श्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


अद्वैत - अभंग २५०१ ते २५२०

२५०१

सखीये अनुतापें वैराग्यतापें अति संतप्त नयनीं । अश्रु अंगीं स्वेद रोमांच जीवीं जीव मूर्च्छित वो ॥१॥

माझें मजलागीं गुरुकृपा मन तें जालें उन्मन वो । देही देह कैसा विदेह जालें क्रिया चैतन्यघन वो ॥२॥

माझें मीपण पहातां चित्तीं चित्त अचिंत वो । वृत्तिनिवृत्ति तेथें चिद्रुप जालो परमानंदें तृप्त वो ॥३॥

एका जनार्दनीं एकत्वें जन वन समसमान एक । एकपणें परिपुर्ण जाला त्रैलोक्य आनंदघन वो ॥४॥

२५०२

असोनी देहीं आम्हीं विदेही भाई । नातळों कर्म अकर्माचें ठायीं ॥१॥

माझें नवल म्यांच पाहिलें डोळां । शब्द निःशब्द राहिलों वेगळा ॥२॥

काय सांगु नवलाची कहाणी । पाहतें पाहणें बुडाले दोन्हीं ॥३॥

न पहावें न देखवें नायकावें कानीं । कायावाचामनें शरण एका जनार्दनीं ॥४॥

२५०३

जाहली गेली तुटली खुंटली हाव । पहातां पाहणें एकचि जाहला देव ॥१॥

जंगम स्थावर अचळ चळाचळ । अवघा व्यापुनी राहिला अकळ ॥२॥

न कळे लाघव खेळ खेळ करूणादानी । कायावाचामनें शरण एका जनार्दनीं ॥३॥

२५०४

देव पाहतां मजमाजीं भेटला । संदेह फिटला सर्व माझा ॥१॥

माझा मीच देव माझा मीच देव । सांगितला भाव श्रीगुरुनें ॥२॥

एका जनार्दनीं पाहिलासे देव । फिटला संदेह आतां माझा ॥३॥

२५०५

पहावया गेलों देव । तो मीची स्वयमेव ॥१॥

आतां पाहणेंचि नाहीं । देव भरला हृदयीं ॥२॥

पाहतां पाहतां खुंटलें । देवपण मजमाजीं आटलें ॥३॥

परतलें दृष्टीचें देखणें । अवघा देव ध्यानेंमनें ॥४॥

एका जनार्दनीं देव । नुरे रिता कोठें ठाव ॥५॥

२५०६

कायावाचामनें । कृपाळू दीनाकारणें ॥१॥

ऐसा समर्थ तो कोन । माझ्या जनार्दनावांचुन ॥२॥

माझें मज दाखविलें । उघडें वाचे बोलविलें ॥३॥

जनीं जनार्दन । एका तयासी शरण ॥४॥

२५०७

सर्व देवांचा हा देव । उभा राहे विटेवरी ॥१॥

त्याचे ठायीं भाव माझा । न दिसे दुजा पालटु ॥२॥

वारंवार ठेवीन डोई । उगेच पायीं सर्वदा ॥३॥

न मागें भुक्ति आणि मुक्ति । संतसंगति मज गोड ॥४॥

त्यांचें वेड माझें मनीं । शरण एका जनार्दनीं ॥५॥

२५०८

आजी देखिलीं पाउलें । तेणें डोळे धन्य जाहले ॥१॥

मागील शीणभारु । पाहतां न दिसे निर्धारु ॥२॥

जन्मांचें तें फळ । आजी जाहलें सुफळ ॥३॥

एक जनार्दनीं डोळा । विठ्ठल देखिला सांवळा ॥४॥

२५०९

सायासाचें बळ । तें आजी जाहलें अनुकुळ ॥१॥

धन्य जाहलें धन्य जाहलें । देवा देखिलें हृदयीं ॥२॥

एका जनार्दनीं संशय फिटला । देव तो देखिला चतुर्भुज ॥३॥

२५१०

मज करुं दिली नाहीं सेवा । दाविलें देवा देहींचे ॥१॥

जग व्यापक जनार्दन । सदा वसे परिपुर्ण ॥२॥

भिन्न भिन्न नाहीं मनीं । भरलासे जनीं वनीं ॥३॥

एका जनार्दनीं शरण । सर्वां ठायीं व्यापक जाण ॥४॥

२५११

मानसींच ध्यान मानसींच स्नान । मानसींच अर्चन करुं आम्हीं ॥१॥

न करुं साधन लौकिकापुरतें । न पुजूं दैवत आन वायां ॥२॥

मानसेंच तप मानसेंच जप । मानसीं पुण्यपाप नाहीं आम्हां ॥३॥

मानसीं तीर्थयात्रा मानसीं अनुष्ठान । मानसें धरूं ध्यान जनार्दन ॥४॥

एका जनार्दनीं मानसी समाधी । सहज तेणें उपाधि निरसली ॥५॥

२५१२

मानसींच अर्थ मानसींच स्वार्थ । मानसें परमार्थ दृढ असे ॥१॥

मानसींच देव मानसींच भक्त । मानसींच अव्यक्त दिसतसे ॥२॥

मानसींच संध्या मानसीं मार्जन । मानसी ब्रह्मायज्ञ केला आम्हीं ॥३॥

मानसी आसन मानसीं जनार्दन । एका जनार्दनीं शरण मानसींच ॥४॥

२५१३

बहुत पुराणें बहुत मतांतरें । तयांच्या आदरें बोल नोहे ॥१॥

शाब्दिक संवाद नोहे हा विवाद । सबाह्म परमानंद हृदयामाजीं ॥२॥

नोहे हें कवित्व प्रेमरस काढा । भवरोग पीडा दुरी होय ॥३॥

नोहे हें कामानिक आहे पैं निष्कामनिक । स्मरतां नासे दुःख जन्मांतरीजें ॥४॥

एका जनार्दनीं माझा तो निर्धार । आणिक विचार दुजा नाहीं ॥५॥

२५१४

जो काळासी शासनकर्ता । तोचि आमुचा मातापिता ॥१॥

ऐसा उदार जगदानी जनार्दन त्रिभुवनीं ॥२॥

आघात घात निवारी । कृपादृष्टी छाया करी ॥३॥

जन तोचि जनार्दन । एका जनार्दनीं भजन ॥४॥

२५१५

आम्हां काळांचें भय तें काय । जनार्दन बापमाय ॥१॥

पाजी प्रेमाचा तो पान्हा । नये मना आन दुजें ॥२॥

दिशाद्रुम भरला पाहीं । जनार्दन सर्वाठायी ॥३॥

एका जनार्दनीं ध्यात । जनार्दन तो ध्यानाआंत ॥४॥

२५१६

स्वर्ग मृत्यु पाताळ सर्वावरी सत्ता । नाहीं पराधीनता जिणें आमुचें ॥१॥

नाहीं त्या यमाचे यातनेंचे भय । पाणी सदा वाहे आमुचे घरीं ॥२॥

नाहीं जरामरण व्याधीचा तो धाक । सुखरुप देख सदा असों ॥३॥

एका जनार्दनीं नामाच्या परिपाठ । सुखदुःख गोष्टी स्वप्नीं नाहीं ॥४॥

२५१७

जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें । मग या विठ्ठलें कृपा केली ॥१॥

जन्मोनी संसारीं झालों याचा दास । माझा तो विश्वास पांडुरंगीं ॥२॥

भ्रमर सुवासी मधावरी माशी । तैसें या देवासी मन माझें ॥३॥

आणिका देवासी नेघें माझें चित्त । गोड गातां गीत विठोबाचें ॥४॥

एका जनार्दनीं मज तेथें न्यावें । हाडसोनी द्यावें संतांपाशीं ॥५॥

२५१८

अगाध तुझीं लीला आकळ कैसेनी कळे । ब्रह्मा मुंगी धरूनी तुझें स्वरुप सांवळें ॥१॥

तुज कैसे भजावें आपणां काय देखावें । तुजपाशीं राहुनी तुजला कैसें सेवावें ॥२॥

अंगा देव तुं आम्हां म्हणसी मानवी । हेम अलंकार वेगळे निवडावे केवीं ॥३॥

एका जनार्दनीं सबाह्मभ्यंतरीं नांदे । मिथ्या स्वप्नजात जेवीं जाय तें बोधे ॥४॥

२५१९

निरसिया वरू आपरूपें । नुपजता लग्न लाविलें बापें ॥१॥

निरासिया वरू निरासिया वरू । निरासी गमला केला संसारू ॥२॥

निरासिया वरु साजिरा कैसा । अंगीचिया तेजें आरसा जैसा ॥३॥

निरासिया जोंवरी आस । संकल्पाशीं जो तोडितो पाश ॥४॥

आस निरास जाली पाही । एका जनार्दनीं सलग्न पायीं ॥५॥

२५२०

अविवेकें देखा नवल केलें । अभिमानें कैसें लग्न लाविलें ॥१॥

गुणाची नोवरी अवगुणाचा नोवरा । सख्या सहोदरा लग्न केलें ॥२॥

पांचें सुरवाडी सासुरवाडी ये । अकल्पीचे शेजे निजलिये ॥३॥

अंगसंगेविण संतती जाहली । आब्रह्म कैसी तात्काळ व्याली ॥४॥

गुणाचेनि बळें वरसोनी पोटें । घरोघरीं भेटी नेत असे ॥५॥

सत्कर्म विवेकु पोटासी आला । तेणें जागविला आपुला व्याला ॥६॥

उठोनियां वरु संतती खाये । नोवरीसहित गेली माये ॥७॥

पितामहाचा पिता सुभानुतेजें । एका जनार्दनीं न दिजे दुजें ॥८॥