श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


नामपाठ - अभंग १५७१ ते १५९०

१५७१

संतांचे ठायीं नाहीं द्वैतभाव । रंक आणि राव सारिखाची ॥१॥

संताचें देणें अरिमित्रां सम । कैवल्यांचें धाम उघड तें ॥२॥

संतांची थोरीव वैभव गौरव । न कळे अभिप्राय देवासी तो ॥३॥

एका जनार्दनीं करी संतसेवा । परब्रह्मा ठेवा प्राप्त जाला ॥४॥

१५७२

दरुशनें तरती प्राणी । ऐशी आयणी जयाची ॥१॥

ठेवितांचि मस्तकी हात । देवाचि करीत तयासी ॥२॥

देउनी नाममात्रा रस । भवरोगास छेदिती ॥३॥

एका जनार्दनीं ते संत । कृपावंत दीनालागीं ॥४॥

१५७३

सम असे सुखदुःख । संत त्यासी म्हणती देख ॥१॥

पापपुण्य मावळलें । द्वैत सव दुरावलें ॥२॥

हर्ष शोक नाहीं देहीं । संत जाणावे विदेही ॥३॥

एका जनार्दनीं संत । जनालागीं कृपावंत ॥४॥

१५७४

मुखीं नाही निंदा स्तुती । साधु वरिती आत्मस्थिती ॥१॥

राग द्वेष समुळ गेले । द्वैताद्वैत हारपलें ॥२॥

घेणे देणें हा पसारा । नाहीं जयासी दुसरा ॥३॥

एका जनार्दनीं संत । ज्याचे हृदयीं भगवंत ॥४॥

१५७५

मान देखोनि सहसा । संतां असंतोष होय जैसा ॥१॥

नाम ऐकुनि बागुलातें । बाळ सांडु पाहें प्राणातें ॥२॥

चंडवातें ते कर्दळी । समूळ कांपे चळचळीं ॥३॥

सन्मानें नामरुप जाय । एका जनार्दनीं सत्य पाहे ॥४॥

१५७६

पवित्र तो देह सदा ज्याचा नेम । वाचे गाय राम सर्वभावें ॥१॥

धन्य ते भाग्याचा तरला संसार । परमार्थाचें घर नाम मुखीं ॥२॥

करितसे कथा कीर्तनीं आवडी । ब्रह्माज्ञान जोडी तया लाभे ॥३॥

एका जनार्दनीं धन्य तें शरीर । परमार्थ संसार एकरुप ॥४॥

१५७७

छळिला न येती रागावरी । तदाकरी वृत्ती मुराली ॥१॥

आपपर नाहीं जेथें । भेद तेथें नसेची ॥२॥

याती असो भलते परी । एकसरी जयासी ॥३॥

एका जनार्दनीं भाव । अवघियां ठाव एकची ॥४॥

१५७८

देहींची वासना अद्वैत निमालें । साधन साधिलें तोचि धन्य ॥१॥

द्वैताचा भाव अद्वैताचा ठाव । आठवा स्वयमेव नेणें कांहीं ॥२॥

एका जनार्दनीं अद्वैता वेगळा । राहिला निराळा सुखरुप ॥३॥

१५७९

सहज सहज ऐशा करिताती गोष्टी । परि सहजाची भेटी विरळा जाणें ॥१॥

सहजाच्या आवडी विद्या अविद्या तोडी । जाणीव नेणीवेची राहुं नेदी बेडी ॥२॥

जाणीव जाणपण नेणिवां नेणपण । दोहींच्या विंदाने सहजाचें दर्शन ॥३॥

एका जनार्दनीं जाणीव नेणीव । सहज चैतन्यासी देउनी ठेला खेव ॥४॥

१५८०

कार्य कर्ता आणि कारण । त्रिगुणेशीं त्रिपुटी शुन्य ॥१॥

अंगीं गुण आदळतां तिन्हीं गुण । जया चित्तवृत्ति नोहे भिन्न ॥२॥

ऐसा त्रिगुणावेगळां । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥३॥

१५८१

जागा परी निजला दिसे । कर्म करी स्फुरण नसे ॥१॥

सकळ शरीराचा गोळा । होय आळसाचा मोदळा ॥२॥

संकल्पविकल्पाची ख्याती । उपजेचिना सदा चित्तीं ॥३॥

यापरी जनीं असोनि वेगळा । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥४॥

१५८२

आपुलीच दारा जरी टेके व्यभिचार । क्रोधाचा थारा अंतरीं नये ॥१॥

आपुलेंच धन तस्करें नेतां जाण । जयांचें मन उद्विग्र नव्हे ॥२॥

आपुलाची पुत्र वधोनि जाय शत्रु । परी मोहाचा पाझरु नेत्रीं नये ॥३॥

आपुलें शरीर गांजितां परनरें । परी शंतींचें घर चळो नेदी ॥४॥

एका जनार्दनीं जया पूर्ण बोधू । तोचि एक साधु जगामाजीं ॥५॥

१५८३

असोनि संसारीं आपदा । वाचे वदे विठ्ठल सदा ॥१॥

नाहीं मानसीं तळमळ । सदा शांत गंगाजळ ॥२॥

असोनियां अंकिंचन । जयाची वृत्ति समाधान ॥३॥

एका जनार्दनीं ऐसें थोडे । लक्षामध्येंअ एक निवडे ॥४॥

१५८४

इहलोकीं बरा तो परलोकीं वंद्य । त्यासी भेदत्व निंद्य उरलें नाहीं ॥१॥

परस्त्री देखतां नपुंसक वागे । परधन पाहतां अंधापरी निघे ॥२॥

वाद वेवादा नोहे त्याची मती । हृदयीं भगवद्भक्ति सदा वाहे ॥३॥

एका जनार्दनीं ऐसें विरळे प्राणी । कोटी माजीं जनें एक देखो ॥४॥

१५८५

न मानी सन्मानाचें कोडें । नाहीं चाड विषयाची ॥१॥

ऐसें मज शरण येती । तयांचे उणें न पडे कल्पांती ॥२॥

नाहीं संसाराची चाड । नाहीं भीड कवणाची ॥३॥

एका त्याचा म्हणवी दास । धरुनी आस जनार्दनीं ॥४॥

१५८६

देह पाहतां दोषाची दिठी । वृत्ती दिसे तैं स्वरुपीं मिठीं ॥१॥

कैसेनी हरिदास भासती । देही असे तंव दोष दिसती ॥२॥

देह दिसतां न दिसे भावो । वृत्ती दिसे तंव समाधान पहा हो ॥३॥

एका जनार्दनाच्या पाही । वृत्ती दिसे तैं दोष नाहीं ॥४॥

१५८७

सदा वसे अंगीं शांती । चारी मुक्ति होती दासी ॥१॥

तोचि सखे हरीचे दास । सदा सोंवळे उदास ॥२॥

कामक्रोधाची वार्ता । अंगीं नाहीं पैं सर्वथा ॥३॥

एका जनार्दनीं निष्काम । सदा परिपूर्ण मंगळधाम ॥४॥

१५८८

मुक्तिची तो नाही चाड । ऐसे वाड हरि दास ॥१॥

मोक्षमुक्तिसी कोण पुसे । हें तों सरसें भांडवल ॥२॥

लक्ष्मीसहित देव नांदे । येरा विनोदें काय चाड ॥३॥

एका जनार्दनीं दास्य करी । मुक्ति तेथें फुका वरी ॥४॥

१५८९

संतांचा दास तो देवाचा भक्त । तरती पतीत दरुशनें त्यांच्या ॥१॥

त्याचिया योगें घडती सर्व । तीर्थ तें पवित्र होतीं तीर्थें ॥२॥

तयाचियां पदें धरा धन्य म्हणे । ऐसे जे भेदरहित मनें तेचि संत ॥३॥

एका जनार्दनीं तयाच्या प्रसादे । कर्मे अकर्मा दोंदें निघताती ॥४॥

१५९०

जयाचेचि चरणीं तीर्था तीर्थपण । तों हृदयीं केला सांठवण ॥१॥

नवल महिमा हरिदासाची । तीर्थें उपजती त्याचे कुशीं ॥२॥

काशीं मरणें होय मुक्ति । तेथें वचनें न मरतां होय मुक्ति ॥३॥

एका जनार्दनाचे भेटी । सकळ तीर्थे वोळंगतीं दिठी ॥४॥