श्री नवनाथ भक्तिसार पोथी

श्री नवनाथ भक्तिसार पोथी


प्रस्तावना

श्रीनवनाथभक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व साधकाला विधिपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव देणारा असा आहे. हा ग्रंथ चाळीस अध्यायांचा आहे. याच्या ओव्या ७६०० आहेत. याचा ग्रंथकर्ता धुंडिसुत ' मालुकवि ' या नावाचा आहे. तो नरहरी वंशातील असून परमभक्त आहे. त्याचप्रमाणे हा ग्रंथ भक्तिरस व अदभुतरसाने परिपूर्ण भरला आहे. हा ग्रंथ शके १७४१ प्रमाथी नाम संवत्सरांत ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला लिहून पूर्ण झाला असा ग्रंथात उल्लेख आहे. श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधामध्ये नवनारायणांचे संवाद निमि राजाशी झाले आहेत. ते नवनारायण ऋषभदेवांच्या शंभर पुत्रांपैकी नऊजण भगद्भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. भगवान द्वारकाधीशांच्या आज्ञेवरुन कवी नारायणाने मच्छिंद्र हे नांव धारण केले, हरीने गोरक्ष, अंतरिक्षाने जालंधर, प्रबुद्धाने कानिफ, पिप्पलायनाने चरपट, आविहोंत्राने नागेश, द्रुमिलाने भरतनाथ, चमसाने रेवण व करभाजनाने गहिनी अशी नावे धारण केली व कलियुगात अवतार धारण केले. हा नवनाथांचा संप्रदाय मूळ श्रीदत्तात्रेय गुरुंच्यापासून प्रवृत्त झाला असून आजही आजही या संप्रदायात दिव्य तेजस्वी लोकांची उज्ज्वल परंपरा दिसून येते. श्रीनवनाथभक्तिसार या ग्रंथात नवनाथांचे अदभुत चरित्र वर्णिलेले आहे.

हा ग्रंथ दिव्य चरित्राने नटलेला आहे. या ग्रंथाच्या वाचनाने ऐहिक उत्कर्ष व पारलौकिक कल्याण खात्रीने होते असा भक्तांचा अनुभव आहे. पारायण व सप्ताहपद्धतीचे नियम खालीलप्रमाणे आहेत.

दिनशुद्धी पाहून ग्रंथारंभ करावा. पूर्वेकडे मुख करुन ग्रंथवाचनासाठी आसनावर बसावे. चौरंगावर दत्ताची तसबीर ठेवावी व पोथीपण ठेवावी. गणपतीचे स्मरण करुन देवांना व थोर मंडळींना नमस्कार करुन ग्रंथाची व दत्तात्रेयांची पूजा करावी. नैवेद्यासाठी पेढे, दूध, खडिसाखर, शक्य झाल्यास वडे असावेत. वाचन पूर्ण होईपर्यंत समई अखंड ठेवावी. धूप, नीरांजन लावावे. प्रथम दिवशी विडा - सुपारी, नारळ व दक्षिणा ठेवावी. शुचिर्भूत असावे. ब्रह्मचर्य पाळावे. अध्याय सुरु झाल्यापासून संपेपर्यंत आसनावरुन उठू नये व कोणाशी बोलू नये. शक्यतो सोवळ्याने वाचन करावे. रात्री घोंगडीवर झोपावे. प्रतिदिन वाचन झाल्यावर दत्ताची आरती करावी. सांगतेसाठी ब्राह्मण, सुवासिनीस भोजन घालावे. ज्यांना सप्ताह - वाचनास वेळ नसेल त्यांनी श्रावणासारख्या पवित्र महिन्यात संपूर्ण महिनाभर वाचन करावे. मात्र अध्याय संपूर्ण वाचावा. कांही दिवस दोन अध्याय वाचावे. वरील सप्ताह व महिन्याचे पारायण घरी वाचले तरी चालेल. परंतु ज्याला लवकर फळ मिळावे अशी इच्छा असेल त्यांनी गाणगापूर, नर सोबाची वाडी, औदुंबर, माहूर, गिरनार आदि दत्तस्थानांच्या ठिकाणी वाचन करावे. ज्याला समग्र अध्याय वाचण्यास वेळ नसेल त्याने एक तरी ओवी वाचावी व नवनाथांनी प्रार्थना करावी म्हणजे मनःकामना पूर्ण होते.

नवनाथ सांप्रदायिक लोकांची नऊ दिवसांत ( नवरात्र ) पारायण - वाचनपद्धती खालीलप्रमाणेः -

दिवस १ ला ६ अध्याय दिवस ५ वा ५ अध्याय

दिवस २ रा ५ अध्याय दिवस ६ वा ५ अध्याय

दिवस ३ रा ५ अध्याय दिवस ७ वा ४ अध्याय

दिवस ४ था ५ अध्याय दिवस ८ वा ३ अध्याय

दिवस ९ वा २ अध्याय

टीपः-

पारण्याच्या दिवशी प्रसादासाठी विशेषतः वडे ( भरड्याचे ), अंबिल ( ताक - जोंधळ्याची खीर ) व घुगर्‍या ( हरबर्‍याच्या ) करतात. वरील माहिती नाथपंथीय लोकांकडून विचारुन घेऊन दिली आहे.