श्री वेंकटेश विजय

वेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.


अध्याय ३ रा

शतानंद गौतमांनी राजास अंजनाद्रि नावाचा इतिहास सांगण्यास सुरुवात केली. पूर्वी त्रेतायुगात केसरी नावाचा एक वानर होता. त्याची अंजनी नावाची एक पतिव्रता स्त्री होती. तिला संतती नसल्याने ती नेहमी काळजीत असे. एके दिवशी मतंग नावाचे एक ऋषि तिच्या आश्रमास आले. त्यांचा तिने योग्य आदरसत्कार करून आपली हकीगत तिने त्यांना सांगितली. मतंगऋषींनी तिजवर कृपा करून तिला सांगितले की, तू काळजी करू नकोस. तुझे कल्याण होवो. तुला मी एक युक्ति सांगतो. येथून थोड्या अंतरावर स्वामी तीर्थापासून एक कोस अंतरावर आकाशगंगा नावाचे तीर्थ आहे. तेथे जाऊन तू बारा वर्षे भगवंताची तपश्चर्या कर. म्हणजे तुला पुत्र होईल.

हे ऐकून अंजनी ऋषीच्या आज्ञेप्रमाणे तेथे जाऊन दीर्घ काल फार उग्र असे तप करू लागली. तिने सर्व काही सोडून दिले. तपाने तिचे शरीर लाकडासारखे झाले. अशी बारा वर्षे पूर्ण झाली; तेव्हा एक आश्चर्य घडले. ती ओंजळ करून ध्यान करण्यात मग्न झाली असता प्रत्यक्ष वायुदेवतेने येऊन तिच्या हातात एक फळ टाकले. तो प्रसाद म्हणून अंजनिने भक्षण केला. ती त्यामुळे गर्भवती झाली. दहा महिने पूर्ण होताच तिला एक तेजस्वी व पराक्रमी पुत्र झाला तेच रामदुत हनुमंत. या पर्वतावर अंजनीमातेने तप करून भगवंताकडून प्रसाद मिळविला म्हणून याला अंजनाद्रि असे म्हणतात.

यानंतर द्वापार युगा त्याला शेषाचल असे नाव मिळाले आहे. शतानंदांनी ती हकीकत राजा जनकास सांगण्यास सुरुवात केली.

एकदा भगवान विष्णु लक्ष्मीसह एकांतात होते. द्वारपाल जय व विजय यांना सनकादिकांनी शाप दिल्यामुळे ते राक्षस योनीत जन्मास आहे होते. त्यावेळी द्वाररक्षणाच्या कामावर महाशेषाची योजना झाली होती. त्यावेळी वायुदेव भगवंताच्या दर्शनास आले असता श्रीशेषांनी त्याला अडविले. वायूने त्यास सांगितल, येथे भगवंताच्या राज्यात कोणासही अडथळा नसता तू का अडवतोस. शेषांनी आपला अधिकार सांगितला. आपण माझे ऐकले पाहिजे असे सांगितले. दोघांच पुष्कळ वादविवाद झाला. तो वादविवाद ऐकून श्रीमहालक्ष्मी बाहेर आली. तिने श्रीविष्णूंना दोघांचे भांडण सांगितले. भगवान बाहेर आले. दोघांनी त्यांना पाहून नमस्कार केला. शेषांनी आपली योग्यता व वायूची अयोग्यता सांगितली. त्यावेळी भगवान म्हणाले, उगाच कलह का! शेषा येथून उत्तरेकडे मेरुःपर्वताचा पुत्र जो एक पर्वत आहे त्याला तू वेढून घट्ट धरून राहा. त्यावेळी वायू त्याला उडविण्याचा प्रयत्न करील व मग श्रेष्ठ कोण हे ठरेल. दोघांनीही ही गोष्ट मान्य केली व स्पर्धेस सुरवात झाली. सर्व देवदानव मानव वगैरे सर्व पाहाण्यास आले. शेषाने आपल्या शरिराने तो पर्वत घट्ट धरला. तेव्हा भगवंतांनी वायूला तो उडविण्यास सांगितले असता त्यांनी केवळ आपल्या करांगुलीने त्या पर्वतास शेषांसह उडवून टाकले. तेथून तो फार लांबवर जाऊन पडला. सर्वांना फार आश्चर्य वाटले. सर्वांनी वायूची स्तुती केली. शेषाचा गर्व परिहार झाला. त्यांनी भगवंताची स्तुति केली. वायू देवतेची क्षमा मागितली. भगवंतांनी सर्वांना आशीर्वाद दिला. अभिमान कोणासही नसावा असे सांगितले. शेषांनी या पर्वताला वेढल्यामुळे या पर्वताला शेषाचल असे नाव पडले आहे.

श्रीलक्ष्मीवेंकटेशायनमः ॥ जयजयाजी जगदुद्धारा ॥ मत्स्यरूपा सर्वेश्वरा ॥ वधूनिया निगमचोरा ॥ सुखी केलासि भक्तजन ॥१॥

सागरमथनी मंद्राचळ ॥ भेदित चालिला रसातळ ॥ कूर्मरूप तू घननीळ ॥ धरिला अचल पृष्ठावरी ॥२॥

हिरण्याक्षदैत्यदुर्जन ॥ पृथ्वी नेत असता चोरुन ॥ तू वराहवेष भगवान्‍ ॥ धावलासि ते काळी ॥३॥

प्रल्हादासि गांजिले असुरे ॥ तू नृसिंह जाहलासी भयंकर ॥ स्तंभभेदोनी दानवेश्वर ॥ निर्दाळिले क्षणार्धे ॥४॥

शतमख करी दनुजेश ॥ तुवा धरुनी वामनवेष ॥ भूदानमिषे दैत्यास ॥ पाताळांतर गाडिला ॥५॥

तीनसप्तके धरित्री ॥ निःक्षत्री केली मातृकैवारी ॥ भार्गवरूपा मधुकैटभारी ॥ भक्तकैवारी तू साच ॥६॥

महा बलोन्मत्तरावण ॥ बंदी घातले त्रिदशगण ॥ तू श्रीरामरूपधरोन ॥ राक्षस मर्दिले सर्वही ॥७॥

कंसचाणूरकालयवन ॥ शिशुपाळवक्रदंत दुर्जन ॥ श्रीकृष्णावतारी मर्दोन ॥ मनमोहन विजयी तू ॥८॥

कलीयुगी लोक मतिहीन ॥ तुज न जाणती दुर्जन ॥ तू बौद्धरूपे जनार्दन ॥ कोणासी न बोलसी ॥९॥

म्लेंच्छ माजतील अपार ॥ त्यांसि मर्दावया उदित साचार ॥ कल्किरूप श्रीकरधर ॥ तुरंगारूढ धावसी ॥१०॥

तोचि तू वेंकटाद्रीवरी ॥ उभा भक्तजनाचा साहकारी ॥ वाट पाहसी अहोरात्री ॥ निजदास येतील म्हणोनिया ॥११॥

पूर्वाध्यायी अनुसंधान ॥ वृषभासुरासि मर्दून ॥ वैकुंठासी रमारमण ॥ जाता जाहला जगदात्मा ॥१२॥

पुढील कथेचे वर्तमान ॥ परिसा येता श्रोतेजन ॥ शतानंद म्हणे जनकालागून ॥ ऐक राया सादर ॥१३॥

त्रेतायुगामाजी साचार ॥ केसरी नामा वानर ॥ त्याची स्त्री पतिव्रता थोर ॥ अंजनी नाम तियेचे ॥१४॥

पोटी नाही पुत्रसंतान ॥ या करिता चिंताक्रांतमन ॥ मग ती अंजनी परमउद्विग्न ॥ विचार करी निजमानसी ॥१५॥

पुत्रावांचोनी शून्यसदन ॥ सरोवर जैसे जीवनाविण ॥ की नासिकेवाचोनि वदन ॥ शोभा नयेचि सर्वथा ॥१६॥

की प्राणविण शरीर ॥ की फळेविण तरुवर ॥ तैसे पुत्राविण साचार ॥ वंश पवित्र न होय ॥१७॥

या करिता अंजनी ॥ परम चिंताक्रांत अंतःकरणी ॥ मग मतंगनामे महामुनी ॥ त्याच्या आश्रमा पातला ॥१८॥

जो ऋषियांमाजी मुकुटमणी ॥ जो तपस्वियांत अग्रगणी ॥ त्यापाशी येवोनि अंजनी ॥ साष्टांगनमन करितसे ॥१९॥

म्हणे महाराजा ऋषिवर्या ॥ तू तापसियांमाजी राजया ॥ मी शरण आले तुझ्या पाया ॥ करी छाया कृपेची ॥२०॥

पोटी नाही सत्पुत्र ॥ या लागी मी चिंतातुर व तू सद्‌गुरु माझा कृपासागर ॥ सांग निर्धार काय करू ॥२१॥

ऐसे ऐकता वचन ॥ मतंग बोले कृपाकरोन ॥ म्हणे कल्याण ऐकपुर्ण ॥ सांगतो तुज युक्तीते ॥२२॥

शुभ लोचने ऐकवचन ॥ पंपापासोनि पूर्वेस जाण ॥ दूर आहे पन्नास योजन ॥ नारसिंहाचा आश्रम पै ॥२३॥

त्याचे दक्षिणेसि निर्धारी ॥ नारायणगिरीचे उत्तरी ॥ स्वामितीर्थाहूनि कोशावरी ॥ वियद्गंगा वसतसे ॥२४॥

तू जाय आता झडकरी ॥ तेये स्नान करून निर्धारी ॥ श्रद्धायुक्त तपश्चर्या करी ॥ द्वादशवर्ष पर्यंत ॥२५॥

त्या पुण्ययोगे करून ॥ दिव्यपुत्र होईल तुजलागून ॥ ऐकोनि ऋषीचे वचन ॥ अंजनी तेथूनि निघाली ॥२६॥

तत्काळ पावली ते स्थान ॥ करूनि स्वामितीर्थी स्नान ॥ वंदिले वराहरूप भगवान्‌ ॥ अश्वत्थप्रदक्षिना करितसे ॥२७॥

तप आचरली खडतर ॥ आहार त्यागिला निर्धार ॥ काष्ठवत्‌ जाहले शरीर ॥ सर्वभोग वर्जिले ॥२८॥

परम शुचिर्भूत होऊन ॥ एकाग्रमने करी चिंतन ॥ ऐसे द्वादश वर्षे होतांचि जाण ॥ नवल एक वर्तले ॥२९॥

एके दिवशी अंजनी ॥ ध्यानकरी अंजलीपसरोनि ॥ तो साक्षात पवमान येऊनी ॥ प्रसाद दिधला तियेते ॥३०॥

पक्व फळ ते अवसरी ॥ दिधले अंजनीचे करी ॥ येरी नेत्र उघडोनि ते अवसरी ॥ पाहती जाहली ते काळी ॥३१॥

प्रसाद ऐसे जाणोन ॥ येरी अविलंबे करी भक्षण ॥ तो तत्काळ जाहली गर्भिण ॥ अंजनी देवी तेधवा ॥३२॥

दशमास भरतांचे वेल्हाळ ॥ पुत्र प्रसवली परमसबळ ॥ जैसे पूर्वेसि मित्रमंडळ ॥ निशाअंती उगवले ॥३३॥

परमतेजस्वी देदीप्यवंत ॥ वानरवेष बळ अद्भुत ॥ अवतरला हो हनुमंत ॥ श्रीरामदूत प्रतापी ॥३४॥

अंजनीसी पुत्र जाहला ॥ तै पासून या पर्वताला ॥ अंजनाचल विख्यात जाहला ॥ त्याचे नाम राजेंद्रा ॥३५॥

त्रेतायुगी अंजनाद्री ॥ नाम पावलायापरी ॥ आता शेषाचल द्वापारी ॥ काय कारण ऐकपा ॥३६॥

एकदा वैकुंठी भगवान्‌ ॥ एकांती लक्ष्मीसहितजाण ॥ केले असता शयन ॥ तो अपूर्व वर्तले ॥३७॥

जयविजय द्वारपाळ ॥ द्वारी नव्हते तये वेळे ॥ सनकादिकी त्यांशी श्रापिले ॥ दैत्ययोनीत जन्मले ते ॥३८॥

त्यावेळी द्वारी रक्षण ॥ भोगिनायक करी आपण ॥ ऐसे असता एकेदिन ॥ नवल अपुर्व वर्तले ॥३९॥

साक्षात प्राणेश आपण ॥ दर्शनालागी पातला जाण ॥ त्याशी नागेंद्र बोले वचन ॥ आत सर्वथा जाऊ नको ॥४०॥

स्पर्शून म्हणे तयासी ॥ काय कारण अवरोधावयासी ॥ अहो म्हणे तुजशी ॥ न सोडी मी सर्वथा ॥४१॥

मग क्रोधावला प्रकंपन ॥ म्हणे आत जाईन ॥ हरिद्वारी अवरोधन ॥ नाही कोणाशि आजिवरी ॥४२॥

जयविजयसनकादिकांशी ॥ अवरोधितागति जाहली कैशी ॥ तुज ठाऊक असता निश्चयेसी ॥ आडविसी तू किंनिमित्त ॥४३॥

यावरी तो काद्रवेनायक ॥ परम कोपारूढ जाहला देख ॥ वायूसि म्हणे तू मूर्ख ॥ सांगता हीन ऐकसी ॥४४॥

माझे प्रताप नेणोन ॥ भलतेंचि जल्पसी येऊन ॥ मी हरीचे प्रियपात्रगहन ॥ प्राणांहूनि आवडता ॥४५॥

माझ्यावरी सर्वेश्वर ॥ शयनकरी निरंतर ॥ कैलासपती शंकर ॥ भूषणरूपे वाहे मज ॥४६॥

म्या सर्षपप्राय धरिली अवनी ॥ माझा प्रताप जाणे चक्रपाणी ॥ मशका माते न गणोनी ॥ आत कैसा संचरशी ॥४७॥

प्राणेश बोले ते अवसरी ॥ स्वमुके स्वगुण वर्णन करी ॥ तो शतमूर्ख पुरुष निर्धारी ॥ तुज ऐसाचि जाणपा ॥४८॥

माझे तुझे पराक्रम ॥ जाणतसे मेघश्याम ॥ व्यर्थ वल्गना करिता अधम ॥ नाही दुसरा तुज ऐसा ॥४९॥

यावरी बोले अहिनायक ॥ मी हरीचा निकट सेवक ॥ मजवरी प्रीतिविशेष देख ॥ ऐशी नाही दुसरीकडे ॥५०॥

तुम्ही सर्व इतर भक्त ॥ हरीसी आवडता यथार्थ ॥ परी मजवरी जैशी हरीची प्रीत ॥ तैशी नाही इतरांकडे ॥५१॥

प्राणेश म्हणे बिडाळका ॥ अंतरगृही प्रवेश देखा ॥ बाहेर असतो करिनायक ॥ परी प्रीति अधिक कोणीकडे ॥५२॥

पर्यंकावरी चढे चरणसेवक ॥ परी पुत्राहूनि नव्हे अधिक ॥ तैसे श्रीहरिसी प्रिय देख ॥ मजहूनि न होसी तू ॥५३॥

तू जवळी अससी जरी ॥ अभिमाने भरलासि अंतरी ॥ अहंभाव असलियावरी ॥ त्यासि श्रीहरी नातळे ॥५४॥

तू सेवक म्हणविसी थोर ॥ परी मी श्रीहरीचा असे कुमर ॥ पुत्राहूनि सेवकावर ॥ प्रीति फार केवी होय ॥५५॥

उभयता ऐसे प्रकारे ॥ बोलती पररस्परे कठोर ॥ गजबज ऐकोनी बाहेर ॥ जगन्माता पातली ॥५६॥

उभयताचा कलह देखोन ॥ हरीसी सांगे वर्तमान ॥ शेषवायूंचे भांडण ॥ महाद्वारी मांडले ॥५७॥

कोण्या कारणास्तव भांडती ॥ आपण पहावे जगत्पति ॥ आपणावाचोनि अन्याप्रती ॥ न मानिती दोघेही ॥५८॥

ऐसे ऐकता नारायण ॥ तत्काळ आले उठोन ॥ उभयता हरीसी पाहोन ॥ साष्टांग नमन पै केले ॥५९॥

यावरी मधुकैटभारी ॥ शेषासि म्हणे ते अवसरी ॥ कासयाचा कलह तरी ॥ सांग निर्धारी मजलागी ॥६०॥

श्रीहरीप्रती धरणीधर ॥ सांगता जाहला सर्व समाचार ॥ मजसमान वायु पामर ॥ होईल कैसा जगदात्मया ॥६१॥

मी तुझे प्रीतिपात्र ॥ मज एवढा बळिया वीर ॥ पाताळ भू आणि स्वर ॥ लोकी दुसरा नसेचि ॥६२॥

ऐकता हासला जगन्मोहन ॥ म्हणे स्वमुखे स्वगुणवर्णन ॥ हे असे परमदूषण ॥ विद्वज्जन मानिती ॥६३॥

जो असेल बलवंत ॥ तो स्वमुखे न वर्णी पुरुषार्थ ॥ कर्तृत्व करोनि दावित ॥ जेणे त्रिभुवन धन्य म्हणे ॥६४॥

शेषासि म्हणे रमावर ॥ उत्तरेसि गिरिमेरूचा पुत्र ॥ तू स्वदेह रज्जूवेष्टूनि सत्वर ॥ दृढधरी अचळाते ॥६५॥

मग वायु स्वबळे करून ॥ उडवील पर्वता लागून ॥ कोणाचे बळ असेल गहन ॥ सहज परीक्षा होईल ॥६६॥

सर्वा देखता सहज ॥ तुम्ही करावे एवढे काज ॥ ऐसे बोलता वैकुंठराज ॥ अवश्य म्हणोनी ऊठिले ॥६७॥

हे कौतुक पाहावया लागून ॥ आकाशी दाटले सुरगण ॥ सावित्रीसहित कमळासन ॥ पहावयासी पातला ॥६८॥

इंदिरेसहित इंदिरावर ॥ अपर्णेसहित पंचवस्त्र ॥ शचीसहित पुरंदर ॥ येते जाहले साक्षेपे ॥६९॥

यक्षगण गंधर्व किन्नर ॥ चारण गुह्यक विद्याधर ॥ अष्टदिक्पाळ समग्र ॥ कौतुक पाहो पातले ॥७०॥

आले सकळऋषीश्वर ॥ यावरी तो पन्नगेश्वर ॥ मनी गर्व धरोनी फार ॥ पर्वतापाशी पातला ॥७१॥

विशाळ वपू पसरून ॥ नगाशी घातले वेष्टन ॥ सबळबळे करून ॥ पर्वत दृढ धरियेला ॥७२॥

जेणे पुष्पप्राय धरिली अवनी ॥ तो आपुले निजबळेकरूनी ॥ पर्वत धरिला आकर्षोनी ॥ न हाले ऐसा ते काळे ॥७३॥

यावरी तो तमाळनीळ ॥ वायूशी आज्ञापी तात्काळ ॥ प्रकट करी सामर्थ्य प्रबळ ॥ सर्वा देखता प्राणेशा ॥७४॥

ऐसे ऐकतांचि चंड मारुत ॥ कनिष्ठ अंगुळीने अकस्मात्‍ ॥ उडविल हो पर्वत ॥ शेषासमवेत तेधवा ॥७५॥

वातचक्रांत निर्धारी ॥ तृण जैसे उडे अंबरी ॥ की पक्षी उडे ज्यापरी ॥ तैसा गिरि उडविला ॥७६॥

दक्षिणेसि तो गिरिवर ॥ पडिला पाचकोटी योजनावर ॥ त्रिदशांसहित वृत्रहर ॥ आश्चर्य करिती तेकाळी ॥७७॥

पाहता प्राणेशाचे बळ ॥ अद्भुत म्हणतील लोक सकळ ॥ तृणप्राय उडविला अचळ ॥ हे अपूर्व आजि पाहिले ॥७८॥

जाहल एकचि जयजयकार ॥ देव वर्षती सुमनसंभार ॥ शेषाचा गर्व समग्र ॥ निरसोनी गेला तेकाळी ॥७९॥

तो मेरु आला धावोन ॥ करी प्रभंजनासी नमन ॥ म्हणे केवळ माझा नंदन ॥ सांभाळी त्यासि दयाळा ॥८०॥

असो यावरी कद्‌रुतनुज ॥ धरूनि हरीचे चरणांबुज ॥ म्हणे तू देवाधिदेव अधोक्षज ॥ तुझे चरित्र न कळेची ॥८१॥

माझे मनी गर्व फार ॥ की मी एकलाची बळसागर ॥ मजसमान दुसरा वीर ॥ ब्रह्मांडोदरी नसेचि ॥८२॥

ऐसा माझा गर्व होता ॥ तो आजि निरसला अनंता ॥ कमळपत्राक्षा दीननाथा ॥ करी आता कृपा मज ॥८३॥

तू देवाधिदेवा सनातन ॥ मायातीत शुद्धचैतन्य ॥ तुझा महिमा नेणोन ॥ मूर्ख मी गर्व केला वृथा ॥८४॥

मग वायूसि करूनि नमस्कार ॥ बोलता जाहला धरणीधर ॥ मी तुझा महिमा नेणोनि पामर ॥ वृथागर्व केला पै ॥८५॥

अपराध क्षमा करोन ॥ मजवरी कृपा करी पूर्ण ॥ यावरी तो प्रभंजन ॥ काय बोलता जाहला ॥८६॥

म्हणे ऐक आता भोगिपाळा ॥ श्रीहरीचा प्रताप आगळा ॥ भक्तांशी अभिमान केवळ ॥ येऊ नेदी सर्वथा ॥८७॥

सर्वांसी समान जैसा अर्क ॥ तैसाचि असे वैकुंठनायक ॥ एकाशि उणे एकाशि अधिक ॥ जगन्नायक नसेची ॥८८॥

दासांसी नसावा अभिमान ॥ यालागी केले विंदान ॥ तू निराभिमान होऊन ॥ भज चरण हरीचे ॥८९॥

असो शेषवेष्टित पर्वत ॥ यालागी शेषाचल नाम विख्यात ॥ शतानंद म्हणे जनकाते ॥ पूर्वकथा ऐसी असे ॥९०॥

नैमिषारण्यी सूत ॥ शौनकादिकांसी कथा वर्णित ॥ शेषाचल या पर्वताते ॥ याचिलागी म्हणती पै ॥९१॥

कलियुगी वेंकटेशगिरी ॥ नाम पावले निर्धारी ॥ ती कथा ऐक यावरी ॥ सादरचित्ते करोनिया ॥९२॥

सज्जन रंजना श्रीनिवासा ॥ चिद्धनानंदा आदिपुरुषा ॥ जगद्व्यापका शेषाद्रिवासा ॥ आशापाशरहित तू ॥९३॥

तुझे गुण वर्णावया श्रीपती ॥ सहस्त्रमुखाची न चले गती ॥ मी मानव पामर निश्चिती ॥ केवि वर्णू गुण तुझे ॥९४॥

मी मतिमंद किंकर ॥ केवि क्रमू महिमांबर ॥ परी आत्महितास्तव साचार ॥ तव गुणी लीन जाहलो ॥९५॥

तू सूत्रधारी सर्वेश्वर ॥ कर्ता करविता तूचि समग्र ॥ जैसे नाचविता सूत्र ॥ बाहुली नाचे तैसेची ॥९६॥

वाजविणार नसता बरवा ॥ कैसा वाजेल पोवा ॥ जगन्निवासा कमलाधवा ॥ तुझे चरित्र तू बोलवी ॥९७॥

क्षीराब्धिजा मानसमोहना ॥ भक्तवत्सला मायाविपिनदहना ॥ वीरवरदा मनमोहना ॥ मधूसूदना श्रीहरी ॥९८॥

इतिश्रीवेंकटेशविजयसुंदर ॥ संमतपुराणभविष्योत्तर ॥ श्रवणकरोतपंडितचतुर ॥ तृतीयाध्यायगोडहा ॥९९॥३॥

एकंदरओवीसंख्या ॥३०७॥