श्री शिवलीलामृत

भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.


अध्याय तिसरा

श्रीगणेशाय नमः ॥

जय जय शिव मंगलधामा ॥ निजजनहृदयआरामा ॥ चराचरफलांकितद्रुमा ॥ नामाअनामातीत तूं ॥१॥

इंदिरावरभगिनीमनरंजना ॥ षडास्यजनका शफरीध्वजदहना ॥ ब्रह्मानंदा भाललोचना ॥ भवभंजना त्रिपुरांतका ॥२॥

हे शिव सद्योजात वामघोरा ॥ तत्पुरुषा ईशान ईश्वरा ॥ अर्धनारीनटेश्वरा ॥ गिरिजारंगा गिरीशा ॥३॥

गंगाधरा भोगिभूषणा ॥ सर्वव्यापका अंधकमर्दना ॥ परमातीता निरंजना ॥ गुणत्रयविरहित तूं ॥४॥

हे पय:फेनधवल जगज्जीवना ॥ द्वितीयाध्यायीं कृपा करून ॥ अगाध सुरस आख्यान ॥ शिवरात्रिमहिमा वर्णविला ॥५॥

यावरी कैसा कथेची रचना ॥ वदवीं पंचमुकुट पंचानना ॥ शौनकादिकां मुनिजनां ॥ सूत सांगे नैमिषारण्यीं ॥६॥

इक्ष्वाकुवंशीं महाराज ॥ मित्रसहनामें भूभुज ॥ वेदशास्त्रसंपन्न सतेज ॥ दुसरा बिडौजा पृथ्वीवरी ॥७॥

पृतनावसनेंकरून ॥ घातलें उर्वीसी पालाण ॥ प्रतापसूर्य उगवला पूर्ण ॥ शत्रुभगणें मावळलीं ॥८॥

तो एकदां मृगयाव्याजेंकरून ॥ निघाला धुरंधर चमू घेऊन ॥ घोरांदर प्रवेशला विपिन ॥ तों सावजें चहूंकडून ऊठलीं ॥९॥

व्याघ्र वृक रीस वनकेसरी ॥ मृग मृगी वनगौ वानर वानरी ॥ शशकजबुंकांच्या हारी ॥ संहारीत नृपवर ॥१०॥

चातक मयूर बदक ॥ कस्तूरीकुरंग जवादिबिडालक ॥ नकुल राजहंस चक्रवाक ॥ पक्षी श्वापदें धांवती ॥११॥

नृपे मारिले जीव बहुवस ॥ त्यांत एक मारिला राक्षस ॥ महाभयानक तामस ॥ गतप्राण होऊनि पडियेला ॥१२॥

त्याचा बंधु परम दारुण ॥ तो लक्षिता झाला दुरोन ॥ मनीं कापट्य कल्पून ॥ म्हणे सूड घेईन बंधूचा ॥१३॥

मित्रसह पातला स्वनगरास ॥ असुरें धरिला मानववेष ॥ कृष्णवसनवेष्टित विशेष ॥ दर्वी स्कंधीं घेऊनियां ॥१४॥

नृपासी भेटला येऊन ॥ म्हणे मी सूपशास्त्रीं परम निपुण ॥ अन्न शाका सुवास करीन ॥ देखोन सुरनर भूलती ॥१५॥

रायें ठेविला पाकसदनीं ॥ त्यावरी पितृतिथी लक्षुनी ॥ गुरु वसिष्ठ घरालागुनी ॥ नृपश्रेष्ठें आणिला ॥१६॥

भोजना आला अब्जजनंदन ॥ तो राक्षसें कापट्यस्मरून ॥ शाकांत नरमांस शिजवून ॥ ऋषीस आणून वाढिलें ॥१७॥

त्रिकालज्ञानी वसिष्ठमुनी ॥ सकळ ऋषींमाजी शिरोमणी ॥ कापट्य सकळ जाणुनी ॥ मित्रसह शापिला ॥१८॥

म्हणे तूं वनीं होई राक्षस ॥ जेथें आहार न मिळे नि:शेष ॥ मी ब्राह्मण मज नरमांस ॥ वाढिलें कैसें पापिया ॥१९॥

राव म्हणे मी नेणें सर्वथा ॥ बोलावा सूपशास्त्रीं जाणता ॥ तंव तो पळाला क्षण न लगतां ॥ गुप्तरुपें वना आपुल्या ॥२०॥

राव कोपला दारुण ॥ म्हणे मज शापिले काय कारण ॥ मीही तुज शापीन म्हणोय ॥ उदक करीं घेतलें ॥२१॥

तंव रायाची पट्टराणी ॥ मदयंती नामें पुण्यखाणी ॥ रूपें केवळ लावण्यहरिणी ॥ चातुर्य उपमे जेवीं शारदा ॥२२॥

मदयंती म्हणे राया ॥ दूरदृष्टीं पाहें विचारूनियां ॥ शिष्यें गुरूसी शापावया ॥ अधिकार नाहीं सर्वथा ॥२३॥

गुरूसी शाप देतां निर्धारीं ॥ आपण नरक भोगावे कल्पवरी ॥ राव म्हणे चतुर सुंदरी ॥ बोललीस साच तें ॥२४॥

म्हणे हें उदक खालीं टाकूं जरी ॥ तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री ॥ मग आपुल्याचि प्रपदांवरी ॥ जल टाकी मित्रसह ॥२५॥

तों जानुपर्यत चरण ॥ दग्ध झालें कृष्णवर्ण ॥ कुष्ठ भरला मग तेथून ॥ कल्माषपाद नाम त्यांचें ॥२६॥

वसिष्ठें जाणोनि वृत्तांत ॥ रायासी उ:शाप देत ॥ म्हणे द्वादशवर्षी होसील मुक्त ॥ येसी स्वस्थाना आपुल्या ॥२७॥

गुरु पावला अंतर्धान ॥ मग कल्माषपाद राक्षस होऊन ॥ क्षुधाक्रांत निशिदिनी ॥ वनीं भक्षी जीव सर्व ॥२८॥

परम भयानक असुर ॥ विशाळ देह कपाळी शेंदुर ॥ विक्राळ वदन बाहेर शुभ्र ॥ दंतदाढा वाढलिया ॥२९॥

जीव भक्षिले आसमास ॥ वनीं हिंडतां तो राक्षस ॥ एक ब्राह्मणकुमर डोळस ॥ द्वादश वर्षी देखिला ॥३०॥

सर्वे त्याची ललना चिमणी ॥ दोघें क्रीडती कौतुकें वनीं ॥ तंव तो ब्राह्मणपुत्र राक्षसें धरूनी ॥ भक्षावया सिद्ध झाला ॥३१॥

तंव त्याची वधू काकुळती येत ॥ अरे तूं मित्रसह राजा पुण्यवंत ॥ गोब्राह्मणप्रतिपाळक सत्य ॥ माझा कांत मारूं नको ॥३२॥

गडबडां लोळे सुंदरी ॥ करुणाभाकी पदर पसरी ॥ सवेचि जाऊनि चरण धरीं ॥ सोडी झडकरी पति माझा ॥३३॥

पतीस भक्षूं नको राजेंद्रा ॥ महत्पाप घेऊं नको एकसरा ॥ स्वर्गमार्ग तरी चतुरा ॥ कैसा पावसी अंतकाळीं ॥३४॥

ऐसी करुणा भाकिता कामिनी ॥ निर्दये भक्षिला तेच क्षणीं ॥ अस्थिपंजर टाकूनी ॥ तियेपुढें दिधला ॥३५॥

तंव ती दुःखे करूनी ॥ आक्रोशें कपाळ पिटी धरणीं ॥ मृत्तिका घेऊनि घाली वदनी ॥ कोण वनीं सांवरी तीतें ॥३६॥

मग तिनें शाप दीधला रायातें ॥ जो अलोट विधिहरिहरातें ॥ म्हणे दमयंती संगसुरते ॥ प्राण जाईल तेचि क्षणीं ॥३७॥

कोणे एके स्त्रीचा संगसोहळा ॥ तुज न घडोरे चांडाळा ॥ ऐसा शाप वदोनि ते वेळां ॥ केल्या गोळा अस्थि पतीच्या ॥३८॥

तात्काळ प्रवेशली अग्नी ॥ इकडे द्वादशवर्षी शापमुक्त होऊनी ॥ राव स्वनगरा येऊनी ॥ वर्तमान सांगे स्त्रियेशीं ॥३९॥

येरी कपाळ पिटी आक्रोशें करून ॥ म्हणे झालें वंशखंडन ॥ पतीसी म्हणे ब्रह्मचर्य धरून ॥ प्राण आपुला रक्षीं कां ॥४०॥

अनिवार अत्यंत मन ॥ न करी कोण स्त्रियेशीं संभाषण ॥ खदिरांगाराची सेज आजपासून ॥ झाली तुजलागी जाण पां ॥४१॥

परम तळमळी राजेंद्र ॥ जैसा सांपळा कोंडिला व्याघ्र ॥ कीं महाभुजंगाचे दंत समग्र ॥ पाडोनि गारुडी दीन करी ॥४२॥

कीं नासिकीं वेसण घालून ॥ महावृषभ करिती दीन ॥ कीं वनीं निरंकुश वारण ॥ धरूनि क्षीण करिती मग ॥४३॥

तैसा कल्पाषपद भूप ॥ होऊनि राहिला दीनरूप ॥ पुढें प्रकाशावया कूळदीप आपण धर्मशास्त्र पाहातसे ॥४४॥

तेथीचे पाहोनि प्रमाण ॥ वसिष्ठें मदयंतीस भोग देऊन ॥ अमोघ वीर्य पडतां पूर्ण ॥ दिव्य पुत्र जाहला ॥४५॥

तेणें पुढें वंश चालिला ॥ असो तो राव मृगयेस निघाला ॥ यथारण्य तथा गृह वाटे नृपाला ॥ भोग त्यजिले सर्वही ॥४६॥

मनांत मनोजविकार उठत ॥ विवेकांकुशें कामइभ आवरूत ॥ म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्यु ॥ तें कर्म सहसा न करावें ॥४७॥

आपुली कर्मगती गहन ॥ प्राक्तन विचित्र दारुण ॥ देवावरी काय बोल ठेवून ॥ भोगल्याविण न सुटेचि ॥४८॥

ऐसा राव उदासयुक्त ॥ वनीं हिंडता मागें पहात ॥ तों पिशाच भयानक अत्यंत ॥ रायापाठीं उभें सदा ॥४९॥

दंपत्ये पूर्वी मारिलीं ॥ ती ब्रह्महत्या पाठीसी लागली ॥ राजा तीर्थे हिंडता सकळीं ॥ परी कदाकाळीं न सोडी ॥५०॥

न सोडी स्वप्नीं जागृतींत ॥ महाविक्राळ दांत करकरां खात ॥ रायें व्रतें केलीं बहुत ॥ दान देत बहुसाल ॥५१॥

ऐसा हिंडतां राव भागला ॥ मिथुलानगरासमीप आला ॥ वनश्री देखतां आनंदला ॥ परी ब्रह्महत्या पाठीसी उभी ॥५२॥

वृक्ष लागले बहुत ॥ आम्रवृक्ष फळभारें डोलत ॥ पोफळी रातांजन विराजित ॥ केळी नारळी खर्जुरिया ॥५३॥

चंपक जाई जुई मालती ॥ मोगरे पुन्नागराज शेवंती ॥ मलयागर कृष्णागर जाती ॥ जपा करवीर कोविदार ॥५४॥

वड पिंपळ औदुंबर ॥ पारिजातक बकुळ देवदार ॥ कपित्थ बिल्व अंजीर ॥ अर्जुन पिचुमंद कदंब ते ॥५५॥

ऐसिया वनामाजी नृपती ॥ क्षणएक पावला विश्रांती ॥ परी ते पाठीसीं पापमती ॥ ब्रह्महत्या उभी असे ॥५६॥

तों उगवला भाग्यवासरमणी ॥ कीं निधान जोडे रंकालागुनी ॥ कीं क्षुधितापुढें उचंबळोनी ॥ क्षीरब्धि जैसा पातला ॥५७॥

कीं मरतियांच्या मुखांत ॥ अकस्मात घातलें अमृत ॥ कीं चिंताग्रस्तासी प्राप्त ॥ चिंतामणी जाहला ॥५८॥

तैसा तापसियांमाजी मुकुटमणीं ॥ शिष्यमांदी सवे घेऊनी ॥ महाराज तपस्वी गौतममुनी ॥ तये स्थानीं पातला ॥५९॥

रायें घातलें लोटांगण ॥ दाटला अष्टभावेंकरून ॥ उभा ठाकला कर जोडून ॥ करी स्तवन प्रीतीनें ॥६०॥

सहज होतां संतदर्शन ॥ पापें संहारती संपूर्ण ॥ तूं विलोकिसी जरी कृपा करून ॥ तरी रंक सहस्त्रनयन होय ॥६१॥

यावरी तो महाराज गौतम ॥ कल्माषपादा पुसे कुशलक्षेम ॥ राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम ॥ सुखेंकरून नांदती कीं ॥६२॥

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ॥ स्वधर्म आचरती कीं समग्र ॥ पशु सेवक पुत्र कलत्र ॥ समस्त सुखरूप आहेत कीं ॥६३॥

राव म्हणे आपुले कृपेकरून ॥ समस्त आहेत क्षेमकल्याण ॥ परंतु आलासी वाटतें दुरून ॥ आनंदघन दिसतोसी ॥६४॥

तुझ्या दर्शनें मज वाटे सत्वर ॥ ब्रह्महत्या दूर होईल समग्र ॥ मग पूर्वकर्म आपुलें दुस्तर ॥ ऋषीप्रती निवेदिलें ॥६५॥

गौतम म्हणे परम पवित्र ॥ भूकैलास गोकर्णक्षेत्र ॥ तेथूनि मी आलो अपार ॥ महिमा तेथींचा न वर्णवें ॥६६॥

ॐकाररूपें कैलासनाथ ॥ भवानीसहित तेथें नांदत ॥ सुर असुर किन्नर सेवित ॥ अर्धमात्रापीठ जें ॥६७॥

त्या गोकर्णींचे शिवदर्शन ॥ ब्रह्मादिकां दुर्लभ जाण ॥ तेथें इंदिरेसहित जनार्दन ॥ तप गहन आचरत ॥६८॥

कोटिसूर्याची प्रभा ॥ मृडानीसहित शिव उभा ॥ कैवल्यगर्भीचा पूर्ण गाभा ॥ तेथींची शोभा न वर्णवे ॥६९॥

इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र ॥ तेथेंचि वस्ती अहोरात्र ॥ जेथींचे पाषाण तरूवर ॥ समग्र निर्जर अवतरले ॥७०॥

सत्यवतीहृदयरत्न ॥ जेथें करी अनुष्ठान ॥ वसिष्ठ भृग जामदग्न्य ॥ गोकर्णक्षेत्रीं सदा वसती ॥७१॥

पहावया मृडानीनायक ॥ मंडपघसणी होतसे देख ॥ नारद तुंबरु गायक ॥ जेथें गाती शिवलीला ॥७२॥

गोकर्णाभोवतें समग्र ॥ उभे अखंड देवांचे भार ॥ मुखें गर्जती शिवहरहर ॥ आनंद थोर होतसे ॥७३॥

ऋषि करिती वेदघोष ॥ अष्टनायिकांचें नृत्य विशेष ॥ किन्नरगंधर्व गायक सुरस ॥ तोषविती महेशातें ॥७४॥

तें अति उत्तम स्थान ॥ तेजोमय प्रकाश गहन ॥ नाना वृक्ष लागले सघन ॥ कैलासभुवन प्रत्यक्ष ॥७५॥

शुभ्र सिंहासन लखलखित ॥ चारी द्वारें मणिमयखचित ॥ ऐरावतारूढ अमरनाथ ॥ पूर्वद्वारी तिष्ठतसे ॥७६॥

दक्षिणेस रक्षी सूर्यनंदन ॥ पश्चिमेसी वारूणीरमण ॥ उत्तरेसी वैश्रवण ॥ प्राणमित्र शिवाचा ॥७७॥

कर्पूरगौर भवानीसहित घवघवीत तेजें विराजित ॥ भूकैलास साक्षात माहेर संतसाधकांचें ॥७८॥

त्या मूर्तींचे करावे ध्यान ॥ त्याभोवतें महासिध्दीचें पूजन ॥ त्याभोंवतें कात्यायनी आवरण ॥ अष्टभैरव पूजिजे ॥७९॥

द्वादश मित्र एकादश रुद्र ॥ तेथेंचि वसती अहोरात्र ॥ अष्टवसु दिक्पाळ समग्र ॥ जोडोनि कर उभे तेथें ॥८०॥

अष्टसिध्दि नवनिधि कर जोडूनी ॥ अखंड आराधिति पिनाकपाणी ॥ रायास म्हणे गौतममुनी ॥ मीही वसतों सदा तेथें ॥८१॥

वरकड क्षेत्रीं लक्ष वरुषें जाण ॥ तप आचरला निर्वाण ॥ गोकर्णी एकदिन ॥ होय प्रसन्न सदाशिव ॥८२॥

अमावास्या संक्रांति सोमवार ॥ प्रदोष पर्वकाळ शिववासर ॥ समुद्रस्नान करितां समग्र ॥ फळ होय सकळ तीर्थाचें ॥८३॥

रावण कुंभकर्ण बिभिषण ॥ याहीं पूर्वी केले तेथें अनुष्ठान ॥ तें निर्वाणलिंग दशानने जाण ॥ कैलासाहूनि आणिलें ॥८४॥

गणेशें स्थापिलें तें लिंग ॥ ऋषि म्हणती सूतातें कथा सांग ॥ ऐकावया लीला सुरंग ॥ श्रवण वाट पाहती ॥८५॥

यावरी सूत वक्ता निपुण ॥ रावणमातेसी कैकसी अभिधान ॥ ती नित्य लिंगपूजनाविण जाण ॥ उदक प्राशन न करीच ॥८६॥

पंचधान्यांचें पिष्ट करून ॥ लिंग करी कामना धरून ॥ व्हावें रावणाचें कल्याण ॥ जय संपूर्ण प्राप्त व्हावा ॥८७॥

शक्रें तिचें लिंग नेऊन ॥ समुद्रीं टाकिलें द्वेषेंकरून ॥ त्यालागी रात्रंदिन ॥ रावणमाता अन्न न घे ॥८८॥

रावण म्हणें मातेलागून ॥ मी मुख्य आत्मलिंग आणितों जाऊन ॥ कैलासाप्रती द्विपंचवदन ॥ जाता झाला साक्षेपें ॥८९॥

तप आचरला दारुण ॥ जो चतु:षष्टिकलाप्रवीण ॥ जेणें वेदांची खंडे करून ॥ सारासार निवडिलें ॥९०॥

चतु:र्दशविद्यापारंगत ॥ शिवासी आवडे अत्यंत ॥ दशमुखें गायन अद्भुत ॥ केलें त्याणें स्वामीपुढें ॥९१॥

आपुलें शिर छेदूनि स्वहस्तें ॥ शिरांच्या तंती करूनि स्वरयुक्त ॥ दशमुख गात प्रेमभरित ॥ उमानाथ संतोषे जेणें ॥९२॥

राग उपराग भार्यासहित ॥ मूर्च्छना शरीर कंपित ॥ सप्तस्वर ताल संगीत ॥ शास्त्रप्रमाण गातसे ॥९३॥

गद्यपद्यरचना नाना कळा ॥ गीत प्रबंध अखंड नाममाळा ॥ गातां प्रीतीनें शिवलिला ॥ शंभु तोषला अद्भुत ॥९४॥

म्हणे प्रसन्न झालों दशमुखा ॥ इच्छित माग तुज प्रिय जें कां ॥ दशकद्वयनयन म्हणे कामांतका ॥ आत्मलिंग मज देई ॥९५॥

या त्रिभुवनांत जे सुंदर ॥ ऐसी ललना देई सुकुमार ॥ ऐकून संतोषला कर्पूरगौर ॥ भोळा उदारचक्रवर्ती ॥९६॥

कोटि चंद्रसूर्याची प्रभा पूर्ण ॥ ऐसें लिंग कांढिलें हृदयांतून ॥ कीं ब्रह्मानंदरस मुरोन ॥ दिव्य लिंग ओतिलें ॥९७॥

सहस्त्र बालसूर्य न पवती सरी ॥ ऐसी प्रभा पडली दशदिशांतरीं ॥ दिधलें रावणाचे करीं ॥ जें अतर्क्य ब्रह्मादिकां ॥९८॥

जें मुनिजनांचें ध्येय ध्यान ॥ जें सनकादिकांचें देवतार्चन ॥ वेद शास्त्र पुराण ॥ दिव्यलिंग वर्णिती ॥९९॥

जें त्रिगुणातीत परब्रह्म ॥ जें अर अजित अनाम ॥ सच्चिदानंद निर्वाणधाम ॥ योगी आराम पावती जेथें ॥१००॥

अनंत ब्रह्मांडे विचित्रें ॥ जेणें रचिलीं इच्छामात्रें ॥ ज्याकारणें भांडती वेदशास्त्रें ॥ तें दिव्य लिंग पुरातन ॥१॥

तें लिंग रावणे हातीं घेऊन ॥ म्हणे हे त्रिलोचन त्रिदोषशमन ॥ लावण्यसागरींचें निधान ॥ त्रिभुवनसुंदर ललना दे ॥२॥

जी अपर्णेची अपरप्रतिमा ॥ ऐसी देई मज सर्वोत्तमा ॥ सच्चिदानंद पूर्णब्रह्मा ॥ नामाअनामातीत तूं ॥३॥

शिव म्हणे इची प्रतिमा विशेष ॥ निर्मू न शके विधीश ॥ भोळा चक्रवतीं महेश ॥ म्हणे हेचि नेई अपर्णा तूं ॥४॥

रावणें अवश्य म्हणोनी ॥ स्कंधीं घेतली स्कंदजननी ॥ दिव्यलिंग हातीं घेऊनी ॥ लंकानाथ चालिला ॥५॥

दक्षिणपंथें जातां सत्वर ॥ गजबजिले सकळ सुरवर ॥ गजानन स्कंद वीरभद्र ॥ नंदिकेश्वर तळमळती ॥६॥

म्हणती हे सदाशिव त्रिनयन ॥ हें कैसें तुझें उदारपण ॥ भवानी बैसलासी देऊन ॥ पंचवदन हांसतसे ॥७॥

म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ ॥ तो धांवेल आतां स्नेहभरित ॥ इकडे भवानी स्तवन करीत ॥ हे पद्मजतांत धांव वेगीं ॥८॥

वारिजनयना इंदिरावरा ॥ निगमागमवंद्या सुहास्यवक्रा ॥ हे नीलपयोधरगात्रा ॥ धांव वेगीं सोडवी मज ॥९॥

हे मधुकैटभनरकमुरभंजना ॥ हे दशावतारधरा पीतवसना ॥ हे मदनांतकमानसरंजना ॥ जनार्दना जगद्गुरू ॥११०॥

हे कोटिमनोजतात श्रीधर ॥ असुरमर्दन परम उदार ॥ ऐसें स्तवन ऐकतां सर्वेश्वर ॥ विप्ररूपें आडवा आला ॥११॥

म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना ॥ कोठें मिळविली ऐसी ललना ॥ दशमुख म्हणे हे अपर्णा ॥ सदाशिवें दिधली ॥१२॥

विप्र म्हणे खालीं उतरून ॥ न्याहाळूनि पाहें इचें वदन ॥ रावण पाहें तव ते कुलक्षण ॥ अत्यंत कुरूप देखिली ॥१३॥

भंवयांस आंठी अमंगळ पूर्ण ॥ वृद्ध गाल बैसले दंतहीन ॥ गदगदां विप्र हांसे देखून ॥ टाकोनि रावण चालिला ॥१४॥

मग रमाधवें तये स्थळीं ॥ स्थापिली माता भद्रकाळी ॥ इकडे असुर शिवाजवळी ॥ म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली ॥१५॥

शिव म्हणे सत्य वचन ॥ ते तुज नाटोपे कौटाळीण ॥ अनंत ब्रह्मांडे दावून ॥ सवेंचि लपवील तत्वतां ॥१६॥

मग श्रीधरें आंगींची मळी काढून ॥ स्वहस्तें निर्मिली रूपसंपन्न ॥ मयासूराचे उदरीं जाण ॥ उत्पन्न झाली तेचि पै ॥१७॥

तिच्या स्वरूपाची प्रती ॥ नाहीं नाहीं त्रिजगतीं अंगीच्या सुवासें धांवती ॥ काद्रवेयचक्रें प्रीतीनें ॥१८॥

तिचें नाम मंदोदरी ॥ तिची प्रतीमा नाहीं उर्वीवरी ॥ विंशातिनेत्राचे चत्वरीं ॥ पट्टमहिषी पतिव्रता ॥१९॥

मयासुर करील कन्यादान ॥ वरी एक शक्ति देईल आंदण ॥ सप्तकोटी मंत्राचें गहन ॥ सामर्थ्य असे जियेमाजी ॥१२०॥

ते निर्वाण सांगातीण शक्ति ॥ तुज प्राप्त होईल लंकापती ॥ महाशत्रूवरी निर्वाणीं ती ॥ प्रेरावी त्वां सत्य पै ॥२१॥

ऐसें ऐकताचि रावण ॥ परतला लिंग घेऊन ॥ पूर्वस्थळासी आला जाण ॥ तों गजानन गाई राखी ॥२२॥

गजाननाचें स्तवन ॥ देव करिती कर जोडून ॥ म्हणती दिव्यलिंग सोडवून ॥ स्थापी अक्षयीं गणपती ॥२३॥

ऐसा देवीं प्रार्थिला एकदंत ॥ तंव रावणासी मूत्र लागलें बहुत ॥ पुढें पाऊल न घालवत ॥ चरफडीत मूत्रभरें ॥२४॥

भूमीवरी लिंग न ठेवावें ॥ ऐसें पूर्वी सांगीतलें उमाधवें ॥ हातीं घेऊनि लघुशंकेसी बैसावें ॥ हेही कर्म अनुचित ॥२५॥

तंव तो सिध्दिबुध्दींचा दाता ॥ विप्रवेषें गाई राखितां ॥ त्यासी लंकानाथ म्हणे तत्वतां ॥ लिंग हातीं धरीं हे ॥२६॥

विप्र म्हणे लंकापती ॥ माझ्या गाई रानोरानी पळती ॥ तुझ्या मुत्रशंकेसी वेळ किती ॥ लागेल हें न कळे मज ॥२७॥

रावण म्हणे न लगतां क्षण ॥ येतों मूत्रशंका करून ॥ विप्र म्हणे तीन वेळां बांहीन ॥ न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी ॥२८॥

अवश्य म्हणे लंकापती ॥ लिंग देत विप्राच्या हातीं ॥ दूर जाऊनि एकांतक्षितीं ॥ लघुशंकेस बैसला ॥२९॥

अगाध गजमुखाचें चरित्र ॥ जो साक्षात अवतरला इंदिरावर ॥ शिवउपासना करावया पवित्र ॥ जाहला पुत्र शंभूचा ॥१३०॥

असो रावणासी मूत्राचे पूर ॥ लोटले न सांवरती अनिवार ॥ एक घटिका लोटतां इभवक्र ॥ हांक फोडी गर्जोनी ॥३१॥

माझ्या गाई गेल्या दूरी ॥ हें आपलें लिंग घेईं करीं ॥ रावण न बोलेचि निर्धारीं ॥ हस्तसंकेतें थांब म्हणे ॥३२॥

दुसरी घटिका झाली पूर्ण ॥ हांक फोडी गजानन ॥ एवं घटिका झाल्या तीन ॥ कदापि रावण न उठेचि ॥३३॥

जैसें पाखंडियाचें कुमत ॥ न सरेचि वारितां पंडित ॥ तैसें रावणाचें मूत्र न सरे सत्य ॥ पुनः एकदंत हांक फोडी ॥३४॥

राक्षसा आपुलें लिंग सांभाळीं ॥ म्हणोनि ठेविलें भूमंडळीं ॥ अक्षय स्थापिलें कदाकाळीं ॥ ब्रह्मादिकां उपटेना ॥३५॥

पृथ्वीसहित अभंग ॥ एकचि झालें दिव्य लिंग ॥ रावण धांवें सवेग ॥ अशौच अपवित्र क्रोधभरें ॥३६॥

लिंग उपटितां डळमळी कुंभिनी ॥ महाबळें दशमुख पाहे उपटोनी ॥ परी न उपडे तयालागुनी ॥ अखंड अभंग जाहलें ॥३७॥

गुप्त जाहला गजानन ॥ गाई पृथ्वींत जाती लपोन ॥ रावणें एक गाईचा कर्ण ॥ धांवोनियां धरियेला ॥३८॥

तोही न उपडे तयालागून ॥ मग तेथेंचि केलें लिंगपूजन ॥ गोकर्णमहाबळेश्वर तेथून ॥ नाम जाण पडियेलें ॥३९॥

रावणमाता तेथें येऊन ॥ ते नित्य करी शिवपूजन ॥ आदिलिंग हें जाणोन ॥ करिती अर्चन सुरऋषी ॥१४०॥

रावण कुंभकर्ण बिभीषण ॥ तेथेंच करिती अनुष्ठान ॥ त्याच्या बळेंकरून ॥ देव जिंकिले रावणें ॥४१॥

मयासूर मंदोदरी आणि शक्ति ॥ देता झाला रावणाप्रती ॥ लक्ष पुत्र नातू गणती ॥ सवा लक्ष जयाचें ॥४२॥

इंद्रजिताऐसा पुत्र ॥ अष्टादशाक्षौहिणी वाद्यभार ॥ जेथींच्या अनुष्ठानें अपार ॥ रावण पावला संपत्ती ॥४३॥

गौतम म्हणे राजोत्तमा ॥ ऐसा गोकर्णीचा थोर महिमा ॥ वर्णू न शके मघवा ब्रह्मा ॥ येणें आम्हां तेथूनि जाहलें ॥४४॥

मिथुलेश्वराच्या यागाकारणें ॥ आम्ही येत असतां त्वरेनें ॥ अद्भुत एक वर्तले तुजकारणें॥ कथा तेचि सांगतो ॥४५॥

एक वृक्ष न्यग्रोध विशाळ ॥ त्याखाली आम्ही बैसलों सकळ ॥ तों एक चांडाळीण अमंगळ ॥ अति अपवित्र देखिली ॥४६॥

सर्वरोगवेष्टित पूर्ण ॥ जन्मांध गलितकुष्ठ भरलें जाण ॥ किडे पडले सर्वांगी व्रण ॥ दुर्गंधी उठली चहूंकडे ॥४७॥

रक्तपिती भरोन ॥ हस्तपाद बोटें गेली झडोन ॥ परम कुश्चित कुलक्षणा ॥ कैचें अन्न उदक तियेतें ॥४८॥

दंतहीन कर्णहीन ॥ गर्भीच तियेचे गेले लोचन ॥ कर्ण नासिक झडोन ॥ किडे पडले बुचबुचित ॥४९॥

अंगींचें चर्म गेलें झडोन ॥ वस्त्र पडलें गळोन ॥ धुळींत लोळे चांडाळीण ॥ पाप पूर्वीचें भोगीत ॥१५०॥

तिचा मरणकाळ जवळी आला जाण ॥ वरतें पाहिलें आम्हीं विलोकून ॥ तों शिवें धाडिलें दिव्य विमान ॥ तियेलागीं न्यावया ॥५१॥

दशभुज पंचवदन ॥ शिवदूत बैसले चौघे जण ॥ कोटिसूर्यतेज विराजमान ॥ प्रभा शशिसमान एकाची ॥५२॥

कोणी अग्नितेजें विराजत ॥ भालचंद्र शोभिवंत ॥ दिव्य विमान लखलखित ॥ वाद्यें वाजती चतुर्विध ॥५३॥

अष्टनायिका नृत्य करिती ॥ किन्नर गंधर्व शिवलीला गाती ॥ गौतम म्हणे ऐकें नृपती ॥ मग तयांप्रती पूसिलें ॥५४॥

हें दिव्य विमान घेऊन ॥ कोणाचें करूं जातां उद्धरण ॥ ते म्हणत तिये चांडाळणीलागून ॥ शिवें आणूं पाठविलें निजपद ॥५५॥

मग म्यां तयांसी पुसिलें ॥ इणें पूर्वी काय तप केलें ॥ मग ते शिवदूत बोलिले ॥ पूर्वजन्मींचा वृत्तांत ॥५६॥

पूर्वी केकय नामा ब्राह्मण ॥ त्याची कन्या सुमित्रा जाण ॥ आपुल्या सौंदर्यगर्वेकरून ॥ कोणासही मानीना ॥५७॥

ही बाळपणीं विधवा झाली ॥ तारुण्यमदें स्वधर्म विसरली ॥ जारकर्म करूं लागली ॥ बापें शिकविल्या नायके ॥५८॥

तों हे जाहली गरोदर ॥ लोक निंदा करिती समग्र ॥ मग बापें केश धरूनि सत्वर ॥ बाहेर घातलें इयेसी ॥५९॥

मग ही हिंडतां देशांतर ॥ कोणी एक सभाग्य शुद्र ॥ त्याणें इतें स्त्री करून सत्वर ॥ समग्र द्रव्य ओपिलें ॥१६०॥

तेथें अपत्यें झालीं बहुत ॥ ही अत्यंत मद्यमांसी रत ॥ पुष्ट जाहली बहुत ॥ घूर्णित लोचन उघडीना ॥६१॥

शुद्र घेवोनि दासीदास ॥ गेला क्षेत्रीं कृषिकर्मास ॥ हे क्षुधिंत आठवूनि मांसास ॥ शस्त्र घेवोनि चालिली ॥६२॥

मद्यें माजली नुघडी लोचन ॥ हा बस्तचि आहे म्हणोन ॥ गोवत्साचे कंठी जाण ॥ पापिणी सुरी घालीतसे ॥६३॥

तें अट्टाहासें ओरडत ॥ गाई हंबरोनि अनर्थ करीत ॥ इणे कंठ छेदोनि गृहांत ॥ वत्स नेलें त्वरेनें ॥६४॥

डोळे उघडूनि पाहे पापिणी ॥ मग गोवत्स ओळखिलें ते क्षणीं ॥ तेव्हा तिणें शिव शिव उच्चारूनी ॥ म्हणे करणी न कळतां केली ॥६५॥

मग अर्धवत्समांस भक्षून ॥ उरलें टाकी बाहेर नेऊन ॥ लोकांत उठविलें पूर्ण ॥ गोवत्स मारिलें व्याघ्रानें ॥६६॥

त्यावरी ही काळें मृत्यु पावत ॥ तों येऊनियां यमदूत ॥ इयेसी नेलें मारीत ॥ जाचिती बहुत निर्दयपणें ॥६७॥

कुंभीपाकीं घालिती ॥ असिपत्रवनीं हिंडविती ॥ तप्तभूमीवरी लोळविती ॥ स्तंभ कवटाळविती तप्त जे कां ॥६८॥

चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन ॥ इचें कांही आहे कीं नाहीं पुण्य ॥ तो म्हणे शिवनाम उच्चारून ॥ गोवत्सवध इणें केला ॥६९॥

मग यमें दिधलें लोटून ॥ चांडाळयोनींत पावली जनन ॥ गर्भांध कुश्चल कुलक्षण ॥ विष्ठामूत्रें भरली सदा ॥१७०॥

श्वानाचें उच्छिष्ट भक्षी जाण ॥ तंव मायबापें गेलीं मरोन ॥ मग ही हातीं काठी घेऊन ॥ गांवोगांवीं हिंडतसे ॥७१॥

तों शिवरात्र पर्वकाळ लक्षून ॥ गोकर्णक्षेत्रापति संपूर्ण ॥ यात्रा चालिली घोष गहन ॥ नानाविध वाद्यांचा होतसे ॥७२॥

शिवनामाचा घोष अपार ॥ शिवभक्त करिती वारंवार ॥ त्यांच्या संगें ही दुराचार ॥ चांडाळीही चालिली ॥७३॥

गोकर्णक्षेत्रा गेली चांडाळी ॥ पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी ॥ म्हणे मज अन्न द्यावें ये वेळीं ॥ बहुत पापिणी मी आहें ॥७४॥

हांका फोडीत हात पसरून ॥ तों प्रदक्षिणा करिती भक्तजन ॥ एकें बिल्वपत्र नेऊन ॥ तिचे हातीं घातलें ॥७५॥

तें त्रिदळ चांचपोन पाहत ॥ मुखीं घालावयाची नाहीं वस्त ॥ म्हणोनि रागें भिरकावीत ॥ तें पडत शिवलिंगावरी ॥७६॥

शिवरात्रीस उपोषण ॥ बिल्वदळे घडले शिवपूजन ॥ शिवभक्तांसवें जागरण ॥ घडलें संपूर्ण चांडाळीस ॥७७॥

शिवनामें गर्जती जन ॥ हेही करीत तैसेंचि स्मरण ॥ ती ही वडाखालीं येऊन ॥ पडली आहे चांडाळी ॥७८॥

ऐसा तिचा पूर्ववृत्तांत ॥ गौतमें सांगितला समस्त ॥ मग ती दिव्य देह पावोनि बैसत ॥ शिवविमानीं तेधवां ॥७९॥

आपुलें पूर्वकर्म आठवून ॥ करूं लागली शिवस्मरण ॥ मग शिवगणीं नेऊन ॥ शिवपदीं स्थापिली ॥१८०॥

गौतम म्हणे ऐक राया सादर ॥ तूं गोकर्णाप्रति जाई सत्वर ॥ शिवरात्रीस पार्वतीपरमेश्वर ॥ त्रिदळेंकरूनि अचीं कां ॥८१॥

ऐसें बोलोनि गौतम मुनी ॥ गेला जनकाच्या यागालागुनी ॥ कल्माषपाद तेच क्षणीं ॥ गोकर्णक्षेत्रीं पातला ॥८२॥

शिवरात्रीस दिव्य लिंग ॥ मित्रसहरायें पूजिलें सांग ॥ अंतरी सप्रेम अनुराग ॥ उमारंग संतोषला ॥८३॥

ब्रह्महत्येचें पातक विशेष ॥ जाऊनि राव झाला निर्दोष ॥ तों कैलासाहूनि आदिपुरुष ॥ पाठवीत दिव्य विमान ॥८४॥

विमानीं बैसले शिवगण ॥ परम तेजस्वी दैदीप्यमान ॥ अनंत विजांचे रस पिळोन ॥ मूर्ती ओतिल्या वाटतें ॥८५॥

अनंत वाद्यें गर्जती एक वेळां ॥ तेणें रंगसुरंग दाटला ॥ दिव्यसुमनांच्या माळा ॥ वर्षती वरूनि वृंदारक ॥८६॥

मित्रसह दिव्य देह पावोन ॥ झाला दशभुज पंचानन ॥ इंद्रचंद्रादिपदें ओलांडून ॥ नेला मिरवत शिवपदा ॥८७॥

सरूपता मुक्ति पावोन ॥ शिवरूपीं मिळाला आनंदघन ॥ धन्य शिवरात्रिव्रत पावन ॥ धन्य गोकर्ण शिवमंदिर ॥८८॥

गौतम ऋषि परम धन्य ॥ तेणें इतिहास सांगितला पावन ॥ धन्य श्रोते तुम्हीं सज्जन ॥ श्रवणीं सादर बैसलां ॥८९॥

मानससरोवरवेष्टित ॥ मराळ जैसे विराजीत ॥ कीं निधानाभोंवते समस्त ॥ साधक जैसे बैसती ॥१९०॥

तरी पंडित तुम्ही चतुर ॥ तुमचे अवधान दिव्यालंकार ॥ देवोनि गौरवा श्रीधर ॥ ब्रह्मानंदेकरूनियां ॥९१॥

श्रीमद्भीमातटविलासा ॥ ब्रह्मानंदा आदिपुरुषा ॥ श्रीधरवरदा कैलासविलासा ॥ कथारस वदवीं पुढें ॥९२॥

श्रीशिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्ज्न अखंड ॥ तृतियाध्याय गोड हा ॥१९३॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥