श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


नामपाठमार्ग - अभंग १३५१ ते १३७३

१३५१

नामपाठ नारायण वदे सर्वकाळ । काळाच तो काळ नारायण ॥१॥

नारायण गाय नारायण ध्याय । नारायण पाहे सर्वाठायीं ॥२॥

जनार्दनाचा एका नारायणीं प्रेम । आणिक नाहीं प्रेम दुजा कांहीं ॥३॥

१३५२

नामापाठ माधव सदा तूं उच्चारी । माधव अंतरीं धरुनी राहे ॥१।

माधवा माधवा आठवी यादवा । आणिक धांवा धांवा करुं नको ॥२॥

जनार्दनाचा एक माधवीं मुराला । वसंत तयाला जनार्दन ॥३॥

१३५३

नामपाठ गोविंद हाचि लागो छंद । न करी भेदाभेद हृदयामाजीं ॥१॥

गोविंद नाम गाय गोविंद नाम गाय । गोविंद नाम गाय हृदयीं सदा ॥२॥

जनार्दनाचा एका हृदयीं ध्यायें सच्चित्ता । गोविंद गीतीं सुख जोडे ॥३॥

१३५४

विष्णुनामपाठ करी वेळोवेळां । पाहे तूं सावळा विष्णुसखा ॥१॥

विष्णुनाम गाय अंतरी सर्वदा । तुटें जन्मजरा बाधा येणें नामें ॥२॥

जानर्दनाचा एका विष्णुरुप देखा । जनार्दन सखा एकरुप ॥३॥

१३५५

नामपाठें मधुसुदन वाचे । अनंत जन्माचें दोष जाती ॥१॥

मधुनामे जैसा मोक्षकेशी वेधु । तैसा तूं बोधूं धरीं देहीं ॥२॥

जनार्दनाचा एका मधुर बोले वाणीं । मधुसूदन चरणीं देउनी दिठी ॥३॥

१३५६

नामपाठ त्रिविक्रम वदे तूं रे वाचे । अनंत जन्माचे दोष जाती ॥१॥

बळीये द्वारी त्रिविक्रम उभा । नाम पाठें उभा तुजपुढें ॥२॥

जनार्दनाचा एका त्रिविक्रमीं वंदी । साधन उपाधी नेणें आन ॥३॥

१३५७

नामपाठें वामन अक्षरें तीं तीन । आणिक योगसाधन आन नाहीं ॥१॥

वदे तूं वामन वदे तूं वामन । विषय वमन करुनि सांडि ॥२॥

जनार्दनाचा एका नसे तो पारखा । वामन तेणें सखा जोडियेला ॥३॥

१३५८

नाम तें सार श्रीधरांचे वाचे । कोटी जन्माचें दोष जाती ॥१॥

जपें तूं आवडी धरुनियां गोडी । युगाऐसीं धडी करुनियां ॥२॥

जनार्दनीं एका श्रीधर निजसखा । नोहे तो पारखा जनार्दनीं ॥३॥

१३५९

नाम हृषिकेश गाये सावकाश । धरुनि उदास देहाअशा ॥१॥

जाईल जाईल देह नाशिवंत । नाम तें शाश्वत हृषिकेश ॥२॥

जनार्दनाचा एका नाम गाय सदा । पंचभूत बाधा तेणे नोहे ॥३॥

१३६०

नाम तें सोपें पद्मनाभ पाठ । करी तूं बोभाट दिवसनिशीं ॥१॥

चौसष्ट घडियामाजीं जपें नामावली । कळिकाळ टाळी मारुं न शके ॥२॥

जनार्दनाचा एक नामीं तो निर्भय । कळिकाळ वंदी पाय जन्मोजन्मी ॥३॥

१३६१

दामोदर गावा दामोदर पहावा । दामोदर सांठवा हृदयमाजीं ॥१॥

गोपीराजी ध्यान दामोदरीं मन । चुकलें बंधन नाम घेतां ॥२॥

जनार्दनाचा एका दामोदरी मिनला । कृतकृत्य झाला उभय लोकीं ॥३॥

१३६२

नाम तें सोपें संकर्षण जपे । आणिक संकल्पें धरुं नको ॥१॥

धरितां संकल्प नाशिवंत बापा । नाम जप सोपा मंत्रमार्ग ॥२॥

जनार्दनाच एक बोले लडिवाळ । जनार्दन कृपाळ जगीं तोची ॥३॥

१३६३

वासुदेव नाम प्रातःकाळीं वाचे । धन्य जन्म त्यांचें सुफळ सदा ॥१॥

वाहतां टाळीं मुखीं नाम सार । वासुदेव उच्चार करी आधीं ॥२॥

जनार्दनाचा एका एकपणें देखा । जनार्दन सखा जोडियेला ॥३॥

१३६४

नाम जप वाचा प्रद्युम्न साचा । न करी नामाचा आळस कदा ॥१॥

संसारयातना जाती पां निर्धारें । नाम निरंतर जपें आधीं ॥२॥

जनार्दनाचा एका त्रैलोक्याचा सखा । झाली पूर्ण कृपा जनार्दन ॥३॥

१३६५

नाम अनिरुद्ध जगीं तें प्रसिद्ध । ओहं सोहं बोध गिळोनि गाय ॥१॥

अहंकार सांडी नाम मुखें मांडी । साधन देशधडी करुनी जपें ॥२॥

जनार्दनाच एक साधन सारुनी । जनार्दनचरणीं विनटला ॥३॥

१३६६

नामपुरुषोत्तम घेई तूं आवडी । यातना कल्पकोडी नाहीं तुज ॥१॥

नाम हें आठवी नाम हें आठवी । हृदयीं सांठवी पुरुषोत्तम ॥२॥

जनार्दनाचा एका पारखी नेटका । पुरुषोत्तम सखा जोडिलासे ॥३॥

१३६७

नाम तूं अधोक्षज घेई सर्वकाळ । महाकाळ काळ अधोक्षज ॥१॥

नामीं धरुनी प्रीति आठव सर्वदा । नाहीं तुज बाधा जन्मोजन्मीं ॥२॥

जनार्दनाचा एका प्रेमें विनटला । आपुलासा केला जनार्दन ॥३॥

१३६८

नाम नारसिंह नाम नारसिंह । भक्तांसी तो सम सर्वकाळ ॥१॥

जपे तो प्रल्हाद आवडी तें नाम । पावला सर्वोत्तम तयालागीं ॥२॥

जनार्दनाचा एका रुप तें पाहुनी । नारसिंहचरणीं मिठी घाली ॥३॥

१३६९

वंदें तूं अच्युत सर्वकाळ सदा । मायापाश बंध तुटोनि जाय ॥१॥

करी कां रे नेम धरीं का रे प्रेम । अच्युताचें नाम वंदे सदा ॥२॥

जनार्दनाचा एका अच्युत पै झाला । सप्रेमे रंगला प्रेमें रंगीं ॥३॥

१३७०

नाम जनार्दन रुप जनार्दन । ध्यान जनार्दन सर्व मज ॥१॥

माय जनार्दन बाप जनार्दन । जन जनार्दन सर्व मज ॥२॥

जनार्दनाचा एका जनार्दन देखा । जनीं वनीं सखा जनार्दन ॥३॥

१३७१

नाम उपेंद्र सर्व देवांचा तो इंद्र । शुभ काळ वक्त्र जप सदा ॥१॥

तें नाम सोपें जपें कां रे वाचे । अहर्निशी साचें नाम जप ॥२॥

जनार्दनाचा एका एकाभावें नटला । हृदयीं सांठ विला जनार्दन ॥३॥

१३७२

नाम हरिहर संसार तो हरी । सबाह्म अभ्यंतरीं हरि माझा ॥१॥

हरिनाम जपें हरिनाम जपें । ते वर्म सोपें हरि जपें ॥२॥

जनार्दनाचा एका हरिचरणीं देखा । सुखासुख सुखा अनुभवला ॥३॥

१३७३

नाम श्रीकृष्ण उद्धवें साधिलें । चोविस नामें झालें जप पवे ॥१॥

आठवा श्रीकृष्ण आठवा श्रीकृष्ण । आठवा श्रीकृष्ण वेळोवेळां ॥२॥

जनार्दनाचा एका श्रीकृष्ण निजसखा । जनार्दनें देखा दावियेला ॥३॥