श्री वेंकटेश विजय

वेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.


अध्याय ११ वा

श्री वेंकटेशाचा लग्न सोहळा दहाव्या अध्यायात सांगून झाल्यावर पुनः सूतांनी देवाचे चरित्र सांगण्यास सुरुवात केली. सूत म्हणाले, हे ऋषिजनहो श्रीभगवान अगस्तिऋषींच्या आश्रमापाशी येऊन राहिले असता त्या अरण्यास अपूर्व शोभा प्राप्त झाली. सर्व वृक्षलतादिक फळाफुलांने नित्य बहरून गेले होते. अशा आश्रमात देव पद्मावतीसह आनंदाने येऊन राहिले.

इकडे नारायणपुरात आकाशराजा उत्तम रीतीने राज्यकारभार करीत राहिला होता. तो एकाएकी फार मोठ्या रोगाने पिडला गेला. त्या रोगाने त्याचा मृत्युकाल जवळ येत चालला होता. दैवगती विचित्र असते. पुढे तो रोग इतका वाढला की, राजाची वाणी बंद झाली. चलनवलन थांबले. त्याला ऊर्ध्वश्वास सुरू झाला.

राजाचा आसन्नमरणकाल जवळ आला हे पाहून तोंडमान नावाच्या राजाच्या भावाने श्रीवेंकटेशाकडे दूत पाठविला, व त्वरित येण्याविषयी कळविले. दूताची बातमी ऐकताच देवी पद्मावती दुःखाने मूर्च्छित पडली. अगस्तीऋषींच्या पत्‍नीने थंड उपचाराने तिला सावध केले. श्रीवेंकटेश बकुला पद्मावतीसह नारायणपुरास आले. भगवंतांनी राजाचे क्षेमकुशलाची चौकशी केली. प्रकृति बरी नसल्याचे ऐकून राजशयनमंदिरात भगवान गेले व त्यांनी राजाची गाठ घेतली. प्रकृतीमान पाहून उभयतांना फारच दुःख झाले. श्रीवेंकटेश राजाचे गुणवर्णन करून शोक करू लागले. ते पाहून राजा सावध होऊन भगवंतास म्हणाला, मी आता चाललो. आपण आता माझ्या बंधूस व मुलास सांभाळावे, असे सांगून राजाने प्राण सोडला. सर्वत्र शोकाकूल झाले. देवी पद्मावती व राणीच्या दुःखास पारावार उरला नाही. देवांनी सर्वांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. भगवंतांनी तेथे राहून आकाशराजाचे उत्तर कार्य यथासांग करविले. पुष्कळ दानधर्म करविला. ब्राह्मण भोजन वगैरे झाले. भगवान पद्मावती देवीसह आपल्या मंदिरास परत आल्यावर काही दिवस गेले. पुढे राजपुत्र वसुदान व तोंडमान यांच्यात राज्याच्या अधिकाराबद्दल वाद सुरू झाला. वाद संपेना शेवटी ते प्रकरण भगवंताच्याकडे आले. देवी पद्मावतीने आपल्या भावाचा पक्ष घेण्यास भगवंतांना सांगितले व आपली शस्त्रसामग्री तोंडमानास देवविली.

उभयतात घनघोर युद्ध सुरू झाले. विपुल हानी झाली, कोणी कोणास हटेना. भगवंतांनी मेहुण्याच्या बाजूने युद्धात भाग घेतला. त्यांना शस्त्राघाताने मूर्च्छा आली. पद्मावतीस ही बातमी कळताच तिला फारच दुःख झाले. थोड्यावेळाने भगवान सावध झाले. सर्वांचे त्यांनी समाधान केले.

शेवटी अगस्ति ऋषींच्या विचारे उभयतांना राज्य वाटून देण्याचे ठरवून युद्ध थांबविले. सर्व ऐश्वर्याची व राज्याची वाटणी करून तोंडदेशावर तोंडमान यास व नारायणपुरात वसुदान यास राज्यावर बसविले. विभाग करताना शेवटी तीन गावे उरली ती उभयतांनी भगवंतांना दिली. एवढे कार्य करून भगवान आपल्या स्थानी परत आले.

तोंडमान नेहमी श्रीवेंकटेशाच्या दर्शनास येत असे. एके दिवशी असाच तो आला असता त्याने काही तरी आपणाकडुन सेवा घेण्याविषयी विनंती करताच भगवंतांनी आपणास राहण्यास एक विशाल व अतिसुंदर असे मंदीर बांधून देण्यास सांगितले. भगवंताच्या इच्छेप्रमाणे मंदीर बांधून तयार होताच योग्यवेळी वास्तुशांति वगैरे करून भगवान तेथे राहण्यास गेले. वास्तुशांतीचा समारंभही फार मोठ्या प्रमाणावर साजरा झाला. भगवंतास उच्चासनावर बसवून सर्व देव व ऋषी वगैरे मंडळींनी पूजा केली. देवांनी व ऋषींनी या ठिकाणी आपण स्थिर राहा असा आशीर्वाद दिला. दोन दिवे लाविले. ते कलियुगाच्या अस्तापर्यंत कायम राहतील असे सांगण्यात आले. तोंडमानाने छत्रचामर वगैरे सर्व ऐश्वर्य भगवंतास समर्पण केले. अनेक प्रकारचे उत्सव समारंभ झाले. ध्वज चढविला गेला. शेवटी अवभृत स्नान करून मंडळी आपापल्या ठिकाणी गेली. शुक्रवारी आकाशराजाने दिलेला मुकुट देवाच्या मस्तकावर घातला जातो. अद्यापि सर्व उत्सव मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चालतात. मोठी यात्रा नेहमी व अनेक उत्सव येथे होतात. श्रीभगवान आपल्या ऐश्वर्याने या ठिकाणी सतत वास्तव्य करून आहेत. जे कोणी भगवंताच्या दर्शनास जातात त्यांच्या मनोकामना सर्व पूर्ण होतात. यापुढील भगवन्माहात्म्य पुढील अध्यायात पाहू.

श्रीगजाननाय नमः ॥ वेंकटेश चारी अक्षरे ॥ ज्याचे मुखी वसती निरंतर ॥ त्यासी वंदिती विधि पुरंदर ॥ कलिकाळासि जिंकिले त्याने ॥१॥

जिही वेंकटेशासि गाइले ॥ ते तरती हे नव्हे नवल ॥ त्याचे दर्शने तात्काळ ॥ उद्धरतील बहुत जीव ॥२॥

जो साक्षात इंदिरारमण ॥ जो ब्रह्मादिकांचे देवतार्चन ॥ त्याचे दास्यत्व कर्त्यासि विघ्न ॥ करू कोण शकेल पै ॥३॥

ज्याचे नाम परम सार ॥ ह्रदयी ध्यातो अपर्णावर ॥ जो योगियांचे निज माहेर ॥ संहार कर दुर्जनांचा ॥४॥

त्या श्रीहरीचे नामस्मरण ॥ आदरे करावे संपूर्ण ॥ तुटेल त्याचे भवबंधन ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥५॥

असो गतकथाध्यायी निरूपणा ॥ जाहले पद्मावतीचे लग्न ॥ अगस्तीआश्रमी नारायण ॥ राहता जाहला स्वइच्छे ॥६॥

दशमाध्यायाचे अंती ॥ इतुकी कथा ऐकिली संती ॥ यावरी सूत शौनकादिकांप्रती ॥ कथा विचित्र वर्णितसे ॥७॥

अगस्ती आश्रमासमीप ॥ राहिला कमळोद्भवाचा बाप ॥ नानाप्रकार भोग अमूप ॥ भोगितसे परमात्मा ॥८॥

जेथे उभविले असे शिबिर ॥ ते वनशोभिवंत सुंदर ॥ नानावृक्ष लता मनोहर ॥ फळपुष्पेशि विराजती ॥९॥

शाल तमाल देवदार ॥ कदंब पारिजातक औदुंबर ॥ अश्वत्थ अंजीर ॥ बकुल मोगरी शोभती ॥१०॥

वट कपित्थ पुन्नाग जाती ॥ नाग चंपक आणि शेवंती ॥ द्राक्षावेली पसरल्या निश्चिती ॥ सफळ दिसती सर्वदा ॥११॥

नारिंगी केळी रातांजन ॥ नागवेली शोभती विराजमान ॥ वाळियाची बेटे गहन ॥ कर्पूर कर्दळी डोलती ॥१२॥

नाना पुष्पफळ युक्त ॥ वन दिसे सर्वदा शोभिवंत ॥ तेथींचे उदक गोड बहुत ॥ अमृताहुनी कोटिगुणे ॥१३॥

जेथे वास करी श्रीधर ॥ वसंत वन शृंगारी निरंतर ॥ अष्टही सिद्धि अहोरात्र ॥ दासी होऊनी राबती ॥१४॥

असो ऐशा वनात ॥ पद्मावतीसहित रमाकांत ॥ क्रीडत असता जगन्नाथा ॥ काही दिवस लोटले ॥१५॥

इकडे नारायणपुरात ॥ काय वर्तला हो वृत्तांत ॥ आकाशराजा राज्य करित ॥ यथान्याय करोनिया ॥१६॥

एकाएकी रायासी तत्वता ॥ अंगी दाटली घोर व्यथा ॥ काल समीप आला निश्चित ॥ जाहले विचित्र पूर्वदत्ते ॥१७॥

बहुत वैद्य आणोन ॥ दिधले नाना रसायन ॥ बरी नव्हे कदापि जाण ॥ व्यथा अधिक जाहली ॥१८॥

वाचा जाहली खुंटित ॥ चळणवळन राहिले समस्त ॥ ऊर्ध्व श्वास लागला तयाते ॥ प्राणांत समय पातला ॥१९॥

ऐसा समय पाहोनि कठिण ॥ काय करी तोंडमान ॥ वेगी सेवक बोलावून ॥ आज्ञा दीधली तात्काळ ॥२०॥

अगस्तीआश्रमासी जावे त्वरित ॥ हरीसि श्रुतकरावा वृत्तांत ॥ पद्मावतीशी मात ॥ करावीस श्रुत वेगेसी ॥२१॥

आकाशराजा व्यथा भूत ॥ समीप आला त्यासी मृत्यु ॥ तुम्ही शीघ्र याल त्वरित ॥ तरीच दर्शन होईल ॥२२॥

ऐशी आज्ञा वंदोन ॥ दुत धावले त्वरेकरून ॥ पद्मावतीस करोनि नमन ॥ वर्तमान सांगती ॥२३॥

म्हणती माते आकाश कुमारी ॥ रायासि जाहली व्यथा भारी ॥ अंत समय निर्धारी ॥ समीप वाटे जननिये ॥२४॥

दूतमुखीचे वर्तमान ॥ ऐकोनि घाबरले अंतःकरण ॥ तेव्हा पद्मावतीस दारुण ॥ कल्पांतचि भासला ॥२५॥

किंवा पर्वतचि कोसळला ॥ की मस्तकी विद्युत्पात जाहला ॥ दूतमुखींची वार्ता ऐकिली ॥ तैसे गमले सतीते ॥२६॥

दुःखे पडिली मूर्च्छागत ॥ अगस्तीची स्त्री धावली त्वरित ॥ शीतळ उपचार करोनि बहुत ॥ सावध केली तियेसी ॥२७॥

बैसविती जाहली उठवोन ॥ शोकसमुद्री गेली बुडोन ॥ तो जवळी आला नारायण ॥ कळला वृत्तांत सर्वही ॥२८॥

मग पद्मावती आणि बकुलेसहित ॥ वेगे निघाले वैकुंठनाथ ॥ मनोवेगे आले त्वरित ॥ नारायणपुरा प्रती ॥२९॥

द्वारपाळासि वेगे करोन ॥ पुसता जाहला पक्षिवाहन ॥ विपरीत नसे की वर्तमान ॥ आकाशराजा सुखी की ॥३०॥

सेवक बोलती श्रीहरी ॥ राजयासी व्यथाभारी ॥ त्याचे मरण मुरारी ॥ समीप आले वाटतसे ॥३१॥

ऐसे ऐकोनि जगन्नाथ ॥ शीघ्र प्रवेशले मंदिरात ॥ तो दर्भासनी राजयाते ॥ पहुडविले असे ते काळी ॥३२॥

समीप देखोनिया मरण ॥ दुःखे व्याप्त नारायण ॥ रायासि ह्रदयी कवळोन ॥ अत्यंत शोक आरंभिला ॥३३॥

मुखावरी ठेवोनि मुख ॥ विलापतसे रमानायक ॥ म्हणे राजेश्वरा मजसी एक ॥ बोल आता सत्वर ॥३४॥

तू वडील सर्वांसी मान्य ॥ तुजविणे आम्ही परदेशी दीन ॥ तू धर्मात्मा पुण्यपरायण ॥ करिता गमन उचित नव्हे ॥३५॥

आम्हासि नाही मातापिता ॥ बंधु आप्त नाही सर्वथा ॥ तुझा आश्रय तत्वता ॥ केला आम्ही सर्वस्वे ॥३६॥

अहा राया गुणनिधाना ॥ अहा राया धर्म परायणा ॥ अहा राया आम्हासि टाकोन ॥ जातोसि आता निर्धारी ॥३७॥

किंचित सावध होवोनि ॥ मजशी बोल एक वचन ॥ ऐसे नानाप्रकारे करोन ॥ जगज्जीवन शोककरी ॥३८॥

श्रोते पुसती हो कौतुक ॥ जो अनंत ब्रह्मांडांचा नायक ॥ त्यासी कैसा जाहला शोक ॥ हे असंमत दिसतसे ॥३९॥

जाणोनि श्रोतियांचे प्रश्न ॥ उत्तर दीधले विचारून ॥ जगन्निवास नारायण ॥ भेदाभेद रहित तो ॥४०॥

ज्याचे नाम घेता उत्तम ॥ शोक रहित होती भक्तसत्तम ॥ त्यासी ऐसा शोक दुर्गम ॥ बाधेल कैसा निर्धारी ॥४१॥

परी मायावेषधारी मुरहर ॥ लौकिक दावी समयानुसार ॥ जैसा नट सोंग घेवोनि परिकर ॥ संपादणी दावितसे ॥४२॥

तैसाचि आता श्रीधर ॥ दावीतसे लौकिकाचार ॥ ऐसे ऐकता उत्तर ॥ श्रोते चतुर आनंदले ॥४३॥

असो ऐसा नानाभाव ॥ दाविता जाहला माधव ॥ जो मायानियंता केशव ॥ करुणार्णव भक्तांचा ॥४४॥

शोक करिता जगन्नाथ ॥ राये नेत्र उघडिले किंचित ॥ सावध होवोनी मात ॥ काय बोलता हरीप्रती ॥४५॥

राजा म्हणे जगन्मोहना ॥ मज समीप आले मरण ॥ आता मी न वाचे व्यथेतून ॥ जगन्नायका श्रीपती ॥४६॥

तू जगत्कुटुंबी सर्वेश्वर ॥ तुज काय सांगावे विचार ॥ माझा पुत्र आणि सहोदर ॥ सांभाळी यांसि नारायणा ॥४७॥

ऐसे बोलिला नृपती ॥ तो कासावीस जाहला मागुती ॥ ह्रदयी कवळिला रमापती ॥ तेथेचि प्राण सोडिला ॥४८॥

जाहला एकचि हाहाकार ॥ ह्रदय पिटिती नारीनर ॥ नगरीचे लोक समग्र ॥ शोकसागरी बुडाले ॥४९॥

पद्मावतीच्या शोका नसे अंत ॥ गडबडा भूमीवर लोळत ॥ म्हणे ताता तुज यथार्थ ॥ कोठे पाहू यावरी ॥५०॥

दुःख जाहले अत्यद्भुत ॥ धरणीदेवी पडिली मूर्च्छित ॥ सकळस्त्रिया तिशी सावरित ॥ नाही अंत महाशब्दा ॥५१॥

मृत्तिका घेवोनि हस्तकी ॥ धरणीदेवी घाली मुखी ॥ वोढवले पूर्वकर्म की ॥ गहनपातक केले म्या ॥५२॥

की अपमानिले ब्राह्मणाते ॥ की भेद मानिला हरिहराते ॥ की विप्र बैसला पंगतीत ॥ उठवोनि बाहेर घातला ॥५३॥

की पंक्तिभेद केला पूर्ण ॥ की मातापित्यासि बोलिले कठीण ॥ की सद्‌गुरूसी अव्हेरून ॥ वचन बोलिले मी पूर्वी ॥५४॥

तरी आता पतिवियोग ॥ त्या पापे जाहला सवेग ॥ असो तो भक्तभवभंग ॥ संबोखित सर्वांसी ॥५५॥

श्रीहरि म्हणे ऐका ॥ आता वृथा शोक करू नका ॥ जे जे प्राणी दिसती देखा ॥ ते नाश पावती शेवटी ॥५६॥

आकारासि आले ते जीव ॥ ते ते लया पावती सर्व ॥ आत्मा शाश्वत स्वयमेव ॥ तो आप्त नव्हे कोणाचा ॥५७॥

जातस्यहि ध्रुवो मृत्युः ॥ गीतेचा असे वाक्यार्थ ॥ माता शोक करोनी व्यर्थ ॥ विचारोनी पाहेपा ॥५८॥

होणार न चुके कोणासी ॥ ऐसे बोलोनि ह्रषीकेशी ॥ शांत केले सर्वांसी ॥ शोकापासूनी ते काळी ॥५९॥

मग राजदेह उचलोन ॥ केला अग्निमुखी समर्पण ॥ उत्तरकार्य संपूर्ण ॥ करविते जाहले यथाविधि ॥६०॥

सोळा दिवस पर्यंत ॥ जवळी राहोनि जगन्नाथ ॥ यथा सांग समस्त ॥ उत्तरक्रिया करविली ॥६१॥

द्रव्य वेचोनी बहुत ॥ दाने देवविली अमित ॥ ब्राह्मणभोजन यथायुक्त ॥ दक्षिणा अपार दीधली ॥६२॥

असो यावरी क्षीराब्धिजामात ॥ पुसोनिया समस्ताते ॥ गेला पद्मावती समवेत ॥ स्वस्थानासि ते काळी ॥६३॥

काही दिवस गेलियावर ॥ तोंडमान आणि राजकुमार ॥ दोघात उद्भवला कलह दुर्धर ॥ राज्यनिमित्त करोनिया ॥६४॥

तोंडमान म्हणे सत्वर ॥ मी रायाचा कनिष्ठ सहोदर ॥ रायामागे निर्धार ॥ मी अधिकारी राज्याचा ॥६५॥

राजपुत्र वसुदान ॥ म्हणे मी असता राजनंदन ॥ राज्यासी अधिकारी तोंडमान ॥ सर्वथाही न होय ॥६६॥

ऐसा होता वादविवाद ॥ वाढले द्वंद्व अति अगाध ॥ उभयता पातले जेथे गोविंद ॥ आनंद कंद जगद्‌गुरू ॥६७॥

उभयता वंदोनिया अनंता ॥ सांगीतली सकळही वार्ता ॥ संकट पडिले जगन्नाथा ॥ कैसे आता करावे ॥६८॥

विचार करी नारायण ॥ परमभक्त माझा तोंडमान ॥ शालक आपला वसुदान ॥ दोघांसी समान पहावे ॥६९॥

तव एकांती पद्मावती ॥ वेंकटेशासी जाहली प्रार्थिती ॥ म्हणे प्राणेश्वरा वचनोक्ती ॥ ऐका माझी सत्वर ॥७०॥

वसुदान माझा सहोदर ॥ आपण तिकडे व्हावे निर्धार ॥ जगदात्मा तू सर्वेश्वर ॥ करी उपकार शालकाते ॥७१॥

परम संकट जाणोन ॥ मग काय करी जगज्जीवन ॥ शंख चक्र आयुधे दोन ॥ तोंडमानासि दीधली ॥७२॥

वसुदानाकडे मुरहर ॥ आपण साह्य जाहला सत्वर ॥ सज्योनी एक रहंवर ॥ आरूढले तयावरी ॥७३॥

उच्चैः श्रवासमान ॥ चारी घोडे जुंपिले पूर्ण ॥ वरी सारथी बैसला निपुण ॥ गरुडध्वज झळकतसे ॥७४॥

चैत्रशुद्ध त्रयोदशीस ॥ नेमिला युद्धाचा दिवस ॥ शस्त्रास्त्र सज्योनी बहुवस ॥ उभय पक्षींचे वीर पै ॥७५॥

सैन्यसागर करोनी सिद्ध ॥ मांडले हो द्वंद्वयुद्ध ॥ जैसे कौरव पांडवांचे अगाध ॥ पूर्वी युद्ध जाहले ॥७६॥

गज अश्व आणि रहंवर ॥ निघाले बहुत पायभार ॥ दोही कडे समान वीर ॥ युद्धासि उभे ठाकले ॥७७॥

जाहले शस्त्रास्त्रमंडित ॥ दोही दळी वाद्य अद्भुत ॥ वाजता नाद भरला गगनात ॥ पृथ्वी थरथरा कापतसे ॥७८॥

सिंहनादे गर्जती वीर ॥ शंख त्राहाटिती परमघोर ॥ त्यानादे दिशा अंबर ॥ भरोनि गेले एकदाची ॥७९॥

पायदळावरी पायदळ ॥ अश्वांसी अश्व झगटती प्रबळ ॥ रथियांवरी रथी ते वेळ ॥ धावताती परस्परे ॥८०॥

सारथियांसि सारथी हाणिती ॥ शस्त्रास्त्रे बहुतवर्षती ॥ प्रेते पडियेली निश्चिती ॥ गणना नव्हे तयांची ॥८१॥

चहूकडून अशुद्धपूर ॥ लोटला पै अपार ॥ त्यामाजी अश्वकुंजर ॥ वाहोनि जाती निर्धारी ॥८२॥

एकासी एक हाणिती ॥ जीवाशा काही न धरिती ॥ स्वामिकार्यालागी निश्चिती ॥ प्राण त्यागिती रणांगणी ॥८३॥

तोंडमान स्वये आपण ॥ रथारूढ जाहला न लागता क्षण ॥ चारी घोडे सुपर्णासमान ॥ श्वेतवर्ण जुंपिले ॥८४॥

आलात चक्रवत सायकासन ॥ झळके सौदामिनी समान ॥ तूणीर बांधिले परिपूर्ण ॥ आकर्षोनि पाठिसी ॥८५॥

सिंहनादे महावीर ॥ गर्जद पुढे आला सत्वर ॥ तो देखोनिया मुरहर ॥ रथारूढ जाहला ॥८६॥

सारंग धनुष्य घेऊन ॥ तडित्प्राय नेसला पीतवसन ॥ किरीट कुंडले शोभायमान ॥ तुळसी वनमाळा शोभती ॥८७॥

चतुर्भुज श्यामसुंदर ॥ तोंडमानासम्मुख राजीवनेत्र ॥ अकस्मात जगदुद्धार ॥ उभा ठाकला ते काळी ॥८८॥

तोंडमानते पाहून ॥ कर जोडोनी करी नमन ॥ म्हणे जगदात्मा तू नारायण ॥ युद्धकरी मज आता ॥८९॥

तू जगद्वंद्य जगत्पती ॥ त्रिभुवन तुझे चरणवंदिती ॥ तुजवरी बाण श्रीपती ॥ केवि सोडू सांगपा ॥९०॥

यावरी बोले श्रीहरी ॥ क्षात्रधर्म आमुचा निर्धारी ॥ युद्धासी सम्मुख जाहली या वरी ॥ काही चिंता नसे मग ॥९१॥

सद्‌गुरु किंवा आपुला पिता ॥ युद्धासि जरी आला तत्वता ॥ त्यावरी करिता शस्त्रघाता ॥ दोष नाही निर्धारी ॥९२॥

याकरिता राजेंद्रा अवधारी ॥ तू शस्त्रे सोडी अनुमान न करी ॥ तोंडमान म्हणे मुरारी ॥ आधी शर सोंडी तू ॥९३॥

ऐसे ऐकूनि मधुसूदन ॥ सोडी तोंडमानावरी मार्गण ॥ मग येरी सरसावून ॥ शस्त्रास्त्री युद्ध करीतसे ॥९४॥

बाणापाठी बाण ॥ सोडी पद्मावती रमण ॥ जैसे जीमूत वर्षती घन ॥ तैसे मार्गण जाताती ॥९५॥

तोंडमानाचे दळभार ॥ बहुत संहारिले श्रीधरे ॥ कोणी न राहती समोर ॥ हरिसमुख युद्धासी ॥९६॥

कंदुका ऐसी शिरे उसळती ॥ पक्षी ऐसे गगनी भासती ॥ कित्येकांचे चरण तुटती ॥ संख्या नाही तयांची ॥९७॥

अगाध हरीचा मार ॥ पळो लागले सैन्य समग्र ॥ ऐसे देखता तोंडमान नृपवर ॥ क्रोधायमान जाहला ॥९८॥

जैसा कल्पांतींचा रुद्र ॥ तैसा दिसे तो महावीर ॥ सोडीत शरांचा पूर ॥ करी संहार सेनेचा ॥९९॥

हरीचे बाणजाळ समस्त ॥ तोडोनि टाकिले क्षणांत ॥ आत्मशरे खिळोनि सर्वाते ॥ जर्जर केले ते काळी ॥१००॥

ते पाहोनि राजीवनेत्र ॥ सोडिता जाहला अग्निअस्त्र ॥ तोंडमानाचे दळसमग्र ॥ जळो लागले एकदा ॥१॥

मग तो वीर तोंडमान ॥ सोडिता जाहला पर्जन्य ॥ तेणे स्वसैन्य शीतळ होवोन ॥ वाहो लागली हरिसेना ॥२॥

वातास्त्र प्रेरी रमानाथ ॥ तेणे जळद विदारिला अकस्मात ॥ वात प्रबळ देखोनि बहूत ॥ येरी पर्वत सोडिले ॥३॥

वातनिरसोनी सवेग ॥ चमूवरी कोसळो पाहे नग ॥ मग वज्रास्त्र श्रीरंग ॥ सोडोनि पर्वत फोडिले ॥४॥

ऐसे शस्त्रास्त्री युद्धबहुत ॥ जाहले चार घटिका पर्यंत ॥ काही केल्या रमानाथ ॥ नाटोपेचि सर्वथा ॥५॥

मग आरक्त करोनिया नयन ॥ सरसावला तोंडमान ॥ बाणापाठी बाण ॥ सोडिता जाहला हरीवरी ॥६॥

विमानारूढ सुरवर ॥ वरोनि पाहती चमत्कार ॥ तोंडमान सोडोनि चारीशर ॥ रथीचे अश्व मारिले ॥७॥

सवेचि सोडोनि एकबाण ॥ सारथी मारी न लागता क्षण ॥ आणिक पंचशर सोडून ॥ रथही छेदोनि पाडिला ॥८॥

पुन्हा एक निर्वाणशर ॥ हरीवरी प्रेरिला सत्वर ॥ ह्रदयी बैसला साचार ॥ वज्रप्राय ते काळी ॥९॥

तेणे मुर्च्छाना येऊन ॥ खाली पडिला जगन्मोहन ॥ लोक धावले चहूकडोन ॥ हाहाकार जाहला ॥१०॥

वसुदानाचे सेनेत ॥ जाहला एकचि आकांत ॥ पद्मावतीचे कर्णी मात ॥ अकस्मात पडियेली ॥११॥

ती ही होवोनी दुःखित ॥ महाआक्रोशे शोक करित ॥ तो आगस्तीऋषि आला धावत ॥ पद्मावतीते बोलतसे ॥१२॥

म्हणे आकाशराज नंदिनी ॥ शोक करू नको ये क्षणी ॥ मूर्च्छित पडिला चक्रपाणी ॥ उठेल आता सत्वर ॥१३॥

तुमचा क्षात्रधर्म परिपूर्ण ॥ वीरासी रण ते केवळधन ॥ रणी त्यागावे प्राण ॥ हा मुख्य धर्म असे पै ॥१४॥

तू क्षत्रियराजकुमारी ॥ आणि महावीराची होय अंतुरी ॥ रणी पडिला याचा निर्धारी ॥ शोक सर्वथाही न करावा ॥१५॥

पद्मावती म्हणे महाऋषि ॥ आता काय करावे ऐशियासी ॥ काही युक्ति आम्हांसी ॥ सांगवेगेसि ऋषिवर्या ॥१६॥

अगस्ती म्हणे महासती ॥ ऐक माझी वचनोक्ती ॥ तोंडमान वसुदाना प्रती ॥ राज्य वाटोनि देइजे ॥१७॥

तो पितृव्य हा बंधुजाण ॥ दोघेही तुजसम समान ॥ दोघांसी दुःख न व्हावे पूर्ण ॥ ऐसी युक्ति करावी ॥१८॥

मग ऋषिसहित पद्मावती ॥ आली वेगी रणाप्रती ॥ तो मूर्च्छित पडिला श्रीपती ॥ देखती जाहली ते काळी ॥१९॥

नेत्रांसि लावोनिया नीर ॥ केले शीतळ उपचार ॥ विंझणवारा सुवासकर ॥ आत्महस्ते घालितसे ॥१२०॥

सावध होवोनी भगवान्‌ ॥ म्हणे कोठे गेला तोंडमान ॥ त्यासि बाणावरी फोडीन ॥ घेईन प्राण आजि त्याचे ॥२१॥

अगस्ती म्हणे राजीवनेत्रा ॥ कोप कासया स्मरारीमित्रा ॥ एक भक्त एकशालक खरा ॥ समान तुज दोघेही ॥२२॥

कासया पाहिजे युद्धप्रसंग ॥ करोनि देई राज्यविभाग ॥ भक्तकैवारी तू श्रीरंग ॥ समान पाही दोघांसी ॥२३॥

मग बोले जगन्मोहन ॥ क्षणात जिंकोन तोंडमान ॥ राज्य शालकासि देईन ॥ अर्धक्षण न लगता ॥२४॥

मग पद्मावती धावोन ॥ धरिती जाहली दृढचरण ॥ म्हणे जगदात्मा तू सनातन ॥ भक्तवत्सला श्रीहरी ॥२५॥

मनमोहना केशवा ॥ वैकुंठवासिया रमाधवा ॥ प्राणवल्लभा दयार्णवा ॥ विनंति माझी परिसावी ॥२६॥

बंधु पितृव्य दोघेजण ॥ उभयतांसि असावे कल्याण ॥ वल्लभा आपण कोप सोडून ॥ राज्य वाटोनि देईजे ॥२७॥

अगस्तीचे वचनासी ॥ मान देईजे ह्रषीकेशी ॥ सर्वांसी समान जैसा शशी ॥ तैसे करी प्राणेश्वरा ॥२८॥

मग अवश्य म्हणोनि नारायणे ॥ जवळी बोलावोनि तोंडमान ॥ म्हणे करू नका युद्ध दारुण ॥ माझे वचन ऐका पै ॥२९॥

तोंडमान म्हणे जगदीशा ॥ तू करशील ती पूर्वदिशा ॥ तुझी आज्ञा पुराणपुरुषा ॥ शिरी वंदू वेद ऐसी ॥१३०॥

हरि म्हणे राज्य वाटून ॥ उभयतांसि देतो सम समान ॥ दोघांसी ते मानले पूर्ण ॥ म्हणती अवश्य करावे ॥३१॥

मग देश दुर्ग गड ग्राम ॥ विभाग करी मेघश्याम ॥ कोश गज रथ तुरंग ॥ पशु सेवका समवेत ॥३२॥

सर्वही समान वाटून ॥ तोंडदेशी स्थापिला तोंडमान ॥ नारायणपुरी वसुदान ॥ स्थापिता जाहला जगदात्मा ॥३३॥

विभाग करिता उत्तम ॥ उरले होते तीन ग्राम ॥ ते उभयता मिळोनि सप्रेम ॥ श्रीहरी प्रती दीधले ॥३४॥

इतुके कार्य करोन स्वस्थानासि गेला नारायण ॥ पद्मावतीसहित जगज्जीवन ॥ आनंदघन वर्ततसे ॥३५॥

असो तोंडमान हरिभक्त ॥ नित्य काळदर्शनासि येत ॥ एके दिवसी नृपनाथ ॥ श्रीहरीप्रती बोलतसे ॥३६॥

म्हणे अनंतकोटीब्रह्मांडनायका ॥ हे दयार्णव विश्वव्यापका ॥ वैकुंठपते सुखदायका ॥ त्रिभुवनपाळका श्रीपती ॥३७॥

निजभक्तह्रदय मांदुसरत्‍ना ॥ मीनकेतना ह्रदय जीवना ॥ दुष्टदानव निकृंतना ॥ राजीवनयना श्रीहरी ॥३८॥

आकाशजामाता विश्वंभरा ॥ पद्मावतीह्रत्पद्मभ्रमरा ॥ भक्तपाळका प्रतापरुद्रा ॥ काही आज्ञा करी मज ॥३९॥

ऐसे मनी वाटे माधवा ॥ काही तरी करावी तुझी सेवा ॥ मधुसूदना केशवा ॥ आज्ञा करी सत्वर ॥१४०॥

ऐकताचि ऐसे स्तवन ॥ संतोषला पद्मावती रमण ॥ म्हणे भक्तशिरोमणि तुजकारणे ॥ सेवाकरणे असेल जरी ॥४१॥

शेषाद्रीवरी आम्हांसी ॥ मंदिर रचावे रहावयासी ॥ तीन दुर्ग सप्त द्वारांशी ॥ गोपुरे दोन निर्मावी ॥४२॥

पाकशाळा कोशसदन ॥ धान्यशाळा पशुशाळा गहन ॥ चित्रविचित्र सोपान ॥ पर्वतापरी बांधावे ॥४३॥

स्वामितीर्थासि पायर्‍या ॥ बांधाव्या नृपवर्या ॥ विश्वकर्म्यासि बोलवूनिया ॥ आज्ञा त्यासि दीधली ॥४४॥

म्हणे नृपतीचे अनुमतीने ॥ मंदिर रचावे शोभायमान ॥ तेणे तात्काळ आज्ञा वंदोन ॥ सिद्ध केले सर्वही ॥४५॥

बैसावया सभास्थान ॥ विमान रचिले तालप्रमाण ॥ हरीचे जैसे इच्छित मन ॥ तैसेचि केले तात्काळी ॥४६॥

असो सिद्ध जाहलिया मंदिर ॥ कर जोडोनी विनवी नृपवर ॥ म्हणे जगन्निवासा सत्वर ॥ मंदिराप्रती चलावे ॥४७॥

गृहप्रवेश करावयास ॥ मुहूर्त नेमिला अतिविशेष ॥ विकृतिसंवत्सर आश्विनमास ॥ शुद्धप्रतिपदा गुरुवार ॥४८॥

मध्यान्हासि आला चंडकिरण ॥ उत्तमसमया पाहून ॥ पद्मावतीसहित जनार्दन ॥ मंदिराप्रती चालिले ॥४९॥

ब्रह्मादि देव संपूर्ण ॥ पातले उत्साहा कारण ॥ सहित ब्राह्मण तोंडमान ॥ नारायण चालिले ॥१५०॥

नानावाद्ये वाजती प्रबळ ॥ मंगळतुरे गर्जती रसाळ ॥ गजरे करोनी तमाळनीळ ॥ मंदिरामाजी प्रवेशले ॥५१॥

उच्चासनी बैसवोन ॥ हरीसि पूजी तोंडमान ॥ देवऋषी देती आशीर्वचन ॥ स्थिरो भव म्हणोनिया ॥५२॥

मग तेथे कमळासने ॥ स्वहस्ते लाविले दीपदोन ॥ कलियुगाचे होय अवसान ॥ तोवरी स्थिर राहो हे ॥५३॥

या विमानाचे होईल पतन ॥ आणि या दीपांचे होय अवसान ॥ तेव्हा अवतार संपवील भगवान् ॥ निश्चय विधीने कथिला असे ॥५४॥

नूतनछत्र आणि चामर ॥ नाना वाहने परिकर ॥ स्वये करवोनी तोंडमान नृपवर ॥ देता जाहला तेकाळी ॥५५॥

द्वितीयेचे दिवसी ध्वजारोपण ॥ नानापरीचे नैवेद्य निर्मून ॥ श्रीहरीसी करोनि अर्पण ॥ ब्रह्मकल्पोत्सव करीतसे ॥५६॥

अष्टमीसी हनुमंत वाहन ॥ नवमीसी रथोत्सवपूर्ण ॥ मग गरुड वाहन काढून ॥ उत्साह केला नानापरी ॥५७॥

करोनिया अवभृथस्नान ॥ स्वस्थानासि गेला तोंडमान ॥ नित्यत्रिकाळ हरिदर्शना ॥ लागी नृपवर येत असे ॥५८॥

अद्यापि भक्तप्रेमळ ॥ आश्विनमासी यात्रा प्रबळ ॥ पहावयालागी घननीळ ॥ वेंकटाद्रीसि धावती ॥५९॥

विश्वकर्म्याने निर्मित ॥ मंदिर असे शोभिवंत ॥ अद्यापि पाहती निजभक्त ॥ श्रीवेंकटाद्रीवरी पै ॥१६०॥

आठा दिवशी भृगुवारी ॥ मुकुट घालिती मस्तकावरे ॥ आंदण दीधला निर्धारी ॥ आकाशराये मुकुट तो ॥६१॥

अद्यापवरी इतुका उत्सव ॥ प्रतिवर्षी होतसे अपुर्व ॥ तेहतीसकोटी देव ॥ त्रिकाळ दर्शना नित्य येती ॥६२॥

जो जगद्‍गुरु वैकुंठनाथ ॥ निजभक्तांची वाट पाहत ॥ श्रीवेंकटाद्रीवरी यथार्थ ॥ स्वामी माझा तिष्ठतसे ॥६३॥

स्वामितार्थी करोनि स्नान ॥ जे घेती वेंकटेशदर्शन ॥ ते वैकुंठपुरीचे पाहुणे ॥ होतील जाण निश्चये ॥६४॥

वेंकटेशविजय ग्रंथ ॥ जाहला एकादशाध्यायापर्यंत ॥ आता कळसाध्याय बारावा त्वरित ॥ सप्रेम भक्त ऐका तो ॥६५॥

श्रीमद्वेंकटाचलनिवासिया ॥ निर्विकल्प वृक्षा करुणालया ॥ वीरवरदा वैकुंठवासिया ॥ छेदी माया दासाची ॥६६॥

वेंकटेशविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत पुराण भविष्योत्तर ॥ श्रवण करोत पंडित चतुर ॥ एकादशाध्या गोडहा ॥६७॥११॥

एकंदर ओवीसंख्या ॥१९२२॥