श्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


अद्वैत - अभंग २४८१ ते २५००

२४८१

फिरलों मीं दशादिशा । वायां सोसा हाव भरी ॥१॥

नाहीं जाहलें समाधान । वाउगा शीण जाहला पोटीं ॥२॥

उरला हेत पंढरीसी । सुखरासी लाधली ॥३॥

एका जनार्दनीं सुखाचें भांडार । जोडिलें निर्धार न सरेची ॥४॥

२४८२

आणिकांचे धरितां आस । होतो नाश जीवित्वा ॥१॥

म्हणोनि निर्धारिलें मन । धरिलें ठाणें रामकृष्ण ॥२॥

न धांवे आतां कोठें मन । हृदयीं ध्यान धरिलें तें ॥३॥

एका जनार्दनीं प्राण । ठेविला जाण समूळ चरणीं ॥४॥

२४८३

मागें बहुतांसी सांभाळिलें । ऐसें वरदान ऐकिलें ॥१॥

म्हणवोनी धरिला लाहो । मनींचा संदेहो टाकुनी ॥२॥

अजामेळ पापराशी । नेला निज नित्य टाकुनी ॥३॥

तारिले उदकीं पाषाण । ऐसें महिमान नामाचें ॥४॥

एका जनार्दनीं जाहलों दास । नाहीं आस दुसर्‍याची ॥५॥

२४८४

उपाधीच्या नांवें घातियेलें शून्य । आणिका दैन्यवाणें काय बोलुं ॥१॥

टाकूनिइयां संग धरियेला देव । आतां तो उपाय दुजा नाहीं ॥२॥

सर्व वैभव सत्ता जयाचें पदरीं । जालों अधिकारी आम्हीं बळें ॥३॥

एका जनादनीं तोडियेला संग । जालों आम्हीं निःसंग हरिभजनीं ॥४॥

२४८५

सकळ प्रपंचाचे भान । तें तंव मृगजळासमान ॥१॥

जन्ममरणापरता । त्रिगुणातें नातळता ॥२॥

प्रपंचाची अलिप्त युक्ति । ऐसी आहे देहस्थिती ॥३॥

प्रपंची न दिसे भान । एका शरण जनार्दन ॥४॥

२४८६

उघड दाखविलें देवा । नाहीं सेवा घेतली ॥१॥

ऐसी प्रेमाची माउली । जगीं व्यापक व्यापली ॥२॥

नाहीं घालीत भार कांहीं । आठव देहीं रामकृष्ण ॥३॥

एका जनार्दनीं शरण । मन माझें नेलें चोरुन ॥४॥

२४८७

मनाचे माथां घातिला धोंडा । वासना कापुनी केला लांडा ॥१॥

जनीं लांडा वनीं लांडा । वासना रांडा सांडियलें ॥२॥

वासना सांडोनी जालों सांड्या । कामना कामिक म्हणती गांड्या ॥३॥

कामना सांडे विषयीं लाताडे । एका जनार्दनीं तयाची चाड ॥४॥

२४८८

मनाचें तें मन ठेविलें चरणीं । कुर्वडीं करुनी जनार्दनीं ॥१॥

ध्यानाचें तें ध्यान ठेविलें चरणीं । कुर्वडीं करुनी जनार्दनीं ॥२॥

ज्ञानाचें तें ज्ञान ठेविलें चरणीं । कुर्वडीं करुनी जनार्दनीं ॥३॥

शांतीची शांती ठेविली चरणीं । कुर्वंडी करुनी जनार्दनीं ॥४॥

दयेचि ते दया ठेविली चरणीं । कुर्वंडी करुनी जनार्दनीं ॥५॥

उन्मनी समाधी ठेविली चरणीं । कुर्वंडी करुनी जनार्दनीं ॥६॥

एका जनार्दनीं देहाची कुर्वंडी । वोवाळोनी सांडी जनार्दनीं ॥७॥

२४८९

एक भाव दुजा न राहो मनीं । श्रीरंगावांचुनी दुजें नाहीं ॥१॥

मनासी ते छंद आदर आवड । नामामृत चाड गोविंदाची ॥२॥

एका जनार्दनीं नाम वाचे गाऊं । आणिक न ध्याऊं दुजें कांहीं ॥३॥

२४९०

अवघें देवा तुजसमान । मज नाहीं भिन्न भिन्न ॥१॥

नाम वाचे सदा गाऊं । आवदी ध्याऊं विठ्ठल ॥२॥

वारंवार संतसंग । कीर्तनरंग उल्हास ॥३॥

एक जनार्दनीं सार । विठ्ठल उच्चार करुं आम्हीं ॥४॥

२४९१

भुक्ति मुक्तीचें कारण । नाहीं नाहीं आम्हां जाण ॥१॥

एक गाऊं तुमचें नाम । तेणें होय सर्व काम ॥२॥

धरलिया मूळ । सहज हातीं लागे फळ ॥३॥

बीजाची आवडी । एक जनार्दनीं गोडी ॥४॥

२४९२

लौकिकापुरता नोहे हा विभाग । साधलें अव्यंग सुखसार ॥१॥

अविट विटेना बैसलें वदनीं । नाम संजीवनीं ध्यानीं मनीं ॥२॥

बहुता काळांचें ठेवणें शिवाचें । सनकसनंदनाचेंक कुळदैवत ॥३॥

एका जनार्दनीं भाग्य तें चांगलें । म्हणोनि मुखा आलें रामनाम ॥४॥

२४९३

वेदाचा वेदार्थ शास्त्राचा शास्त्रार्थ । आमुचा परमार्थ वेगळाची ॥१॥

श्रुतीचें निजवाक्य पुराणींचे गुज । आमुचें आहे निज वेगळेंची ॥२॥

तत्त्वाचें परमतत्त्व महत्वासी आलें । आमुचें सोनुलें नंदाघरीं ॥३॥

एका जनार्दनीं ब्रह्माडांचा जीव । आमुचा वासुदेव विटेवरी ॥४॥

२४९४

गाढवासांगती सुकाळ लाथांचा । श्रम जाणिवेचा वायां जाय ॥१॥

आम्हांसी तों एक प्रेमाचे कारण । नामाचें चिंतन विठोबाच्या ॥२॥

एका जनार्दनीं आवडी हें माझी । संतचरण पुजीं सर्वकाळ ॥३॥

२४९५

दास्यत्वें चोखट । रामनामें सोपीं वाट ॥१॥

करितां लाधलें चरण । मना जाहलें समाधान ॥२॥

होतों जन्मोजन्मीं तापलों । तुमचे दरुशनें निवांत ठेलों ॥३॥

शरण एका जनार्दनीं । जनार्दन एकपणीं ॥४॥

२४९६

रामकृष्णनाम । कथा करूं कीर्तन ॥१॥

हाचि आम्हां मंत्र । सोपा दिसे सर्वत्र ॥२॥

संतांचे संगती । मुखीं नामामृत तृप्ती ॥३॥

बसो कीर्तनीं सदा । माझी मति गोविंदा ॥४॥

जनार्दनाचा एक । म्हणे माझी कींव भाका ॥५॥

२४९७

चरणाची सेवा आवडी करीन । कायावाचामन धरुनी जीवीं ॥१॥

यापरतें साधन न करीं तुझीं आण । हाचि परिपुराण नेम माझा ॥२॥

एका जनार्दनीं एकत्वें पाहिन । ह्रुदयीं ध्याईन जनार्दन ॥३॥

२४९८

मागें बहुतांनीं मानिला विश्वास । म्हणोनि मी दास जाहलों ॥१॥

कायावाचामन विकिलें चरणीं । राहिलों धरूनि कंठीं नाम ॥२॥

एका जनार्दनीं नामाचा प्रताप । भक्त आपोआप तरताती ॥३॥

२४९९

वायांविण करुं नये बोभाट । सांपडली वाट सरळ आम्हां ॥१॥

आतां नाहीं भय तत्त्वतां । ठेविला माथा चरणावरी ॥२॥

धरिल्या जन्माचें सार्थक । निवारला थोर धाक ॥३॥

गेला मागील तो शीण । तुमचें दरुशन होतांची ॥४॥

पूर्णपणें पूर्ण जाहलों । एका जनार्दनीं धालों ॥५॥

२५००

अवघा व्यापक दाविला । माझा संदेह फिटला ॥१॥

मन होतें गुंडाळलें । आपुलें चरणीं पैं ठेविलें ॥२॥

केलें देहाचें सार्थक । तुटला जन्ममरण धाक ॥३॥

नाहीं पहावया दृष्टी । अवघा जनार्दनीं सृष्टी ॥४॥

कार्यकरण हारपलें । द्वैत अवघें निरसलें ॥५॥

उडालें वैरियाचें ठाणें । आतां एकचि जहालें एकपणें ॥६॥

दुजा हेत हारपला । एका जनार्दनीं एकला ॥७॥