श्री वेंकटेश विजय

वेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.


अध्याय २ रा

मागील अध्यायात शतानंद गौतमांनी व्यंकटगिरीचा महिमा सांगून चारही युगात तो निरनिराळ्या नावांनी प्रसिद्धीस आला आहे असे सांगितले. तेव्हा राजाने एकाच पर्वतास भिन्न भिन्न काळी अशी निराळी नावे का पडली असा प्रश्न केला; तेव्हा शतानंद गौतमांनी तो इतिहास सांगण्यास सुरुवात केली.

राजा ! कृतयुगात याला वृषभाद्री नाव पडण्याचे कारण आता तुला मी सांगतो; ते ऐक.

पूर्वी वृषभ नावाचा एक फार भयंकर राक्षस होता. तो लोकांना फारच त्रास देतसे. त्याचे आचरण वाईट होते. तो एकदा या पर्वतावर आला. त्याने आपल्या कपाळास शेंदूर फासला होता. त्याचे तोंड फार मोठे होते. त्याला पांढरी शुभ्र लांब दाढी होती. वर्णाने तो अतिशय काळा असल्याने काळापर्वतच असा तो भासत होता. तोंडातून जीभ बाहेर काढून तो जेव्हा फिरत असे तेव्हा लोक भयाने घाबरत असत. असा हा उन्मत्त राक्षस या पर्वतावरील तुंबर तीर्थावर राहत असे. ब्राह्मण याच्या भीतीने थरथरा कापत असत. ब्राह्मणाचे स्नान संध्या ध्यान अध्यापन होमहवनदि सर्व कर्म याच्या भीतीने बंद पडले. केव्हातरी सर्व ब्राह्मण मंडळी आपापल्या अनुष्ठात मग्न होऊन बसत. त्यावेळी याचे भयंकर ओरडणे ऐकू आले की त्याचे मन चलबिचल होतेसे.

याप्रकारे तो वृषभ राक्षस जरी महाभयंकर होता, तरी तो विष्णुभक्त असून नरसिंह शालिग्रामाची पूजा फार भक्तीने करीत असे. पूजेच्यावेळी अतिशय प्रेमाने आपले मस्तक तोडुन विष्णूस समर्पण करीत असे. भगवान विष्णूंनीही त्याच्या प्रेमाने त्यास पुनः सजीव करावे. असे पाच हजार वर्षे त्याचे तप चालले होते. सर्व लोक त्याच्या उग्रपणास फार घाबरले होते, तेव्हा त्यांनी आता आम्हांस या संकटातुन कोण सोडविणार? आता कोणास शरण जावे? या राक्षसाचा नाश कोण करिल असा विचार करीत असता त्यांनी ठरविले की, एका भगवंतावाचून आमचे रक्षण कोण करील ! त्यानेच जर मनावर घेतले तरच आमचे रक्षण होईल, मग त्या ब्राह्मणांनी स्नाने वगैरे केली व पर्वताच्या शिखरावर ते चढले. तेथे जाऊन त्यांनी भगवंताची एकाग्र मनाने स्तुती केली, त्यांची स्तुति ऐकून भगवान गरुडावर बसुन तेथे आले. त्यांचे ते स्वरूप अत्यंत सुंदर व तेजस्वी पाहून सर्वांना फार आनंद झाला. सर्व ब्राह्मणांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला व स्तुती केली. त्यांची ती स्तुती ऐकून भगवान प्रसन्न झाले व त्यांनी ब्राह्मणांना घाबरू नका असा वर दिला. तुमचे कल्याण होईल. नंतर भगवान विष्णु राक्षसाकडे आले. त्यानेही भगवंताला पाहून नमस्कार केला व स्तुतीने त्यांना संतुष्ट केले. संतुष्ट भगवंताना पाहून राक्षस म्हणाला, देवा मला राज्य वगैरे काही वैभव नको. माझे हे बाहू स्फुरण पावतत तेव्हा मला युद्धभिक्षा दे. मला तुझ्याबरोबर लढाई करावी असे वाटते. भगवंतांनी त्यास तथास्तु म्हणून त्याच्याबरोबर घनघोर युद्ध केले. त्रैलोक्यावर त्या युद्धाचा परिणाम झाला. देव, माणसे वगैरे सर्व घाबरून गेले. असे युद्ध सुरू असता याचा मला पराजय करता येत नाही हा साक्षात भगवान भक्तरक्षणाकरिता अवतरला आहे असे राक्षसास वाटले. शेवटी श्रीभगवंतांनी आपले सुदर्शनचक्र त्यावर टाकले व त्याचे मस्तक तोडले. सर्वत्र आनंदीआनंद झाला. सर्व लोक सुखी झाले. भगवान वैकुंठास परत गेले.

नंतर शतानंद गौतमांनी राज्याच्या प्रश्नाप्रमाणे त्रेतायुगात याला अंजनाद्री असे नाव का मिळाले ती हकीकत सांगितली ती तिसर्‍या अध्यायात पाहू.

श्रीगणेशाय नमः ॥ जयजय क्षीरसागरविलासिया ॥ निर्विकल्पवृक्षा श्रीहरिराया ॥ भक्त वत्सला शेषाद्रिनिलया ॥ निरसी माया दासाची ॥१॥

तू जगदात्मा परात्पर ॥ भक्तसाहकरी निर्विकार ॥ दासासि रक्षी वारंवार ॥ हेही बोलणे नसाहे ॥२॥

चकोरासि निववी म्हणोन ॥ चंद्रासि प्रार्थणे काय कारण ॥ अद्भुत प्रकाश पाडी म्हणोन ॥ सूर्यासि सांगणे नलगेची ॥३॥

तैसा तू कृपाळू सर्वकाळ ॥ तुज काय प्रार्थावे वेळोवेळ ॥ भक्तरक्षणार्थ अवतार प्रबळ ॥ युगानुयुगी घेतोसी ॥४॥

जयजयाजी वेंकटपति ॥ वेदशास्त्रे तुज वर्णिती ॥ कृपाकरूनि दीनावरुती ॥ ग्रंथसिद्धीसी नेई हा ॥५॥

पूर्वाध्यायी कथाविशेष ॥ शतानंद सांगे जनकास ॥ कृतयुगी त्या पर्वतास ॥ वृषभाद्रि ऐसे नामका ॥६॥

पूर्वी वृषभनामे निशाचर ॥ परमदुरात्मा दुर्धर ॥ लोकपीडक दुराचार ॥ तया पर्वतासी पातला ॥७॥

महाभयानक निष्ठुर ॥ कपाळी चर्चित सेंदूर ॥ विक्राळवदन भयंकर ॥ दाढा शुभ्र दीसती ॥८॥

जैसा का कज्जलपर्वत ॥ तैसा शरीरे उंच भासत ॥ जिव्हा बाहेर लळलळित ॥ पाहता भय वाटतसे ॥९॥

ऐसा तो राक्षस उन्मत्त ॥ तुंबरतीर्थाजवळ राहत ॥ त्याच्या भये विप्रसमस्त ॥ चळचळा कापती ते काळी ॥१०॥

न चले स्नानसंध्यातपाचरण ॥ असुरभये विव्हळमन ॥ वेदशास्त्रांचे अध्ययन ॥ न चले अनुष्ठान सर्वथा ॥११॥

जैसा अजाजवळी वसता वृक ॥ त्यासि नाठवे तहान भूक ॥ तेवि असुरभये ऋषि सकळिक ॥ भयभीत सर्वदा ॥१२॥

यमनियमप्राणायामकरून ॥ ऋषि बैसती होऊनि तल्लीन ॥ तो इतक्यात ऐकता हाक दारुण ॥ विगलित मन होय त्यांचे ॥१३॥

ऐसा तो दैत्यदुर्धर ॥ परी विष्णुभजनी होता तत्पर ॥ श्रीनृसिंहशालग्राम मनोहर ॥ पूजी निरंतर अत्यादरे ॥१४॥

असुराचे निश्चय थोर ॥ छेदूनि आपुले शिर ॥ नित्य काळी देवावर ॥ प्रेमभावे वाहतसे ॥१५॥

प्रसन्न होऊनी जगन्नाथ ॥ नित्य सजीव त्याते करीत ॥ पाचसहस्त्रवर्षपर्यंत ॥ याचप्रकारे जाहले ॥१६॥

ऐसा तो भाविक सत्य ॥ परी असुरस्वभावे वर्तत ॥ क्रुरकर्म पाहता मनात ॥ भयभीत विप्र जाहले ॥१७॥

मग ऋषी मिळोनी समग्र ॥ म्हणती कैसे करावे विचार ॥ संकट पडिले परमदुर्धर ॥ सोडवी कोण आम्हाते ॥१८॥

कोणासि जावे आता शरण ॥ कोण साहकार करील पूर्ण ॥ एक म्हणती असुरहनन ॥ होय ऐसे योजावे ॥१९॥

जो जगदात्मा श्रीहरी ॥ भक्तजनांचा कैवारी ॥ त्रिभुवनपति वैकुंठविहारी ॥ त्यासी शरण जावे आता ॥२०॥

तो जरी होईल कृपावंत ॥ तरी सत्य करील दैत्यांत ॥ मग विप्र होऊनी शुचिर्भूत ॥ पर्वतमस्त की चढियले ॥२१॥

एकाग्र मन करोन ॥ उभे राहिले कर जोडून ॥ अंतरी आठविला मनमोहन ॥ पीतवसनजगद्‌गुरु ॥२२॥

म्हणती पुराणपुरुषा नारायणा ॥ दीनबंधो रमारमणा ॥ क्षीराब्धिवासा जगन्मोहना ॥ मधुसूदना केशवा ॥२३॥

भक्तकामकल्पद्रुमा ॥ साधुजनमनोभिरामा ॥ करुणासागरा मेघश्यामा ॥ पूर्णकामा सर्वेशा ॥२४॥

हे दशावताररूपधारणा ॥ अंधकारिह्रदयभूषणा ॥ मधुमुरनरकप्राणहरणा ॥ जगत्पाळणा दीनबंधो ॥२५॥

नमो जगत्स्थित्यंतकारण ॥ भक्तकार्याझालाशि सगुण ॥ तुझे वर्णावया गुण ॥ सहस्त्रवदन शक्त नव्हे ॥२६॥

जरी तू कृपाकरिशी स्वये ॥ तरी निगर्मतेचि सुगम होय ॥ मृत्तिका जो खणो जाय ॥ निधान त्यासी सापडे ॥२७॥

जेथे जाय तेथे विजय ॥ दुर्जन नाश शत्रुपराजय ॥ निजभक्त होऊन निर्भय ॥ तुझे चिंतिती चरणांबुज ॥२८॥

नमो कमलावरा कमलभूषणा ॥ कमलोद्भवजनका कमलयना ॥ कमलनाभा कमलशयना ॥ कमलधारणा कमलप्रिया ॥२९॥

नमो दुष्टदानवनिकृंतना ॥ शिष्टसाधुजन प्रतिपालना ॥ मायामोहपाशविमोचना ॥ नागेंद्रशयना श्रीहरी ॥३०॥

हे द्वारकानगरविहारा ॥ विश्वव्यापका क्षीराब्धिजावरा ॥ खगवरकेतना शार्ङ्गधरा ॥ विश्वोद्धारा विश्वपती ॥३१॥

तुझी वेदाज्ञा शिरी वंदून ॥ करित असता तुझे चिंतन ॥ विघ्नकरी दैत्यदुर्जन ॥ रक्षी श्रीहरी आम्हांते ॥३२॥

ऐसे ऐकोनिया स्तवन ॥ वैकुंठीहूनि नारायण ॥ गरुडावरी आरुढोन ॥ जगज्जीवन पातला ॥३३॥

सुरंगविराजे पीतांबर ॥ गळा डोले वैजयंतीहार ॥ मुकुटमंडले मकराकार ॥ निढळी केशर विराजितसे ॥३४॥

परमसुकुमार घनश्यामवर्ण ॥ आकर्णविराजतीराजीवनयन ॥ आजानुबाहु सुहास्यवदन ॥ देदीप्यमान शोभतसे ॥३५॥

शंख चक्र गदा पद्म ॥ चारी आयुधे उत्तमोत्तम ॥ उदारवदन पुरुषोत्तम ॥ निगमागमा वंद्य जो ॥३६॥

ऐसा तो इंदिराकांत ॥ जो देवाधि देव समर्थ ॥ विप्रांनी देखिला अकस्मात ॥ घालिती दंडवत प्रेमभावे ॥३७॥

दृढ धरोनि चरण कमळ ॥ ऋषि विनविती तेव्हा सकळ ॥ तू कृपाळु दीनदयाळ संकटप्रबळ निवारी हे ॥३८॥

देखता विप्रांचे भावार्थ ॥ प्रसन्न जाहला लक्ष्मीकांत ॥ म्हणे भिऊ नका हो समस्त ॥ चिंता अणुमात्र करू नका ॥३९॥

अभय देऊनि द्विजांसी ॥ वेगी पातले असुरापाशी ॥ येता देखिले ह्रषीकेशी ॥ असुरमानसी आनंदला ॥४०॥

देखता साक्षात भगवान ॥ राक्षस करी साष्टांगनमन ॥ उभयहस्त जोडून ॥ करी स्तवन प्रीतीने ॥४१॥

म्हणे जय जय कमलपत्राक्षा ॥ हे कंसारे निर्विकल्पवृक्षा ॥ निगमागमवंद्या सर्वसाक्षा ॥ कभीध्यक्षा कर्ममोचका ॥४२॥

हे भवभयपाशनिवारणा ॥ हे सच्चिदानंद मुरमर्दना ॥ सुरकैवारीया बंधच्छेदना ॥ दानवमर्दना दयानिधे ॥४३॥

तू नाढळसी बहुत यत्‍ने ॥ साधिता पंचाग्निसाधने ॥ अष्टांगयोगादिप्रयत्‍ने ॥ करिता दर्शन न होय ॥४४॥

नानातपे आचरता ॥ प्राप्त न होशी रमाकांता ॥ भक्त वत्सला दीननाथा ॥ अनाद्यनंता श्रीहरी ॥४५॥

पंच सहस्त्र संवत्सर ॥ मी येथे तप करितसे घोर ॥ परी दर्शन नव्हेचि साचार ॥ बहुत यत्‍न केलिया ॥४६॥

आता गांजले भक्तजन ॥ जाणोनि आलासि धावोन ॥ भक्तपाळक ब्रीदगहन ॥ साचकरोनि दाविले ॥४७॥

ऐसे ऐकता ते अवसरी ॥ प्रसन्न जाहले मधुकैटभारी ॥ राक्षसासि म्हणे मुरारी ॥ माग झडकरी अपेक्षित ॥४८॥

असुर बोले अधोक्षजा ॥ प्रसन्न जाहलासि गरुडध्वजा ॥ मनोरथ पूर्ण माझा ॥ करी आता दयानिधे ॥४९॥

नावडे राज्यसिंहासन ॥ इंद्रपद नावडे मज लागून ॥ बाहु स्फुरती माझे दारुण ॥ युद्धभिक्षा देई मज ॥५०॥

तुजशी करावा संग्राम ॥ ऐसा मनोरथ माझा उत्तम ॥ पूर्णकर्ता तू मेघश्याम ॥ कृपाकरोनि देइजे ॥५१॥

ऐकोनि तयाची वचनोक्ती ॥ मंदस्मितवदन जगत्पती ॥ अवश्य म्हणोनि असुराप्रती ॥ युद्धालागी प्रवर्तले ॥५२॥

असुर सरसावला तेच क्षणी ॥ शस्त्रास्त्रसामग्री सिद्धकरोनी ॥ हरीसवे रणांगणि ॥ निर्वाण युद्ध करितसे ॥५३॥

युद्धहोतसे घनचक्र ॥ भयभीत जाहले सुरवर ॥ विमानी बैसोनि समग्र ॥ कौतुक थोर पाहती ॥५४॥

दिग्गज कापती भयेकरोन ॥ ग्रीवाहालवी विषकंठभूषण ॥ आदिवराह सावरोन ॥ पृथ्वी धरिती दाढेवरी ॥५५॥

घोरांदर मांडला रण ॥ बाणमंडप दाटलासे घन ॥ त्याचेनियोगे संपूर्ण ॥ चंडकिरण झाकोळला ॥५६॥

चळचळा कापती द्विज सर्वत्र ॥ म्हणती कैसा मरेल अमित्र ॥ श्रीहरिरूप कोमळ साचार ॥ कैसा आकळे असुरहा ॥५७॥

एक म्हणे दुष्टवधार्थ ॥ अवतरला हा रमाकांत ॥ त्यासि दैत्य वधावाया निश्चित ॥ उशीर काय असे पै ॥५८॥

जेणे उचलोन गोवर्धन ॥ नखाग्री धरिला सप्तदिन ॥ त्या हरीसी असुरभंजन ॥ करावया काय उशीर ॥५९॥

असोयुद्ध मांडले दुर्द्धर ॥ शार्ङ्गधनुष्य चढवोनि श्रीधर ॥ सोडित शरा पाठी शर ॥ राक्षसेंद्रासि लक्षोनिया ॥६०॥

शक्तिपाशगदातोमर असिलताआदि शस्त्र ॥ सोडी राक्षस बहुत प्रकार ॥ परी श्रीधर नाटोपे ॥६१॥

आसुरी माया परम अद्भुत ॥ प्रकट करी दैत्यनाथ ॥ क्षणांत व्याघ्रादिरूपे धरित ॥ परमभ्यासुरतेकाळी ॥६२॥

जैशी वेदोक्तमंत्रापुढे निश्चित्त ॥ गारुडियाची विद्या न चलत ॥ तैशा कापट्यविद्या बहुत ॥ हरी पुढे न चलती ॥६३॥

असो नानापरीचे शस्त्रपात ॥ असुरावरी करी रमानाथ ॥ बहुत प्रकारे युद्ध करीत ॥ नाटोपे दैत्य सर्वथा ॥६४॥

अग्निअस्त्र पर्जन्यास्त्र ॥ वातपर्वत आणि वज्र ॥ गरुडसर्पादि अस्त्रविचित्र ॥ परस्परे प्रेरिती ॥६५॥

बाणयुद्ध गदायुद्ध ॥ मल्लमहिषीकुंजरयुद्ध ॥ अंतरिक्षयुद्ध अगाध ॥ नानामंडळे दाविती ॥६६॥

ऐसे सहस्त्रवर्षपर्यंत ॥ रात्रंदिवस युद्ध होत ॥ परी नाटोपे दैत्यनाथ ॥ मग रमानाथ काय करी ॥६७॥

विश्वरूप ते अवसरी ॥ प्रकट करी मधुकैटभारी ॥ ते रूप अगाध निर्धारी ॥ कृतांत पाहो शकेना ॥६८॥

वाटे त्याचे तेजावरती ॥ चंद्रसूर्य बुचकळ्या देती ॥ चराचरजीवांसि निश्चिती ॥ कल्पांतचि भासला ॥६९॥

सहस्त्रमस्तके अद्भुत ॥ सहस्त्रकर आयुधे मंडित ॥ सहस्त्रचरणविराजित ॥ सहस्त्रलोचन दिसती पै ॥७०॥

रक्त श्वेत आणि पीत ॥ कृष्ण नील वर्णभासत ॥ परमभयानकरूप अद्भुत ॥ पाहता न पाहवे तयाकडे ॥७१॥

पृथ्वी आणि अंबर ॥ दाही दिशा व्यापिल्या समग्र ॥ दंत दाढा कराळ शुभ्र ॥ भयंकर वाटती ॥७२॥

तेहतीसकोटी सुरवर ॥ दिसती त्याचे अवयवसमग्र ॥ नेत्र जयाचे मित्र ॥ अत्रिपुत्र मन ज्याचे ॥७३॥

अश्विनीकुमार तेचिश्रोत्र ॥ अहंकार तो साक्षातरुद्र ॥ पाणी जयाचे पुरंदर ॥ कर्तृत्व सर्व करितसे ॥७४॥

सहस्त्रसूर्य उगवले अकस्मात् ॥ त्याहुनि तेजविशेष भासत ॥ भयभीत असुर मनात ॥ म्हणे हे अद्बुत प्रकटले ॥७५॥

या पुढे माझे कपटयुक्ती ॥ आता कदापि न चालती ॥ हा साक्षात जगत्पती ॥ भक्तकार्यार्थ अवतरला ॥७६॥

याही वेगळे रूप सगुण ॥ चतुर्भुज गरुडवाहन ॥ हाती घेऊनि धनुष्यबाण ॥ अनंतरूपे दीसती ॥७७॥

चहूकडोनी येती शर ॥ भुलोनि गेला हो असुर ॥ ऐसे रूप मनोहर ॥ कोणासि दृष्टी पडेना ॥७८॥

करिता अष्टांगयोगसाधन ॥ किंवा आचरता महायज्ञ ॥ की करिता तीर्थाटन ॥ कदापि दर्शन न होय ॥७९॥

अथवा प्रयागी जाऊन ॥ देह करवती घातले जाण ॥ तथापि ऐसे दर्शन ॥ त्यासि ही दुर्लभ सर्वथा ॥८०॥

सुरभृसुरादिक चित्ती ॥ ऐसे दर्शन इच्छिती ॥ परी त्यास ही तत्प्राप्ती ॥ सर्वथा ही नव्हेची ॥८१॥

त्या दैत्याचे सुकृत ॥ त्याचे कोणासि न करवे गणित ॥ साक्षात इंदिराकांत ॥ रूप अद्भुत दाविले ॥८२॥

असो आता सर्वेश्वर ॥ करी घेउनी सुदर्शनचक्र ॥ असुरावरी जगदीश्वर ॥ धावला हो ते काळी ॥८३॥

राक्षस ऐसे पाहून ॥ करिता झाला साष्टांगनमन ॥ म्हणे श्रीनिवासा माझे हनन ॥ करी आता झडकरी ॥८४॥

तुझ्या चक्राचा पराक्रम ॥ पूर्वी च म्या ऐकिला उत्तम ॥ तुझे घोररूप हे परम ॥ आजि दृष्टी देखिले ॥८५॥

तुझे रूप पहावया दृष्टी ॥ योगी होती परमकष्टी ॥ त्यासि नातळसी जगजेठी ॥ कृपादृष्टि मज केली ॥८६॥

तुझ्या सुदर्शनेकरून ॥ तू जवळी असता नारायण ॥ तव हस्ते पावतो मरण ॥ सभाग्य नसे मज ऐसा ॥८७॥

यावरी बोले मुरहर ॥ मी करितो आता तुझा संहार ॥ अंतकाळी इच्छित वर ॥ माग काही मजलागी ॥८८॥

राक्षस म्हणे मन्मथताता ॥ मागणे माझे हेचि आता ॥ माझे नाम या पर्वता ॥ लागी असावे जाणपा ॥८९॥

कृतयुगाचा होईल अंत ॥ तोवरी यासी नामप्राप्त ॥ वृषभाचल ऐसे विख्यात ॥ जाहले पाहिजे स्वामिया ॥९०॥

आणि मजसी केलासि संग्राम ॥ ही कथा ऐकती उत्तम ॥ त्यासि प्रसन्न होऊनि मेघश्याम ॥ अक्षयपद देईजे ॥९१॥

ऐसे ऐकोनि श्रीधर ॥ अवश्य म्हणोनि दीधला वर ॥ मग सोडोनिया चक्र ॥ शिर तात्काळ छेदिले ॥९२॥

जाहला एकचि जयजयकार ॥ सुमने वर्षती सुरवर ॥ आनंदले द्विजवर ॥ श्रीहरीजवळ पातले ॥९३॥

म्हणती पुराण पुरुषा मधुसूदना ॥ मायातीता जगन्मोहना ॥ भक्तजनमानसरंजना ॥ जनार्दना जगद्‌गुरु ॥९४॥

हे मनोजताता श्रीकरधरा ॥ असुरभंजना परमोदारा ॥ असुर संहारूनि परात्परा ॥ सुखी केलेसि आम्हांते ॥९५॥

असो आता खगवरकेतन ॥ वैकुंठासि केले गमन ॥ शतानंद म्हणे जनकालागून ॥ ऐसे कथन पूर्वीचे ॥९६॥

तै पासूनि वृषभाचळ ॥ नाम पावला हा अचळ ॥ ही कथा ऐकता प्रेमळ ॥ पावती अढळ हरिपद ॥९७॥

मग बोले नृपवर ॥ कथा ऐकिली मनोहर ॥ पुढील कथा सुंदर ॥ श्रवणकरवी गुरुवर्या ॥९८॥

त्रेतायुगि निर्धारी ॥ नाम पावला अंजनाद्री ॥ ती कथा ऐकावी चतुरी ॥ अतिआदरे करोनिया ॥९९॥

श्रीवेंकटेशचरित्रगहन ॥ ऐका आता चित्त देउन ॥ पुढील अध्यायी कथन ॥ अति सुंदर असे पै ॥१००॥

सज्जनरंजना श्रीनिवासा ॥ जगद्व्यापका आदिपुरुषा ॥ चैतन्यघना रमाविलासा ॥ अनंतवेषा जगत्पती ॥१०१॥

तू अजअव्ययअविनाश ॥ मायातीता चित्प्रकाश ॥ मी रे तुझा दासानुदास ॥ तोडी पाश तयाचे ॥१०२॥

श्रीवेंकटेशविजय सुंदर ॥ संमत पुराणभविष्योत्तर ॥ श्रवण करोत पंडित चतुर ॥ द्वितीयाध्याय गोड हा ॥१०३॥

एकंदर ओवीसंख्या ॥२०८॥