श्री वेंकटेश विजय

वेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.


अध्याय ४ था

पुढे सुतांनी शौनकादिक ऋषींना सांगण्यास प्रारंभ केला. तीच हकीकत शतानंद गौतम राजाजनकास सांगू लागले. शतानंद म्हणाले- राजा या कलियुगामध्ये त्या पर्वताला वेंकटगिरी हे नाव का पडले ती कथा आता तुला मी सांगतो. या पृथ्वीवर कालहस्ती या नावाचे एक सुंदर नगर आहे. तेथे वेदशास्त्रात पारंगत हरिभक्त आणि सदाचारसंपन्न, स्नानसंध्या पंचमहायज्ञ नित्य करणारा, दया, क्षमा, शांती अशा सर्व गुणांनी संपन्न सत्य भाषण करणारा पुरंदर नावाचा एक ब्राह्मण तेथे रहात होता. त्याला संतती नसल्याकारणाने तो अनेक प्रकारचे उपाय करीत असे. पुष्कळ नवससायास केल्यावर त्या ब्राह्मणाला एक मुलगा झाला. ब्राह्मणाला व सर्वांना परमेश्वर संतुष्ट झाला म्हणून आनंद झाला. ब्राह्मणाने बालकाचे जातकर्म केले. चंद्राच्या कलेप्रमाणे तो मुलगा वाढू लागला. पुरंदर ब्राह्मणाने त्या मुलाचे नाव माधव असे ठेवले. आठ वर्षे पूर्ण होताच त्यांची मुंज करून वेदशास्त्र इतर सर्व विद्या व पुराणे त्याला शिकविली. त्याचे विद्येतील प्राविण्य पाहून सर्व लोक आश्चर्यचकित होत असत. आपल्या मुलाची ही योग्यता पाहून आपल्या कुलात सत्पुत्र जन्माला आला म्हणून पुरंदराला अतिशय आनंद झाला. पुढे वयात आल्यावर पांडिव राजाची अत्यंत सुंदर आणि सर्व गुणसंपन्न अशा चंद्ररेखा नावाच्या मुलीबरोबर त्याचे लग्न केले. सुनेला घेऊन पुरंदर ब्राह्मण आपल्या गावी येऊन आनंदाने राहू लागला.

पुढे एकेदिवशी माधवाने अतिशय कामातुर होऊन आपल्या पत्‍नीशी दिवसा रममाण होण्याची इच्छा व्यक्त केली. चतुर पत्‍नीने अनेकवार ही गोष्ट अयोग्य आहे, हे शास्त्रविहित नाही, लोक हसतील आपण विद्वान आचारसंपन्न ब्राह्मण आहात असे अनेक प्रकारे सांगून पाहिले; परंतु आपली इच्छा पूर्ण न झाल्यास आपले प्राण जातील असे माधव म्हणताच चंद्ररेखा म्हणाली, नाथ आपण कुशसमिधा आणावयास वनात चलावे; मीही पाणी आणावयास आपणाबरोबर येते. असे म्हणताच ठीक आहे म्हणून तो ब्राह्मण उठला व ती दोघेही गंगेच्या काठी असलेल्या एका अरण्यात आली. तो तेथे येताच एक आश्चर्य घडले ! तेथे एका झाडाखाली त्याला एक सुंदर स्त्री दिसली. तिला पाहून तो आश्चर्यचकित झाला, व तो म्हणाला, ही जर आपणांस मिळेल तर आपण फार सुखी होऊ. असा विचार करून तो आपल्या पत्‍नीस म्हणाला, तू घरी जा. माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले. तुझे मन मी पाहिले. तू आता येथे राहू नकोस. पतीच्या आज्ञेप्रमाणे ती चंद्ररेखा घरी परत आली.

नंतर तो त्या स्त्रीपाशी जाऊन तिला म्हणाला. सुंदरी तू कोण, कोठे राहतेस वगैरे सांग तिनेही त्याला असाच प्रश्न केला. माधवाने आपली सर्व हकीकत सांगितली, व तुझ्या रूपावर मी मोहित झालो आहे. माझी इच्छा पूर्ण कर असे तो तिला म्हणाला. तेव्हा ती त्याला म्हणाली. महाराज मी जातीने चांडाळीण आहे. माझे नाव कुंथळा आपल्यासारख्यांना माझा स्पर्शही न व्हावा. असे असता आपण हे काय बोलत आहा.

ब्राह्मण म्हणाला- तुझ्या सौंदर्यापुढे हे सर्व फुकट आहे. जगात अशा पुष्कळ गोष्टी आहेत; व लोकही फळाकडे दृष्टि देऊनच वागत असतात. आता तू माझे मनोरथ पूर्ण कर. असे म्हणताच ती चांडाळ स्त्री म्हणते. आपण आपल्या मातापित्यांचा कुलधर्म कुलाचारांचा व प्रिय पत्‍नीचा त्याग करून ही अयोग्य गोष्ट करण्यास तयार झाला तर लोक आपल्याला हसतील. आपणास जातीबाहेर टाकतील. हे तिचे बोलणे ऐकूनही माधव आपला अविचार बदलण्यास तयार नाही असे पाहाताच ती स्त्री विचार करू लागली की, या ब्राह्मणास वेड लागले आहे. असे म्हणत ती आपल्या घरी जाण्यास उठली असता वीज तळपल्याचा भस झाला. ब्राह्मण झटदिशी पुढे गेला व त्याने पकडून तिच्याशी तो पूर्ण रममाण झाला. ती चांडाळीण नंतर त्यास म्हणाली. आता माझ्या घरी आपण चलावे, मद्यमांसाचे सेवन करीत मजबरोबर आपण राहावे. त्याप्रमाणे तिच्या घरी जाऊन तो ब्राह्मण राहू लागला. सर्व आचारविचार, ब्राह्मण्य वगैरे त्याचे नष्ट झाले. तो आपले सर्व कुलगोत विसरून गेला. केवढा हा स्त्रीसंगाचा परिणाम !

पुढे माधवाच्या आईबापांना ही हकीकत समजली. पत्‍नीसह सर्वांना फार दुःख झाले. पूर्व कर्मास दोष देऊन सर्व लोक व्यवहार करीत राहिले. बारा वर्षे याप्रमाणे तो ब्राह्मण अनाचार करीत पिशाचाप्रमाणे राहिला.

नंतर अकस्मात ती चांडाळीणच मरण पावली. माधवास फार दुःख झाले. आता त्याला आपल्या सर्व गोष्टींची आठवण झाली. आपण कोण होतो, काय झाले याचा विचार करीत तो फार उदासीन झाला. प्रिय पत्‍नी, आईबाप यांचा मी त्याग केला ही माझ्याकडून फार मोठी चूक घडली; पण आता उपाय काय? आता आपण देशान्तर करावे. आपणास महानरक यातना भोगाव्या लागणार. यातून कोणीही सोडविणार नाही. कोणास शरण जावे. कोण आपला उद्धार करील असा विचार तो रात्रंदिवस करू लागला. याप्रकारे अरण्यात हिंडत असता यात्रेस जाणारे लोक माधवास भेटले. त्यांना माधवाने विचारले असता शेषाद्रीच्या यात्रेस जात आहोत असे त्यांनी सांगताच माधव त्यांचेबरोबर जाऊ लागला. माधवाने आपली घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगताच ते त्यास धीर देऊन म्हणाले तू त्या पर्वताचे दर्शन घे. तू सर्व पातकापासून मुक्त होशील.

हे ऐकताच त्यांचेबरोबर तो ब्राह्मण जाऊ लागला. त्या यात्रेकरू लोकांनी भोजन करून बाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीवरील अन्न खात तो आपला उदरनिर्वाह करीत असे. त्यांची सेवा तो करू लागला.

असा जात असता पुष्कळ राजेमहाराजे, साधुसंत मंडळी तेथे जमा झाली होती. ते सुंदर स्वामीतीर्थ पाहून यालाही समाधान वाटले. तेथे क्षौरश्राद्धादि विधि इतरांनी केल्याप्रमाणे माधवाने ही केले. पुढे ती मंडळी पर्वत चढू लागली. त्यांचेबरोबर हाही जाऊ लागला असता पर्वतस्पर्शाने याचे पातक नष्ट होऊ लागले. तेथे त्यास एकदा ओकारी झाली, त्याबरोबर त्याचे सर्व पातक नाहीसे झाले. ब्राह्मण पवित्र व तेजस्वी झाला. सर्व लोकांनाही फार आश्चर्य वाटले. पर्वताच्या दर्शनास आलेल्या ब्रह्मदेवाने माधवास म्हटले, माधवा तू आता सर्व पातकांतून मुक्त झाला आहेस. स्वामी तीर्थापाशी स्नान कर. वराहाचे दर्शन घे व तेथेच देहसमर्पण कर. पुढील जन्मी तू आकाशराजा म्हणून जन्म घेशील व तुझ्या पोटी लक्ष्मीमाता जन्म घेईल. भगवान तिला वरतील व ते तुझे जामात होतील. असा पर्वतदर्शनाचा महिमा सांगून ब्रह्मदेव गुप्त झाले. वें म्हणजे महादोष. ते केवळ स्पर्शाने नाहीसे झाले म्हणून या पर्वताला कलियुगात वेंकटगिरी असे नाव पडले आहे.

श्रीसज्जनरंजनायनमः ॥ मनमोहन मेघश्यामा ॥ मुनिजनह्रदया मंगलधामा ॥ चराचरफळांकितद्रुमा ॥ पूर्णकामा सर्वेशा ॥१॥

करुणासागरा लक्ष्मीरमणा ॥ कामजनका कल्मषमोचना ॥ कैटभारे मुरमर्दना ॥ कमलावर श्रीहरी ॥२॥

मागील अध्यायी गतकथार्थ ॥ वायूने उडविला पर्वत ॥ शेषाद्रि ऐसे नाम प्राप्त ॥ तैपासूनि जाहले ॥३॥

सूत म्हणे शौनकादिकांप्रति ॥ पुढे ऐकाहो एक चित्ती ॥ कलियुगी त्या नगोत्तमाप्रति ॥ वेंकटगिरी नाम जाहले ॥४॥

तेचि कथा परमपवित्र ॥ ऐका आता सादर ॥ कालहस्ती नाम नगर ॥ पृथ्वीवरी विख्यात पै ॥५॥

तेथील रहिवासी द्विजवर ॥ नाम तयाचे पुरंदर ॥ वेदशास्त्रिनिपुण पवित्र ॥ हरीभक्त सत्वागळा ॥६॥

नित्यनैमित्तिक कर्म उत्तम ॥ स्नानसंध्यादिसत्कर्म ॥ पंचमहायज्ञ नित्यनेम ॥ यथासांग करीतसे ॥७॥

सत्यवचनी क्रियावंत ॥ दया, क्षमा ह्रदयी नांदत ॥ ऐसा विप्र सर्वगुणी युक्त ॥ तया नगरात वसतसे ॥८॥

परी पोटी नाही संतती ॥ अहोरात्र हेचि त्याचे चित्ती ॥ यत्‍न करीत नाना रीती ॥ पुत्रप्राप्ती कारणे ॥९॥

असो नवस करिता बहुत ॥ एक पुत्र जाहला अकस्मात ॥ विप्र होउनी आनंद भरित ॥ म्हणे नारायण तुष्टला ॥१०॥

परमहर्षे द्विजसत्तम ॥ करी बाळाकाचे जातकर्म ॥ चंद्रवद्धि होत उत्तम ॥ तैसे वाढे बाळक ॥११॥

दिवसंदिवस थोर जाहले ॥ माधव ऐसे नाम ठेविले ॥ आठा वर्षी व्रतबंधन केले ॥ परमानंदे ते काळी ॥१२॥

करविले वेदशास्त्रपठण ॥ करतळामळ अवघे पुराण ॥ ज्याची विद्या पाहोन ॥ जन होती तटस्थ ॥१३॥

पुत्र पाहोनि विद्यावंत ॥ पुरंदर मनी आनंदभरित ॥ म्हणे मी भाग्याचा बहुत ॥ सुपुत्रकुळी उपजला ॥१४॥

मग पांडीव राजाविख्यात ॥ त्याची कन्यासुंदर अत्यंत ॥ चंद्ररेखा नामे गुणभरित ॥ ती दिधली माधवाते ॥१५॥

परमसुंदर चातुर्यखाणी ॥ रूपासि रंभा उर्वशी उणी ॥ जिचे स्वरूप पाहोनी ॥ मीनकेतन तटस्थ ॥१६॥

विशाळभाळ आकर्ण नयन ॥ शोभे सोगयाचे अंजन ॥ सरळनासिका विराजमान ॥हंसगमनी हरिमध्या ॥१७॥

चंद्रवदना अहिवेणी ॥ अलंकारासि शोभातनू आणि ॥ दंतझळकता मेदिनी ॥ वरी पडे प्रकाश ॥१८॥

ऐसी स्वरूपे सुंदर ॥ राजकन्या ती मनोहर ॥ माधवासि देउनी साचार ॥ लग्न केले यथाविधि ॥१९॥

पुत्रसुनेसहित ॥ पुरंदर आला स्वनगरात ॥ आनंदरूपे वर्तत ॥ ऐका राया सादर ॥२०॥

एके दिवसी माधव विप्र ॥ दिवसा होउनी कामातुर ॥ कांते प्रती साचार ॥ काय बोलता जाहला ॥२१॥

प्राणवल्लभे ऐक वचन ॥ मनी भरला पंचबाण ॥ काहीच न सुचे मजलागून ॥ अंगसंग देई वेगी ॥२२॥

ऐकोनि पतीचे वचन ॥ चंद्ररेखा बोले हसून ॥ तुह्मी शास्त्रज्ञ ब्राह्मण ॥ सर्वनिगमार्थ ठाऊका ॥२३॥

घरी आहेती सासूश्वशुर ॥ लोक हिंडती आत बाहेर ॥ दिवसा ऐसा प्रकार ॥ घडे कैसा प्राणेश्वरा ॥२४॥

आपुला प्रपंच करिता आपण ॥ लोकापवाद सांभाळावा पूर्ण ॥ आपुलेच शरीर म्हणोन ॥ नग्न फिरता न येकी ॥२५॥

इष्टमित्र आप्तजन ॥ ऐकता हासतील अवघेजण ॥ लोकी प्रतिष्ठेशि न्यून ॥ ऐसे कर्म करू नये ॥२६॥

याकरिता वल्लभा अवधारी ॥ काम जिरवावा अंतरी ॥ निशा प्राप्त जाहलिया वरी ॥ मनोरथ पूर्ण करावे ॥२७॥

ऐसे बोलता सती ॥ माधव बोले तियेप्रती ॥ वेदशास्त्राची पद्धती ॥ कायकारण तुजलागी ॥२८॥

माझे वचन तुज प्रमाण ॥ कामे जाताति माझे प्राण ॥ सर्व संशय टाकोन ॥ अंगसंग देई मज ॥२९॥

काम खवळला मानसी ॥ नाठवेचि दिवसनिशी ॥ देखोनि तव वदन शशी ॥ मम मानसचकोर वेधले ॥३०॥

टाकोनी सर्वही लाज ॥ प्रिये आलिंगी आता मज ॥ तेणे माझे सर्वकाज ॥ पूर्ण होती गुणसरिते ॥३१॥

तू न करिता अनुमान ॥ वेगी येई झडकरोन ॥ नाही तरी जाताति माझे प्राण ॥ प्राणप्रिये जाण पा ॥३२॥

अनंग भरिला अंतरी ॥ भयलज्जा त्यागिले दुराचारी ॥ कामापुढे कळाकुसरी ॥ लोपोनि जाती सर्वही ॥३३॥

कामचि बंधासि कारण ॥ कामे बुडविले सर्वसाधन ॥ मोक्षद्वारासि अर्गळा पूर्ण ॥ नरकासि कारण कामची ॥३४॥

कामासंगे थोरथोर ॥ बुडाले सज्ञानी चतुर ॥ क्षयरोगी केला चंद्र ॥ किरणलोप भास्कराचा ॥३५॥

कामे भंगला पाकशासन ॥ शंकराचे जाहले लिंग पतन ॥ विधातियाचे शिरजाण ॥ कामानिमित्त छेदिले ॥३६॥

मरण पावले पंडु दशरथ ॥ कौरवांचा झाला निःपात ॥ कीचकाचा प्राणांत ॥ द्रौपदी निमित्त जाहला ॥३७॥

रावणाचा सकुळ झाला नाश ॥ मरण आले सुंदोपसुंदास ॥ विश्वामित्राचे तपविशेष ॥ भंग पावले कामसंगे ॥३८॥

असो काम ऐसा अपवित्र ॥ तेणे ग्रासिला माधवविप्र ॥ कांतेसि म्हणे वल्लभे सत्वर ॥ संग देई एकदा ॥३९॥

घूर्णित झाले लोचन ॥ विसरला देहगेहअभिमान ॥ मग चंद्रलेखा विचार करून ॥ काय बोलती जाहली ॥४०॥

म्हणे प्राणेश्वरा गोष्टी ऐका ॥ मी आणावया जाते उदका ॥ तुम्ही कुश आणावयासी देखा ॥ वनाप्रती चलावे ॥४१॥

ऐसे ऐकतांचि वचन ॥ तात्काळ उठिला तो ब्राह्मण ॥ गंगातीरी उपवन ॥ तया स्थानासी पातला ॥४२॥

घट घेऊनिया सुंदरी ॥ गेली गंगेचिया तीरी ॥ पतीसमीप येता झडकरी ॥ तो अपूर्व वर्तले ॥४३॥

तव तया उपवनात ॥ एक वृक्षाखाली निश्चित ॥ तरुणी स्त्री सुंदर बहुत ॥ अकस्मात देखिली ॥४४॥

स्वरूप पाहिले परमसुंदर ॥ वदन विराजे जैसा द्विजवर ॥ विशाळभाळ सुकुमार ॥ पद्मनेत्र विराजती ॥४५॥

सरळ नासिका आकर्णलोचन ॥ विलसतसे नेत्रांजन ॥ गौरवर्ण सुहास्यवदन ॥ धनुष्याकृति भृकुटिया ॥४६॥

कनककलश जैसेसुंदर ॥ तैसे दिसती युग्मपयोधर ॥ तटतटीत कंचुकी सुंदर ॥ मनोहर गृह मदनाचे ॥४७॥

हरिमध्या हंसगमनी ॥ शशिवदना भुजंगवेणी ॥ बोलता दशन झळकती वदनी ॥ आकर्ण नयन शोभती ॥४८॥

द्विजराजमुखी सुहास्यवदन ॥ मृगराजकटी विराजमान ॥ करिणिराजगमनागमन ॥ पाहता मनविस्मित ॥४९॥

अत्यंत सुंदररूपागळे ॥ देखता कामाची मुरकुंडी वळे ॥ पाहता विप्राचे उभय डोळे ॥ वेडे जाहले ते काळी ॥५०॥

ऐसी पाहिली सुंदरी ॥ विप्र मानसी विचार करी ॥ ही प्राप्त होईल मजजरी ॥ सुखास पार नाहीच ॥५१॥

मग आपले कांतेलागून ॥ विप्र बोले तेव्हा वचन ॥ म्हणे प्रिये जाय त्वरोन ॥ मनोरथ पूर्ण झाले ॥५२॥

तुझे अंतर पहावया कारण ॥ मागीतले मी भोगदान ॥ आता जाय तू येथून ॥ प्राणवल्लभे सत्वर ॥५३॥

पतीची आज्ञा वंदून ॥ चंद्रलेखा पावली स्वस्थान ॥ मग तो माधव ब्राह्मण ॥ तिये जवळी पातला ॥५४॥

म्हणे कल्याणवंते तू कोण ॥ काय तुझे नाम खूण ॥ देशग्राम मजलागून सांग आता सत्वर ॥५५॥

ती म्हणे तुम्ही कोण ॥ मज पुसावया काय कारण ॥ यावरी तो विप्र म्हणे ॥ नाम माधव माझे असे ॥५६॥

मी यातीचा ब्राह्मण ॥ मन वेधले तव रूप पाहोन ॥ तुझा मुखेंद्रु देखोन ॥ कामसिंधु उचंबळे ॥५७॥

देखता तव मुखनिशाकर ॥ माझे नयन झाले चकोर ॥ तव वचन गर्जता अंबुधर ॥ मम मानस मयूर नृत्यकरी ॥५८॥

कुरंगनेत्रे कृपाकरून ॥ शांतवी मनींचा मीनकेतन ॥ तू सांगसी ते ऐकेन ॥ तुझे अधीन जाहलो ॥५९॥

यावरी बोलेती अबळा ॥ नाम माझे असे कुंथळा ॥ चांडाळजातीची अमंगळा ॥ माझा विटाळ न व्हावा ॥६०॥

तुम्ही उंचवर्ण ब्राह्मण ॥ आणि वेदशास्त्रपरायण ॥ करतळामल अवघे पुराण ॥ परमपवित्र देह तुमचा ॥६१॥

आमुचे शब्द कानी ऐकता ॥ सचैल स्नान करावे तत्वता ॥ तो तुम्ही मदनयुक्त बोलता ॥ हेचि आश्चर्य वाटतसे ॥६२॥

विप्र म्हणे पद्मनयने ॥ मम ह्रदयानंदवर्धने ॥ तुझ्या स्वरूपासी उणे ॥ रंभा मेनका वाटती ॥६३॥

तू झालीस चांडाळिण ॥ तथापि दोष नाही जाण ॥ जैसा क्षारसिंधूत चवदारत्‍न ॥ निघता देवी ग्रहण केले ॥६४॥

रत्‍नमुख्य जाहले देवांसी ॥ काय कारण त्या सागरासी ॥ तैसी तू सौंदर्यरत्‍नाशी ॥ काय जातीसी कारण ॥६५॥

द्राक्षवेलीसी घालिति खत ॥ त्यातच त्याची वृद्धि होत ॥ परी फळे येती मधुर बहुत ॥ सेविती समस्त विद्वज्जन ॥६६॥

तैसि तू आहेसि निधान ॥ काय मुळाशि कारण ॥ आता अविलंबे करून ॥ मनोरथ पुरवी माझे पै ॥६७॥

यावरी कुंथळा बोलत ॥ हे वार्ता प्रकटता लोकांत ॥ होईल तुझा अपमान बहुत ॥ आप्तवर्गा माझारी ॥६८॥

हासतील जन समस्त ॥ विप्र जाती अपूर्वअत्यंत ॥ महत्पुण्ये प्राप्त होत ॥ हा का अनर्थ आठवला ॥६९॥

धर्मपत्‍नीचा त्याग करून ॥ मातापितयांसी घरी सोडून ॥ मी आहे चांडाळिण ॥ मजसी संग इच्छिशी ॥७०॥

माधव बोले नेमवचन ॥ जाईल तरी जावो प्राण ॥ परी मी न सोडी तुजलागून ॥ खंजनाक्षी सर्वथा ॥७१॥

नाही विप्रपणाचे काज ॥ लोक सर्व हासोत मज ॥ मायबाप आणि भाज ॥ नलगे कोणीच मज आता ॥७२॥

कुंथळा ऐकता हासतसे ॥ म्हणे या विप्रासि लागले पिसे ॥ यासि आता करावे कैसे ॥ विचारी मानसी कामिनी ती ॥७३॥

हळूच उठोनी तत्वता ॥ कुंथळा सदनासि जाऊ पाहता ॥ तळपे जैसी विद्युल्लता ॥ देखिली जाता ब्राह्मणे ॥७४॥

धावोनी धरिली सत्वर ॥ रगडिले तिचे युग्म पयोधर ॥ आरक्त तिचे बिंबाधर ॥ चुंबन देवोनि दंशिले ॥७५॥

कुंजांत नेली झडकरी ॥ वाम हस्ती कवळिली सुंदरी ॥ सव्यहहस्ते फेडिली निरी ॥ येरी करी हाहाकार ॥७६॥

लाज सोडोनी झडकरी ॥ तिज सवे सुरतक्रीडा करी ॥ आपपर काही अंतरी ॥ नाठवे चित्ती तयासी ॥७७॥

असो त्या माधवविप्रासी ॥ सुरत घडला चांडाळाशी ॥ यावरी कुंथळा म्हणे त्याशी ॥ चाल मंदिरासी माझिया ॥७८॥

गेले तुझे विप्रपण ॥ राही आता अंत्यज होऊन ॥ मद्यमांसादि भक्षण ॥ करी सत्वर मजसंगे ॥७९॥

अवश्य म्हणोनी झडकरी ॥ माधव गेला दुराचारी ॥ मद्यमांसरत अहोरात्री ॥ मारकर्दमी लोळतसे ॥८०॥

विसरला जपतपानुष्ठान ॥ नाठवे वेदशास्त्र अध्ययन ॥ शौच सत्कर्म देवतार्चन ॥ नावडेची तयाते ॥८१॥

नावडे त्यासि मातापिता ॥ विसरला धर्मपत्‍नीशि तत्वता ॥ आसक्त कुंथळेसी सुरता ॥ लागी निमग्न सर्वदा ॥८२॥

पहा कर्म कैसे बळवंत ॥ आपण विप्रशुचिर्भूत ॥ वेदशास्त्री पारंगत ॥ विसरोनि उन्मत्त जाहला ॥८३॥

स्त्रीसंगे केवढा अनर्थ ॥ स्त्रीसंगे होतो आत्मघात ॥ जरी ज्ञानी असेल बहुत ॥ होईल मोहित स्त्रीसंगे ॥८४॥

स्त्री केवळ अनर्थाचे मूळ ॥ अनाचारी परम अमंगळ ॥ असत्याचे भाजन केवळ ॥ किंवा कल्लोळ दुःखाचा ॥८५॥

की हे कामाची दरी ॥ की हे मत्सरव्याघ्राची जिव्हा खरी ॥ की क्रोधसर्पाची वैखरी ॥ विषदंतचि प्रकटली ॥८६॥

स्त्रीरूपाची ही दिवटी ॥ भुलवूनी लावी नरकाच्या वाटी ॥ महाज्ञानियासी उठाउठी ॥ भुलवी शेवटी कामिनी हे ॥८७॥

स्त्री ही असत्याचे घर ॥ नाही पापपुण्याचा विचार ॥ सकळमूर्खत्व मिळोनि साचार ॥ कामिनीरूप आकारली ॥८८॥

असो हा आता अनुवाद ॥ जरी कृपा करील चिद्धनानंद ॥ भक्तवत्सल गोविंद ॥ आनंदकंद जगद्‌गुरू ॥८९॥

स्त्री पुरुष नपुंसक खूण ॥ नाहीच ज्यासी मुळींहून ॥ त्याची कृपा जाहल्यावीण ॥ भवबंधन सुटेना ॥९०॥

असो तो माधव निश्चिती ॥ रतला त्या कुंथळेप्रती ॥ वर्ष पळा ऐसे वाटती ॥ तिच्या संगे विप्रासी ॥९१॥

मातापित्यांसी कळला वृत्तांत ॥ चंद्रलेखा शोक करी बहुत ॥ पतिवियोग घडला सत्य ॥ जाहला अनर्थ सर्वस्वे ॥९२॥

एकमेकांचे गळा पडोन ॥ दुःख करिती तिघेजण ॥ त्यांचे दुःख पाहता गहन ॥ न वर्णवेची सर्वथा ॥९३॥

वेदशास्त्रसंपन्न ॥ तेवढाच पुत्र तयालागून ॥ पूर्वकर्माचे विंदान ॥ न सुटे जाण काळत्रयी ॥९४॥

असो पुरंदर विप्र ॥ दीनरूप जाहला साचार ॥ प्रारब्धरेखा विचित्र ॥ उपाय काही चालेना ॥९५॥

येरीकडे माधवप्रिय ॥ कुंथळेसि रतला अहोरात्र ॥ नाठवेचि दुसरा विचार ॥ पिशाचवत जाहला ॥९६॥

द्वादश वर्षपर्यंत ॥ या प्रकारे दिवस लोटत ॥ तो दैवयोगे अकस्मात ॥ कुंथळा मरण पावली ॥९७॥

माधव शोक करी फार ॥ गडबडा लोळे भूमीवर ॥ मृत्तिका घेऊनि सत्वर ॥ मुखामाजी घालितसे ॥९८॥

म्हणे कुंथळे गुणभरिते ॥ हे कुंथळे सद्‌गुणसरिते ॥ हे कुंथळे स्वरूपवंते ॥ गेलीस टाकोनी मजलागी ॥९९॥

आता तुज ऐसी सुंदरी ॥ न मिळेचि कदापि दुसरी ॥ अहा प्राणप्रिये ये अवसरी ॥ कैसे परी करू आता ॥१००॥

तुजसाठी त्यागिले जनकजननी ॥ सोडोनि दिधली धर्मपत्‍नी ॥ जातिअभिमान सांडोनी ॥ तुझे ठायी मीनलो ॥१॥

तूही गेलीस सोडून ॥ तुजविणे मी परदेशी दीन ॥ आता मज आहे कोण ॥ काय करू यावरी ॥२॥

अहा प्रिये तुजवीण ॥ सदन वाटे केवळ अरण्य ॥ गोड न लगे अन्नपान ॥ तळमळी ब्राह्मण तेकाळी ॥३॥

इकडे मायबाप त्यागिले सत्य ॥ तिकडे कुंथळा पावली मृत्य ॥ उभयभ्रष्ट होऊनी निश्चित ॥ दीनवदन जाहला ॥४॥

मग विचार करी माधव विप्र ॥ म्हणे न मिळे आता संसार ॥ विरक्त होऊनि देशांतर ॥ हिंडावया जाऊ आता ॥५॥

मनी जाहला पश्चात्ताप ॥ म्हणे मज घडले महापाप ॥ मी स्वधर्म सोडोनी पापरूप ॥ कर्म केले भलतेंची ॥६॥

द्विजयोनीत जन्मोन ॥ मजग्रंथ त्रयी होते ज्ञान ॥ मी विचार न करिता पूर्ण ॥ घोर कर्मासि प्रवर्तलो ॥७॥

उभयपक्षी जाहली हानी ॥ आता मज न शिवती कोणी ॥ अंती यमपुरिची जाचणी ॥ होईल पुढे मजलागी ॥८॥

असिपत्रादि नरक दारुण ॥ भोगणे न सुटे मजलागून ॥ आता ऐसिया दुःखापासून ॥ सोडवी कोण निर्धारी ॥९॥

मी कोणासि जाऊ शरण ॥ काय करू आता साधन ॥ परम तळमळी ब्राह्मण ॥ दिशा शून्य वाटती ॥११०॥

ऐसे विप्र निज मनात ॥ रात्रंदिवस आहळत ॥ हिंडत असता अरण्यात ॥ तो एक अपुर्व वर्तले ॥११॥

दूरदेशस्थ राजे बहुत ॥ जात होते यात्रानिमित्त ॥ दैवयोगे माधवाते ॥ अकस्मात भेटले ॥१२॥

माधव पुसे त्यांते ॥ कोठे जाता येणे पंथे ॥ ते म्हणती जातो तीर्थाते ॥ शेषाद्रिसी पहावया ॥१३॥

ऐकोनि तयांचे वचन ॥ विप्र जाहला आनंदघन ॥ म्हणे यांची संगती धरोन ॥ तीर्थयात्रा करावी ॥१४॥

ऐसा करोनी विचार ॥ त्यासंगे चालिला सत्वर ॥ आपण कर्म केले अपवित्र ॥ कथिले त्यांसी सर्वही ॥१५॥

ते म्हणती शेषाचळ उत्तम ॥ दर्शने पाविजे सर्व काम ॥ अनंतजनींचे पाप दुर्गम ॥ हरती जाण माधवा ॥१६॥

मग त्यांची संगती धरोन ॥ तीर्थासि चालिला ब्राह्मण ॥ नगोत्तमाचा महिमा पूर्ण ॥ श्रवण केला त्यांच्या मुखे ॥१७॥

ते ही भोजन करोनी समग्र ॥ बाहेर टाकिती उच्छिष्टपात्र ॥ त्यातील अन्न मेळवूनी सत्वर ॥ उदरनिर्वाह करीतसे ॥१८॥

नीचसेवा असेल जाण ॥ ती स्वये करी आपण ॥ असो त्यांचे संगतीकरून ॥ जाता झाला ते काळी ॥१९॥

राजे जाऊनी अमूप ॥ उतरले स्वामितीर्था समीप ॥ ते स्थान पाहता तेजोरूप ॥ मनोरम्य होतसे ॥१२०॥

सर्वलोक तीर्थावरी ॥ वपन करोनी ते अवसरी ॥ यथाशास्त्रे निर्धारी ॥ पिंडदान करिती पै ॥२१॥

ते पाहोन माधवविप्र ॥ आपणही केले क्षौर ॥ मृन्मयपिंडदानसत्वर ॥ पितरप्रीत्यर्थ करीतसे ॥२२॥

महादोष त्याचे गहन ॥ त्यापुण्ये जाहले क्षीण ॥ तृप्त जाहले पितृगण ॥ ब्राह्मणाचे ते काळी ॥२३॥

मग त्या राजयांची हारी ॥ चढती तया पर्वतावरी ॥ माधवविप्र ये अवसरी ॥ तोही चालिला त्यांसवे ॥२४॥

पर्वतस्पर्शतांची तात्काळ ॥ क्षय जाहले पापसमूळ ॥ तेथेंचि वमिला तयेवेळ ॥ पापे सकळ निघाली ॥२५॥

ग्रासामाजी मक्षिका भक्षिती ॥ ते तात्काळचि जैसे वमिती ॥ तैसे विप्राने दोष निश्चिती ॥ वमिले तेथे समूळ ॥२६॥

दुर्गंधी सुटली अरण्यात ॥ असंख्यात पापाचे पर्वत ॥ बाहेर पडले समस्त ॥ निष्पाप त्वरित जाहला ॥२७॥

किंचित लागता कृशान ॥ भस्म होय जैसे तृण ॥ की सूर्योदय होताची जाण ॥ निरसे तम ज्यापरी ॥२८॥

किंवा काष्ठ अग्नीत पडत ॥ ते भस्म होय जैस क्षणात ॥ की सुटता वात अद्भुत ॥ मेघ जैसा वितळे ॥२९॥

दर्पणाचा जाता बुरसा ॥ मग स्वच्छ दिसतसे जैसा ॥ की लोह लागता परिसा ॥ चामीकर सहजची ॥१३०॥

ऐसा तो द्विजेंद्र ॥ निष्पाप जाहला निर्धार ॥ आश्चर्य करती समग्र ॥ केवढा पापी उद्धरला ॥३१॥

ब्रह्म इंद्र आणि रुद्रगण ॥ नित्य येती पर्वताकारण ॥ निष्पाप द्विजवरास पाहोन ॥ परमेष्ठी त्यासि बोलत ॥३२॥

म्हणे माधवा तू धन्य ॥ पर्वतदर्शने झालासि पावन ॥ अनंतजन्मींचे दोषगहन ॥ भस्म जाहले तुझे पै ॥३३॥

तू स्वामितीर्थी करोनी स्नान ॥ घेउनी वराहाचे दर्शन ॥ त्याचे समिप देहअर्पण ॥ करी येथे द्विजवरा ॥३४॥

पुढील जन्मींचा साचार ॥ आकाश नामे होसि नृपवर ॥ परम पुण्यशीळ निर्धार ॥ जन्म येईल तुजलागी ॥३५॥

तेथे तुझिये उदरी ॥ अवतरेल जगद्वंद्याची अंतुरी ॥ वैकुंठवासी श्रीहरी ॥ जामात होईल तुझा पै ॥३६॥

तुझ्या कुळाचा उद्धार ॥ पर्वतदर्शने झाला निर्धार ॥ ऐसे बोलोनि सत्वर ॥ विधि पावला स्वस्थाना ॥३७॥

वेंनाम दोषदारुण ॥ स्पर्शमात्रे नासले जाण ॥ यालागी वेंकटगिरी नामाभिधान ॥ व्हावया कारण जाहले ॥३८॥

जनकासि म्हणे मुनिवर ॥ ऐसी ही कथासुंदर ॥ राजा जाहला परम निर्भर ॥ श्रवण करिताचि साक्षेप ॥३९॥

शौनकादिकांसि सूत ॥ परमहर्षे कथा वर्णित ॥ हे ऐकतांची भक्तियुक्त ॥ हरते दुःख सर्वही ॥४०॥

चिद्धनानंदा राजीवनयना ॥ वीरवरदा सज्जन रंजना ॥ भक्तपाळका रमारमणा ॥ क्षीराब्धिवासा श्रीहरी ॥४१॥

इतिश्रीवेंकटेशविजय ग्रंथसुंदर ॥ संमत पुराण भविष्योत्तर ॥ श्रवण करोत पंडितचतुर ॥ चतुर्थाध्याय गोड हा ॥१४२॥ एकूण

ओवीसंख्या ॥४४९॥

प्रसंगः ॥४॥