श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३५०

१३२४

नामपाठें ओहं सोहं कोहं खादलें । परब्रह्मा लक्षिलें नामपाठें ॥१॥

अहं अहंपण सोहं सोहंपण । नाम हेंचि खूण नामपाठें ॥२॥

जनार्दनाचा एका कोहंपणा वेगळा । जनार्दनें कुर्वाळिला अभय दानीं ॥३॥

१३२५

नामपाठ गीता नामपाठ गीता । नाम पाठ गीता गाय सदा ॥१॥

हाचि बोध सोपा अर्जुना उपदेश । नामपाठें क्लेश सर्व गेले ।२॥

जनार्दनाचा एका वाचे गाये गीता । हारपली चिंता जन्मरण ॥३॥

१३२६

नामपाठें गीता ज्ञानेश्वरी होय । स्मरे तूं निर्भय ज्ञानदेवी ॥१॥

नामपाठें सोपीं अक्षरें ती उच्चार । ज्ञानेश्वरी उच्चार करी वाचे ॥२॥

जनार्दनाचा एका ज्ञानेश्वरवरी ध्याय । तेणें मुक्त होय युगायुगीं ॥३॥

१३२७

नामपाठ ज्ञानदेवी नामपाठ तूं करीं । चुकें वेरझारी चौर्‍यांशीची ॥१॥

ऐसें वर्म सोपें सांगो जगा गुज । ज्ञानेश्वरी निजीं जपों आधीं ॥२॥

जनार्दनाचा एका चरणीं विनटला । धन्य धन्य झाला ज्ञानदेवी ॥३॥

१३२८

नामपाठें वर्म वेदींचें तें कळे । नाम पाठबळें शास्त्रबोध ॥१॥

या दोहींचेंवर्म ज्ञानदेवी जाणा । जपें कां रे जना हृदयीं सदा ॥२॥

जनार्दनाचा एक विनित हो उनी । आठवितो मनी ज्ञानदेवा ॥३॥

१३२९

नामपाठें संदेह सर्व हा जाईल । गामपाठ गाईल प्रेमभावें ॥१॥

नामपाठ सोपा नामपाठ सोपा । अहर्निशीं बापा जप करी ॥२॥

जनार्दनाचा एका ठेउनी विश्वास । नामपाठ निजध्यास करीं सदा ॥३॥

१३३०

नामपाठ साधन याहुनी आहे कोण । कासयासी पेणें स्वर्गवास ॥१॥

जन्म देई देवा जन्म देई देवा । गाईन मी देवा नामपाठ ॥२॥

जनार्दनाचा एका बोलतसे वाणी । नामपाठें जनीं जनार्दन ॥३॥

१३३१

नामपाठ युक्ति भाविकां प्रतीती । लोभिया विरक्ती नामपाठें ॥१॥

नामपाठें याग नामपाठ योग । नामपाठें भोग सरे आधीं ॥२॥

जनार्दनाचा एका भोगातीत झाला । म्हणोनि वोळला जनार्दन ॥३॥

१३३२

नामपाठें मोक्ष पाविजे तत्त्वतां । आणिक तें आतां साधन नाहीं ॥१॥

नामपाठ सार नामपाठ सार । न करी विचार आणिक दुजा ॥२॥

जनार्दनाचा एका नामपाठ गाय । आदरें नाचताहे संतापुढें ॥३॥

१३३३

नामपाठें संत पावले विसांवा । आणिक नाहीं ठेवा दुजा कांहीं ॥१॥

नामपाठें सिद्धि येईल हातां । मोक्षमार्ग तत्त्वतां नामपाठें ॥२॥

जनार्दनाचा एका नामपाठें तरला । उद्धार तो केला जडजीवां ॥३॥

१३३४

नामपाठे युक्ती साधन समाप्ती । नोहे दुजी प्रीति नामपाठें ॥१॥

आणिक खटपट कासया बोभाट । नामपाठ वाट वैकुंठाची ॥२॥

जनार्दनाचा एका नामपाठें रंगला । आनंदें वहिला नाचतसे ॥३॥

१३३५

नामपाठ मंत्र सर्वांत पैं श्रेष्ठ । तेणें तें वैंकुठ सरतें केलें ॥१॥

नामपाठें साधे साधन तत्त्वतां । मोक्ष सायुज्यता हातां लागें ॥२॥

जनार्दनाचा एका प्रेमें नाम गाय । उभारुनी बाह्म सांगतसे ॥३॥

१३३६

नामपाठ करितां आनंद मानसें । योगयाग राशीं पायां लागे ॥१॥

आनंदें आवडी नामपाठ गाय । उभा तारिता बाह्मा जना ॥२॥

जनार्दनाचा एका सांगे जगाप्राती । नामपाठें विश्रांती होईल जना ॥३॥

१३३७

नामपाठ पसारा घे रे मुखें सदा । कळिकाळाची बाधा तुज नोहे ॥१॥

नाम तें सोपें नाम तें सोपें । नाम तें सोपें विठ्ठलाचें ॥२॥

जनार्दनाचा एका नामपाठ वाणी । कीर्ति त्रिभुवनी नाममाठें ॥३॥

१३३८

नामपाठ कसवटी अखंड ज्याचे मुखीं । तोचि झाला इहीं जनीं ॥१॥

नामपाठ धन्य नामपाठ धन्य । नामपाठ धन्य कालीमाजीं ॥२॥

जनार्दनाचा एका नामपाठें मिरविला । श्रीरंग वरला नामपाठें ॥३॥

१३३९

नामपाठे ज्ञान नामपाठें ध्यान । नामपाठे मन स्थिर होय ॥१॥

जगांत हें सार नामपाठ भक्ती । आणिक विश्रांती नाहीं नाहीं ॥२॥

जनार्दनाचा एका अखंड नाम गाय । हर्ष नाचताहे प्रेमे रंगीं ॥३॥

१३४०

नामचेनि पाठें जाती पैं वैकुंठी । आणिक खटपटी न तरती ॥१॥

आठवा नामपाठ आठवा नामपाठ । वाउगा बोभाट करुं नका ॥२॥

जनार्दनाचा एका नामपाठें तरला । जनार्दन जोडला गुरु मज ॥३॥

१३४१

संसार पाल्हाळ सांगती परिकर । नामपाठ सार सिद्धवरी ॥१॥

न करी आळस नामपाठ गातां । तुटे भवचितां नाना व्याधीं ॥२॥

जनार्दनाचा एका जनार्दन चरणीं । भासे जनीं वनीं जनार्दन ॥३॥

१३४२

नामपाठ नित्य एक नेमें गायें । हरिकृपा होय तयावरी ॥१॥

अंतरीं बाहेरी रक्षी नारायण । आलिया विघ्न निवारी साचें ॥२॥

जनार्दनाचा एका प्रचीत घेउनी । गात असे वाणी नामपाठ ॥३॥

१३४३

नामपाठ गंगा नामपाठ सरिता । सागर जाती भंगा नामपाठें ॥१॥

नामपाठ सरिता सागर संगम । देवभक्त नाम तिन्हीं बोध ॥२॥

जनार्दनाचा एका करितो मार्जन । त्रिवेणीं स्नान पुण्य जोडे ॥३॥

१३४४

नामपाठ श्रेष्ठ तीर्थाचे तें तीर्थ । वदे तूं चितारहित सर्वकाळ ॥१॥

काळाचें तें काळ नामपाठ गात । काळ हा तयास नमस्कारी ॥२॥

जनार्दनाचा एका काळा बांधी चरणीं । म्हणोनी जनार्दनीं विनटला ॥३॥

१३४५

नामपाठ श्रेष्ठ तीर्थाचें तें तीर्थ । वदे तूं चितारहित सर्वकाळ ॥१॥

काळांचे तें काळ नामपाठ गात । काळ हा तयास नमस्कारी ॥२॥

जनार्दनाचा एका काळा बांधी चरणीं । म्हणोनी जनार्दनीं विनटला ॥३॥

१३४६

नामपाठ यश कीर्ति नामपाठें । तो जाय वैकुंठा हेळामात्रें ॥१॥

न करी रे जना आळस मानसीं । नामपाठ अहर्निशी जपे सदा ॥२॥

जनार्दनाच एका सांगतो आदरें । नामपाठ स्मरे वेळोवेळां ॥३॥

१३४७

आणिक साधन नाहीं नाहीं जगीं । नामपाठ वेगीं गाय जना ॥१॥

तुटली बंधनें खुंटलें पतन । नामपाठ खुण वैकुंठाची ॥२॥

जनार्दनाचा एका नामपाठें रंगला । भोळ्या भाविकाला नामपाठ ॥३॥

१३४८

चंचळ तें मन मुष्टीमाजी धरी । नामपाठ हरि गाये सदा ॥१॥

जोडेल सर्व सिद्धि तुटेल उपाधी । नामपाठी आधींभावें गाय ॥२॥

जनार्दनाचा एका निश्चयें करुनीं । नामपाठ निर्वाणीं जपतसे ॥३॥

१३४९

नामपाठ स्नान नामपाठ दान । नामपाठ ध्यान जनार्दन ॥१॥

नामपाठ संध्या नामपाठ कर्म । नामपाठें धर्म सव जोडे ॥२॥

जनार्दनाचा एका करी नामपाठ । आणिक नाहें श्रेष्ठ नामेंविण ॥३॥

नामपाठ संध्येतील चोवीस नामांचा नामोच्चार

१३५०

नामपाठ केशव वदा नित्य वाचे । सार्थक देहांचे सहजासहज ॥१॥

आठवी केशव आठवीं केशव । ठेवी तूं भाव केशवचरणीं ॥२॥

जनार्दनाचा एका केशवीं विनटला । प्रेमें तो दाटला हृदयामाजीं ॥३॥