श्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


अद्वैत - अभंग २३२१ ते २३४०

२३२१

वेद वेद ब्रह्मा एक । स्वानुभवें तैसेंच देख ॥१॥

हा वेदाचा गौरव । कोण घेतो अनुभव ॥२॥

वेद ब्रह्मास्थिति । कोण प्रतिपाद्य करिती ॥३॥

वेदी ब्रह्माचें ब्रह्मापण। शरण एका जनार्दन ॥४॥

२३२२

वेदवचनें सुतक पावे । ब्रह्मा म्हणतां ब्रह्म नव्हें ॥१॥

वेद न कळेंचि साचार । देहबुद्धिं अविचार ॥२॥

सकळ ब्रह्मा पैं अद्वैत । वेद परीसोनी ना तुटे द्वैत ॥३॥

श्रुति सांगती परमार्था । हिंसा न करावी सर्वथा ॥४॥

संकल्प नाशी तो संन्यासी । तेथें तों कल्पना कायसी ॥५॥

२३२३

नाहीं नामरुप गुण कर्म । पाहतां अवघे परब्रह्मा ॥१॥

पिंडी आणि ब्रह्माडीं । भरला असे नवखंडीं ॥२॥

रिता नाहीं कोठें ठाव । जिकडे पाहे तिकडे देव ॥३॥

एका जनार्दनीं भाव । अवघा माझा गुरुराव ॥४॥

२३२४

मी ब्रह्मा जाहलों म्हणें अंतरीं ब्रह्मा नव्हें ऐसें कांहीं । ब्रह्माविण अनु न दिसे कोठें । तितुकें ब्रह्मा पाहीं ॥१॥

होय नाहीं ऐसा संशयचि नाहीं निश्चयेंसी तेंचि आहे । आहे तेंचि ब्रह्मा नाहीं तेंचि ब्रह्मा अवघेंचि ब्रह्मा पाहे ॥२॥

वर्णाश्रमधर्म साचार मानुनी यथाविधी आचरती । स्वमताचा देहीं अभिमान धरुनी पृथक पृथक वाद करिती ॥३॥

पाषांडाच्या बळें होताती तोडागळे भेदें साचि हें अम्हीं ना हो म्हणती । सर्वदा तरी ब्रह्मा आहे ऐसें न कळे तयाप्रती ॥४॥

जळेंशी लवण वेगळे नाहीं जाण । तैसें आदिमध्य अंतीं ब्रह्माचि असे तेथें कैंचें न्युन पूर्ण ॥५॥

कर्ता कार्य कर्म अभिन्न तेथें बद्ध आणि मुक्त कवण । एका जनार्दनीं ऐक्यपणें मुळींच नाहीं भिन्न ॥६॥

२३२५

शुद्ध ब्रह्माज्ञानाचा धडा । पंचभूतांचा खचला खडा । देह चतुष्टय पुसिला वाडा । धन्य धडफुडा आत्मा मी ॥१॥

शुद्धब्रह्माज्ञानाचा मार्ग । मृत्यु पातला सरलें सर्ग । पिंड ब्रह्माडाचें दुर्ग ब्रह्मांडाचें दुर्ग । विरोनी अर्व आत्मा मी ॥२॥

ॐ नमो जी जगदगुरु । सर्वांभुती साक्षात्कारु । ब्रह्मा विष्णु महेश्वर । ॐकार तो वोळखिजे ॥३॥

अनंत ब्रह्मांडाचा टिळा । लावुनी बैसे ब्रह्माकपाळा । त्यांतही वळी तरंग जळा । वरी तेविं ब्रह्मांड ॥४॥

ऐशा अनंत विभूती । दिगंबर अंगीं चर्चिती । घडीनें घडी लेप देती । पुसोनी जाती क्षणक्षणां ॥५॥

तैसे नव इंद्रियां सबाह्म । ब्रह्मा कोंदलें अनुभव पाहे । घट जळीं बुडोनी राहे । ऐसा आहे दृष्टांन्त ॥६॥

गगन ग्रासोनी अपार । तैसा मी आहे सर्वेश्वर । अनंत ब्रह्मांडो अवतार । तरंग फिर मजवरी ॥७॥

तुम्हांआम्हां मध्यें जें अवकाश । तें सबाह्म ब्रह्मा सावकाश । अनंत ब्रह्मांडें फुटती तयास । निराभास निगुण ॥८॥

हें ब्रह्मा हे माया । का बोट लावुनी दाखवुं शिष्यराया । आधारापासोनी सहस्त्रदळ काया । बुडे ठाया तें ब्रह्मा ॥९॥

ब्रह्मा म्हणजे आकाश । कीं ब्रह्मा म्हणजे महदाकाश । कीं ब्रह्मा म्हणजे निर्गुण निराभास । आदि अवकाश तें ब्रह्मा ॥१०॥

ब्रह्मा म्हणजे तें पोकळ । कीं ब्रह्मा म्हणजे आकाशहुन पातळ । कीं ब्रह्मा म्हणजे शुन्य सकळ । मिथ्या मूळ तें ब्रह्मा ॥११॥

सोहं नाद सर्वांसी । विश्वनाथ विश्वासी । अमृतफळ अंबियासी । लक्ष चौर्‍यायंशीं लोंबती ॥१२॥

तैसें जन फळ जनार्दनीं लोंबे । सोहं देठ दोहींकडे झोंबे । फळ दे वृक्ष लोंबें । अद्वैत बिंबलें एका जनार्दनीं ॥१३॥

२६२६

ज्या सुखासी नाहीं अंत । तें सुख पाहे हृदयांत ॥१॥

सुख सुखाची मिळणी करुनी । घेईक आपुले मनीं ॥२॥

सुखें सुखानुभाव । हाचि ब्रह्माविद्येचा भाव ॥३॥

सुखें सुखाची मांडणी । शरण एका जनार्दनीं ॥४॥

२३२७

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण चारी । हें स्थान मान निर्धारीं तो मी ॥१॥

ब्रह्माचारी गृहस्थ संन्यासी वानप्रस्थ । आश्रम धर्मक समस्त नेव्हे मीं ॥२॥

बावन मात्रा चौदा चक्रें सहा शत एकवेस हजार । स्थान मान पवित्र नाहीं मज ॥३॥

स्थूळ सुक्ष्म कारण महाकारणाचें ज्ञान । चहुं देहाचें बंधन नाहीं मज ॥४॥

सोहं सोहं दोन्हींक वेगळा यापासुनीं । चहुं मुद्रेंचे ध्यानीं नाहीं गा मी ॥५॥

या सकळातें जाणता विरळा पैं पाहतां । एका जनार्दनीं तत्त्वतां निजबोध तो मी ॥६॥

२३२८

ज्यासी आत्मलाभ झाला । त्याचा देह प्रारब्धे वर्तला । कायावाचामनें आपुला व्यापार करिताती ॥१॥

होतें हाणितलें तोंडावरी । तेथें इंद्र अग्नि झुंजारी । पैं शुन्य बोले परस्परी । अग्नीसी इंद्र ॥२॥

हात नमस्कारी चरण । तेथें सुसरीतें झालें इंद्रियमन । हाता त्वचेसी केलें मर्दन । तो वामन वायु ॥३॥

शिश्न मुखामाजी मुतती । तेथें भाडती वरुन प्रजापति । तेथें नैऋत्य वसती । अश्विनीदेवो ॥४॥

कीं मुखीं गालीप्रदान । ऐको पैं श्रवण । तेथें दिशा आणि अग्नी । भांडती पैं ॥५॥

कीं तापले नेत्रीचें पाती । तेजें सुर्यासूर्य भांडती । ऐसें इंद्रियें वर्तती । आपाअपले परी ॥६॥

ऐसा विवेक ज्यासी कळला । त्याचा कामक्रोध भस्म झाला । तेणें शांतीचा रोंविला ॥ ध्वजस्तंभु ॥७॥

त्याचा विवेक करुनी । तो वर्तें जनीं वनीं । परी आत्मसुखाचा धनी । झाला तोचि एक ॥८॥

एकाजनार्दनीं या विवेंकें । राज्य केलें भीष्में जनकें । भिक्षुका आत्मसुखें । पावले तेणें ॥९॥

२३२९

भगवद्भाव सर्वांभुतीं । हेंचि ज्ञान हेंचि भक्ति । विवेक विरक्ति । याचि नावें ॥१॥

हें सांडुनीं विषयध्यान । तेंचि मुख्यत्वें अज्ञान । जीवींजीवा बंधन । येनेंचि दृढ ॥२॥

आठव तो परब्रह्मा । नाठव तो भवभ्रम । दोहींचें निजवर्म । जाण बापा ॥३॥

आठव विसर चित्तीं । जेणें जाणिजेती । तेचि एक निश्चिती । निजरुप ॥४॥

स्मरण तेचि निजमुक्ति । विस्मरण तेचि अधोगति । ऐसें पुराणें गर्जती । बाह्मा उभारुनी ॥५॥

एका जनार्दनीं । सहज निजबोध मनीं । सबाह्माभ्यंतरीं । पूर्ण परमानंद ॥६॥

२३३०

लोह तांबे सोनें । रुपें माती पाषाण । टवाळी भिन्न भिन्न । निर्मित होती ॥१॥

वाती स्नेह भरती । पदार्थ वेगळे दिसती । परि तयामाजी ज्योती । असे एकरुप ॥२॥

तैसे अठरा वर्ण । अत्यंजादि ब्राह्मण । मेरु मशक धरून । भरले जीव ॥३॥

यांचे शरीर भिन्न । आत्मा एक परिपुर्ण । नामरुप जाती वर्ण । नाहीं तेथें ॥४॥

आत्मा स्वयंप्रकाश ज्योति । जे ज्योति ती सुर्या म्हणती । ती तुर्या ज्ञानशक्ति । ईश्वराची असे ॥५॥

एका जनर्दनीं शरण । उजळलें आत्मज्ञान । पदार्थ जाती जळुन । क्षणमात्रें ॥६॥

२३३१

ऐसी मी मी करतां । अज्ञानाची अहंता । तेव्हा तैसी ईश्वरसत्ता । वर्तू लागे ॥१॥

सज्ञान अज्ञान । दोघे अदृष्टाधीन । साधुत्व वर्ते सज्ञान । अज्ञानीं अहंकर्ता ॥२॥

अद्रुष्टाधीन देह । त्यांत ज्ञान मुरुनी जाय । मग द्रष्टा होउनी पाहे । जग ब्रह्मारूप ॥३॥

तेथें निंदा आणि स्तवन । हारपले दोष गुण । ऐसें एका जनार्दन सांगतसे ॥४॥

२३३२

शाब्दिक शब्दाचा करिती कंटाळा । द्वेषाचा उमाळा अंगीं वसे ॥१॥

शब्द ब्रह्माज्ञानें फुगविती अंग । वाउगाची सोंग गर्व वाहाती ॥२॥

सर्वां भूतमात्रीं शब्द तो संचला । न कळे तयाला शब्दभेद ॥३॥

एका जनार्दनीं शब्दाचा भेद । न कळे प्रसिद्ध ज्ञानीयासी ॥४॥

२३३३

ज्ञानाभिमान विश्वामित्रा । रंभेमागें जाला कुत्रा ॥१॥

ज्ञानाभिमान दुर्वासासी । म्हणोनी शापी अंबऋषी ॥२॥

ज्ञानाभिमान ब्रह्मीयासी । म्हणोनी चारेलें गाईवत्सांसी ॥३॥

ज्ञानभिमान नको देवा । एका जनार्दनीं देई सेवा ॥४॥

२३३४

नग घडतां सोनें साचें । न घडतां सोनें पण न वचे ॥१॥

मेघापुर्वी शुद्ध गगन । मेघ सबाह्म गगनीं जाण ॥२॥

कुल्लाळ जें भांडें घडीत । त्यासी मृत्तिका नित्य व्याप्त ॥३॥

सागरीं जें जें उपजे लहरी । तैसा व्यापक श्रीहरीं ॥४॥

जन तोचि जनार्दन । एका जनार्दन व्यापक पूर्ण ॥५॥

२३३५

जैसी फांशाची गति पडे । तैसा सोंगटीं डाव पडे । त्याचें कर्तृत्व वाडें । फांशाधीन ॥१॥

झाला देखणा परी । उगला वर्तूं लागे शरीरीं । तैसी शक्ति ईश्वरीं । भूतें चळती ॥२॥

अदृश्य गतीनें वर्तती । तेथें ईश्वराची शबल शक्ति । तेथें आणिकांची मति । कांही न चाले ॥३॥

यालागीं प्राचीनाधीन । ब्रह्मा विष्णु रुद्र पुर्ण । याचें कार्यभुत जाण । सृष्टादिक ॥४॥

एका जनार्दनीं जाण । बाधक अदृश्य शक्ति जाण । जैसें ज्याचें प्राचीन । तैसें ते वर्तती ॥५॥

२३३६

हेंचि वेदोक्ति निजसार । आत्मा अविनाश साचार ॥१॥

नाहीं जन्ममरणाचा धाक । बोले शुद्ध बुद्ध ऐसा वेद ॥२॥

श्रुतिशास्त्र तेही वदती । आत्मा अविनाश म्हणती ॥३॥

एका जनार्दनीं नाहीं मरण । मग कैंचे देहींचें स्फुरण ॥४॥

२३३७

मी तुं ऐसी परी । जैसे तरंग सागरीं ॥१॥

दोहींमाजीं एका जाणा । कृष्ण द्वारवती राणा ॥२॥

तंतु वस्त्र दोनी एक । तैसें जगासी व्यापक ॥३॥

देवभक्त ऐसी बोली । भ्रांति निरसेनासी जाली ॥४॥

सरिता सागरीं मिनल्या । तैसें होय भ्रांतिं गेल्या ॥५॥

एका जनार्दनीं कृपा । भ्रांति कैसी जगीं पहा पां ॥६॥

२३३८

जागृति स्वप्न सुषुप्ति । तिही अवस्थातें प्रकाशिती ॥१॥

जे जागृतीते जागले । तेचि स्वप्रातें चेईले ॥२॥

क्षणें जागृति क्षणें सुषुप्ती । क्षणें एक स्वप्रचि प्रतीति ॥३॥

सर्व दिसे तितुकें मिथ्याभूत । एका जनार्दनीं शाश्वत ॥४॥

२३३९

देहीं कैंचे सुख कैंचें दुःख । कैंचा बंध कैंचा मोक्ष ॥१॥

देहीं कोण देव कोण । भक्त कोण शांत कोण अशांत ॥२॥

देहीं कैंची क्रिया कैंचें कर्म । देहीं विरालें धर्माधर्म ॥३॥

देहीं कैचें शास्त्र कैंचा वेद । कैंची बुद्धि कैंचा बोध ॥४॥

एका जनार्दनीं देह । ब्रह्मीं ब्रह्मा होत आहे. ॥५॥

२३४०

अहा रे अभाग्या काय केलें । फुकट नरदेह गामविलें ॥१॥

भजें भजें रामकृष्ण वासुदेव । वाउगा सांडोनी देई हेवा ॥२॥

मुळ संकल्प तोडोनिया टाकीं । अहंकार ममता वासना उपाधि शेखीं ॥३॥

एका जनार्दनीं टाकुनी परता होय । वाचे सदा गाय वासुदेव ॥४॥