षणामाजीं ॥१०॥

१०५५

आर्ते आरती दत्त वोवाळूं जातां । आरतीचें हरण दत्तें केलें तत्त्वतां ॥१॥

आरती खुंटली आतां वोवाळूं कैसें । तरी निजभजनें निरंजन होतसे ॥२॥

आरतीचे आर्त पुरवी श्रीदत्त । एका जनार्दनीं सहज वोवाळीत ॥३॥