श्री वेंकटेश विजय

वेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.


अध्याय १० वा

श्रीवेंकटेश श्रीशुकाचार्यांच्या आश्रमात भोजन करून इतर सर्वदेवादिकांना संतुष्ट करून नारायणपुरास निघाले. नारायणपुरातही आकाशराजाने विवाहाकरिता आवश्यक ती मंडपवगैरे सर्व सामग्री उत्तम रीतीने तयार केली. सायंकाळपर्यंत नवमीच्या दिवशी पुण्याहवाचनादि सर्व वैदिक विधि उरकण्यात आले. सायंकाळी हेरांनी येउन श्रीवेंकटेश नगराजवळ येत असल्याची बातमी राजास सांगितली.

राजा सर्व लवाजमा बरोबर घेऊन देवास सामोरा गेला. पद्मावती सुद्धा एका हत्तिणीवर बसून बरोबर निघाली देवाच्या दर्शनास ती फार उत्सुक झाली होती.

देवाबरोबर सुद्धा पुष्कळ जनसमुदाय असल्याने श्रीभगवान कोठे आहेत हे लवकर कळून येईना. नंतर ज्यांच्या दोन्ही बाजूस ब्रह्मदेव व शंकर चालतात व मध्यभागी श्रीवेंकटेश येत आहेत हे पाहून राजास फार आनंद झाला व डोळ्याचे पारणे फिटल्याचे समाधान झाले. पद्मावतीचे भाग्य थोर म्हणून तिला असा पति मिळाला असे वाटून राजाच्या शरीरावर अष्टसत्विक भाव उठले.

इकडे श्रीवेंकटेशांनी नारदाकडे यात आकाश राजा कोण याची चौकशी करण्यास सुरुवात केली असता नारदांनी त्यांना लांबून दाखविले. दोघेही जवळ येताच आपल्या वाहनावरून उतरले. श्रीवेंकटेशांनी भावीश्वशुरास वाकून नमस्कार केला. राजाने त्यांना उठवून क्षेमालिंगन दिले. उत्तम साहित्यांनी तेथेच चौरंग मांडून श्रीरंगाचे राजाने सीमांत पूजन केले. सर्व मंडळी लग्न मंडपाकडे निघाली. नारायणपुरातील लोकांना श्रीभगवंताला पाहून फार आनंद व समाधान वाटले व सर्वजण पद्मावतीच्या भाग्याची प्रशंसा करू लागले.

मंडपात येताच भगवंतांनी सर्वजण भुकेलेले पाहून भोजनाची व्यवस्था करण्यास राजाच्या भावास सांगितले. उत्तम सर्व पदार्थांनी सर्वांची भोजने झाली. सर्वांची रात्री निद्रा झाल्यावर दुसरे दिवशी सकाळी विवाहाच्या पूर्वीची सर्व तयारी व सर्व वैदिक विधी पार पडले. लग्नाचा मुहूर्त रात्री असल्याने पुनः सर्वांची भोजने झाली. आवश्यक ती वधुवरांकडील मंडळीतेवढी उपोषित राहिली. धरणी देवींनी येऊन भगवंताचे प्रेमाने पूजन केले. देवाचे सौंदर्य पाहून धरणी देवीस फार आनंद झाला. तिने भगवंताना आपल्या हाताने तेल हळद लावली.

नंतर सर्वजण लग्न मंडपाकडे निघाले. ती मिरवणूक फार मोठी व सुंदर होती. वाद्यांचा गजर, दारूकाम, लवाजमा वगैरे सर्व साहित्यपूर्ण चाललेली ती मिरवणूक पाहून नारायणपुरातील लोक संतुष्ट झाले.

विवाह मंडपात जाताच राजाने सर्वांस यथायोग्य आसनावर बसविले. सर्वांचे प्रेमभराने स्वागत केले. मध्यभागी श्रीवेंकटेशास बसवून मधुपर्कपूजा केली. वस्त्राभरणे सर्व वैभव भगवंतास अर्पण केले. वाङनिश्चय झाला.

इकडी पद्मावतीही सर्व वस्त्राभरणे धारण करून विवाहमंडपात आली. अन्तःपट धरला गेला. सर्वांना सावध होण्याचा इशारा देऊन मंगलाष्टके सुरू झाली. उभयतांच्या मस्तकी सर्वांनी मंगलाक्षता टाकताच वाद्यांचा मोठा गजर झाला. राजाने दक्षिणेस भांडारखाना उघडून दिला. श्रीभगवंतास आकाशराजाने रत्‍नखचित सुवर्णमुकुट दिला. अनेक प्रकारचे वैभव दिले. भगवंतांनी पद्मावतीच्या मस्तकावर आपल्या हातांनी अक्षता घालून वरदहस्त तिच्या मस्तकावर ठेविला. उभयतांच्या कडील पुरोहितांनी दोघांचेही गोत्रोच्चार करून कन्यादान करविले. मंगळसूत्र बांधणे, लाजाहोमादि सर्व विधी झाल्यावर वधूवर व इतर लोकांची भोजने झाली. त्यावेळीही फार मोठे समारंभ उत्साहपूर्वक झाले. स्त्रियांनी उटणी खेळण्याचाही कार्यक्रम भगवंताकडून घेतला. चार दिवस लग्न सोहळा झाल्यावर पद्मावतीस पाठविण्याच्या वेळी सर्वांना फार दुःख झाले. धरणी देवीने एक महिनाभर राहावे असा आग्रह केला. भगवंतांनी सर्वांचा प्रेमाने निरोप घेऊन जाण्याचे ठरविले. आपापल्या वाहनावर बसून सर्व देव निघाले पोचविण्यास येणार्‍यांनी भगवंतांनी प्रेमाने निरोप दिला. भगवंतांनी आकाशराजास वंदन केले. त्यांनी आशीर्वाद दिला.

लग्न झाल्यावर सहा महिने पर्वतावर चढावयाचे नाही म्हणून भगवंतांनी सुवर्णमुखरी पाशी राहण्याचे ठरविले. तेथे अंगिरस ऋषींच्या आश्रमाजवळ एक मंदिर बांधविण्यात आले भगवान तेथे राहू लागले. सर्व देव आपापल्या ठिकाणी परत गेले. या ग्रंथाच्या वाचनपठणाने सर्वांच्या सर्व इच्छा परिपूर्ण होतात. श्रीभगवंताच्या आणखी काही लीला आपण पुढील १।२ अध्यायात पाहू.

श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ॥ ॐनमो श्रीगुरुचिद्धनानंदा ॥ करुणासागरा श्रीगोविंदा ॥ भक्तवत्सला आनंदकंदा ॥ जगद्वंद्या श्रीहरी ॥१॥

क्षीराब्धिवासा दीनदयाळा ॥ कामातकध्येय त्रिभुवनपाळा ॥ कमळोद्भवजनका तुझी लीळा ॥ वर्णवेल कोणासी ॥२॥

वाढ किती आहे गगन ॥ करवेल एक वेळा गणन ॥ खोल किती मेदिनीवसन ॥ हेही अंत पाहवेल ॥३॥

पृथ्वीवर तृणांकुर किती ॥ हेही गणवेल रमापती ॥ रजःकण किती महीवरुती ॥ गणवेल श्रीपती एकदा ॥४॥

हे असाध्यचि सर्व बोलणे ॥ साधतील करिता प्रयत्‍ने ॥ परी जगद्वंद्या तुझे गुण ॥ कोणाचेनि न वर्णवे ॥५॥

निगम राहिले तटस्थ ॥ शेषाचेनि न वर्णवित ॥ नेति नेति म्हणोनि भोगिनाथ ॥ शय्या जाहला शेवटी ॥६॥

चतुर्मुख तुझा बाळ ॥ त्यासि ही अंत न कळे ॥ सहस्त्रवर्शे कमळनाळ ॥ उतरता बहुत शीणला ॥७॥

व्यास वाल्मीकांची मती ॥ वर्णिता खुंटली जगत्पती ॥ थोरथोरांची ऐशी गती ॥ मी अल्प मति केवि वर्णू ॥८॥

मक्षिका स्वपक्षे करोन ॥ पर्वत केवि उडवील गहन ॥ वृश्चिक स्वपुच्छे करोन॥ तोडील केवी वज्राते ॥९॥

ऊर्णनाभी स्वतंतूने ॥ कैसा बांधील मत्तवारण ॥ तैसे वेंकटेशा तुझे गुण ॥ माझेनि कैसे वर्णवेल ॥१०॥

जगद्वंद्या वेदसारा ॥ अखिल अद्वया निर्विकारा ॥ तुझी लीला विश्वंभरा ॥ तूचि बोले रसाळ ॥११॥

शुकाश्रमी तापसभोजन ॥ प्रीतीने करोनि नारायण ॥ निजभारेसि मनमोहन ॥ निघता झाला गजरेसी ॥१२॥

गत कथाध्यायाचे शेवटी ॥ इतुकी कथा जाहली गोमटी ॥ पुढील कथा कर्णपुटी ॥ श्रोते साठवा प्रीतीने ॥१३॥

इकडे नारायणपुरात ॥ काय जाहला वृत्तांत ॥ नवमी दिवसी नृपनाथ ॥ अष्टवर्गासि आरंभिले ॥१४॥

स्नेहहरिद्रा लावून ॥ करविले नवरीसी मज्जन ॥ राव करे मंगलस्नान ॥ धरणीदेवी समवेत ॥१५॥

राजद्वारी वाद्यगजर ॥ मंडप उभारिलासे विचित्र ॥ मिळाले बहुत धरामर ॥ शापानुग्रह समर्थजे ॥१६॥

राये अष्टवर्ग करोन ॥ मंडपदेवतास्थापन सूर्य पावला अस्तमान ॥ इतुके कार्य जाहले ॥१७॥

आनंदमय असता नृपती ॥ चार जावोनि रायासि वंदिती ॥ म्हणती उठाहो शीघ्रगती ॥ वैकुंठपती जवळी आले ॥१८॥

ऐसे ऐकता उत्तर ॥ आनंदे दाटला नृपवर ॥ म्हणे निघावे आता समग्र ॥ सामोरे सत्वर जाऊ पै ॥१९॥

सिद्धकरोनी दळभार ॥ गज अश्व आणि रहंवर ॥ नगरलोक समग्र ॥ श्रृंगारिले ते काळी ॥२०॥

नारायणपुरींची मंदिरे ॥ अवघी श्रृंगारिली ॥ एकसरे ॥ चंदनसडा देवोनि परिकर ॥ तोरणे बांधिली स्थळी स्थळी ॥२१॥

नगरीच्या सर्वसुवासिनी ॥ पद्मावतीच्या सख्या साजणी ॥ वस्त्राभरणी सिद्ध होवोनी ॥ निघत्या जाहल्या सत्वर ॥२२॥

तंत वितंत सनसुस्वर ॥ चतुर्विध वाजती वाद्यगजर ॥ निजभारेसी आकाशनृपवर ॥ निघता जाहला तेधवा ॥२३॥

श्रृंगारोनि एक हस्ती ॥ त्याजवरी बैसविली पद्मावती ॥ जीचिया मुखावरोनी निश्चिती ॥ कोटीकाम वोवाळिजे ॥२४॥

असो ऐसे गजरे करोन ॥ सामोरा निघाला वेगे करून ॥ केव्हा होईल दर्शन ॥ ऐसे जाहले नृपासी ॥२५॥

सहस्त्रवधी दीपिका निर्धारी ॥ पाजळिल्या सैन्यामाझारी ॥ मंगलवाद्ये नानापरी ॥ वाजो लागली एकसरे ॥२६॥

असो ऐशा गजरेसी ॥ राजा निघाला वेगेसी ॥ तो देवभारेसी ह्रषीकेशी ॥ तिकडोनिया येतसे ॥२७॥

सुरभूसुरांचे भार ॥ दिसतो जैसा क्षीरसमुद्र ॥ मध्यभागी जगदुद्धार ॥ गरुढारूढ येतसे ॥२८॥

कोठे आहे वेंकटेश ॥ नृपासि नये प्रत्ययास ॥ मग विचार करोनि सावकाश ॥ दृष्टीने निरखोनि पहातसे ॥२९॥

कोट्यानकोटी दीपिका ॥ सेनेत पाजळिल्या सुरेखा ॥ सावचित्त नृपनायक ॥ पाहता जाहला ते काळी ॥३०॥

पुढे चाले पायदळ ॥ रक्तवस्त्रे मिरवती सकळ ॥ परी ते दिसे केवळ स्थूळ ॥ तेथे गोपाळ नसेची ॥३१॥

त्यामागे श्वेत अश्वभार ॥ सूक्ष्म भासे दिसे मनोहर ॥ परी त्यात न दिसे इंदिरावर ॥ राजविचार करी पुढे ॥३२॥

त्यामागे गज उन्मत्त ॥ कृष्णवर्ण दिसती जैसे पर्वत ॥ कारणरूप उन्नत ॥ कमळानाथ नसे तेथे ॥३३॥

तया मागे रहंवर ॥ वरी आरूढले हरीचे वीर ॥ नीलवर्ण घोडे सुंदर ॥ जुंपिले असती तयासी ॥३४॥

पाहता परम दैदीप्यमान ॥ जवळी दिसे हरिप्राप्ति चिन्ह ॥ अनुहत वाद्यांचे गजर गहन ॥ सावधान नृप एके ॥३५॥

त्यामागे पाहे विलोकून ॥ तेथे पाहता वाटे उन्मन ॥ अष्टदिशेसी विराजमान ॥ अष्टदिक्पाळ असती पै ॥३६॥

ब्रह्म आणि रुद्र ॥ दोन्ही भागी दिसती परिकर ॥ मध्यपीठी जगदुद्धार ॥ श्रीमनोहर देखिला ॥३७॥

साधनकरिती साधन नर ॥ अकस्मात होय साक्षात्कार ॥ तैसा एकाएकी कमळावर ॥ नृपवरे दृष्टी देखिला ॥३८॥

चतुर्भुज श्यामसुंदर ॥ गळा वैजयंती मनोहर ॥ मुकुटमंडले मकराकार ॥ मदनमनोहर भासतसे ॥३९॥

जैसा पूर्णिमेचा चंद्र ॥ तैसे प्रकाशमान दिसे छत्र ॥ दोही बाही चामर ॥ मृगांक वर्ण दिसती ॥४०॥

कोटिसूर्या समान ॥ प्रभा दिसे दैदीप्यमान ॥ तडित्प्राय पीतवसन ॥ नेसलासे जगदात्मा ॥४१॥

ऐसा एकाएकी भूपाळे ॥ दृष्टी पाहिला तमाळनीळ ॥ सद्गदित जाहला नृपाळ ॥ अष्टभावे दाटला ॥४२॥

म्हणे पद्मावतीचे भाग्य साचार ॥ नवरा मिळाला भुवनसुंदर ॥ याचे रूप पाहता मनोहर ॥ कोटिकाम वोवाळिजे ॥४३॥

असो तिकडे जगज्जीवन ॥ नृपभार येता देखोन ॥ नारदाप्रती नारायण ॥ पुसता काय जाहला ॥४४॥

हरि म्हणे येति बहुजन ॥ त्यात आकाशराज तो कोण ॥ त्वरित दाखवी मजलागून ॥ ब्रह्मनंदना आतांची ॥४५॥

नारद म्हणे नृपवर ॥ दीर्घबाहू दिसे परिकर ॥ दीर्घश्मश्रु अश्वरहंवर ॥ अवघे दीर्घ दिसतसे ॥४६॥

ऐसे बोले नारद साचार ॥ समीप जाहले दोनीभार ॥ रथाखाली आकाश नृपवर ॥ उतरता जाहला ते काळी ॥४७॥

जवळी देखोनि राजेश्वर ॥ गरुडाखाली उतरला श्रीधर ॥ श्वशुरालागी जगदुद्धार ॥ वंदिता जाहला तेधवा ॥४८॥

सम्मुख पाहता घनश्याम ॥ रायासि नावरे तदा प्रेम ॥ कंठी मिठी घालोनि परम ॥ दृढ आलिंगन दीधले ॥४९॥

सोडावयासी मागुती ॥ ऐसे न वाटे रायाचे चित्ती ॥ म्हणे अंत नाही भाग्याप्रती ॥ जावई श्रीपति जोडला ॥५०॥

मग तेथेचि मांडोनिया चौरंग ॥ वरी बैसविला रमारंग ॥ सीमंत पूजन सवेग ॥ करिता जाहला नृपनाथ ॥५१॥

हरीचे चरण धुवोनी ॥ गंधपुष्पी अर्चिला ते क्षणी ॥ वस्त्राभरणे करोनी ॥ गौरविले हो हरीप्रती ॥५२॥

करिणीवरोनी पद्मावती ॥ चोरदृष्टीने पाहे हरीप्रती ॥ लज्जायमान झाली चित्ती ॥ जगदात्मयासी पाहता ॥५३॥

मना म्हणे सुंदरी ॥ मदनमोहन मूर्ति साजिरी ॥ कोटिकंदर्प मुखावरी ॥ वोवाळोनि टाकावे ॥५४॥

माझे भाग्य परिपूर्ण ॥ नवरा जोडला नारायण ॥ देह गेह विसरोन ॥ गेली तेव्हा सुंदरी ॥५५॥

नारायणपुरिचे जन ॥ तन्मय जाहले हरीसि पाहून ॥ म्हणती अंत नाही परिपूर्ण ॥ भाग्य पद्मावतीचे ॥५६॥

असो करोनी सीमंतपूजन ॥ मिरवत चालिले संपूर्ण ॥ गरुडावरी आरोहण ॥ करिता जाहला श्रीहरी ॥५७॥

मंगळतुरे अपार ॥ वाजो लागले एकसर ॥ चतुरर्विध वाद्यनाद परिकर ॥ नभोदरी न समाये ॥५८॥

लक्षानुलक्ष तैलदीप ॥ पाजळिले त्यांचे तेज अमूप ॥ पुष्पवृष्टि करिती विष्टप ॥ वारंवार ते काळी ॥५९॥

असो ऐसे मिरवत ॥ चालिले नारायणपुरात ॥ नगरलोक पहावयासी धावत ॥ मंडप घसणी होतसे ॥६०॥

नगरींच्या अवघ्या सुवासिनी ॥ पाहती गोपुरावरी चढोनी ॥ पुष्पांजळी समर्पूनी ॥ वोवाळिती रत्‍नदीप ॥६१॥

पाहोनि श्रीहरीचा वदनचंद्र ॥ भुलोनि गेले जननयनचकोर ॥ म्हणती एवढा पुरुषसुंदर ॥ कोठेचि देखिला नव्हता पै ॥६२॥

नानापरी उत्साह करित ॥ गेले मंडपा परियंत ॥ जे विश्वकर्मा निर्मित ॥ तेथे जावोनि उतरले ॥६३॥

पाच घटिका जाहली रात्र ॥ मंडपासि पावला राजीवनेत्र ॥ तोंडमानासी नीळगात्र ॥ काय बोले तेधवा ॥६४॥

सर्वजन झाले क्षुधाक्रांत ॥ देवऋषिआदि समस्त ॥ पाकसिद्धी करोनि त्वरित ॥ भोजन आधी देइजे ॥६५॥

ऐसे ऐकताचि वचन ॥ बोले तेव्हा तोंडमान ॥ हरी तुझी आज्ञा प्रमाण ॥ सिद्धकरितो आताचि ॥६६॥

तात्काळ पाकसिद्धी करून ॥ पात्रे मांडिली न लगता क्षण ॥ हरिआज्ञे सर्वजन ॥ भोजनासी बैसले ॥६७॥

निर्मिले षड्रस पक्वान्न ॥ साठी शाखा सुवास गहन ॥ नानाप्रकार भक्षपूर्ण ॥ वाढिते जाहले ते काळी ॥६८॥

दधि मधु घृत क्षीर ॥ वाढिते जाहले अपार ॥ भोजन कर्त्यासि सुवास नीर ॥ वारंवार पुरविती ॥६९॥

असो देव आणि ऋषिगण ॥ स्त्रिया आदि थोर लहान ॥ भोजनविधी संपादोन ॥ शयन केले रात्रीमाजी ॥७०॥

शुद्ध दशमी शुक्रवार ॥ उदयाद्रीवरी आला दिनकर ॥ अभ्यंगस्नान श्रीकरधर ॥ करिता झाला तेधवा ॥७१॥

मग वैश्रवणासी पाचारोन ॥ आज्ञा देत लक्ष्मीरमण ॥ तुवा राजमंदिरासी जावोन ॥ इतुकेच निरोप सांगावे ॥७२॥

रात्री घटिका त्रयोदश ॥ मुहूर्त असे अतिविशेष ॥ याकरिता देवऋषि सर्वांस ॥ भोजन आधी देइजे ॥७३॥

कमळा आणि कमळासन ॥ माता बकुला पुरोहितपूर्ण ॥ मजसहित पाचजण ॥ उपोषित असो द्या ॥७४॥

वधूपत्‍नी सहित नृपवर ॥ पुरोहित आणि राजपुत्र ॥ ऐसे दहा वेगळे सर्वत्र ॥ भोजनविधी सारावे ॥७५॥

लग्न जाहलिया ब्रह्मभोजन ॥ रात्रीमाजी करावे जाण ॥ ऐसे नृपवरासी सांगोन ॥ शीघ्र येई आतांची ॥७६॥

अवश्य म्हणोनी नरवाहन ॥ जाता जाहला न लगता क्षण ॥ हरि आज्ञा नृपती लागून ॥ श्रुत करिता जाहला ॥७७॥

संतोषोनी धरणीपाळ ॥ पाकसिद्धि करवी तात्काळ ॥ ऋषिराजे देव दिक्पाळ ॥ किन्नरगंधर्व सर्वही ॥७८॥

स्त्रिया वृद्ध बाळ तरुण ॥ सर्वजनी केले भोजन ॥ नानारसपक्वान्न ॥ जेवोनि तृप्त जाहले ॥७९॥

सायंकाळचे अवसरी ॥ वर आणावया निर्धारी ॥ निजभारेसि ते अवसरी ॥ आकाशराव निघाला ॥८०॥

बंधु सोयरे आप्तजन ॥ पुत्रमित्र आदिकरोन ॥ सर्वस्त्रियांशी आपण ॥ धरणीदेवी निघाली ॥८१॥

श्रृंगारुनि ऐरावत ॥ नानाआभारण मंडित ॥ रत्‍नकंबळ चौरडोलयुक्त ॥ चामरे डोलत उभयकर्णी ॥८२॥

वरासि बैसावया निश्चित्त ॥ सिद्धकरोनि घेतला त्वरित ॥ नानावाद्ये वाजवित ॥ गजरे करोनी पातला ॥८३॥

सर्वांसहित राजेश्वर ॥ प्रवेशता जाहला हरिमंदिर ॥ जे विश्वकर्मानिर्मित मनोहर ॥ पाहता आल्हाद होतसे ॥८४॥

सकळसुरवरा समवेत ॥ सभेसि बैसला वैकुंठनाथ ॥ ऋषींची मांदी समस्त ॥ सभोवते बैसली ॥८५॥

कश्यप अत्रि विश्वामित्र ॥ भरद्वाज वसिष्ठ पवित्र ॥ जमदग्नि दधीची कण्व निर्धार ॥ हरी भोवते बैसले ॥८६॥

मध्यभागी श्रीनिवास ॥ रत्‍नकांबळ्यावरी जगदीश ॥ बैसला असे आदिपुरुष ॥ आकाशनृपनाथे देखिला ॥८७॥

नृपति आला देखोन ॥ काय बोले जगन्मोहन ॥ काय कारण कल्पून ॥ जाहले आगमन तुमचे ॥८८॥

तुम्ही वडील राजेश्वर ॥ कासया आला एथवर ॥ मग बोले नृपवर ॥ हरीप्रती ते काळी ॥८९॥

राव म्हणे जगज्जीवना ॥ ब्रह्मांडनायका मधुसूदना ॥ त्रिभुवन व्यापका जनार्दना ॥ सहज आलो दर्शनात ॥९०॥

मग आपुलिया कांतेप्रती ॥ आज्ञापिता जाहला नृपती ॥ पूजन करावे श्रीपतीप्रती ॥ अरुंधती समवेत ॥९१॥

रत्‍नजडित मांडिला चौरंग ॥ वरी बैसवूनी श्रीरंग ॥ हरिद्रामिश्रित सुरंग ॥ सुगंधतैल आणिले ॥९२॥

हरीपूजना लागूनी ॥ सर्वस्त्रिया सहित नृपकामिनी ॥ जवळी आली तेवि क्षणी ॥ वदन न्याहळिती श्रीहरीचे ॥९३॥

सुहास्य मुख श्यामसुंदर ॥ मुगुट कुंडले मकराकार ॥ कौस्तुभ वैजयंती मनोहर ॥ कंठी शोभती साजिरी ॥९४॥

अंगी केशराची उटी ॥ कस्तूरीतिलक दिसे ललाटी ॥ मदनमनोहर मूर्ति गोमटी ॥ पाहता धणी न पुरेची ॥९५॥

कोट्यानकोटी मीनकेतन ॥ ओवाळोनी टाकावे नखावरून ॥ सूर्यकोटी तेजगहन ॥ पाहता मनविस्मित ॥९६॥

धरणीदेवी मनी भावित ॥ अनंतजन्मीचे पुण्य अद्भुत ॥ एकदाचि फळा आले समस्त ॥ जामाता श्रीहरी जाहला ॥९७॥

आजन्मवरी ऐसा सुंदर ॥ देखिला नव्ह्ता मनोहर ॥ पद्मावतीचे भाग्य परिकर ॥ अंत नाहींचि सर्वथा ॥९८॥

धरणीदेवी आनंदाने ॥ हरिद्रातेल लावोन ॥ चरणांसि करी मर्दन ॥ मळकाढीत स्वहस्ते ॥९९॥

सुगंध अंगी चर्चून ॥ पुष्पमाळा घातल्या जाण ॥ रत्‍नालंकारे करोन ॥ जगन्मोहन पूजिला ॥१००॥

निघाले सर्वसभाजन ॥ गजारूढ जाहला जगज्जीवन ॥ कश्यपात्रि आदिकरून ॥ ऋषीश्वर निघाले ॥१॥

तेहतीसकोटी देव समग्र ॥ वाहनारूढ जाहले सत्वर ॥ पार्वती आदि स्त्रिया सर्वत्र ॥ निघत्या जाहल्या तेचि क्षणी ॥२॥

देवऋषिभार समवेत ॥ जगन्निवास चालिल मिरवत ॥ सव्यभागी उमाकांत ॥ वामभागी कमळोद्भव ॥३॥

जैसा शरत्काळींचा द्विजवर ॥ तैसे हरिवरी विराजे छत्र ॥ मृगांकवर्ण चामरे सुंदर ॥ दोही भागी ढाळिती ॥४॥

कोट्यानुकोटी तैलदीपिका ॥ पाजळिल्या हरिसमुखा ॥ वाद्ये वाजती अनेका ॥ नादे नभ भरियेले ॥५॥

अष्टदिक्पाळ सवे चालती ॥ भाट यदुवंश वाखाणिती ॥ मकरबिरुदे पुढे शोभती ॥ आनंदे गर्जती बंदीजन ॥६॥

अग्निऔषधी चित्रविचित्र ॥ नळ्या हवाया भरती अंबर ॥ चंद्रज्योती चंद्राकार ॥ प्रभा दिसती साजिरी ॥७॥

अष्टनायकांचे नृत्यविशेष ॥ किन्नरगंधर्व गातीसुरस ॥ नारायणपुरीचे जनांस ॥ धणी पाहता पुरेना ॥८॥

नगर श्रॄंगारिले एकसरे ॥ तोरणे बांधिली चित्रविचित्रे ॥ चंदनसडे परिकर ॥ बिंदोबिंदीसी दिधले ॥९॥

गोपुरावरी नरनारी ॥ रत्‍नदीप घेऊनि करी ॥ वोवाळिती सुंदरी ॥ पुष्पांजळी समर्पिती ॥११०॥

पाहता श्रीमुख चांगले ॥ स्त्रियासर्वही भूलोनि गेल्या ॥ म्हणती पद्मावतीचे भाग्यवहिले ॥ अंत नाही पाहता ॥११॥

स्वसेनेशी आकाशराज ॥ समागमे चाले तेजःपुज ॥ श्रीहरीचे मुखांबुज ॥ वारंवार पाहतसे ॥१२॥

धडकत दुंदुभीचे ध्वनी ॥ वृंदारक सुमने वर्षती गगनी ॥ ऐसा मिरवत चक्रपाणी ॥ मंडपद्वारासि पातला ॥१३॥

तो तोंडमानाची कामिनी ॥ कुंकुमोदक घट घेवोनी ॥ हरिसम्मुख येवोनि ॥ केले पूजन प्रेमभावे ॥१४॥

ओवाळणी सांडून ॥ नेत्रांसि लाविले जीवन ॥ राये तात्काळ पशु आणून ॥ बलिदान दीधले ॥१५॥

मग सर्वदेवांसमवेत ॥ मंडपी प्रवेशला जगन्नाथ ॥ त्या मंडपाची शोभा अद्भुत ॥ न वर्णवेची सर्वथा ॥१६॥

स्फटिकशिळा दैदीप्यमान ॥ त्याचे साधिले मंडपांगण ॥ सुवर्णस्तंभशोभायमान ॥ ठायी ठायी उभविले ॥१७॥

नानारत्‍नमणियुक्त ॥ मंडप केलाशोभिवंत ॥ मुक्तजालंधर विराजित ॥ चहूकडे सोडिल्या ॥१८॥

अहोरात्र झगझगित ॥ दिवसनिशी न कळे तेथ ॥ पाहता मन तन्मय होत ॥ कर्तव्य विचित्र पाहोनिया ॥१९॥

असो ऐसिया मंडपात ॥ प्रवेशला वैकुंठनाथ ॥ जो देवाधिदेव समर्थ ॥ तात कमळोद्भवाचा ॥१२०॥

मध्यमंडपी विचित्र ॥ शोभायमान केला बैसाकार ॥ चहूंकडोनी परिकर ॥ कर्दळी स्तंभ उभविले ॥२१॥

तेथे मांडोनी चवरंग ॥ वरी बैसविला भक्तभवभंग ॥ ब्रह्मादि देव सवेग ॥ हेमासनी बैसविले ॥२२॥

अठ्याऐंही सहस्त्रऋषीश्वर ॥ त्रिदशांसहित अमरेंद्र ॥ आणि पृथ्वीचे राजेश्वर ॥ यथावकाशे बैसविले ॥२३॥

पार्वती सावित्री सरस्वती ॥ गायत्री शची अरुंधती ॥ आदि करोनी देवयुवती ॥ तया मंडपी बैसविल्या ॥२४॥

मग शास्त्रप्रमाणे करून ॥ राव करी मधुपर्कपूजन ॥ पुढे कनकपात्र ठेविले पूर्ण ॥ हरिचरण धुवावया ॥२५॥

ज्याचे पदनखी निश्चिती ॥ उद्भवली असे भागीरथी ॥ तेचि चरण आकाश भूपती ॥ निजकरे करोनी स्पर्शिले ॥२६॥

चरण धूतसे नृपवर ॥ मनात आनंद वाटे फार ॥ धरणीदेवी घाली नीर ॥ कनकझारी घेवोनिया ॥२७॥

पाद प्रक्षाळोनी ते नीर ॥ मस्तकी वंदी राजेश्वर ॥ आपुले कुटुंब पशु कोश समग्र ॥ प्रक्षाळिले पादोदके ॥२८॥

मनात भावी नृपनाथ ॥ मी भाग्याचा होय अत्यंत ॥ मजसमान त्रिभुवनात ॥ सभाग्य नसे दूसरा ॥२९॥

असो वस्त्राभरणे करोन ॥ गौरविला हो जगन्मोहन ॥ जो पुरुषशुद्ध चैतन्य ॥ आनंदघन जगदात्मा ॥३०॥

जो वेदांचा निर्मिता यथार्थ ॥ त्यासि विप्र घालिती यज्ञोपवित ॥ माया वेषधारी जगन्नाथ ॥ लौकिकार्थ संपादितसे ॥३१॥

जो मायेचा निर्मिता होय ॥ ब्रह्मादिक वंदिती ज्याचे पाय ॥ त्याहाती करविती वाङ्गनिश्चय ॥ यथान्याये करोनिया ॥३२॥

लग्नघटिका आलि जवळी ॥ तव ते श्रृंगार सरोवरमराळी ॥ पद्मावती आकाशबाळी ॥ वस्त्राभरणे गौरविली ॥३३॥

अंतःपट धरिले त्वरित ॥ देशिक सर्वासि सावधकरित ॥ म्हणे वादविवाद टाकोनि समस्त ॥ सावध व्हावे सर्वाही ॥३४॥

राव जावोनी झडकरी ॥ जो सौंदर्यसागरींची लहरी ॥ तिसी कडिये घेऊनि निर्धारी ॥ नृपवर वेगेसि पातला ॥३५॥

मंगळाष्टके विप्र बोलती ॥ म्हणती जयजयाजी लक्ष्मीपती ॥ सुखदायका वैकुंठपती ॥ करी कल्याण सर्वदा ॥३६॥

हरि नारायणा केशवा ॥ मुकुंदा अच्युता कमळाधवा ॥ शेषशायी करुणार्णवा ॥ मंगळदायका तूचि पै ॥३७॥

ऐसे विप्र अष्टक बोलता ॥ तो अंतःपट फिटला तत्वता ॥ सर्वजनही लग्नाक्षता ॥ टाकिते जाहले वधूवरांवरी ॥३८॥

धडकत वाद्यांचा गजर ॥ नादे कोंदले पुष्कर ॥ देव वर्षती सुमनसंभार ॥ जयजयकार जाहला ॥३९॥

भांडार फोडोनी नृपनाथे ॥ दक्षिणा दिधली अपरिमित ॥ पुरे पुरे हेचि मात ॥ याचक सर्व बोलती ॥१४०॥

वरदक्षिणेसी भांडार ॥ अर्पिता जाहला राजेश्वर ॥ हेममय मुकुटसुंदर ॥ रत्‍नखचित दीधले ॥४१॥

अश्वकुंजर रहंवर ॥ दासदासी दीधल्या अपार ॥ रत्‍नराशि परिकर ॥ आंदण दीधले जामाता ॥४२॥

मंत्राक्षता घेऊनि जगन्नाथ ॥ पद्मावतीचे मस्तकी घालित ॥ तोचि शिरी ठेविला वरदहस्त ॥ अक्षय कल्याण दायक जो ॥४३॥

देवाचार्य येवोनि सत्वर ॥ करी वधूकडील गोत्रोच्चार ॥ अत्रि गोत्री उद्भवली साचार ॥ प्रपौत्री सुधर्म रायाची ॥४४॥

सुशर्मरायाची पौत्रीहोय ॥ आकाशराजपुत्री निश्चय ॥ पद्मावती नाम कन्यास्वये ॥ अंगीकारी नारायणा ॥४५॥

मग वराकडील पुरोहित ॥ वसिष्ठ ऋषि उच्चारकरित ॥ ययाति राजा विख्यात ॥ होय प्रपौत्र तयाचा ॥४६॥

शूरसेनाचा पौत्र ॥ वसुदेवाचा होय पुत्र ॥ वसिष्ठ गोत्रोद्भव साचार ॥ श्रीवेंकटेश नाम साजे ॥४७॥

ऐसे उच्चार करून ॥ केले यथाविधी कन्यादान ॥ मग आत्महस्ते नारायणे ॥ मंगळ सूत्र बांधिले ॥४८॥

वधूवरांचे करी द्विजवरे ॥ लग्न कंकण बांधिले साचार ॥ धडकत वाद्यांचा गजर ॥ आनंद थोर होतसे ॥४९॥

वसिष्ठ म्हणे श्रीहरी ॥ पद्मावतीसी घेऊनि कडेवरी ॥ चाल आता बोहल्यावरी ॥ लाजाहोम करावया ॥१५०॥

हासोनी बोले श्रीपती ॥ म्हणे प्रपंचाची विपरीत गती ॥ तो सावित्री म्हणे जगत्पती ॥ घेई आधी कडेवरी ॥५१॥

हासोनि बोलती सर्वजन ॥ हा मुळींचा अभ्यास असेलपुर्ण ॥ आता लाजावया कायकारण ॥ ऐकोनि नारायण हासतसे ॥५२॥

मग पद्मावतीस उचलोन ॥ घेऊन चालिला जगज्जीवन ॥ बोहल्यावरी जाऊन ॥ लाजाहोम आरंभिला ॥५३॥

यथासांग सप्तपदी ॥ शास्त्रप्रमाणे देवविधी ॥ करिता झाला कृपानिधी ॥ अंतरपदो नेदीच ॥५४॥

तो इतक्यात अंतरगृही ॥ पाकसिद्धि जाहली पाही ॥ भोजनालागी लवलाही ॥ पात्रे मांडिली सत्वर ॥५५॥

विचित्ररंगमाळा घालून ॥ सुवर्णपाट मांडिले समसमान ॥ जडित अडणियातळी ठेवून ॥ कनक ताटे मांडिली ॥५६॥

पात्राप्रती कनक झारिया ॥ माजी सुगंधतोय भरूनिया ॥ ठेविल्या असे जडित समया ॥ रत्‍नदीपलावोनिया ॥५७॥

जो जगदात्मा आदिनारायण ॥ तेथे कोणता पदार्थ नव्हे न्यून ॥ अष्टसिद्धी राबती पूर्ण ॥ हरिइच्छे करुनिया ॥५८॥

जेथे सहाय्यकर्ता श्रीधर ॥ काय वर्णावा तेथील विस्तार ॥ असो देवऋषि राजे सर्वत्र ॥ भोजनालागी बैसले ॥५९॥

पद्मावतीसहित सर्वोत्तम ॥ करी स्त्रियायुक्त भोजन ॥ त्यापंक्तीत मुख्यवराढिण ॥ बैसल्या कोण ऐकापे ॥१६०॥

बकुला लक्ष्मी सावित्री पार्वती ॥ गायत्री आणि सरस्वती ॥ शची आणि अरुंधती ॥ आदिकरोनि सर्वही ॥६१॥

दोन्ही भागी बैसल्या कामिनी ॥ पद्मावतीसहित चक्रपाणी ॥ मध्यभागी तेचि क्षणी ॥ भोजनालागी बैसले ॥६२॥

रजत शुभ्रवर्ण केवळ ॥ तैसा भात वाढिला निर्मळ ॥ सुवर्णनग पिवळे ॥ तैसे वरान्न दिसतसे ॥६३॥

सुवासकर पाच परमान्न ॥ शाखा निर्मिल्या पूर्ण ॥ दधि मधु घृत क्षीर जाण ॥ पाटचि तेथे लोटले ॥६४॥

मांडे बुंदी अनारसे ॥ फेण्या आणि गुळोर्‍या सुरस ॥ केशर कस्तुरीयुक्त सुवास ॥ घवघवीत शोभती ॥६५॥

जिलब्या आणि मोतीचूर ॥ बेसनदळ आणि घेवर ॥ नानापरिच्या कोशिंबिर ॥ मनोहर वाढिल्या असे ॥६६॥

असो नानाप्रकारे पक्वान्न ॥ निर्मिलेते न वर्णवे पूर्ण ॥ ज्या अन्नालागी जाण ॥ सुरगण लाळ घोटिती ॥६७॥

तो सावित्री ब्रह्मपत्‍नी ॥ बोले श्रीवेंकटेशालागूनी ॥ पद्मावतीचे वदनी ॥ ग्रास घाली स्वहस्ते ॥६८॥

अवश्य म्हणोनी श्रीपती ॥ परमान्न ग्रास घेवोनी हाती ॥ वधूचे मुखी जगत्पती ॥ घालिता जाहला तेधवा ॥६९॥

मग पद्मावती प्रती ॥ बोलत्या जाहल्या सर्वयुवती ॥ हरिमुखी शीघ्रगती ॥ ग्रासघाली सत्वर ॥१७०॥

आकाशरायाची बाळी ॥ परमसुकुमार चंपककळी ॥ ग्रास घेवोनी करकमळी ॥ उठोनि उभी राहिली ॥७१॥

वामहस्ते करोनि देख ॥ आवरिले श्रीहरीचे मस्तक ॥ सव्यकरी ग्रास देख ॥ वदनी घालीत तेधवा ॥७२॥

असो ऐसा आनंदयुक्त ॥ भोजनविधि सारिला समस्त ॥ मुखप्रक्षाळोनि यथार्थ ॥ विडे घेतले त्रयोदशगुणी ॥७३॥

सर्वजन जाहले तृप्त ॥ ब्राह्मणांसि दक्षिणा अमित ॥ देता जाहला नृपनाथ ॥ नव्हे गणती तयाची ॥७४॥

मग स्त्रिया सर्वही मिळोनी ॥ आरंभिले हळदी उटणी ॥ पद्मावती प्रति कामिनी ॥ बोलत्या जाहल्या ते काळी ॥७५॥

नाव घेऊनी वेगेसी ॥ हरिद्रा लावावी हरिमुखासी ॥ लज्जित पद्मावती मानसी ॥ अधोवदन राहिली असे ॥७६॥

मनी विचारी सुंदर ॥ हा नामरूपातीत अगोचर ॥ सर्वव्यापक परमेश्वर ॥ काय नाम ठेऊ याते ॥७७॥

परम सलज्ज सुकुमार ॥ शब्दू नये मुखाबाहेर ॥ हरिद्रा घेऊनि सत्वर ॥ हरिमुखासी लाविली ॥७८॥

स्त्रिया म्हणती विश्वंभरा ॥ नाव घेऊनी लावी हरिद्रा ॥ ऐकोनि हासे श्रीधर ॥ काय करिता जाहला ॥७९॥

हाती हरिद्रा घेऊनी ॥ म्हणे पद्मावती विशेष शाहणी ॥ मज अव्यक्ता लागूनी ॥ व्यक्तीस जिणे आणिले ॥१८०॥

ऐसे बोलोनि मोक्षदानी ॥ हरिद्रा लाविली तेचि क्षणी ॥ परमानंदे करोनी ॥ विडे तोडिती परस्परे ॥८१॥

मग घालोनि काचोळीसि गाठी ॥ हरीप्रती बोलती गोरटी ॥ सोडावी आता जगजेठी ॥ उठाउठी सत्वर ॥८२॥

हासोनि बोले श्रीपती ॥ लौकिकाची विचित्र गती ॥ मेहुणे हासोनि बोलती ॥ सोडी निश्चिती वेंकटेशा ॥८३॥

या गोष्टीचा अभ्यास ॥ पूर्वीच असे तुम्हास ॥ आता काही नलगे सायास ॥ सोडावया कारणे ॥८४॥

वेंकटेश पाहता निरखून ॥ गाठ सुटली न लगता क्षण ॥ जो मायानियंता नारायण ॥ नवल अद्भुत केले पै ॥८५॥

जो पाहतांची कृपादृष्टी ॥ सुटे अगाध मायागाठी ॥ जो पुराणपुरुष जगजेठी ॥ ऐका गोष्टी तयाची ॥८६॥

असो याचिप्रकारे करोन ॥ चार दिवसपर्यंत जाण ॥ नित्य उत्साह होतसे पूर्ण ॥ तो नवर्णवेची सर्वथा ॥८७॥

पाचवे दिवशी नृपवर ॥ साडेकरोनी सत्वर ॥ नानाप्रकारे आहेर ॥ समर्पिले सर्वही ॥८८॥

सद्गदित होऊनि अंतरी ॥ आकाशराज बोले निर्धारी ॥ पुत्रप्राय अजिवरी ॥ पालन केले कन्येचे ॥८९॥

आता अर्पिली तुजप्रती ॥ स्नेहे पाळी रमापती ॥ ऐसे बोलता रायाप्रती ॥ अश्रु नयनी पातले ॥१९०॥

धरणीदेवीचे नेत्रकमळी ॥ अश्रु श्रवती तये वेळी ॥ वसुदान तोंडमान तयेकाळी ॥ शोकाकुलीत जाहले ॥९१॥

ऐसे पाहोनि वैकुंठपती ॥ सद्गदित जाहला चित्ती ॥ समयाभिप्राय रमापती ॥ दाविता जाहला लौकिकी ॥९२॥

असो साडे जाहली यावरी जाण ॥ ऐरावतावरी नारायण ॥ पद्मावती सहित जगज्जीवन ॥ आरूढले ते तेकाळी ॥९३॥

धडकते वाद्यांचा ध्वनी ॥ मंगळतुरे वाजती तेक्षणी ॥ सर्वभारेसि चक्रपाणी ॥ निजमंडपासी चालिले ॥९४॥

यथाशास्त्र गृहप्रवेश ॥ नेले आपुल्या मंडपास ॥ धरणीदेवी विनवितसे ॥ हरीप्रती तेधवा ॥९५॥

एकमास पर्यंत ॥ एथेचि वास करावा यथार्थ ॥ एवढे आमुचे मनोरथ ॥ पूर्ण केले पाहिजे ॥९६॥

हरि म्हणे आहे कार्यार्थ ॥ आम्ही गमन करू यथार्थ ॥ तुम्ही पद्मावतीसि अर्पिले आम्हाते ॥ इतुकेन तृप्त असो आम्ही ॥९७॥

नाना प्रकार वस्तु बहुत ॥ जामातासि अर्पी नृपनाथ ॥ आज्ञा घेऊनि जगन्नाथ ॥ निघता जाहला ते काळी ॥९८॥

आपापले वाहनी बैसोन ॥ देवपाळ निघाले अवघेजण ॥ अठ्याऐंशी सहस्त्र ऋषिगण ॥ शिष्यांसहित निघाले ॥९९॥

गरुडावरी गरुडध्वज ॥ आरूढता जाहला अधोक्षज ॥ निजभारेसी आकाशराज बोळवीत जातसे ॥२००॥

मग तयाप्रती श्रीनिवास ॥ प्रार्थना करी आदिपुरुष ॥ तुम्ही परतावे आता नगरास ॥ परिवारेसि राजेश्वरा ॥१॥

जगद्वंद्य आपण ॥ वंदिले आकाशरायाचे चरण ॥ येरी देत आशीर्वचन ॥ यशवंत होय सर्वदा ॥२॥

असो आज्ञा घेऊनि तात्काळ ॥ स्वस्थानासि गेला नृपाळ ॥ निजभारेसी वैकुंठपाळ ॥ चालिला हो ते काळी ॥३॥

आले सुवर्णमुखरी पाशी ॥ श्रीहरी विचारी निजमानसी ॥ षण्मास पर्यंत निश्चयेसी ॥ वास एथे करावा ॥४॥

लग्न जाहलिया षण्मास ॥ पर्वतावरी न चढावे निःशेष ॥ याकरिता श्रीनिवास ॥ राहता जाहला तया स्थळी ॥५॥

अगस्तीआश्रमाजवळी साचार ॥ उभविले रत्नमय शिबिर ॥ तेथे राहिला जगदुद्धार ॥ पद्मावती समवेत ॥६॥

देवऋषि शिष्यांसहित ॥ वंदोनिया जगन्नाथ ॥ आपापले स्थानासि त्वरित ॥ जाते जाहले ते काळी ॥७॥

शचीसहित सहस्त्रनयन ॥ सावित्री सहित चतुरानन ॥ अपर्णेसहित नंदिवाहन ॥ जाते जाहले स्वस्थाना ॥८॥

आज्ञावंदोनी साचार ॥ करवीराशी गेली इंदिरा ॥ अगस्तीआश्रमी जगदुद्धार ॥ राहते झाले स्वइच्छा ॥९॥

वेंकटेशविजयग्रंथ ॥ हाचि केवळ शेषाद्रिपर्वत ॥ श्रीवेंकटेश साक्षात एथे वसे सर्वदा ॥२१०॥

भाविक यात्रेसि घेऊनि जाणा ॥ करिती पारायण प्रदक्षिणा ॥ वेंकटेशा त्यांचे जन्ममरण ॥ दूर करि निर्धारी ॥११॥

की वेंकटेशविजय रसायन ॥ भवरोगी सेवावे प्रीतीकरोन ॥ ते आरोग्य होऊनि न लगता क्षण ॥ वैकुंठधामा पावती ॥१२॥

ज्याचे घरी असेल हा ग्रंथ ॥ पिशाच भूत नरिघे तेथ ॥ सर्प व्याघ्र तस्कर त्याते ॥ बाधा करू न शकती ॥१३॥

हा अध्याय वाचिता त्रिकाळ ॥ त्याची संकटे निरसती सकळ ॥ भाविकी प्रचीत पहावी निर्मल ॥ नाही अभाविकाशी कारण ॥१४॥

नित्य एक आवर्तन यथार्थ ॥ हा अध्याय वाचे षण्मासपर्यंत ॥ दरिद्री लग्नार्थियाचि सत्य ॥ होईल लग्न निर्धारी ॥१५॥

जो का अभाविक खळ ॥ एथ अविश्वास मानी केवळ ॥ तो अल्पायुषी होईल तात्काळ ॥ त्याशी अधःपात सुटेना ॥१६॥

प्रचीत न पाहता यथार्थ ॥ उगेचि ग्रंथासि दोष ठेवित ॥ त्याशी न सुटे अधःपात ॥ कल्पपर्यंत निर्धारी ॥१७॥

जे श्रीहरीचे प्रियपात्र ॥ त्यांशी आवडे हा परमपवित्र ॥ त्यावरी कृपा अहोरात्र ॥ श्रीवेंकटेश करील पै ॥१८॥

जय सद्‌गुरु चिद्धनानंद ॥ महाराज स्वामी श्रीगोविंद ॥ त्याचे पदीचे मकरंद ॥ वीर षट्‌पद सेवीतसे ॥१९॥

इति श्रीवेंकटेशविजय ग्रंथ सुंदर ॥ समंत पुराण भविष्योत्तर ॥ श्रवण करोत पंडित चतुर ॥ दशमाध्याय गोड हा ॥२२०॥ एकंदर ओवीसंख्या ॥१७५५॥