श्री वेंकटेश विजय

वेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.


अध्याय ५ वा

मागील अध्यायात माधव नावाचा ब्राह्मण सर्व पापांपासून मुक्त झाला म्हणून या पर्वताला 'वेंकटाद्रि' असे नाव पडले. ह्यानंतर पुन्हा शौनक ऋषींनी सूताना प्रश्न केला असताना लक्ष्मीकांत माधव वैकुंठ सोडून का आले ही हकीकत आम्हाला सांगा. तेव्हा सूतांनी सांगण्यास आरंभ केला.

एकदा सर्व ऋषींनी मिळून गंगेच्या काठी मोठा यज्ञ सुरू केला. यज्ञमंडप सुंदर घातला होता. तेथे कश्यप अत्री, विश्वामित्र वसिष्ठ इत्यादि विद्वान ब्राह्मण आले होते. इतक्यात येथे नारदमुनी आले. सर्व ऋषींनी व ब्राह्मणाने नारदाची पूजा करुन त्यांना उत्तम आसनावर बसविले; त्यावेळी नारदांनी ऋषींना प्रश्न केला की, तुम्ही हा यज्ञ जो सुरू केला आहे त्याचे फळ काय? सर्व देवतात श्रेष्ठ देव कोण आहे? याचा उपयोग काय हे मला सांगा.

त्यावेळी ऋषी म्हणाले, याचे श्रेय कोणाला द्यावे हे अद्याप आम्हाला कळले नाही. तेव्हा नारद म्हणाले, तुम्हाला जर कळत नाही तर यज्ञाचा उपयोग काय? हे नारदाचे बोलणे ऐकून सर्व ऋषींनी भृगु ऋषीला बोलावून सांगितले की, तुम्ही स्वर्गात जाऊन सर्व देवात श्रेष्ठ कोण याचा विचार करून लवकर या.

भृगु ऋषी सत्यलोकाला गेले. तेथे ब्रह्मदेव होते. सर्व देव त्याची स्तुती करीत होते. भृगु ऋषी तेथे गेला असताना त्याला कोणी विचारले नाही. भृगु ऋषींना राग आला, याला अभिमान झाला आहे हा सर्वज्ञ नाही. त्यामुळे हा यज्ञभोक्ता नाही असे ठरवून भृगु ऋषी तेथून निघाले ते कैलासावर आले. तेथेही त्यांना कोणी विचारले नाही. उलट संमति न घेताना ऋषी येथे आला म्हणून शंकर त्रिशूळ घेऊन त्याच्यावर धावले, भृगु ऋषी म्हणाले हा तामसी आहे. त्यांनी त्याला शाप दिला, तुझी पूजा कोणी करणार नाही. तुझ्या लिंगाची पूजा करतील. तेथून तो वैकुंठाला गेला. तेथे लक्ष्मीसहित विष्णू बसले होते. तेथे त्याला कोणी विचारले नाही. म्हणून ऋषीला राग आला व त्याने विष्णूच्या छातीवर लाथ मारली. लगेच विष्णू उठले व ऋषीचे पाय धरून वंदन केले. मी अपराधी आहे. मला आपण शासन केले चांगले झाले. माझा देह कठीण, आपला पाय दुखवला असेल म्हणून विष्णूने त्याच्या पायाला तेल लावून पाणी घातले व पूजा केली. विष्णूचा हा आदर पाहून ऋषींना वाटले. दयासागर विष्णू ही सत्यगुणी देवता आहे. म्हणून त्याचि स्तुती केली. सर्व देवतात हा श्रेष्ठ आहे.

नंतर भृगु ऋषी यज्ञस्थानी आले. विष्णु श्रेष्ठ आहे असे त्यांनी सांगितले. ज्यावेळी भृगुनी विष्णूला लाथ मारली त्यावेळी विष्णूने ऋषींचे पूजन केले. हे पाहून लक्ष्मीने विष्णुला प्रश्न केला, देवा आपण सर्व देवात श्रेष्ठ आहात. भृगुने तुम्हाला लाथ मारली असता राग का नाही आला? त्यावेळी विष्णू म्हणाले देवी भृगु ऋषी तपस्वी ब्राह्मण आहे. ब्राह्मण हे माझे मुख्य दैवत आहे. तो माझा भक्त आहे. भक्त हे माझे आवडते आहेत. म्हणून मी त्याचा पाय भूषण म्हणून माझ्या वक्षःस्थलावर धारण करतो. हे ऐकून लक्ष्मीला राग आला. मला हे आवडत नाही. विष्णूस सोडून लक्ष्मी पृथ्वीवर येऊन कोल्हापूरास राहिली.

कोल्हापूर म्हणजे करवीर क्षेत्र. हे पंचगंगेच्या काठी आहे. पुण्यक्षेत्र म्हणून फार प्रसिद्ध आहे. लक्ष्मी आपणा सोडून गेली म्हणून त्यांना बरे वाटेना. त्यांनी सर्व पदार्थांचा त्याग केला. उदासीन होऊन वैकुंठाचा त्याग करून विष्णूही पृथ्वीवर आले. निरनिराळ्या ठिकाणी शोध करीत ते दक्षिण दिशेला आले. प्रवरानदीच्या उत्तरेला वैंकटगिरी या नावाचा शंभर योजन लांब आणि तीस मैल रुंद असा मेरू पर्वताचा मुलगा म्हणून जो प्रसिद्ध आहे अशा वेंकट पर्वतावर ते आले. त्याला भूवैकुंठ म्हणतात. त्यांना ते स्थान आवडले. अनेक प्रकारची अरण्ये, पक्षे, हिंस्त्र प्राणी, कस्तुरी मृग अनेक तीर्थे त्या ठिकाणी आहेत. त्या तीर्थाजवळ एक चिंचेचे झाड असून तेथे एक वारुळ होते. त्या वारुळात शिरून भगवान त्या ठिकाणी गुप्त रूपाने राहिले. तेथे ते दहा हजार वर्षे होते.

सर्व देवास चिंता पडली; आता देवास कोठे शोधावे? सर्व देवांनी ब्रह्मदेवाला विचारले, श्रीहरींना कोठे शोधावे. ब्रह्मदेवाने आपल्या मनामध्ये विचार केला आणि करवीर क्षेत्रात जाऊन लक्ष्मीला ही हकीकत सांगितली. तू सोडून गेल्यापासून श्रीहरी कोठे दिसेना. त्याचा शोध कोठे करावा व सर्व देवांना बरोबर घेऊन महादेवी लक्ष्मी श्रीविष्णूच्या शोधात निघाले.

सर्व देवास चिंता पडली; आता देवास कोठे शोधावे? सर्व देवांनी ब्रह्मदेवाला विचारले. श्रीहरींना कोठे शोधवे. ब्रह्मदेवाने आपल्या मनामध्ये विचार केला आणि करवीर क्षेत्रात जाऊन लक्ष्मीला ही हकीकत सांगितली. तू सोडून गेल्यापासून श्रीहरी कोठे दिसेना. त्याचा शोध कोठे करावा व सर्व देवांना बरोबर घेऊन महादेवी लक्ष्मी श्रीविष्णूच्या शोधात निघाले. सर्व ठिकाणी शोध केला पण कोठेही विष्णूचा पत्ता लागेना. त्यावेळी ब्रह्मदेवाने गायीचे रूप धारण केले. स्वतः शंकराने वासराचे रूप घेतले. गोपीचा वेष लक्ष्मीने घेतला. सर्वजण विष्णूचा शोध करण्याकरिता या पृथ्वीवर आले. शोध करता करता चोल राजाच्या राज्यात ते आले. तो राजा धार्मिक होता. ही गायवासरू त्या राज्यामध्ये हिंडत असताना त्या गायीला पाहून सर्व लोकांना आश्चर्य वाटले. असली सुंदर गाय येथे कशी आली व ही कोणाची काही समजेना. राजाला ही हकीकत समजली. त्यांनी ती गाय आणवली. त्यालाही आनंद झाला. राजाने गौळणीला विचारले. तिने सांगितले ही गाय विकावयास आणिली आहे. राजाने द्रव्य देऊन ती विकत घेतली व आपल्या गायीच्या कळपात असताना एकदा या वैंकट पर्वतावर गवळ्यांनी ती गाय चरावयास नेली. त्या गायीने गवत भरपूर खाल्ले व पाणी पिण्यास म्हणून स्वामीतीर्थावर गेली. तेथे चिंचेच्या झाडाखाली असलेल्या वारुळातून सुंदर सुवास येत असलेला गायीस आढळला. ब्रह्मदेवाने तो सुवास ओळखला. येथेच श्री विष्णू आहेत असे त्यांनी ओळखले. ब्रह्मदेवगायीने त्या वारूळावर दुधाचा अभिषेक केला याप्रमाणे रोज तेथे येऊन ती गाय आपल्या दुधाचा अभिषेक करीत असे. असे होत असताना एके दिवशी त्या गायीची धार काढण्यास सांगितले असताना थोडेहि दूध निघेना. ती त्या गवळ्यास बोलू लागली. गवळ्यास तिने मारविले. त्यांनी ठरविले की त्या गायीच्या दुधाचे काय होते ते पाहू.

एकदा तो गवळी सर्व गायींना पाणी पाजवून सावलीत बसला असताना ती गाय त्या वारूळावर जाऊन आपल्या दुधाचा अभिषेक करते आहे हे पाहून त्याला राग आला. हिच्यामुळे आपल्याला शिक्षा भोगावी लागली असे म्हणून हिला मारून टाकतो असे म्हणून तो हातात कुर्‍हाड घेऊन तो तिला मारण्यास धावला हे पाहून देवांना दया आली. भक्ताचे रक्षण करणे हे माझे ब्रीद आहे असे म्हणून देव वारूळाबाहेर आले. गवळ्याची कुर्‍हाड गायीच्या अंगावर पडणार इतक्यात विष्णूने त्या कुर्‍हाडीचा प्रहार आपल्या डोक्यावर घेतला. खूप रक्तस्त्राव झाला. हे पाहून तो गवळी मरण पावला. हे पाहून ती गाय राजाच्या दरबारी जाऊन जमिनीवर पडून लोळू लागली. राजास आश्चर्य वाटले. सर्व लोक पहावयास धावले. त्या गायीने अरण्याची वाट धरली. राजा म्हणाला हिच्याबरोबर जाऊन काय ते पहा गाय त्या वारूळाजवळ आली. तेथे येऊन ओरडू लागली. लोक येऊन पाहतात तो गवळी मरण पावला आहे. वारूळ फुटले आहे. चहुकडे रक्त उडाले आहे. हे पाहून नोकरांनी ती गोष्ट राजाला सांगितली. राजा तेथे पहाण्यास आला. त्यालाहि आश्चर्य वाटले.

इतक्यात विष्णू वारूळातून बाहेर आले. त्यांचे मस्तक फुटले होते. आणि म्हणाले, दुष्टा मी येथे एकटा वारूळात गुप्त होतो, तू माझे मस्तक फोडून मला दुःख दिले आहेस. मी तुला शाप देईन. तू पिशाच्च म्हणून या अरण्यात हिंडशील. तुला फार दुःख भोगावे लागेल. हा शाप ऐकून राजा घाबरला. त्यांनी भगवंताच्या चरणी मिठी मारून देवा मला व्यर्थ का शाप दिला? तुला दुःख कोणी दिले हे मला माहित नाही. माझी चूक काय आहे सांगा. आता याच्यातून मी मुक्त कसा होईन ते सांगा तेव्हा विष्णु म्हणाले, मी विचार न करता शाप दिला. तुझी कर्मगती विचित्र आहे. भोगल्याशिवाय सुटका नाही. कलीयुगाचा नाश झाल्यानंतर कृतयुगात तुझा उद्धार होईल. तोपर्यंत तू येथे पिशाच्च म्हणून रहा. आकाश नावाचा राजा चंद्रवंशात होईल. त्याची सुंदर कन्या मी वरीन. तो राजा आंदण म्हणून मला एक मुकुट देईल. आठव्या दिवशी शुक्रवारी मी तो मुकुट माझ्या मस्तकावर धारण करीन. तू त्यावेळी दर्शनास येत जा. त्यावेळी तुला सुख होईल.

विष्णूच्या शापाने राजा पिशाच्च होऊन, गुप्त होऊन वनांमध्ये राहिला. भगवान विष्णू वारूळात गुप्तरूपाने राहिले. त्यांनी गुरु बृहस्पतीचे चिंतन केले. तेव्हा ते त्याच्याकडे येऊन वंदन केले. विष्णू म्हणतात, गुरो माझ्या डोक्यात फार वेदना आहेत. याला उपयोग सांगा. गुरु म्हणाले, उंबराच्या चिकात कापसाची राख घालून ती जखमेत भरावी; म्हणजे जखम बरी होईल. गुरुनी औषध करून त्यांच्या डोक्यास बांधून त्यांची आज्ञा घेऊन ते गेले. काही दिवस गेल्यावर विष्णू औषधाचा शोध करण्याकरिता म्हणून अरण्यामध्ये हिंडत असताना एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. रस्त्यातून जात असताना वराहाचा अवतार धारण करणारे श्री विष्णू सगळ्या अरण्यातील प्राण्याबरोबर तेथे आले. श्री विष्णू समोर येताच समोरून राजा येत आहे हे पाहिल्याबरोबर ते गुप्त झाले. तेव्हा ते म्हणाले, मी तुला पाहिले आहे. तू गुप्त होऊ नकोस. पुढे ते एकमेकास भेटले. वराहरूपी नारायण त्याला म्हणाले, 'आपण वैकुंठ सोडून येथे का आलात आपल्या डोक्याला जखम कसली? या अरण्यात का येऊन राहिलात?'

यावर विष्णू म्हणाले, 'भृगु ऋषींनी लाथ मारली म्हणून लक्ष्मी रागावली व ती करवीर क्षेत्री येऊन राहिली. म्हणून मी ही या वनात येऊन राहिलो. येथील गवळ्याने माझे डोके फोडले. मी एकटाच येथे राहतो. मला रहावयास जागा नाही आणि सेवा करावयास कोणी नाही. मला रहावयास जागा द्या.' असे विष्णू म्हणताच वराहरूप विष्णूने त्याला रहावयास जागा दिली व बकुला नावाची दासी दिली. ती दासी त्यांची उत्तम प्रकारे सेवा करू लागली. ती बकुला कोण? तिने एवढे पुण्य केव्हा केले होते? यावर सूत सांगू लागले. कृष्णावतारास गोकुळात नंदाच्या घरी भगवान खेळत होते. मथुरेला भगवान गेल्यावर यशोदा शोक करू लागली. त्यावेळी विष्णूने सांगितले, 'कलियुगात मी प्रगट होईन व तुझे सर्व मनोरथ पूर्ण करीन.' तीच ही बकुला दासी म्हणजे यशोदा.

श्रीमंगलमूर्तये नमः ॥ समर्थाचे दर्शनासि जाता ॥ रिक्तहस्ते न जावे सर्वथा ॥ परि दुर्बळाशि उत्तम पदार्था ॥ नाही सामर्थ्य न्यावयासी ॥१॥

मग तो फळमूळघेऊन ॥ जाय दर्शनालागून ॥ तैसे हे प्राकृत बोल रसहीन ॥ संतांपुढे निवेदिले ॥२॥

परि संत अभेदसत्य ॥ त्यांसि नाही विषयस्वार्थ ॥ समर्थ दुर्बळ समान निश्चित ॥ भाविती ते ही सर्वदा ॥३॥

याकरिता हे रसहीनबोल ॥ संती कृपेने मान्य केले ॥ जैसे बाळकाचे बोबडे बोल ॥ जनकजननींशी आवडे ॥४॥

की द्वितीयेच्या चंद्राशी ॥ लोक वाहती जीर्ण दशी ॥ त्रिभुवनदीपक सूर्याशी ॥ एकारती करती जेवि ॥५॥

परी तो भक्तापाहोन ॥ ग्रहण करी प्रीतीकरून ॥ तैसे मजवरी कृपाकरून ॥ श्रोते सादर परिसिजे ॥६॥

गतकथाध्यायी सुंदर ॥ निष्पाप जाहला माधवद्विजवर ॥ श्रीवेंकटाद्रि नाम परिकर ॥ पर्वतालागी पडियेले ॥७॥

शौनकादिऋषि सुमती ॥ सूताप्रती प्रशन करिती ॥ तू चिदाकाशीचा रोहिणीपती ॥ करी तृप्ति श्रवणचकोरा ॥८॥

श्रीहरीचे कथामृत ॥ तव मुखे गोड वाटे बहुत ॥ ऐकावयासी आर्तभूत ॥ श्रवण आमुचे जाहले ॥९॥

श्रीवैकुंठगिरीचे वैभव ॥ ऐकोनि तृप्त जाहलो सर्व ॥ त्या पर्वतावरी रमाधव ॥ काय निमित्त पातले ॥१०॥

टाकोनिया वैकुंठ भुवन ॥ येथे वसावया काय कारण ॥ हे अवघे समूळ वर्तमान ॥ आम्हालादि सांगिजे ॥११॥

यावरी सूत ऋषींसी बोलत ॥ म्हणे ऐका आता प्रेमयुक्त ॥ शतानंद म्हणे जनकाते ॥ ऐक राया सावध ॥१२॥

एकदा सर्वऋषी मिळोन ॥ जान्हवीतीरी आरंभिला यज्ञ ॥ यज्ञमंडप शोभायमान ॥ परमविस्तीर्ण रचियेला ॥१३॥

कश्यपात्रिभरद्वाज ॥ विश्वामित्र गौअम तेजःपुंज ॥ जमदग्नि वसिष्ठादि द्विज ॥ अध्वरासि आरंभिले ॥१४॥

तव तया मंडपात ॥ जो का कमळोद्भवाचा सुत ॥ ब्रह्मवीणा घेवोनि त्वरित ॥ नारदमुनी पातला ॥१५॥

येता देखोनी नारदासी ॥ नमन करिती सर्वही ऋषी ॥ आसन देवोनी तयासी ॥ षोडशोपचारे पूजिले ॥१६॥

नारद म्हणे तये वेळा ॥ तुम्ही तो यज्ञ आरंभिला ॥ शेवटी या मखाचे फळ ॥ कोणालागी अर्पिता ॥१७॥

सर्वदेवांमाजी परम ॥ कोण दैवत आहे उत्तम ॥ अध्वराचा परिणाम ॥ कोण मजला सांगा पै ॥१८॥

ऋषी म्हणती ते वेळा ॥ श्रेय अर्पावे कोणाला अद्यापि आम्हांसी कळला ॥ नाही सर्वथा जाणपा ॥१९॥

मग नारद काय बोलिला ॥ यज्ञभोक्ता नाही कळला ॥ मख करिता कासयाला ॥ महा आयास करोनिया ॥२०॥

ऐसे ऐकोनि वचन ॥ विप्र सर्व यथार्थ मानून ॥ भृगुऋषीसी बोलावून ॥ सांगते झाले तेधवा ॥२१॥

तुम्ही स्वर्गलोकासी जाऊन ॥ देवांमाजी श्रेष्ठ कोण ॥ त्याचा विचार करोन ॥ सत्वरचि येईजे ॥२२॥

सर्वोतम न येता प्रत्यया ॥ व्यर्थ यज्ञ करावे कासया ॥ जैशा भ्रताराविणे स्त्रिया ॥ न शोभती सर्वथा ॥२३॥

वर्‍हाडी जैसे वराविणे ॥ की बुबुळेविणे व्यर्थ नयन ॥ की नासिकेवाचोनि वदन ॥ शोभा न ये सर्वथा ॥२४॥

यालागी तुम्ही सत्वर ॥ श्रेष्ठदेव कोण साचार ॥ याचा शोध करोनि परिकर ॥ यावे लौकरी द्विजवर्या ॥२५॥

ऐसे ऐकोनि भृगुऋशी ॥ सत्वर गेला सत्यलोकासी ॥ तो कमळासन बैसला सभेसी ॥ नारदतुंबर गाती पुढे ॥२६॥

मरुद्गण पितृगण ॥ एकादश रुद्र द्वादशादित्य जाण ॥ अष्टवसु कर जोडून ॥ उभे राहिले सम्मुख ॥२७॥

सावित्री आणि सरस्वती ॥ सन्निधसेवेसी उभ्या असती ॥ अष्टनायका नृत्य करिती ॥ गायन करिती गंधर्व ॥२८॥

ऐशी ब्रह्मसभा अभिनव ॥ त्याची शोभा अतिअपूर्व ॥ सिंहासनी कमळोद्भव ॥ बैसला असे आनंदे ॥२९॥

चारी वेद मूर्तिमंत ॥ हस्त जोडोनि उभे तेथे ॥ भृगु गेला सभेत ॥ परी कोणी न पुसे तयासी ॥३०॥

ऋषि आला म्हणोन ॥ विधातयासी न होय स्मरण ॥ ऐसा अनादर पाहोन ॥ विप्र मनी विचारी ॥३१॥

म्हणे पदाभिमानी उन्मत्त ॥ सर्वज्ञत्व नाही एथ ॥ यज्ञभोक्ता यथार्थ ॥ सर्वथा हीन होय ॥३२॥

मग तेथून निघाला सत्वर ॥ कैलासासि आला मुनिवर ॥ तो गिरजेसहित श्रीशंकर ॥ एकांती रमत होता पै ॥३३॥

ऋषि प्रवेशला आत ॥ देखोनी पार्वती झाली लज्जित ॥ शिवाप्रति विनवीत ॥ काय बोलत जगदंबा ॥३४॥

म्हणे कैलासपते शूळपाणी ॥ सोडा त्वरित मजलागूनी ॥ भृगुऋषि प्रवेशला सदनी ॥ प्राणवल्लभा ऐकपा ॥३५॥

ऐसे ऐकता भाळलोचन ॥ झाला परम कोपायमान ॥ त्रिशूळहाती घेऊन ॥ उठता झाला सत्वर ॥३६॥

काळवेळ न पाहता ॥ आत संचरला अवचिता ॥ यासि मारीन आता ॥ म्हणोनि बाहेर पातला ॥३७॥

क्रोधयुक्त पाहोनि शंकर ॥ ऋषी पळाला भयातुर ॥ म्हणे हा तामसी त्रिनेत्र ॥ विचार काही नसे येथे ॥३८॥

मग शाप देता झाला मुनी ॥ तुझी पूजा न करो कोणी ॥ तुझिया लिंगासी आजपासोनी ॥ करिती पूजन निर्धारी ॥३९॥

ऐसे शापोनी त्रिनेत्रासी ॥ विप्र पातला वैकुंठासी ॥ तो लक्ष्मीसहित ह्रषीकेशी ॥ शयन केले एकांती ॥४०॥

परमकोपारूढ ब्राह्मण ॥ म्हणे तिन्ही देव झाले समान ॥ एकाहुनी एक पूर्ण ॥ जाहले जाण विषयांध ॥४१॥

उताणा निजला श्रीनिवास ॥ ऋषीस चढला कोपविशेष ॥ आत जावोनि श्रीहरीस ॥ लत्ताप्रहारे ताडिले ॥४२॥

सव्यभागी ह्रदयावरी ॥ पदाघात बैसला ते अवसरी ॥ चरण रुतला शरीरी ॥ जगदात्महरीयाच्या ॥४३॥

तात्काळ उठोनी जगज्जीवन ॥ धरिले ऋषीचे चरण ॥ म्हणे स्वामी मजकारणे ॥ श्रम बहुत पावले ती ॥४४॥

मी अपराधी असे पूर्ण ॥ बरे केले मजलागी शासन ॥ परी दुखावले स्वामीचे चरण ॥ महाकठीण देहमाझा ॥४५॥

वज्राहूनी अष्टगुण ॥ तनू माझी असे कठिण ॥ आपुले बहुत मृदुचरण ॥ दुखवले असतील ऋषिवर्या ॥४६॥

मग सुगंधतैल लाऊन ॥ स्वहस्ते करी मर्दन ॥ जगदात्मा मनमोहन ॥ आपण निजांगे करितसे ॥४७॥

उष्णोदके करून ॥ केले ऋषीचे चरणक्षालन ॥ मग वस्त्रे पुसून ॥ चुरितसे क्षणभरी ॥४८॥

ऐसा देखता आदर ॥ संतोष पावला द्विजवर ॥ म्हणे एवढा देवनिर्धार ॥ दयासागर दिसतसे ॥४९॥

केवल सत्वगुणमंडित ॥ देवाधिदेव वैकुंठनाथ ॥ त्रिभुवनपाळक समर्थ ॥ वेदशास्त्र वर्णिती जया ॥५०॥

मग तो भृगुऋषीश्वर ॥ स्तवन करी जोडुनी कर ॥ म्हणे तू जगदात्मा साचार ॥ कोणासी पार न कळे तुझा ॥५१॥

जयजयाजी जगन्नायका ॥ भक्तवत्सला विश्वव्यापका ॥ नमो दानवकुळ पावका ॥ इंदिरापति श्रीहरी ॥५२॥

ऐसे स्तवूनी श्रीनिवासासी ॥ ऋषि परतला वेगेसी ॥ जेथेकश्यपादि होते ऋषी ॥ तया स्थानासी पातला ॥५३॥

विप्र बोलतसे सप्रेम ॥ सर्वदेवात हरि सर्वोत्तम ॥ जो जगदात्मा अत्माराम ॥पूर्णकाम सर्वेश ॥५४॥

जैसे नवग्रहात दिवाकर ॥ की अंडजांमाजी खगेश्वर ॥ देवांमाजी इंदिरावर ॥ श्रेष्ठ असे जाणावे ॥५५॥

की भोगियामाजी धरणीधर ॥ की धनाढ्यामाजी कुबेर ॥ देवांमाजी श्रीकरधर ॥ श्रेष्ठ ऐसे जाणावे ॥५६॥

ज्याचा पार नेणती श्रुती ॥ तो हा जाणावा रमापती ॥ त्या समान देव निश्चिती ॥ दुसरा कोणी असेना ॥५७॥

ऐकोनि संतोषले मुनिजन ॥ ते ही करोनी महायज्ञ ॥ अर्चिते जाहले जनार्दन ॥ अत्यानंदे ते काळी ॥५८॥

असो सिंहावलोकने करून ॥ परिसा मागील अनुसंधान ॥ भृगुऋषीने पदताडण ॥ हरीसी केले ज्याकाळी ॥५९॥

तेव्हा हरींनी सत्कारून ॥ केले भृगूचे पूजन ॥ ते पाहोनि कमळा आपण ॥ श्रीहरिप्रती बोलतसे ॥६०॥

म्हणे क्षीराब्धिवासा जगज्जीवना ॥ त्रिभुवनपालका मनमोहना ॥ दीनबंधो जनार्दना ॥ जगद्रक्षणा जगद्‍गुरु ॥६१॥

तू देवाधिदेव मुररी ॥ तुज वंदिती कमळोद्भव त्रिपुरारी ॥ इंद्रादिदेव निर्धारी ॥ तुझिया सत्तेने वर्तती ॥६२॥

तुजवाचोनी तत्त्वता ॥ दुजा थोर नाही अनंता ॥ आणि भृगूने मारिली लाथ ॥ जगन्नाथा न सोसे मज ॥६३॥

तू समर्थ सर्वांहून आणि भृगु मनुष्य दुर्बळहीन ॥ तेणे तुजला पदताडण ॥ करिता क्रोध न ये तूते ॥६४॥

यावरी बोले मनमोहन ॥ म्हणे वल्लभे ऐकवचन ॥ भृगुऋषि केवळ ब्राह्मण ॥ तपोधन ज्ञानी तो ॥६५॥

ब्राह्मण माझे मुख्य दैवत ॥ मी निजभक्तांसी प्रिय अत्यंत ॥ भक्तावाचोनि यथार्थ ॥ मज न गमे सहसाही ॥६६॥

मीनासी न सोडवे जीवन ॥ की धेनूसी जैसे नवे तृण ॥ तैसे मज भक्तांविण ॥ दुसरे काही नावडे ॥६७॥

याकरिता वल्लभे जाण ॥ ह्रदयी मिरवितो विप्रचरण ॥ भूषणरूपे मजकारण ॥ श्रीवत्स लांच्छन शोभतसे ॥६८॥

यावरी जगन्माता बोलत ॥ स्वामी मज न सोसवे ऐसे सत्य ॥ मी न राहे आता येथ ॥ जाईन त्वरित भूतळा ॥६९॥

ऐसा प्रेमकलह करून ॥ जगन्माता निघाली तेथून ॥ पृथ्वीवरी येऊन ॥ करवीर क्षेत्री राहिली ॥७०॥

जितुकी तीर्थे पृथ्वीवरी ॥ तितुकी असती करवीरक्षेत्री ॥ पंचगंगेचिया तीरी ॥ राहती झाली आदिमाता ॥७१॥

ती वर्णावी समूळकथा ॥ समुद्रा ऐसे होईल ग्रंथा ॥ यालागी बोलिले ध्वनितार्था ॥ कळले पाहिजे निर्धारी ॥७२॥

टाकोनिया वैकुंठपरी ॥ इंदिरा गेली करवीर क्षेत्री ॥ इकडे क्षीरसागरविहारी ॥ काय करिता जाहला ॥७३॥

जगन्माता गेलियावरी ॥ परमचिंताक्रांत श्रीहरी ॥ न गमेचि कदा दिवसरात्री ॥ उदास अंतरीसर्वदा ॥७४॥

गोड नलगे विलासगायन ॥ नावडेची सुमनहार चंदन ॥ भोजन तांबूल शयन ॥ सर्वही वीट वाटतसे ॥५॥

मायाविरहित श्रीधर ॥ तो सर्वदाही निर्विकार ॥ परी लौकिकभावे जगदुद्धार ॥ नानाप्रकारे दावितसे ॥७६॥

असो सर्वदा उदासचित्त ॥ काय करी जगन्नाथ ॥ त्याग करोनी वैकुंठाते ॥ भूतळाप्रती पावले ॥७७॥

कोठे रहावे म्हणोन ॥ स्थळ पाहे मनमोहन ॥ ऐसा हिंडत जनार्दन ॥ दक्षिणदेशी पातला ॥७८॥

भागीरथीचे दक्षिणतीरी ॥ तीनशत योजनांवरी ॥ तीर्थनाम सुवर्णमुखरी ॥ प्रवरा नदी वसतसे ॥७९॥

त्याचे उत्तरेसी कोशावरी ॥ नामाभिधान वेंकटगिरी ॥ शतयोजन लांबनिर्धारी ॥ त्रिंशद्योजन रुंद जो ॥८०॥

जो कनकाद्रीचा पुत्र ॥ तृतीयाध्यायी वर्णिले चरित्र ॥ शेष वायु संवादमात्र ॥ दक्षिणदेशासि पातला ॥८१॥

तोचि हा पर्वतशेषाद्री ॥ वेंकटेश ज्याचे मस्तकावरी ॥ मध्यभागी निर्धारी ॥ श्रीनृसिंह वसतसे ॥८२॥

पुच्छभागी मल्लिकार्जुन ॥ श्रीशैल्य म्हणती त्यालागून ॥ ऐसा हा क्षेत्रराजपूर्ण ॥ भूवैकुंठ म्हणवितसे ॥८३॥

ऐसा तो वेंकटेशगिरी ॥ देखता जाहला वैकुंठविहारी ॥ स्वामिपुष्करणी तीरी ॥ येता जाहला जगदात्मा ॥८४॥

वन पाहिले परमसुंदर ॥ नाना वृक्ष लता मनोहर ॥ शीतळ छाया परिकर ॥ मनोरम्य वाटतसे ॥८५॥

शाल तमाल देवदार ॥ आम्र कदंब शेवंती मंदार ॥ वट पिंपळ औदुंबर ॥ दाडिंबी पारिजातक शोभती ॥८६॥

मालती मोगरी जाईजुई ॥ मलयागर कृष्णागर पाही ॥ लवंग वृक्ष ठायी ठायी ॥ नागचंपक शोभती ॥८७॥

केळी नारळी पोफळी ॥ पुन्नाग राय कर्पूर कर्दळी ॥ फणस निंबोण्या जांभळी ॥ रायअवळी डोलती ॥८८॥

शेवंतीका बकुल चंपक ॥ पुन्नाग करवीर सुवासिक ॥ तुळसी बिल्व सुरेख ॥ शोभायमान दिसती ॥८९॥

कनकवेली नागवेली परिकर ॥ आरक्त प्रवाळवेली सुंदर ॥ वनस्पती अठराभार ॥ तया वनात शोभती ॥९०॥

चातक मयूर बदक ॥ चक्रवाके राजहंस देख ॥ रावे चकोर गरुडादिक ॥ कोकिळा वसती तये स्थळी व९१॥

सिंहव्याघ्र सूकर ॥ वनगायी अस्वल वानर ॥ ससे हरिण मार्जार ॥ जंबुक कुंज वसती तेथे ॥९२॥

कस्तूरीमृग जवादी बिडाळक ॥ नकुळवन गौवा शशक ॥ शार्दूलादि मृग बहुतेक ॥ निर्वैर विचरती त्या स्थळी ॥९३॥

तीर्थजळ दिसे मनोहर ॥ माजी विलसते जळचर ॥ मत्स्य कच्छ मगरी परिकर ॥ जळडुंडुभ मंडूक पै ॥९४॥

माजी विकसली अरविंदे ॥ त्यात रुणझुणती मिलिंद ॥ निर्वैर विचरती श्वापद ॥ तीर्थासमीप सर्वदा ॥९५॥

धनुर्मासाचे सितपक्षात ॥ द्वादशी तिथि पर्वविख्यात ॥ ब्रह्मादिसुरवर इच्छित ॥ तया तीर्थाचे स्नान पै ॥९६॥

जितुकी तीर्थे पृथ्वीवर ॥ ती एथेंचि वसती निरंतर ॥ ऐसे स्थळ पाहूनि श्रीधर ॥ राहो इच्छित ये स्थानी ॥९७॥

तीर्थासमीप सुरेख ॥ तिंतिणी वृक्ष असे एक ॥ तया खाली वल्मीक ॥ होते जाण निर्धारी ॥९८॥

त्या वल्मीकाचे अंतरी ॥ प्रवेशता झाला मुरारी ॥ गुप्त रूपे ते अवसरी ॥ तया स्थळी राहिला ॥९९॥

मनी चिंतूनि रामावतार ॥ म्हणे वल्मीक हेचि कौसल्यासुंदर ॥ तिंतिणी दशरथ साचार ॥ तीर्थसरयू गंगा पै ॥१००॥

अथवा वल्मीक देवकी जननी ॥ वसुदेव हाचि तिंतिणी ॥ गोपगोपिका वृक्ष भावोनी ॥ यमुना हे तीर्थ मानितसे ॥१॥

ऐशियापरी मेघश्याम ॥ जो देवाधिदेव आत्माराम ॥ वारुळामाजी पूर्णकाम ॥ राहता जाहला तेकाळी ॥२॥

दहा सहस्त्र वर्षपर्यंत ॥ तेथेचि राहिलासे गुप्त ॥ देव चिंताक्रांत जाहले समस्त ॥ म्हणती करावे काय आता ॥३॥

वैकुंठनाथ श्रीहरी ॥ जो भक्तजनांचा कैवारी ॥ कोठे गेला निर्धारी ॥ कैसा ठायी पडेल आता ॥४॥

आम्ही क्षणक्षणा जावोन ॥ गार्‍हाणे सांगत होतो पूर्ण ॥ आता आम्हांसी रक्षील कोण ॥ जगद्वंद्या वाचोनिया ॥५॥

असो सर्वही देव मिळून ॥ जवळी केला कमलासन ॥ म्हणे श्रीहरीसी त्वरेकरून ॥ ठायी पाडी विधातिया ॥६॥

ब्रह्मा विचारी मानसी ॥ म्हणे कैसे करावे आता यासी ॥ मग जावोनि करवीरपुरासी ॥ जगन्मातेसि बोलती ॥७॥

माते तू आलिस रुसोन ॥ तुझिया विरहेकरून ॥ सांडला कोठे मनमोहन ॥ आम्हांसी कोण रक्षील आता ॥८॥

तू आदिमाता मूळप्रकृती ॥ ठायी पाडी जगत्पती ॥ तुजवाचूनी हरीप्राप्ती ॥ नव्हे आम्हांसी सर्वथा ॥९॥

मग सर्वदेवा समवेत ॥ जगन्माता हरीसी शोधित ॥ कोठे गेला जगन्नाथ ॥ ठायी न पडे सर्वथा ॥११०॥

जो वेदशास्त्रांसि अगोचर ॥ अठराजणांसी न कळे पार ॥ सहस्त्रमुखांचा साचार ॥ गुण वर्णिता भागला ॥११॥

चारीमुखांचा शिणला ॥ पाच मुखांचा तटस्थ राहिला ॥ सहा मुखांचा दडाला ॥ वनामाजी जावोनिया ॥१२॥

अष्टांगयोग साधिती पाही ॥ योगियांसी न पडे ठायी ॥ तीर्थयात्रादि पुण्यलवलाही ॥ करिताही हरि न सापडे ॥१३॥

नाना व्रत केलिया साधन ॥ तरी न सापडे नारायण ॥ करिता पंचाग्नि साधन ॥ सर्वथाही न सापडे ॥१४॥

द्रव्यबळ विद्याबळे जाण ॥ धरू म्हणती मूर्खपणे ॥ निराहारी जळाहारी जाण ॥ नग्न मौनिया न सापडे ॥१५॥

यज्ञयाग करिता बहुत ॥ ठायी न पडे जगन्नाथ ॥ बहुत प्रकारे कष्ट भोगिता ॥ दीननाथ न सापडे ॥१६॥

एक दृढभक्तीवाचून ॥ वश्य नव्हे नारायण ॥ भक्तांघरी मनमोहन ॥ लक्ष्मीसहित वास करी ॥१७॥

जे का अभेदप्रेमळभक्त ॥ तेचि श्रीहरीसी आवडत ॥ त्यावाचोनि ज्ञान प्राप्त ॥ आणिका नव्हे निर्धारी ॥१८॥

ज्ञानावाचोनि चिद्धनानंद ॥ सर्वथा न मिळेची श्रीगोविंद ॥ श्रीगुरुवाचोनि ज्ञानबोध ॥ कदा काळी मिळेना ॥१९॥

अंगी नसलिया अद्वयभक्ती ॥ श्रीगुरुचे चरण न मिळती ॥ असो देव सर्वही शोधिती ॥ नानाप्रकारे करोनिया ॥१२०॥

मग सर्वही विचार करोन ॥ गोरूप धरी चतुरानन ॥ वत्सवेष भगवान ॥ शंकर स्वये जाहला ॥२१॥

गोपींचे वेश तत्वता ॥ धरिती जाहली जगन्माता ॥ मग शोधावया विश्वपिता ॥ जाते जाहले भूमंडळी ॥२२॥

पशुजातीचे स्वभावपूर्ण ॥ वास घेता होय पदार्थ ज्ञान ॥ वास घेतल्यावाचोन ॥ पशु तृण न भक्षिती ॥२३॥

पृथ्वीत असेल गुप्त ॥ त्याचा शोध करावया निश्चित ॥ गायीचे वेष यथार्थ ॥ धरिता जाहला तेधवा ॥२४॥

असो ऐसे तिघेजण ॥ चालिले तेव्हा शोधा कारण ॥ चोळराजाचे राज्यात जाण ॥ हिंडत हिंडत पातले ॥२५॥

चोळदेशीचा नृपनाथ परम धार्मिक आणि समर्थ ॥ ज्याचिया प्रतापे यथार्थ ॥ शत्रु कापती थरथरा ॥२६॥

सत्क्रियावंत आणि उदार ॥ प्रजापाळणी बहुत चतुर ॥ गोब्राह्मणप्रतिपाळक साचार ॥ सेना अपार तयाची ॥२७॥

ज्याच्या राज्यात नारीनर ॥ स्वधर्मी रत अहोरात्र ॥ स्त्रिया पतिव्रता थोर ॥ लोक सर्व सत्यवचनी ॥२८॥

गायी दुहती त्रिकाळ ॥ वृक्ष सदा डोलती सफळ ॥ अवर्षण दोष दुष्काळ ॥ नाही समूळ राज्यात ॥२९॥

असो ऐसा नृपनाथ ॥ पातले त्याचे नगरात ॥ धेनु पाहोनी जन समस्त ॥ आश्चर्य मानिती ते काळी ॥१३०॥

म्हणती ऐसी सुलक्षण गायी ॥ कधी कोणी पाहिली नाही ॥ कोण देशींची लवलाही ॥ आली येथे कळेना ॥३१॥

नृपासी कळला वृत्तांत ॥ तेणे सभेसि आणविली त्वरित ॥ धेनु पाहोनि नृपनाथ ॥ परमानंद पावला ॥३२॥

मग तिये गोपांली प्रती ॥ पुसता जाहला जगतीपती ॥ म्हणे कोण कोठील तुम्ही निश्चिती ॥ धेनु कासया आणिली ॥३३॥

यावरी बोले गौळणी ॥ म्हणे ऐक नृपवर्य चूडामणी ॥ धेनु ही परम उत्तम गुणी ॥ मी आणिली विकावया ॥३४॥

मग राजा देवोनि यथेष्टधन ॥ विकत घेतली गायी लागून ॥ आपुल्या कळपात नेऊन ॥ वत्सासहित बांधिली ॥३५॥

असो जगन्माता झाली गुप्त ॥ सर्व गोधने चरावयाते ॥ वनाप्रती जाती त्वरित ॥ नित्यकाळी तेधवा ॥३६॥

चरावया निमित्त करोन ॥ पृथ्वीत शोधे चतुरानन ॥ कोठे असेल मनमोहन ॥ ठायी पाडावा म्हणोनिया ॥३७॥

काही दिवस गेलियावरी ॥ श्रीवेंकटाद्रि गिरिवरी ॥ गोधन चरावया निर्धारी ॥ घेवोनि गेला गोपाळ ॥३८॥

तृण भक्षोनिया तुंबळ ॥ मग प्राशन करावया जळ ॥ स्वामितीर्थासी तात्काळ ॥ गोधन सर्व आणिले ॥३९॥

तेथील सेवोनि पुण्यवारी ॥ वृक्षच्छायेसी राहिले निर्धारी ॥ विधाता हरीचा शोधकरी ॥ तीर्था समीप अवनीत ॥१४०॥

तो तिंतिणी वृक्ष सुरेख ॥ तयातळी देखिले वल्मीक ॥ छिद्रांतूनि सुवास देख ॥ येत हरि अंगीचा ॥४१॥

जैसी पेटीत ठेविली कस्तूरी ॥ परी मकरंद निघे बाहेरी ॥ की दिनमणी झांकिला अभ्री ॥ परी प्रकाश बाहेरी दिसे जेवी ॥४२॥

परमचतुर कमळासन ॥ तात्काळ जाणिली खूण ॥ म्हणे येथे आहे जगज्जीवन ॥ मनमोहन जगद्गुरू ॥४३॥

जैसे करिता श्रीगुरुसेवन ॥ अकस्मात होय अपरोक्षज्ञान ॥ की करिता योगसाधन ॥ साक्षात्कार होय जेवी ॥४४॥

तैसा वारुळा भीतरी ॥ विधीने ओळखिला श्रीहरी ॥ म्हणे माझा पिता निर्धारी ॥ येथे येवोनि राहिला ॥४५॥

परमहर्षला चतुरानन ॥ म्हणे भाग्य माझे परिपूर्ण ॥ या चराचराचे जीवन ॥ सापडले पूर्ण मजलागी ॥४६॥

निर्धनासी सापडे धन ॥ की जन्मांधासी आले नयन ॥ तैसा गोरूपी कमळासन ॥ चिद्धनानंदे नाचतसे ॥४७॥

मग तया वल्मीकावरी ॥ विधाता दुग्धाभिषेक करी ॥ म्हणे जयजय वैकुंठविहारी ॥ एकांत भारी सेविलासी ॥४८॥

तुझी राजस तनू सुकुमार ॥ का सेविलासि घोर कातार ॥ तुजवाचोनि निर्धार ॥ दीन आम्ही नारायणा ॥४९॥

तान्ह्यासि टाकूनि घरी ॥ जननी गेलिया बहुत दूरी ॥ लेकरू तळमळी ज्यापरी ॥ तेवी श्रीहरी जाहलो पै ॥१५०॥

असो ऐसे चतुरानन ॥ नित्य करी अभिषेचन ॥ लोटले किती एकदिन ॥ तो एक अपूर्व वर्तले ॥५१॥

राजपत्‍नी एके दिवशी ॥ आपण येवोनी गायीपाशी ॥ लाविली दोहन करावयासी ॥ तो क्षीर न निघे अणुमात्र ॥५२॥

पान्हा फुटे किंचित ॥ मग राजप्रिया क्रोधयुक्त ॥ गोपाळा प्रति बोलत ॥ क्षीर किंचित नसे का ॥५३॥

वत्सासि पाजविले वनांतरी ॥ की तुवांचि दुहिले निर्धारी ॥ गोपाळ बोले ते अवसरे ॥ मी नेणे सर्वथा स्वामिणी ॥५४॥

तुझे चरण साक्ष लवलाही ॥ मी वनी नाही दुहिली गायी ॥ वत्सासि पाजिले ते ही ॥ पाहिले नाही माउली ॥५५॥

राजप्रिया कोपायमान ॥ गोपाळाशी करविले ताडण ॥ तू दुरात्मा परम दुर्जन ॥ अभिलासिलेसि तूचि पै ॥५६॥

ऐसे होताचि निश्चित ॥ गोपाळ सर्वकाळ जपत ॥ गायीचे क्षीर काय होत ॥ पहावयालागी सर्वदा ॥५७॥

एके दिवशी गोपाळाने ॥ स्वामितीर्थी जळ पाजून ॥ वृक्षच्छायेसि गोधन ॥ स्थिर केले नावेक ॥५८॥

तो तया वल्मीकावरी ॥ धेनु जावोनि अभिषेककरी ॥ गोपाळ पाहोनि आपुले नेत्री ॥ कोपायमान जाहला ॥५९॥

म्हणे धेनु हे अवगुणी ॥ वत्सा ना धन्याशी दुग्ध नेदूनी ॥ वारुळावरी दोहन करोनी ॥ शिक्षा करविली मजलागी ॥१६०॥

आता इचा वध करीन ॥ म्हणोनी धावला फरश घेऊन ॥ ऊर्ध्व हस्त उचलोन ॥ घालावा जो गायींवरी ॥६१॥

तव तो भक्तकामकल्पद्रुम ॥ वृत्तांत जाणोनी मेघश्याम ॥ मनी विचारी पुरुषोत्तम ॥ काय करावे ऐसियासि ॥६२॥

ब्रह्मा माझा बाळक ॥ माझी काकुळती तयासी देख ॥ गायीचे स्वरूपे अभिषेक ॥ करीतसे मजलागी ॥६३॥

ऐसा चालता नित्यनेम ॥ पाहो न शके गोपाळ अधम ॥ गोहत्या करावया दुर्गम ॥ प्रवर्तलासे दुरात्मा ॥६४॥

मी भक्तजनांचा रक्षक ॥ ब्रीद माझे गाजे देख ॥ ऐसियास रक्षक ॥ मज वाचोनि कोण असे ॥६५॥

ऐसे विचारूनि अंतरी ॥ जगदात्मा तेव्हा काय करी ॥ तत्काळ वारुळा बाहेरी ॥ प्रकट होता जाहला ॥६६॥

प्रहार पडावा जो गायीवरी ॥ आपुले निजांग छाया करी ॥ श्रीहरीचे मस्तकावरी ॥ कुठार प्रहार बैसला ॥६७॥

मस्तक फुटोनी तात्काळ उचंबळला रक्तबंबाळ ॥ सप्तताल उंचप्रबळ ॥ रक्तधारा वर्षल्या ॥६८॥

ऐसे गोपाळ देखोन ॥ मूर्च्छित पडला न क्षण ॥ निघोनि गेला प्राण ॥ गोपाळ मरण पावला ॥६९॥

ऐसे देखोनि ते अवसरी ॥ धेनु धावली राजद्वारी ॥ नृपतीसम्मुख धरणीवरी ॥ लोळो लागली तेधवा ॥१७०॥

राव आश्चर्य करी मानसी ॥ सेवक धावले पहावयासी ॥ जवळी मनुष्य पहाता वेगेसि ॥ मार्ग धरी वनाचा ॥७१॥

राजा म्हणे सवे जाऊन ॥ पहा काय ते वर्तमान ॥ धेनुसंगे सेवकजन ॥ जाते जाहले वनासी ॥७२॥

वारुळासमीप जावोनी ॥ धेनु हंबरे तये क्षणी ॥ दूत पाहती जवळी येवोनी ॥ तो गोपाळ मरण पावला ॥७३॥

वारुळावरी कडोविकडी ॥ रक्त वर्षले चहूकडी ॥ सेवक धावले तातडी ॥ रायाप्रति सांगावया ॥७४॥

म्हणती नृपवर्या ऐक पूर्ण ॥ गोपाळ पावला असे मरण ॥ स्वामितीर्था समीप जाण ॥ रक्त बहुत वर्षले ॥७५॥

ऐसे ऐकता झडकरी ॥ राव घाबरला अंतरी ॥ सत्वर पातला ते अवसरी ॥ पहावया कारणे ॥७६॥

तो चहूकडे रक्तबंबाळ ॥ प्रेत जाहला असे गोपाळ ॥ राव येवोनि पाहे जवळ ॥ परमाश्चर्य करोनिया ॥७७॥

तव वारुळामधूनि अकस्मात्‍ ॥ प्रकटला कमळोद्भवाचा तात ॥ घाये मस्तक फुटला समस्त ॥ तैसाचि बाहेर पातला ॥७८॥

सच्चिदानंदतनू सगुण ॥ षड्‌विकार रहित नारायण ॥ तेणेंचि व्यथा सोशिली दारुण ॥ दासाकारणे परमात्मा ॥७९॥

असो राया सम्मुख प्रकटोन ॥ बोले इंदिरामनमोहन ॥ म्हणे पापिया मजकारणे ॥ तुवांचु दुःख दिधलेसि ॥१८०॥

मी जनक जननी विरहित ॥ नसे स्त्रीपुत्रबंधुआप्त ॥ एकलाचि परदेशी एथ ॥ वारुळात गुप्त होतो पै ॥८१॥

माझे मस्तक फोडून ॥ मज दुःख दीधले तुवा दारुण ॥ तुज मी आता शाप देईन ॥ महापापिष्ठा अविचारा ॥८२॥

तू पिशाच होवोनी झडकरी ॥ हिडसील या वनांतरी ॥ आहार न मिळेल निर्धारी ॥ दुःख भारी भोगसी ॥८३॥

ऐसा शाप ऐकोनी ॥ राव घाबरला अंतःकरणी ॥ धावोनि मिठी घाली चरणी ॥ नम्रवाणी विनवीतसे ॥८४॥

म्हणे जगन्निवासा श्रीहरी ॥ काय माझा अन्याय तरी ॥ निरपराधियासि मुरारी ॥ शाप व्यर्थ दीधला ॥८५॥

धेनु आली म्हणोन ॥ मी आलो पहावयालागून ॥ कोणे दुःख दीधले तुजलागून ॥ हेही नेणे कदा मी ॥८६॥

विचार न करिता श्रीनिवासा ॥ मज शाप दीधलासी तू कैसा ॥ मनमोहना ह्रषीकेशा ॥ मी अन्यायी कैसा सांग पा ॥८७॥

तुझे नाम घेता साचार ॥ प्राणी तरती घोर संसार ॥ मी प्रत्यक्ष रूप पाहोनी सुंदर ॥ पिशाचयोनि मजला का ॥८८॥

लोह परिसाशी झगटोनी ॥ काळिमा न लोपे चक्रपाणी ॥ कल्पवृक्षतळी बैसोनी ॥ इच्छित झणी न मिळेची ॥८९॥

तैसेचि जाहले एथे साच ॥ तव दर्शने झालो पिशाच ॥ आता कृपा करोनि उच्छाप वाचे ॥ बोल साच स्वामिया ॥१९०॥

ऐसे ऐकताचि गोविंद ॥ उच्छाप वदला श्रीमुकुंद ॥ म्हणे मी न विचारिता अगाध ॥ शाप तुज दीधला ॥९१॥

मी घाये होवोनी जर्जर ॥ न कळता शापिले निर्धार ॥ तुझी कर्मगति विचित्र ॥ भोगल्याविण न सुटेची ॥९२॥

कलियुगाचा होईल अंत ॥ तू पिशाच होवोनी राही एथ ॥ कृतयुगामाजी यथार्थ ॥ उद्धार होईल तुझा पै ॥९३॥

आकाशनामा नृपवर ॥ होईल सोमवंशी साचार ॥ त्याची कन्या परमसुंदर ॥ मी वरीन जाण निर्धारी ॥९४॥

आंदणालागी राजेंद्र ॥ मुकुट एक देईल परिकर ॥ आठा दिवशी भृगुवारी ॥ मुकुट मस्तकी घालीन मी ॥९५॥

त्यावेळी दर्शनासी ॥ तू येत जाइ निश्चयेसी ॥ तेव्हा क्षणमात्र सुख तुजसी ॥ होईल जाण राजेंद्रा ॥९६॥

ऐसा उच्छाप वदोन ॥ गुप्त जाहला जनार्दन ॥ राव पिशाच होवोन ॥ वनामाजी राहिला ॥९७॥

असो वल्मीकामाजी नारायण ॥ करी देवगुरूचे चिंतन ॥ तात्काळ पातला धावोन ॥ हरीसी नमन करीतसे ॥९८॥

हरि म्हणे वाचस्पती ॥ मस्तकी वेदना बहुत होती ॥ यासी उपया त्वरित गती ॥ सांग निश्चिती मजलागी ॥९९॥

गुरु म्हणे औदुबर चीक ॥ त्यात मिळवावी कार्पासराख ॥ घायात भरावे देख ॥ व्यथा दूर होईल ॥२००॥

मग बृहस्पतीने औषध करून ॥ मस्तकासि बांधिले आवळून ॥ हरीची आज्ञा घेऊन ॥ जाता जाहला देवगुरु ॥१॥

काही दिवस लोटल्यावरी ॥ औषधालागी मुरारी ॥ स्वये निघाला निर्धारी ॥ वनामाजी गोविंद ॥२॥

नानावृक्ष लागले सघन ॥ माजी न दिसे सूर्यकिरण ॥ सुंदर लता सुवास सुमन ॥ चहूंकडे शोभती ॥३॥

ऐसिया वनी रमावर ॥ हिंडत असता निर्धार ॥ तव तेथे नवल जाहले थोर ॥ तेचि श्रोते परिसीजे ॥४॥

मार्गी जाता निर्धारी ॥ वराहरूपी जो श्रीहरी ॥ वनचर मेळासवे झडकरी ॥ त्याच मार्गे पातला ॥५॥

वेंकटेश जाता सन्मुख ॥ येता देखिला भूमिपाळक ॥ पृथ्वीमाजी तात्काळिक ॥ लीन झाला तेधवा ॥६॥

ते देखोनि धरणीधर ॥ बोलता झाला पै निर्धार ॥ म्हणे श्रीहरि वैकुंठविहारा ॥ पाहिले म्या तुजलागी ॥७॥

लीन होऊ नका सर्वथा ॥ प्रकट होई जगन्नाथा ॥ ऐसा भूमिपाळ बोलता ॥ प्रकट जाहला श्रीहरी ॥८॥

एकमेकांसी आलिंगन ॥ देते झाले प्रीतीकरून ॥ जैसे भार्गवआणिरघुनंदन ॥ पूर्वी ज्यापरी भेटले ॥९॥

एकरूप दोघे जण ॥ नाही तेथे भेदभान ॥ वराहरूपी नारायण ॥ बोलता झाला त्यावरी ॥२१०॥

म्हणे जगन्निवासा मुरारी ॥ का टाकिली वैकुंठपुरी ॥ कोण्या गुणे मधुकैटभारी ॥ एथे येणे जाहले ॥११॥

मस्तकावरी घाय दारुण ॥ पडावयासी काय कारण ॥ तू कोमळ तनु नारायण ॥ घोर वन का सेविलेसी ॥१२॥

यावरी बोले जगन्नाथ ॥ भृगूने मज दीधली लाथ ॥ ते न सोसवले इंदिरेते ॥ गेली रुसोन करवीरा ॥१३॥

मग मी होवोनि उदास ॥ टाकोनिया वैकुंठास ॥ या वनामाजी केला वास ॥ बहुत दिवस भूमिपाळा ॥१४॥

चोळ रायाचा गोरक्षक ॥ कुठार प्रहारे फोडिले मस्तक ॥ बहुत व्यथा जाहली देख ॥ ते दुःख आता न वर्णवे ॥१५॥

मी एकलाचि वसतो एथे ॥ कोणीच नाही मज सांगाते ॥ रहावयासी स्थळ यथार्थ ॥ तेही न मिळे जाणपा ॥१६॥

तरी या पर्वतावरी देख ॥ मज ठाव देई भूमिपाळका ॥ वराह म्हणे जगन्नायका ॥ अवश्य राही एथेंचि ॥१७॥

मग नगमस्तकी यथार्थ ॥ शतपाद भूमि हरिसी अर्पित ॥ तया स्थळी क्षीराब्धिजामात ॥ राहता जाहला ते काळी ॥१८॥

बकुलानामे आपुली दासी ॥ सेवा करावया वेंकटेशासी ॥ देता जाहला वराहवेषी ॥ तिये प्रती बोधोनिया ॥१९॥

म्हणे मी आणि वेंकटपती ॥ एकरूप दोघे निश्चिती ॥ याची सेवा परमप्रीती ॥ करीत राहे बकुले तू ॥२००॥

ऐसे बोलोनि वेगेसी ॥ वराह गेला स्वस्थानासी ॥ बकुले सह वैकुंठवासी ॥ राहिला हो तेथेचि ॥२१॥

बकुला परमप्रीती करून ॥ सेवा करी रात्रंदिन ॥ उत्तमान्न निर्मून ॥ भोजनालागी देतसे ॥२२॥

घाय मस्तकीचे बांधोन ॥ सर्वदा करी पादसेवन ॥ जेणे संतोष नारायण ॥ तेचि करी सर्वदा ॥२३॥

वराहकल्पाचे द्वितीय परार्धात ॥ अष्टाविंशति द्वापाराचा अंत ॥ वैकुंठीहूनी कमळाकांत ॥ भुतळासी पातले ॥२४॥

याचि कलियुगी यथार्थ ॥ श्रीविक्रमार्काचे संवत ॥ सहस्त्रवर्षे जाहल्यावरुत ॥ प्रकट जाहला परमात्मा ॥२५॥

नैमिषारण्यी सूताप्रती ॥ शौनकादिक प्रश्न करिती ॥ बकुला नाम दासी प्रती ॥ भूमिपाळे दीधली ॥२६॥

परी ती बकुला कोठील कोण ॥ काय आचरली एवढे पुण्य ॥ जिणे साक्षात नारायण ॥ वश केला ऐसे परी ॥२७॥

यावरी सूत बोलत ॥ कृष्णावतारी जगन्नाथ ॥ गोकुळामाजी क्रीडत ॥ नंदाघरी सर्वदा ॥२८॥

नंदाराणी यशोदासती ॥ जिचा पुत्र जाहला जगत्पती ॥ पुढे मथुरेशी जाता श्रीपती ॥ शोक करी यशोदा ॥२९॥

म्हणे तान्ह्या माझ्या मनमोहना ॥ टाकोनि जातोसि मजलागून ॥ मी त्यागीन आपुला प्राण ॥ वियोग तुझा न सोसवे ॥२३०॥

तुजे बाळपणीचे खेळ ॥ कृष्णा म्या पाहिले सकळ ॥ परी तुझे लग्नाचे सोहळे ॥ पाहिले नाही सर्वथा ॥३१॥

तू सोडूनी जासी आता ॥ पुरला नाही मनींचा अर्थ ॥ मग मातेप्रती इंदिराकांत ॥ काय बोलता जाहला ॥३२॥

म्हणे कलियुगा माझारी ॥ मी प्रकट होईन पृथ्वीवरी ॥ तुझे मनोरथ ते अवसरी ॥ पूर्ण करीन जननिये ॥३३॥

ऐसा वर देवोन ॥ मथुरेसी गेले नारायण ॥ तेचि हे बकुला दासी जाण ॥ कलियुगामाजी प्रकटली ॥३४॥

श्रोते ऐकावे सावधचित्त ॥ पुढील अध्यायी कथा अद्भूत ॥ आकाश राजाची उत्पत्ति सत्य ॥ परम रसिक असे पै ॥३५॥

या अध्यायी वैकुंठनाथ ॥ भूतळा आले यथार्थ ॥ हा अध्याय त्रिकाळ वाचिता ॥ सकळ मनोरथ पुरती पै ॥३६॥

प्रीती करोनि निश्चित ॥ अखंड पहावा हा ग्रंथ ॥ न घडे तरी त्वरित ॥ हा अध्याय तरी वाचावा ॥३७॥

श्रवण पठण आणि लेखन ॥ जे प्रीतीने ग्रंथ करिती रक्षण ॥ त्यांसी निजांग साउली करोन ॥ रक्षी नारायण सर्वदा ॥३८॥

चिद्धनानंदा सुखदायका ॥ वीरवरदा वैकुंठनायका ॥ भक्तकामकल्पद्रुम ॥ मुरांतका ॥ न येसी तर्का कोणासी ॥३९॥

इतिश्रीवेंकटेशविजयग्रंथ सुंदर ॥ संमतपुराणभविष्योत्तर ॥ श्रवण करोत पंडित चतुर ॥ पंचमाऽध्यायगोडहा ॥२४० ॥ एकंदर ओवीसंख्या ॥६८९॥