श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


नाममहिमा - अभंग १२६१ ते १२७२

१२६१

उत्तम मध्यम चांडाळ । अत्यजहि तरलें खळ ॥१॥

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र । नामें पवित्र पैं जाहलें ॥२॥

यवन माई तो कुंभार । शिंपी सोनार तरले ॥३॥

एका जनार्दनीं सांगूं किती । मागें तरले पुढें तरती ॥४॥

१२६२

नाम सुलभ सोपें गातां । नाहीं भय आणि चिंता । पळती दोषांच्या चळथा । नाम गातां देशोधडीं ॥१॥

म्हणोनि धरियेली कास । जाहलों संतांचा मी दास । नाम गातां उल्हास । वारंवार मानसीं ॥२॥

उणें पुरें नको कांहीं । सोंवळें येथें नाहीं । एका जनार्दनीं देहीं । सुस्नात सर्वदा ॥३॥

१२६३

जडजीवातें उद्धरी । ऐसी नामामाजी थोरी ॥१॥

तेंचि नाम वाचे गातां । हरे जन्ममरणव्यथा ॥२॥

नामें पाषाण तारिले । गजेंद्राते उद्धारिलें ॥३॥

ऐसा नामाचा निजछंद । एका जनार्दनीं परमानंद ॥४॥

१२६४

आम्हीं धारक नामाचे । आम्हां भय नाहीं काळांचें ॥१॥

ऐशीं नामाची ती थोरी । कळिकाळ दास्य करी ॥२॥

येरा अवघिया उद्धार । नाममंत्र परिकर ॥३॥

एका जनार्दनीं पोटीं । नाम गावें सदा होटीं ॥४॥

१२६५

कोणी कांहीं तरी म्हणो । आम्ही न जाणो तया बोला ॥१॥

गाऊं सुखें नामावळी । सुख कल्लोळीं सर्वदां ॥२॥

नाचुं संतमेळीं सदा । कीर्तनीं गोविंदा रंजवुं ॥३॥

एका जनार्दनीं हाचि धंदा । वायां शब्दा न लागूं ॥४॥

१२६६

धन्य धन्य श्रीहरीचे गुण । नाम पावन ऐकतां ॥१॥

जें जें अवतारचरित्र । वर्णीता पवित्र वाणी होय ॥२॥

कीर्ति वर्णिता उद्धार जीवां । कलीयुगीं सर्वा उपदेश ॥३॥

एका जनार्दनीं सोपें वर्म । गुण कर्म वर्णितां ॥४॥

१२६७

नामाचें धारक विष्णुरुप देख । त्रिभुवनीचें सुख तये ठायीं ॥१॥

ब्रह्मा विष्णु हर येताती सामोरे । नामधारक निर्धारे तया वंद्य ॥२॥

त्रिभुवनापरता नामाचा महिमा । जाणे शंकर उमा सत्य सत्य ॥३॥

एका जनार्दनीं पतीतपावन नाम । गातां निजधामा जोडे मुक्ति ॥४॥

१२६८

मोक्ष मुक्तीचे लिगाड । वागवी अवघड कासया ॥१॥

एक नाम जपा कंठीं । राबती कोटी मुक्ति देखा ॥२॥

मोक्ष तेथें जोडोनि हात । उभाचि तिष्ठत सर्वदा ॥३॥

एका जनार्दनीं देखा । मुक्ति फुका राबती ॥४॥

१२६९

दोषी यमदुत नेतसे बांधोनी । तंव अवचित नाम पडलें कानीं ॥१॥

तुटलें बंधन खुंटलें पतन । नाम जनार्दन ऐकतांची ॥२॥

तुटोनि बंधन पडता तळीं । तंव वरचेवर झेली वनमाळी ॥३॥

दुती अति दृढ नाम धरितां मनीं । यमदूतां देवदूत घालिती विमानीं ॥४॥

दोषी आणि दूता नामाचा परिपाठीं । भावबळें देव स्थापी वैकुंठी ॥५॥

एका जनार्दनीं नामोच्चारासाठीं । यमे यमदूतां नोहे भेटीं ॥६॥

१२७०

चित्रगुप्त म्हणती करावें काई । यमदूताविण न चले कांहीं ॥१॥

नामें नागविलें नामें नागविलें । यम म्हणे माझे सामर्थ्य न चले ॥२॥

यम चित्रगुप्त नाम विवंचीत । नम विवंचितां जाले मुक्त ॥३॥

यमें यमदुता आल्हादें भेटी । अवघे चतुर्भुज झाले वैकुंठीं ॥४॥

जनामाजी थोर दाटुगें नाम । यमें यमदूत झाले आत्माराम ॥५॥

एका जनार्दनीं नामाचा गुण । यमेसी यमलोक जाला परब्रह्मा पूर्ण ॥६॥

१२७१

जपतां नाम पडे धाक । पातकें पळती त्रिवाटे देख । कळिकाळाचें नासे दुःख । ऐसें नामीं सामर्थ्य ॥१॥

जप तप नामावळी । आणिक नको मंत्रावळी । ब्रह्माज्ञान बोली । वायां शीण आटाआटी ॥२॥

साधनें पुण्य असेल गांठीं । तरीच नाम येईल होटीं । एका जनार्दनीं पोटीं । दया शांति आकळे ॥३॥

१२७२

नित्य नैमित्तिक कर्म । जया न घडे हा धर्म । येणें उच्चारावें नाम । सत्य निर्धार जाणावा ॥१॥

नामें कर्माचा सुटे उपाधी । नामें तुटे आधी व्याधी । नामें शोक संदेह बुद्धी । नासतसे हरिनामें ॥२॥

नाना रोग तुटती नामें । घडती सर्व ब्रह्माकर्में । एका जनार्दनीं नामें । धर्म सकळ साधती ॥३॥