श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


नामपाठ - अभंग १७५१ ते १७७०

१७५१

अंगीं जया पुर्ण शांती । वाचा रामनाम वदती । अनुसरले चित्तवृत्तीं । संतचरणीं सर्वदा ॥१॥

घडो तयांचा मज संग । जन्ममरणाचा फिटतसे पांग । आधिव्याधि निरसोनी सांग । घडतां संग वैष्णवांचा ॥२॥

जें दुर्लभ तिहीं लोकां । आम्हां सांपडलें फुका । एका जनार्दनीं घोका । नाम त्यांचे आवडी ॥३॥

१७५२

बाळकाची बोबडी वाणी । ऐकोनी जननी संतोषे ॥१॥

तैसे तुम्हीं कॄपाबळें । पाळिले लळे संतजनीं ॥२॥

बाळाचे जे जे अपराध । माता न करी तयासी कोध ॥३॥

शरण एका जनार्दनी । मिळविलें गुणी आपुलिया ॥४॥

१७५३

देऊनिया अभयदान । संतीं केलें मज पावन । निरसोनी भवबंधन । तारिलें मज ॥१॥

ऐसा संतसमागम । नाहीं आणीक विश्रामक । योगीयांचें धाम कुंठीत पैं झाले ॥२॥

आणीक एक वर्म । मुख्य इंद्रियांचा धर्म । मन ठेवुनी विश्राम । नामचिंतन करावें ॥३॥

एका जनार्दनीं जाण । संत आमुचें निजधान । काया वाच मन । दृढ पायीं ॥४॥

१७५४

माझ्या मनाचा संदेह । फिटला देखतांचि पाय ॥१॥

तुम्हीं कृपा केली संतीं । निरसली भय खंती ॥२॥

माझें मज दिलें हाती । जाहली समाधान वृत्ती ॥३॥

एका जनार्दनीं शरण । निरसला भवशील ॥४॥

१७५५

आलिंगन संतपायां । पावली काया विश्रांती ॥१॥

सुख अपार झालें । संत पाउलें देखतां ॥२॥

अवघा श्रम फळा आला । काळ गेला देशधडी ॥३॥

एका जनार्दनीं संत । मज भेटोत अखंडित ॥४॥

१७५६

सतीं केला उपकार । मज निर्धार बाणला ॥१॥

चुकविलें जन्माचें सांकडें । उगविलें कोडें बहुतांचें ॥२॥

गुण अवगुण नणितां मनीं । देती दरुशनीं मुक्ति त्या ॥३॥

शरण एका जनादनें । करुं वोवाळणीं देहाची ॥४॥

१७५७

संतसंगतीने झाले माझे काज । अंतरीं तें निज प्रगटलें ॥१॥

बरवा झाला समागम । अवघा निवारला श्रमक ॥२॥

दैन्य दरिद्र दुर गेलें । संतपाउले देखतां ॥३॥

एका जनार्दनीं सेवा । करीन मी आपुल्या भावा ॥४॥

१७५८

भाग्याचा उदय झाला । संतसंग मज घडला ॥१॥

तेंणें आनंदाचे पुर । लोटताती निरंतर ॥२॥

प्रेम सप्रेम भरतें । अंगी उतार चढते ॥३॥

आली आनंदलहरी । एका जनार्दनीं निर्धारीं ॥४॥

१७५९

आजी उत्तम सुदीन । झालें दरुशन संतांचें ॥१॥

पापताप दैन्य गेलें । संत पाउलें पहातां ॥२॥

आवघा यत्न फळा आला । अवघा झाला आनंद ॥३॥

अवघें कर्म सुकर्म झालें । अवघे भेटले संतजन ॥४॥

एका जनार्दनीं बरा । संतसमागम खरा ॥५॥

१७६०

आजी दिवस धन्य झाला । संतसमागम पावला ॥१॥

बरवा फळला शकून । अवघा निवारला शीण ॥२॥

सुस्नात झालों । संतसमागरीं नाहलों ॥३॥

एका जनार्दनीं भावें । संतचरणीं लीन व्हावें ॥४॥

१७६१

घटिका पळ न वजे वायां । संतपायां सांडोनी ॥१॥

मनोरथ पुरले मनीचें । झाले देहांचें सार्थक ॥२॥

जन्मा आलियांचें काज । संतसंग घडला निज ॥३॥

एका जनार्दनीं मिठी । संतसंग जडला पोटीं ॥४॥

१७६२

जाणतें संत जाणते संत । जाणते संत अतरीचें ॥१॥

जे जे इच्छा देती फळ । काळ वेळ चुकवोनी ॥२॥

मनोरथ पुरले वो माझे । एका जनार्दनी वोझें ॥३॥

१७६३

जयाच्या चरणां मिठी घाली भावें । धन्य ते जाणावे सदैव संत ॥१॥

प्रेमाचे सागर भक्तीचे उदधी । तोडिला उपाधी नाममात्रें ॥२॥

जडजीवां तारक सत्य सत्य वाचे । आणीक तें न वचे उपमे त्याच्या ॥३॥

एका जनार्दनीं कृपाळु संतजन । तेणे मज पावन केलें जगीं ॥४॥

१७६४

जाणती हे हातवटी । संत पोटीं दयाळू ॥१॥

न म्हणती अधम जन । करिती कृपेचें पोषण ॥२॥

शुचि अशुचि न म्हणे कांहीं । एकरुप वर्ते देहीं ॥३॥

एका जनार्दनीं मज । तारियेलें तेणे सहज ॥४॥

१७६५

कैवल्य निधान तुम्ही संतजन । काया वाच मन जडलें पायीं ॥१॥

सर्वभावें दास अंकित अंकीला । पूर्णपणें जाहला बोध देहीं ॥२॥

जें जें दृष्टी दिसे तें तें ब्रह्मारुप । एका जनार्दनीं दीप प्रज्वळिला ॥३॥

१७६६

धन्य दिवस जाहल । संतसमुदाय भेटला ॥१॥

कोडें फिटलें जन्माचें । सार्थक जाहलें पैं साचें ॥२॥

आज दिवाळी दसरा । संतपाय आले घरा ॥३॥

एका जनार्दनीं जाहला । धन्य तो दिवस भला ॥४॥

१७६७

केल सती उपकार । दिधलें घर दावुनी ॥१॥

नये ध्यानीं मनीं लक्षीं । तो प्रत्यक्षीं दाविला ॥२॥

संकल्पाचें तोंडिलें मूळ । आलें समुळ प्रत्यया ॥३॥

एका जनार्दनीं कृपावंत । होती संत सारखे ॥४॥

१७६८

मती लागो संतसंरणीं । तेथें उन्मनी साधती ॥१॥

तुच्छ वाटे स्वर्ग लोक । जैसा रंक इंद्रासी ॥२॥

आधार तो जैसा फळे । किरण उजाळे देखतां ॥३॥

एका जनार्दन शरण । मनचि जालें कृष्णार्पण ॥४॥

१७६९

मोकळें तें मन ठेविलें बांधोनी । जनार्दनचरणीं सर्वभावें ॥१॥

स्थिर मति जाली वार्ता तीही गेली । द्वैताची फिटली सर्वसत्ता ॥२॥

मोह आशाबद्ध कमी निवारली । पावन तो जालों संतचरणीं ॥३॥

एका जनार्दनीं धन्य संतसेवा । उगविला गोंवा गुंती सर्व ॥४॥

१७७०

पाजी प्रेमपान्हा लाऊनियां सोई । पुन्हा तो न गोवीं येरझारीं ॥१॥

येरझार दारीं घातलासे चिरा । ठेविलेंसे स्थिरा चरणाजवळीं ॥२॥

एका जनार्दनीं केलोंसे मोकळा । संतापायीं लळा लाऊनियां ॥३॥