श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


सद्गुरुमहिमा - अभंग १८२१ ते १८४०

१८२१

येव्हढें जया कृपेचें करणें । रंक राज्यपदें मिरवती ॥१॥

तो हा कल्पतरु गुरुजनार्दनु । छेदी देहाभिमानु भवकंदु ॥२॥

कृपेचें वोरसें धांवे कामधेनु । तैसा माझा मनु वेधिलासे ॥३॥

एका जनार्दनीं तयावांचुनी कांहीं । दुजे पाहाणें नाहीं मनामाजीं ॥४॥

१८२२

साधावया परमार्था । साह्य नव्हती माता पिता ॥१॥

साह्म न होताव्याहीं जांवई । आपणा आपणा साह्म पाहीं ॥२॥

साह्म सदगुरु समर्थ । तेंचि करिती स्वहित ॥३॥

एका जनार्दनीं शरण । नोहें एकपणावांचून ॥४॥

१८२३

रात्रीची प्रौढी नोहे सुर्याचा प्रकाश । तोवंरींचे भास आंधाराचा ॥१॥

सुर्याचे उदयीं अंधार हा नासे । तैसें अज्ञानें नासे ज्ञान सर्व ॥२॥

एका जनार्दनीं सदगुरुवांचुनी । प्रकाश तो मनीं नोहे कांहीं ॥३॥

१८२४

संसाई परजनीं बुडतों महाडोहीं । सोडविण्या येई गुरुराया ॥१॥

गुरुराया धांवें लवदसवडी । जाती एकघडी युगाऐसी ॥२॥

माझी चित्तवृत्ती अज्ञान हेंगाय । एका जनार्दनीं पाय दावीं डोळा ॥३॥

१८२५

सांपडलें होतों भ्रमाचियां जाळीं । मायामोहकल्लोळीं भ्रमत होतों ॥१॥

परी जनार्दनें केलोंसे मोकळा । दवडुनी अवकळा आशा तृष्णा ॥२॥

मीनाचिये परीतळमळ संसारीं । माझे माझें भोवरीं दृढ धरित ॥३॥

ते परतें करुनी केलेंसे सरतें । आपणापरौतें जाऊं नेदी ॥४॥

जनार्दनाचा एका लडिवाळ तान्हा । पाजी प्रेमपान्हा जनार्दन ॥५॥

१८२६

दासां दुःख झालें फार । वेगीं करा प्रतिकार ॥१॥

सुख मानिलें संसारीं । दासां दुःख झालें भारी ॥२॥

सोडुनियां मी स्वधर्म । आचरलों नीच कर्म ॥३॥

सेवा केली नीच याती । द्रव्यलोभें घाताघातीं ॥४॥

अन्न ग्रास न जाय मुखीं । पश्चात्ताप झाला शेखीं ॥५॥

पुण्यस्थान मी पावलोम । गुरुचरणीं विश्रामलों ॥६॥

स्वामी विनंती अवधारा । दीनबांधी करुणाकरा ॥७॥

कर जोडोनिया शीर । ठेवियलें पायांवर ॥८॥

जन्मनाम जनार्दन । मुखीं गुरुअभिधान ॥९॥

१८२७

जन्मोजन्मींचे संचित । गुरुपायीं जडलें चित्त ॥१॥

तेंतो सोडिल्या न सुटे । प्रेमतंतु तो न तुटे ॥२॥

दुःखें आदळलीं वरपडा । पाय न सोडी हा धडा ॥३॥

देह गेला तरी जावो । गुरुचरणीं दृढ भावो ॥४॥

वरी पडोन पाषाण । परी न सोडी गुरुचरण ॥५॥

एका जनार्दनीं निर्धार । तेथें प्रगटे विश्वंभर ॥६॥

१८२८

न सोडी रे मना गुरुजनार्दना । संसार बंधना सोडविलें ॥१॥

संसार अजगर झोंबला विखार । धन्वंतरी थोर जनार्दन ॥२॥

जनार्दन ऐसी माउली परियेसी । बहु कष्टें सायासी जोडियेली ॥३॥

एका जनार्दनीं परब्रह्मा । हेंचि जाणा धर्म कर्म ॥४॥

१८२९

न सोदी रे मना गुरुजर्नादना । संसार बंधना सोडविलें ॥१॥

संसार अजगर झोंबला विखार । धन्वंतरी थोर जनार्दन ॥२॥

जनार्दन ऐसी माउली परियेसी । बहु कष्टें सायासीं जोडियेली ॥३॥

जनार्दनें रंक तारियेला एका । संसारी हा सखा जनार्दन ॥४॥

१८३०

कोण पार नेई भवनदींतुनीं । सदगुरुवांचुनी तुम्हालांगीं ॥१॥

अनंत उपाय जरी तुम्हीं केले । पार पावविलें नव जाय ॥२॥

नाना तीर्थयात्रा घडल्या तुम्हांसी । परी संतोषासी न पावल ॥३॥

व्रतें तपें यज्ञें दानें चित्तशुद्धि । परी निजपदीं स्थिर नोहे ॥४॥

विवेक वैराग्य बळें सदगुरुभेटी । आन आटाआटी नलगे कांहीं ॥५॥

एका जनार्दनीं गुरुचरण धरीं । तेथें स्थिर करी मन नरा ॥६॥

१८३१

नमावे हे नित्य नित्य सदगुरुचे पाय । आन तो उपाय करुं नये ॥१॥

गुरुचरनांविण मानुं नये कांहीं । वेद शास्त्र पाहीं हेंचि सांगे ॥२॥

एका जनार्दनीं गुरुचरण सेवा । प्रिय होय देवा सर्वभावें ॥३॥

१८३२

नमुं जाय तंव गुरुत्वा । तंव त्रैलोक्य आलें गुरुत्वा ॥१॥

तें आतां नमना नुरेचि गुरु । गुरुत्वा आला संसारु ॥२॥

वंद्यत्वें नमुं गुरुभेदे । तंव त्रैलोक्य गुरुत्वें नांदें ॥३॥

गुरुवांचुनीं न दिसे कांहीं । तंव सानथोर अवयवें गुरु पाहीं ॥४॥

थोर गुरुत्वा आलें गौरव । तरी गुरुनामें नेघें अहंभाव ॥५॥

एका जनार्दनाच्या पायीं । नमुं गेलों तो गुरुशिष्य नाहीं ॥६॥

१८३३

सदगुरुसी शरण जाय । त्यासी ब्रह्माप्राप्ति होय ॥१॥

न लगे आणिक उपाव । धरी सदगुरुचे पाय ॥२॥

सदगुरुचें चरणतीर्थ । मस्तकी वंदावें पवित्र ॥३॥

एका जनार्दनीं सदगुरु । हाचि भवसिंधुचा तारु ॥४॥

१८३४

विनंती माझी परिसावी । कृपा दीनावार करावी ॥१॥

नित्य नवा नामघोष । आठव द्यावा सावकाश ॥२॥

नामावांचुनी कांही दुजें । मना आणिक नमो माझें ॥३॥

एका विनंति करी । जनार्दन कृपा करी ॥४॥

१८३५

तुझ्या चरणापरतें । शरण जाऊं आणिकातें ॥१॥

काया वाच आणि मन । रिघाली शरण तुमची ॥२॥

निवारुनि भवताप । त्रिविध तापें तो संताप ॥३॥

एका जनार्दनीं चित्तें । शरण आला न करा परतें ॥४॥

१८३६

ध्येय ध्याता ध्यान । अवघा माझा जनार्दन ॥१॥

आसन शयनीं मुद्रा जाण । अवघा माझा जनार्दन ॥२॥

जप तप यज्ञ यागपण । अवघा माझा जनार्दन ॥३॥

भुक्ति मुक्ति स्थावर जाण । अवघा माझा जनार्दन ॥४॥

एका एकींवेगळा जाण । अवघा भरला जनार्दन ॥५॥

१८३७

जयजय वो जनार्दनें विश्वव्यापक सपुर्ण वो । सगुन अगुण विगुण पुर्णपूर्णानंदघन वो ॥१॥

ब्रह्मा विष्णु रुद्र निर्माण तुजपासुनी वो । गुणत्रय उभय वनीं तुंचि पंचक अंतःकरणीं वो ॥२॥

व्यापुनी पंचक प्राण दश इंद्रिय करणी वो । पंचक विषय स्थानें पंच विषयांचे स्वामिनी वो ॥३॥

स्थूललिंग कारण चौथें महाकारण वो । जागृती स्वप्न सुषुप्ति तुर्या उन्मनीं हें स्थान वो ॥४॥

नेत्र कंठ हृदय मूध्नीं या प्रमाण वो । विश्वजैस प्राज्ञ प्रत्यगात्मा तुं संपुर्न वो ॥५॥

स्थुळ प्रविविक्त सुख चौथे आनंदाभास वो । पिंड ब्रह्मांड आणिक तुं ॐकाराचें सुख वो ॥६॥

त्वंपद आणिक असिपद ते तूं एक वो । आजी पंचकारण षडचक्रांचे भेदन वो ॥७॥

मंत्र तंत्र स्थानी अनावराचे आवरण वो । नसोनि एकपणीं एकाएकीं जनार्दन वो ॥८॥

१८३८

जनार्दनीं माय जनार्दन बाप । जनार्दन ताप निवारिती ॥१॥

जनार्दन बंधु जनार्दन भगिनी । जनार्दन निर्वाणी मजलागीं ॥२॥

जनार्दन सखा जनार्दन चुलता । जनार्दन तत्त्वतां प्राण माझा ॥३॥

जनार्दन सुहृद जनार्दन मित्र । पवित्रापवित्र जनार्दन ॥४॥

जनार्दन जन जनार्दन विजन । माझें तनमन जनार्दन ॥५॥

जनार्दन ऐश्वर्य जनार्दन धन । मज निरंजन जनार्दन ॥६॥

जनार्दन जीव जनार्दन भाव । जनार्दन शिव मजलागीं ॥७॥

जनार्दन पिंड जनार्दन ब्रह्मांड । जनार्दन अखंड परब्रह्मा ॥८॥

एका जनार्दन वृत्ति होय लीन । जालासे तल्लीन परब्रह्मी ॥९॥

१८३९

जनार्दनीं शोभित जन । जनार्दनें साचार ज्ञान । जनार्दनें आकळें मन । ध्याता ध्येय ध्यान जनार्दन ॥१॥

गाई जनार्दन मुखकमळीं । जनार्दनु नयनीं न्याहाळी । ह्रुदयकमळीं । जनार्दनु ॥२॥

जनार्दनें बोलिला वेदु । जनार्दनें बुद्धिसे बोधु । जनार्दनें तोडिला भेदु । परमानदु जनार्दनु ॥३॥

जनार्दनें ज्ञानदृष्टी । जनार्दनें पावन सृष्टी । जनार्दने संतुष्ट पुष्टी । निजभावें भेटी जनार्दनें ॥४॥

जनार्दनें सर्व ज्ञान डोळसु । जनार्दन स्वयंप्रकाशु । जनार्दनें देहबुद्धि निरासु । परमहंसु जनार्दन ॥५॥

जनारने अज्ञानभंग । जनार्दनें नित्य नवा रंग । जनार्दनें वैष्णवसंग । वोडगे रंग जनार्दनें ॥६॥

जनार्दनें सुख होय सुखा । जनार्दन पाठीराखा । जनार्दनें तारिला एका । आम्हां निजसखा जनार्दन ॥७॥

१८४०

जनार्दन कृपा केली । वृत्ति ब्रह्माकार झाली ॥१॥

धन्य धन्य जनार्दन । तयापायींमम वंदन ॥२॥

मन मनपणा हरपलें । तन्मय होऊनियां ठेंलें ॥३॥

चित्त चिंतना विसरलें । चैतय्न्यरुप होऊनि ठेलें ॥४॥

निश्चयरुप जे का बुद्धि । परब्रह्मा तें निरवधी ॥५॥

अहंपणे अहंभाव । तोही झाला देवाधि देव ॥६॥

श्रोत्रेद्रिय ग्राहा शब्द । होऊनि राहिला निःशब्द ॥७॥

त्वगिंद्रिय स्पर्श । तो पैं जाहल परेश ॥८॥

नेत्रें पाहती रुपातें । तें पैं परब्रह्मा आतें ॥९॥

जिव्हासेवितसे रस । तें हें ब्रह्मा स्वयंप्रकाश ॥१०॥

घ्राण सेवितसे गंध । तें हें परात्पर निर्द्वद ॥११॥

वाणीं उच्चारी वचन । तें हें परब्रह्मा जाण ॥१२॥

गमन करिताती पाद । तें हें ब्रह्मा परम पद ॥१३॥

पाणीद्रियें घेणे देणें । तेंचि ब्रह्मा परिपुर्ण ॥१४॥

गुह्मोंद्रियाचा आनंद । तो हा झाला परमानंद ॥१५॥

जे जे क्रिया घडे अंगी । तें तें ब्रह्मारुप जगीं ॥१६॥

पंचप्राण ते अमुप । परब्रह्माचें स्वरुप ॥१७॥

स्थुल सुक्ष्म तें कारण । सकळ ब्रह्मा परिपूर्ण ॥१८॥

महाकारण प्रकृति । परब्रह्माची आकृती ॥१९॥

अन्नमय कोश । परब्रह्माचा विकाश ॥२०॥

कोश तोहि प्राणमय । दिसे प्रत्यक्ष चिन्मय ॥२१॥

मनोमय कोश जाण । परात्पर परिपूर्ण ॥२२॥

कोश विज्ञान पहावा । द्रष्टा दृश्यातीत अवघा ॥२३॥

कोश जाणावा आनंद । तो हा केवळ परमानंद ॥२४॥

समाष्टिव्यष्टयात्मक जग । तें हें परब्रह्मा अभंग ॥२५॥

जनार्दन जन वन । जनार्दन निरंजन ॥२६॥

एका जनार्दन भाव । एकनाथ झाला देव ॥२७॥