श्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


अद्वैत - अभंग २३६१ ते २३८०

२३६१

वायां वायां शिणती साधक जन । साधक तितुकें ज्ञानघन । साध्य साधन मानितां भिन्न । निजात्मा पुर्ण नव्हती ॥१॥

साखरेवेगळी पाहतां गोडी । पाहे म्हणती ते बुद्धि कुडी । साखर अवघी गोड धाकुडी । आत्मा निरवडी जग तैसें ॥२॥

साधनें साधूं आत्मायासी । ऐसें म्हणती ते परम पिसी । आत्मा प्रकाशी साधनासी । तो केवीं त्यासी आकळे ॥३॥

एक ते मंत्र उपदेशिती । जपू करावा नेणों किती । जेणें होय निजात्मप्रत्पि । ते मंत्रयुक्ति न कळे ॥४॥

मंत्री मंत्रामाजीं अक्षर । ॐ नमः इत्यादि उच्चार । अक्षरीं अक्षर चिन्मात्र । मंत्र साचार परब्रह्मा ॥५॥

पाठका साधन वेदपठण । अक्षर उच्चार स्वर वर्ण । कोरडी वाची तोंड पठण । नव्हे बोळवण कामक्रोधा ॥६॥

वेदमुळ तो ॐकार । तोचि परब्रह्मा साचार । अकार उकार मकार । वेद चिन्मात्र पठणेसी ॥७॥

शास्त्र श्रवण साधन शुद्ध । देहाभिमानें केलें विरुद्ध युक्तिप्रगुक्तिचें बोध । अति विवाद पंडितीं ॥८॥

शास्त्र तितुकें ज्ञानसंपन्न । जे जे युक्ति ते केवळ ज्ञान । शास्त्रामाजीं जाणपन । तेंचि ब्रह्मापुर्ण श्रवणार्थ ॥९॥

प्रल्हादा साधन केवळ हरी । हरी सर्वांगें विघ्न निवारी । अनाम भक्त वचनें करी । नरकेसरी होऊन ठेला ॥१०॥

जैसा जैसा भक्तांचा पैं भावो । तैसा तैसा भाळे देवो । भावे वाचूनियां पाहो । हायो अभावो देवाचा ॥११॥

ऐसे साध्य तेंचि साधन । ज्ञेय तेंचि धृतिज्ञान । ध्येय तेंचि होय ध्यान । समाधान गुरुवाक्यें ॥१२॥

जें जें विषयांचें गोडपण । तें तें गोडी चैतन्यघन । विषयीं विषय ब्रह्मापुर्ण । इंद्रिय स्फुरण चिन्मात्र ॥१३॥

जेथें जो म्हणविसी अज्ञाना अज्ञान । देखणें तो ज्ञानघन । आम्ही नेणों ज्ञानाज्ञान । तो ब्रह्मापुर्ण सहजेंचि ॥१४॥

एका पाहातां एकपण । जन तोचि जनार्दन । एकाजनार्दनीं शरण । जग संपुर्ण परब्रह्मा ॥१५॥

२३६२

एक आधार खोंचुनी स्वाधिष्ठाना येती मणिपुरी घेताती झटे ।

चंद्रसुर्य कला म्हणती बारा सोळा पवनासी करिती उफराटे ।

सतरावीचें क्षीर सेउनी शरीर कलीकाळवंचनीं ताठे ।

सबाह्म आत्माराम नेणुनी विश्राम व्यर्थचि करिती या चेष्टे ॥१॥

तें वर्मा चुकेलें रें तें वर्म चुकलें रे । जवळींच असतां रे तें वर्म चुकलें रे ।

जवळींच असतां अंतरीं न पाहे । ब्रह्माप्राप्ती केवीं होय ॥ध्रु०॥

मीमांसक मात्त कर्माचा आचार स्नानसंध्या यथायुक्ति ।

एक दोन तीन स्नानें झालीं तरी आगळी लाविती माती ।

द्वादश जपतां घरींची चिंता करिती नारायणस्मरण चिंत्तीं ।

स्वयें नारायण कीं तेथें आपण नेणती स्वरुपस्थिती ॥२॥

चारी वेद पुर्ण आचार होम क्रिया नित्य नेम आचरती ।

शिखासुत्र मंत्र त्रिकाळ क्रिया संध्यादि यथापद्धति ।

पुजा ब्रह्मायज्ञ उपवास पारणें मध्यामातें नातळती ।

आत्मज्ञानेवीण न तुटे बंधन कष्टचि पावत अंतीं ॥३॥

विष्णु उदरीं त्रिभुवन अवघें म्हणउनि वैष्णव झाले ।

तुळशीवृंदावनें हरीचें पुजन विष्णुपदीं मिरविलें ।

हरिहर भेद करिताती वाद जाणविनें नागविलें ।

आत्मज्ञानेविण न तुटे बंधन कणेविण उपणिलें ॥४॥

दैवत शिवापरतें नाहीं जंगम राहिलें नेहटी ।

शैव पाशुपत रुद्राक्ष विभुति आचार लिंगे कंठीं ।

पाषाण पुजुनी पवाडा करिती घालूनिया शस्त्रें पोटीं ।

आत्मज्ञानेविण न तुटे बंधन मरण पावती हटीं ॥५॥

दरवेश काजी सैद मुलांना पडताती नित्य किताब ।

करिती पंच वक्त निमाज गळा घालुन पोकळ जुभा ।

परमात्मा देहीं न पडेचि ठायीं पश्निमें मारिती बोंबा ।

आत्मज्ञानेंविन न तुटे बंधन अंतीं करिती तोबा तोबा ॥६॥

शक्तीचे उदरीं त्रिभुवन अवघे आवडी पूजिती शक्ति ।

अर्चन हवन पूजन कामना वाढवुनी फळें घेती ।

जारण मारण स्तंभन मोहन अभक्त लाविलें भक्ति ।

आत्मज्ञानेविण न तुटे बंधन चुकले तें निजमुक्तिः ॥७॥

बौध्यरुपालागीं क्षपाणिक जाहलें करिताती लुंचि कर्मे ।

वेद निरोधन मनीं निरोधन आचरती जैंन कर्मे ।

वस्त्रें फेडण्या नग्न फिरताती न चुकती मरण जन्मे ।

आत्मज्ञानेवीण न तुटे बंधन चुकली त्या गुरु वर्मे ॥८॥

भ्रष्टाचा आचार पालव माथां उफराटी काठी धरिती ।

पंचक्रोधी ध्यान पंथीचें स्मरण षटचक्रा उलटितीं ।

दर्शन खंडिती सज्जन निंदिती दृष्ट कर्में आचरती ।

अत्माज्ञानेवीण न तुटे बंधन व्यर्थ तनु विटंबि ॥९॥

ऐसा एक एका संवाद करितां अहंता ममताची पाही ।

नेणतां निपुण बुडाले संसारडोहीं । स्वकर्माचरणमतांचें विवरण परमात्मा न पडेचि ठायीं ।

एका जनार्दनीं अनुभवी तो जाणे सर्वेश्वर याच देहीं ॥१०॥

२३६३

चौ देहांचा पूर्णघट । त्याचा अवघा बोभाट ॥१॥

माझें माझें म्हणती वेडे । घट भरला रिता फूडें ॥२॥

ऐसे भांबावले देहा । दिवसां नागविले पहा ॥३॥

एका जनार्दनीं पुर्ण घट । एक नांदे उघड प्रगट ॥४॥

२३६४

फुटलिया घट । नसे जीवन प्रगट ॥१॥

घटमाजीं जीवन । घट फूटतां नसे जाण ॥२॥

घटामाजीं आकाश । आकाश घटेंचि न नासे ॥३॥

एका जनार्दनीं मिथ्या । घट विरालिया सत्या ॥४॥

२३६५

स्थापक व्यापक सर्वदेशीं भरला । पाहतां तो भला पंढरीये ॥१॥

असोनियां नसे नसोनियां असे । योगिया हृदयीं वसे दृष्टीं न पडे ॥२॥

एका जनार्दनीं भुवैकुंठनायक । उभा असे सम्यक विटेवरी ॥३॥

२३६६

जेथोनि त्रिपुटीचें विंदान । दृश्य द्रष्टा आणि दरुशन ॥१॥

अध्यात्म अधिभुत असतां पाहीं । अधिदैव सुर्य जेथें नाहीं ॥२॥

अध्यात्म अधिदैव दोन्हीं आहे । अधिभुत दृश्य दरुशन पाहे ॥३॥

जेथें दृश्याचें दरुशन । तेथें एक जनार्दन ॥४॥

२३६७

सुर्य आहे डोळा नाहीं । तेथें पाहणें न चले कांहीं ॥१॥

सुर्य आणि दृष्टी दोन्हीं आहे । परि दृश्य पाहणें नाहीं होय ॥२॥

सुर्य प्रकाशी रूपासी । एका जनार्दनीं स्वरुपासी ॥३॥

२३६८

उदकी साखर पडत । विरोनी उदका गोड करीत ॥१॥

तेथें हेतुसी नाहीं ठावो । निमाला भाव आणी अभावो ॥२॥

सांडोनी मोपणासी । खेंव दिधला समरसी ॥३॥

एका जनार्दनीं शरण । एकपणें एकचि जाण ॥४॥

२३६९

पंचभूतांचें हें शरीर खरें । निर्माणक तें बरें केलें देवें ॥१॥

पृथ्वी आप तेज वायु हें आकाश । यांचा हा सौरस आत्माराम ॥२॥

एका जनार्दनीं पंचभुत आत्मा । सर्व परमात्मा । नेणती ते ॥३॥

२३७०

जगाचियें देहीं नांदतो आपण । तरी करतें कर्म परियेसा ॥१॥

जीव शिव दोन्हीं शरीरीं नांदती । कर्मधर्म स्थिति तया हातीं ॥२॥

शिव तो उपाधीवेगळाचि वसे । कामक्रोध पिसें जीवालागीं ॥३॥

लिगाडाचे मिसें जीवासी बंधन । एका जनार्दनीं जाण शिव मुक्त ॥४॥

२३७१

एका देहामाजीं दोघे पैं वसती । एकासी बंधन एका मुक्त गति ॥१॥

पहा हो समर्थ करी तैसें होय । कोण त्यासी पाहे वक्र दृष्टी ॥२॥

पापपुण्य दोन्हीं भोगवी एक हातीं । ऐशी आहे गति अतर्क्य ते ॥३॥

एका जनार्दनीं जनीं जनार्दन । तयासी नमन सर्वभावें ॥४॥

२३७२

जाणीव फेडा जाणीव फेडा । जाणिवेनें वेडा लावियेलें ॥१॥

नेणपणें मज होता जो भाव । जाणीवेनें कैसें मज नागविलें ॥२॥

नेणपणें मी सर्वांसी मानी । जाणीव येतां कोण्हा न मानी ॥३॥

जाणीण नेणीव नेणेंचि कांहीं । एक जनार्दनीं लागला पायीं ॥४॥

२३७३

माझा देहीं असतां डोळा । काय जालें रे गोपाळा ॥१॥

माझा डोळा गिवसोनी दीजे । मी पाऊल न सोडीं तुझें ॥२॥

डोळा मुराला डोळियांत । कवण जाणे तेथील मात ॥३॥

एका जनार्दनीं अवलीला । पाहतां त्रैलोक्य जाहला डोळा ॥४॥

२३७४

मीच देवो मीच भक्त । पूजा उपचार मी समस्त ॥१॥

हीच उपासना भक्ति । धर्म अर्थ सर्व पुरती ॥२॥

मीच गंध मीच अक्षता । मीच वाहें मीच पुर्ता ॥३॥

मीच धुप मीच दीप । मी माझें देख स्वरुप ॥४॥

मीच माझी करी पूजा । एका जनार्दनीं नाहीं दुजा ॥५॥

२३७५

मी तो स्वयें परब्रह्मा । मीचि स्वयें आत्माराम ॥१॥

मी तों असे निरुपाधी । मज नाहीं आधिव्याधी ॥२॥

मी तों एकट एकला । द्वैतभाव मावळला ॥३॥

मजविण नाहीं कोणीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥

२३७६

ब्रह्मी स्फुरें जें स्फुरण शुद्ध सत्त्वाचें लक्षंण । तो तूं लक्षी लक्ष्यातीत परिपुर्ण रे ॥१॥

कान्हु सच्चिदानंदु शब्द अरुता रे । त्याही परता तुं निजानंदु रे ॥२॥

जेथें नाहीं गुणागुण नाहीं कायासी कारण । तो तुं गुणा गुणातीत परिपुर्न रे ॥३॥

एकाएकीं जनार्दन वेद भाष्य वचन । तो तुं शब्दादी गिळुन राहिलासी रे ॥४॥

२३७७

सर्व देशीं सर्व जीवीं तो हरी । सर्वाठायीं सर्व भावें सर्व मुरारी ॥१॥

सर्व गांवी सर्व रुपीं भरुनी उरला । सर्व व्यापक सर्वां भूतीं तो व्यापला ॥२॥

सर्व आदि सर्व अंतीं सर्वीं सर्वे भावो । एका जनार्दनीं देखा देवाधिदेवो ॥३॥

२३७८

माझ्या देहाचें देहपण । नागविता नारायण ॥१॥

माझें मीपणा पाडिलें वोस । वायां कां मज ठेविला दोष ॥२॥

जेथें; मीपण जाले वाव । तेथें करतेपणाचा ठाव ॥३॥

एका जनार्दनीं अभिमान । सांडोनियां झाला लीन ॥४॥

२३७९

तुझें तुझ्या ठायीं । तुजचि शुद्धि नाहीं । मी मी म्हणती काई । न कळे तुज ॥१॥

मीपण ठेवितां ठायीं । तुंचि ब्रह्मा पाहीं । इतर साधन कांहीं । नलगे येथें ॥२॥

मीपण तत्त्वतां । साच जेथें अहंता । एका जनार्दनीं तेचि ते निजात्मता ॥३॥

२३८०

कानावाटें मी नयनासी आलों । शेखीं नयनाचा नयन मी जाहलों ॥१॥

दृष्टीद्वारां मी पाहे सृष्टीं । सृष्टी हरपली माझें पोटी ॥२॥

ऐसं जनार्दनें मज केलें । माझें चित्ताचें जीवपण नेलें ॥३॥

एका जनार्दनीं जाणोनि भोळा । माझा सर्वांग जाहला डोळा ॥४॥