भद्रायुचरित्राख्यान

कीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.


भद्रायु चरित्र

साकी-

शिवभक्तिचा अपार महिमा सांगतसे कीं सूत ॥

एतद्विषयीं कथा रसिक ही परिसा देऊन चित्त ॥१॥

श्रोते परिसाहो ॥ वदनीं शिव हर हर गाहो ॥श्रो०॥ध्रृ०॥

अंवति नगरी माजी ब्राह्मण नाम जयाचें मदन ॥

पिंगलाख्य त्या वेश्येप्रति तो रतला रात्रंदिन ॥२॥

मातापितरें धर्मपत्‍निसी त्यागुनि ब्रह्मसुकर्मा ॥

मद्यमांसरत सदनिं तियेच्या राहुनि करि दुष्कर्मा ॥३॥

॥ श्लोक ॥

विचरत शिवयोगी पिंगलेच्या गृहासी ॥

अवचित सहजेंची पातला ज्ञानराशी ॥

नमुन उभयतांही देखतांची तयाला ॥

नमुनि पद करी ती आदरें पूजनाला ॥४॥

देऊनि भोजन सुखें मग तांबुलातें ॥

ते अर्पिती सुवसनें बहु भूषणांतें ॥

अत्युत्तमा सुमनशेज करुन वेगीं तो आवडीं निजविला शिवराज योगीं ॥५॥

उभयतां निशिपूर्णचि तत्पदा निजकरें तळहातिं तितें तदां ॥

क्रमुनि एक निशी असि त्यावरी ॥

निघती तुष्टुनियां मुनि सत्वरीं ॥६॥

छंद - हर्ष पावुनी मदन पिंगला ॥

म्हणति आमुतें ईश भेटला ॥

उभयतां पुढें मृत्यू पावलीं ॥

त्याचि सत्कृतें सुजनि लाधलीं ॥७॥

आर्या-

ते पिंगलाख्य वेश्या कन्या सीमंतिनीचिये पोटीं ॥

जन्मा आली विस्तृत नामें जे कीर्तिमालिनी मोठी ॥८॥

दशार्णदेशाधिपती नामें जो वज्रबाहु विख्यात ॥

त्याचीच पट्टमहिषी सुमती नामें सुपूज्य लोकांत ॥९॥

उदरि तियेच्या आला जन्मा भूदेव सत्कृतें मदन ॥

मदनदहन सुकृपेनें लाधे सुख त्या करील जो मदन ॥१०॥

दिंडी -

वज्रबाहू भूपासि स्त्रिया साठ ॥

तयांमाजी सुमति ते मुख्य श्रेष्ठ ॥

अवघियाही मत्सरा धरुन पोटीं ॥

तीस विष तें घातलें उठाऊठीं ॥११॥

मृत न झाली तेधवां परी अंगीं ॥

रोग दारुण लागला तीजलागीं ॥

प्रसुत होतां बालकासहित पाही ॥

विष अंगीं उमटलें ठायिंठायीं ॥१२॥

क्षतें पडुनी जाहले व्रण थोर ॥

वाहे रक्त आणि पूय अनीवार ॥

रायें बहुत औषधी उपायांतें ॥

करीतांही आरोग्य नव्हे त्यांतें ॥१३॥

कडवीं

रात्रंदिन तें रडतें बाळ ॥ त्रासे भूपाळ ॥

दुःखें सुमती ते वेल्हाळ ॥ बडवी निजभाळ ॥

चाल-

मृत्यु न येतां रोगहि न हरे ॥

संकट भूपाळातें ॥१४॥

परिसा श्रोतेहो सादरचित्तें ॥

प्रेमळ चरितातें ॥प०॥ध्रु०॥

नृपती पावुनियां अमित त्रास ॥स्त्रीपुत्रांस ॥

त्याजिता झाला तो घोर वनास ॥ सोडुनियां आस ॥

चाल

सुमती बाळक कडिये घेउनि ॥

हिंडे व्याघ्ररिसादिक जेथें ॥ परिसा श्रो० ॥१५॥

पद्य-

कंटक रुतती अपार चरणीं ॥

कधीं न देखिलाही तरणी ॥

पडे मूर्च्छा येउनि धरणीं भ्रमतां अति दुःखें ॥१६॥

व्रणें करुनी तिडके काया ॥ जळही न मिळे तया ठाया ॥

आक्रोशें ती मोकलि धाया ॥ कवटाळूनि बाळा ॥१७॥

म्हणे बापा गिरिजाकांता ॥ सोडविं देहापासुनि आतां ॥

तिचिये दुःखा नयनीं पाहतां ॥ रुदती पशुपक्षी ॥१८॥

साकी

रुदतां बाळक स्नेहे द्विजगण भरुनी चंचुजळातें ॥

सिंचुनि अंगावरी घालिती वदनीं मधुर रसातें ॥१९॥

गीत-

यापरि राज्ञी दुःखें काननीं भ्रमतां ॥

देखे वणिजा वृषभ घेउनी जातां ॥

त्याचे संगती मग ती त्याचीं पंथा ॥

धरुनि वैश्यपुरातें या कष्टतां ॥

परिसा भाविक जनहो सद्भक्त-कथा ॥

दुरितें दुस्तर हरुनी लावी सुपथा ॥२०॥परि०॥ध्रु०॥

तेथिल वनिजाधिपती पद्माकर ॥ नानावस्तुरक्षक सधन उदार ॥

तेणें वृत्त तियेचें ऐकुनि सार ॥ धर्मसुता मानुनियां तिज दे थार ॥ परि० ॥२१॥

ओंवी-

शेजारीं तिला देउनी सदन ॥परमार्थ करी रात्रंदिन ॥

वैद्य-करें औशधें देऊन ॥ केले यत्‍न परी वृथा ॥२२॥

पुढें व्यथा होतां दुस्तर ॥ पंचत्व पावला राजकुमार ॥

सुमती आक्रोश करी अपार ॥ अहारे निधान हरपलें ॥२३॥पद० ॥

हर हर शंभो काय हें केलें ॥ दावुनि स्वप्नसें विलया नेलें ॥ध्रु०॥

राजपत्‍नी हा आरोप मातें ॥ भोगितसें क्लेशा अंत न त्यातें ॥हर० ॥१॥

एकुलतें एक माझें लेंकरुं ॥ व्याधिस्थ गेलें कैसें या करुं ॥हर० ॥२॥

बाळकाविण या मजसी आधार ॥ नव्हता ठाऊक तुजला निर्धार ॥हर० ॥३॥

छंद-

या परी तदा शोक ते सती ॥

करुनियां रडे फार पूरती ॥

वैश्यनाथ तो खेद पावुनीं ॥

शांतवीतसे तीजलागुनी ॥२५॥

पूर्वसत्कृतें तों तया स्थला ॥

ऋषभ योगि तो शीघ्र पातला ॥

वेष्टितां गजीं धांवला हरी ॥

अनल पेटतां मेघ त्यावरी ॥२६॥

साकी-

पद्माकर तैं लागुन चरणीं पूजित सोपस्कारें ॥

योगिराज मग सुमतीलागीं बोधितसे सुविचारें ॥२७॥

दृश्य आवघें नष्ट जाण हें ऋणानुबंधें गांठीं ॥

पडुन प्रपंचीं तुटली यातें करणें दुःख न पोटीं ॥२८॥

नदींत काष्टें मिळून वाहतां वेगळीं होत दुफाटीं ॥

तसे प्रपंची सुतादि मिळती व्यर्थ खेद यासाठीं ॥२९॥

श्लोक-

परिसुनि शिवयोगीयाचिया भाषणातें ॥

सुमतिसहित भावें वैश्य लागे पदातें ॥

म्हणति तुं भव साक्षात्‌ होसि कारुण्यसिंधू ॥

न करिसि जगिं ऐसें काय तें दीनबंधू ॥३०॥

आर्या-

उपदेशि मग सदय तो मृत्युंजयमंत्र योगि सुमतीला ॥

देऊन शिवदीक्षेतें सांगे करिं जप धरुनि सुमतीला ॥३१॥

छंद-

भस्म मंत्रुनी आंगिं लावितां ॥

हरपली व्यथा सकल तत्वतां ॥

उर्वशीहुनी रम्य आगळें ॥

स्वरुप तें तिचें दिव्य जाहलें ॥३२॥

बाळकासिही भस्म त्यापरी ॥

चर्चितां उठे तोहि सत्वरी ॥

व्रणव्यथादि ते हरुनि त्या क्षणीं ॥

बाळ जाहला युक्त लक्षणीं ॥३३॥

श्लोक-

परीसाप्रती लोहा तें लागतांची ॥

झळाळी त्वरें येत त्या कांचनाची ॥

सुपुत्रा तशी राज्ञि सौख्या अमूपा ॥

गुरुच्या कृपें लाधली दिव्यरुपा ॥३४॥

घालोनियां गुरुपदांवरि बालकाला ॥

राज्ञी करी स्तुति नमून पदांबुजाला ॥

तूं तात माय मज मी तव कन्यकाची ॥

झाले असंख्य उपकार न वर्णवेची ॥३५॥

आर्या-

योगी म्हणे सुतनये त्वत्पुत्रा पूर्ण आयुरारोग्य ॥

पावुनी यशःसमृद्धी भोगिल महि सर्व हा महा योग्य ॥३६॥

भद्रायु नाम यातें स्वबळें जिंकिल रणांत कळिकाळा ॥

बाळा जाणतपण ये तोंवरि येथेंच तूं क्रमीं काळा ॥३७॥

हा राजपुत्र ऐशी लोकीं प्रगटों नदे कदा मात ॥

न विसंबें शिवभजना न्यून न पाडीं कदापि नियमांत ॥३८॥

दिंडी-असें योगी सांगोनि शीघ्र पाहीं ॥ अंतर्धान पावला तेचि ठायीं ॥

वैश्यनाथ हर्षीत तये वेळां ॥ राजपुत्रा आलिंगि वेळोवेळां ॥३९॥

स्वपुत्राही परिअ त्या बालकाचे ॥ सदां पुरवी आवडी लाड साचे ॥

वेंचुनीयां आपल्या द्रव्यराशी ॥ करी दोघां मेखलाबंधनासी ॥४०॥

निपुण केले दोघेही वेद्शास्त्रीं ॥ द्वादशाब्दें लोटिलीं तया पुत्रीं ॥

धैर्यवंत गंभीर राजपुत्र ॥ मातृसेवे सादर सुपवित्र ॥४१॥क० ॥

पदरीं पूर्वील सुकृत कांही ॥ तेणें तो लवलाहीं ॥

योगी ऋषभ गुरु मागुति पाहीं ॥ आला त्या ठायीं ॥चाल॥

भद्रायूसह सुमती धांवुनि ॥ प्रेमें वंदिति त्यातें ॥ ऐका श्रो० ॥४२॥

नानाउपचारें पूजन करुन ॥ करिती बहु स्तवन ॥

योगी संतोषित तो होऊन ॥ बोधितसे ज्ञान ॥चाल॥

नाना नीति सुविस्तरेंसी ॥ कथिल्या राजसुतातें ॥ ऐका श्रो० ॥४३॥

ओवी-

मग भद्रायूसी तये वेळे ॥ शिवकवच मंत्रा उपदेशिलें ॥

आणि सर्वांगी भस्म चर्चिलें ॥ दिलें द्वादशसहस्त्र नागबळ ॥४४॥

दिधला दिव्यशंख प्रीतीं ॥ ज्याचे नादें शत्रू मूर्छित होती ॥

तैसेंच खड्‌ग रविसम दीप्ति ॥ देखतां हरती शत्रुप्राण ॥४५॥

नाना अस्त्रें आशीर्वचन ॥ देऊन पावला अंतर्धान ॥

इकडे भद्रायूचा जनक जाण ॥ दशार्णदेशीं वज्रबाहु ॥४६॥

कडवीं-

त्यावरि तें परचक्र ॥ आलें बहुत मागध देशाधिपती, जो हेमरथ ॥

तेणें गोहरणातें करुनी त्वरित ॥ नागविलें देशातें धान्यासहित ॥परि० ॥४७॥

मग तो दळसह येऊन ॥ वेष्टित नगरी । कळतां पविबाहूतें सहपरिवारीं ॥

निघुनी बाहेर त्वरित, भिडला समरीं ॥ केलें तुंबळ कदन ॥ दश दिनवरी परि० ॥४८॥

ओंवी-

मिळोनियां शत्रु बहुत ॥ धरिला भूपति सचिवांसहित ॥

स्यंदनीं आकर्षूनियां जीत ॥ त्वरित चालविला ॥४९॥

लुटोनी लोकांसहित ग्रामा ॥ धरिल्या भूपाळाच्या भामा ॥

यापरी हरुनी आपुले धामा ॥ चालविलें रिपूनीं ॥५०॥

झालें श्रुत तें भद्रायूसी ॥ शत्रु नेती निज जनकासी ॥

कृतांतवत् तैं क्षोभून मानसीं ॥ आवेशें बहुत ॥५१॥

साकी-

ध्याउनि गुरुपद सर्व शरीरा चर्चितसे भस्माला ॥

शंख खड्‌ग तें घेउन अंगीं अक्षयि कवचा ल्याला ॥५२॥

जननीलागीं नमन करुनी सर्वहि वृत्ता कथितां ॥

म्हणे प्रसादें गुरुच्या काळहि आणिन धरुनी जीता ॥५३॥

पद्माकर सुत विनय वीर जो संगें घेइ तयासी ॥

त्वरा करुनि आटपिलें त्या धावुन शत्रुजनांसी ॥५४॥

॥ दिंडी ॥

सिंहनादें गर्जून म्हणे आहा ॥ पळुन जातां चोरहो उभे रहा ॥

वज्रबाहूअ वस्तु हे चोरुनीयां ॥ कसे नेतां जालरे वांचुनीयां ॥५५॥

श्लोक-

अशी ऐकतां ॥त्याची ते तीक्ष्ण वाणी ॥

बहु क्षोभले वीर ते शस्त्रपाणी ॥

फिरोनी पुन्हां भार शत्रूजनांचा ॥

करीती बहू मार तेव्हां शरांचा ॥५६॥

वाद्यें अति भ्यासुर वाजताती ॥

तेणें दिशा व्यापुनि सर्व जाती ॥

दोघांवरी घालिती बाणजाळें ॥

एका शरें तोडिलीं राजबाळें ॥५७॥

भद्रायू मग शंखवादन करी तेणें दिशा सर्वही ॥

नादें व्यापुन कोंदल्या अतिशयें भंगोंचि पाहे मही ॥

पाताळीं फणिनाथ आवरि धरा शक्रासनी ते ढळे ॥

शत्रू मूर्छित होऊनी रथ बहू ते हिंडती मोकळे ॥५८॥

छंद-स्यंदनद्वया दिव्य त्यांतुनी ॥ घेतलें बरें शींघ्र निवडुनी ॥

उभयतां वरी बैसुनी त्वरें ॥ भंगिती दळा दिव्य त्यांतुनी ॥

घेतलें बरें शींघ्र निवडुनी ॥ उभयतां वरी बैसुनी त्वरें ॥

भंगिती दळा दिव्य त्या शरें ॥५९॥

साकी

वज्रबाहुचे वीर शेष ते गजरथभारासहित ॥

भद्रायू निज कैवारीसा जाणुनि जवळी येत ॥६०॥

पृष्ठीराखा सबळ देखुनी वीरां बळ तैं चढलें ॥

हेमरथाची असंख्य सेना संहारिति त्या वेळे ॥६१॥

आर्या

तो वज्रबाहु सचिवासहित रथीं बद्ध करुन निजभारीं ॥

लक्षुनि बाळातें त्या करिता झाला सुविस्मया भारी ॥६२॥

गमती हरिहर दोघे धरुनि सुवेशा किशोर साह्यातें ॥

आले मजसी वाटे देखुनियां स्नेह फारसा ह्यांतें ॥६३॥

दिंडी

नृपसुताचा बहु मार तये वेळे ॥ होत शत्रू हिंपुटी फार झाले ॥

हेमरथ ते यापरी पाहूनियां ॥ काळसाची लोटला धांवुनीयां ॥६४॥

युद्ध झालें दोघांशिं घडी चारी ॥ नये कोणीं कोणास एक हारी ॥

येउनीया शत्रुचे वीर घाई ॥ उठावले एकदां सर्व पाहीं ॥६५॥

कडवीं-

शत्रूच्या पाहुनियां उत्कर्षा भद्रायू रोषा ॥

चढुनी श्रीगुरुदत्त विशेषा ॥ खड्‌ग अवशेषा ॥

चाल-

निर्वाणीं मग करीं घेतलें ॥

तेजें लोपवी मित्रास ॥ परिसा० ॥६६॥

अग्नी जिव्हाची प्रळयकाळीं ॥ तैसे खड्‌ग झळाळी ॥

त्यातें देखोनियां ते काळीं ॥ रिपुगण तात्काळीं ॥

चाल-

भस्म होऊनि सर्वहि गेले ॥

कळलें हेमरथातें ॥ ऐका० ॥६७॥

ओवी-

प्रधानासह वज्रबाहुसी ॥ टाकुनी तो पळाला वेगेंसी ॥

भद्रायुनें पाहतांच दृष्टीसी ॥ धावुन केशीं धरियेला ॥६८॥

महीस पाडोनी हाणितां लत्ता ॥ भडभडां अशुद्ध झाला वमिता ॥

मग त्याचे मंत्रियासह तत्वतां ॥ रथीं बांधिला आकर्षुनी ॥६९॥

तेणें धनादि लुटिलें बहुत ॥ तें हिरोनी घेतलें परत ॥

सोडवुनि पिता अमात्यासहित ॥ प्रेमे वंदी भद्रायु ॥७०॥

भूप पाहून त्या कुमारा ॥ नयनीं टाकी अश्रुधारा ॥

कोण म्हणे तूं मज दातारा ॥ कथीं बापा सत्य हें ॥७१॥

अपयशाब्धींतून मजसी ॥ उडी घालून काढिलेंसी ॥

जाळितां शत्रुशोचिष्केशी ॥ पडलासी घन तूं ॥७२॥

तंव तो सांगे भूपाळातें ॥ रक्षीं बंदीत शत्रुजनातें ॥

तींन दिवसांमधीं वृत्त तुम्हातें ॥ कळेल अवघेंहि ॥७३॥

साकी-

तेथुनि मग तो येउनि वेगें वंदी जननीलागीं ॥

वृत्त ऐकुनी पद्माकरही आलिंगी अनुरागी ॥७४॥

इकडे श्रीगुरु शिवयोगी तो निजजनकार्या जागे ॥

चित्रांगदासह सीमंतिनीतें भेटुनियां गुज सांगे ॥७५॥

भद्रायूचें मूळापासुनी कथिलें वृत्त तयासी ॥

सांप्रत जनकाप्रती सोडवुनी केलें पुरुषार्थासी ॥७६॥

कीर्तिमालिनी तुझी हे कन्या उपवर त्यातें द्यावी ॥

वंदुनियां ते अवश्य म्हणती दिधली भाषहि घ्यावी ॥७७॥

श्लोक

वदुनि मग नृपाळें यापरी योगियातें ॥

सचिव सपरिवारा धादी आणी तयातें ॥

ससुत शिवपती तो राजपुत्रासि संगें ॥

सुमतिसह सभाग्या घेऊनि ये स्वअंगें ॥७८॥

नृपवर मग तो ये शीघ्र सन्मूख त्यासी ॥

मिरवत गजरेंसी आणिलें त्या गृहासी ॥

नरवर पृथिवीचे लग्नकाजा मिळाले ॥

निरखुनि वर डोळां सर्व सौख्यें निवाले ॥७९॥

त्यामाजी नृप वज्रबाहु नयनीं देखूनि भद्रायुसी ॥

कैवारी निज ओळखून उठला वंदावया त्याजसी ॥

तेणें वारुन त्यास मस्तक पदीं त्याचेचि तें ठेविलें ॥

आलिंगूनि परस्परां नृप वदे कां मौन हें रक्षिलें ॥८०॥

छंद-

स्फुंदतां बहू कंठ दाटले ॥ अश्रुपूर ते नयनिं लोटले ॥

वदत तेधवां भूपती तया ॥ वृत्त सांगुनी फेडिं संशया ॥८१॥

आर्या-

चित्रांगदें नृपा मग नेउनि एकांति सर्व वृत्तातें ॥

कथिलें आकर्णुनि तें लज्जेसह हर्षशोक तातातें ॥८२॥

सुमतीहि पट्टमहिषी भेटविली ते तयास एकांतीं ॥

तेव्हां नृपवदनीं त्या राहुग्रस्तेंदुसाम्य ये कांती ॥८३॥

मागिल दुःखा स्मरुनी सति तेव्हां फार होतसे रुदित ॥

मुदित अति श्रीगुरुचे स्मरतां उपकार होय सद्गदित ॥८४॥

भूपति सद्गद बोले नम्रपणें तो सलज्ज सुमतीतें ॥

हा बिंदुसि सिंधु तसा भेटविला मज सुपुत्र कुमतीतें ॥८५॥

साकी-

सीमंतिनी त्या उभयांचा एकपणा तंव केला ॥

वज्रबाहु मग सभेसी येतां लागे सुतचरणाला ॥८६॥

आलिंगुनियां भूपति त्यासी स्नेहें बसवित अंकीं ॥

म्हणे सुपुत्रा कीर्तिध्वज त्वां उभवीला तिहिं लोकीं ॥८७॥

ओंवी-

असो आनंद सकळां होऊन ॥ यथासांग लाविलें लग्न ॥

चारी दिवस सोहळा पूर्ण ॥ झाला पार नसे तया ॥८८॥

चित्रांगदें अपार आंदण ॥ देऊनी केली बोळवण ॥

वज्रबाहू स्त्री पुत्र स्नुषा घेऊन ॥ सपरिवार स्वपुरा पातला ॥८९॥

दिंडी-

शत्रुलागीं देऊनी जीवदान ॥ घेऊं केला करभार द्रव्य जाण ॥

सिंहासनीं स्थापून स्वपुत्रातें ॥ तपा गेला भूपति काननातें ॥९०॥

चालवूनि शंभुची उपासना ॥ करी राज्या भद्रायु सुखें जाणा ॥

एक दिवशीं तो वनीं विहारातें ॥ सवें पत्‍नी पातला हर्षचित्तें ॥९१॥

साकी-

सत्व तयाचें पहावया शिव माया करिता झाला ॥

ब्राह्मणवेषें भूपा अग्नीं हांका फोडित आला ॥९२॥

व्याघ्रभयें तो कांपत बोले माझी अतिप्रिया जाया ॥

व्याघ्र धरुनि नेइ तियेतें सोडविं धांवुन राया ॥९३॥

ओंवी-

रायें चढवूनियां चाप ॥ सायकवृष्टी केली अमुप ॥

परि तो शार्दूल कृतांतरुप ॥ घेऊन तिजला गेलासे ॥९४॥

ब्राह्मण रोदत बोले राया ॥ धिग‌ धिग्‌ तुझा प्रताप वायां ॥

तुझिये समोर माझी जाया ॥ व्याघ्रें ती नेली कीं ॥९५॥

साकी-

राव म्हणे तुज इच्छित देइन पुढती लग्न करावें ॥

अथव तिचिया अन्य पालटा देतों तरि मागावें ॥९६॥

नृपमन पहाया द्विज तो बोले देईं तुझि हे जाया ॥

राव म्हणे हें अपेश आलें तोंड नसे चुकवाया ॥९७॥

तरि यालागीं देउन कांता सेविन अग्नीकाष्टें ॥

विचार ऐसा करुन दिधली स्त्री दान तया कष्टें ॥९८॥

ओंवी-

कीर्तिमालिनी घेऊन विप्र गेला ॥ रायें वैश्वानर चेतविला ॥

स्नान करुनी गुरुपदाला ॥ स्मरोन शंकरा ध्याइलें ॥९९॥

पद-

घाल उडी त्रिपुरारी झडकर ॥ घाल उडी त्रिपुरारी ॥ध्रु०॥

उपमन्यूतें पयोब्धि दिधला ॥ ऐसा निजजन कैवारी ॥

पूर्ण कृपेचा सागर होसी ॥ मम दुःखातें परिहारी ॥ घाल उडी त्रि०॥१॥

मी अपराधी शरणागत परि ॥ जाणुन वेगें तारी ॥

दीन जनाचा पालक म्हणविसि ॥ भक्तजना सुखकारी ॥घाल उडी त्रि०॥२॥

तुजविण त्राता त्रिभुवनिं कोणी नाहींच या संसारीं ॥

दास तुझा बहु दीन जाणुनी ॥ धांवुनि संकट वारीं ॥घाल उडी त्रि०॥३॥१००॥

ओंवी-

ऐसा धांवा करोनि त्वरित ॥ उडी टाकिली प्रज्वलिताग्नींत ॥

तों कुंडांतूनी उमेसह विश्वनाथ ॥ प्रगटोनि झेलिला वरचेवरी ॥१॥

आर्या-

हृदयीं धरुन वदे त्या मागें वर मी प्रसन्न झालों कीं ॥

येरु म्हणे विप्रस्त्री करिं मज देऊन धन्य या लोकीं ॥१०२॥

मंदस्मित ईश वदे बापा तो मीच व्याघ्रही विप्र ॥

गेलों गिरिजा घेऊन सत्य तुझें बा विलोकना क्षिप्र ॥३॥

हे कीर्तिमालिनी घे जाया तुझि बा पुढें उभी केली ॥

सुमनें वर्षति सुरवर म्हणतात अगम्य शंभुची केली ॥४॥

श्लोक-

देऊनि वांछित वराप्रति त्या नृपाला ॥

गौरीसहीत भव तो मग गुप्त झाला ॥

त्यानंतरें नृपति घेउनि अंगनेतें ॥

आला स्वकीय सदनाप्रति हर्षचित्तें ॥५॥

ओंवी-

दश सहस्त्रशब्दपर्यंत ॥ राज्य करुनि कीर्तिमालिनीसहित ॥

अंतीं दिव्य देह पावूनि त्वरित ॥ गेला विमानस्थ शिवलोका ॥६॥

कडवीं-

ऐसें भद्रायूचें हें चरित ॥ रसाळ अत्यंत ॥

सांगे शौनकादिकयां सूत ॥ स्कंद-पुराणांत ॥

चाल-

कृष्णदास तें यथामतीनें ॥ वर्णितसे भावार्थें ॥

ऐका श्रोते हो सादर चित्तें ॥ प्रेमळ चरितातें ॥१०७॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

या प्रकारें सद्‌गुरुच्या कृपेंवरुन भद्रायु सकल दुःखरहित होऊन शिवसायुज्यता पावला.

यासाठीं तुकोबा साधकांप्रत सांगतात. सद्‌गुरुवांचोनी सां०॥

धरावे ते पाय आधीं आधीं ॥

यास्तव साधूच्या वचनावर भरंवसा ठेवून श्रीगोपालकृष्णाजवळ मागणें मागावें ॥

अभंग-

हेंचि दान देगा देवा ॥ तुझा विसर न व्हावा ॥१॥

गुण गाईन आवडीं ॥ हेचि माझी सर्व जोडी ॥२॥

नलगे मुक्ती धन संपदा ॥ संतसंग देगा सदा ॥३॥

तुका म्हणे गर्भवासीं ॥ सुखें घालावें आम्हांसी ॥४॥

या प्रकारें मागणें मागून प्रभूतें मंगल आरती करावी. ॥

आरती-

येउन मानवदेहा भुललों संसारीं ॥

धन सुत जाया माझीं म्हणूनीया सारी ॥

नाहीं स्मरलों तुजला क्षणही कंसारी ॥

वारीं भवदुःखातें शरणागत तारी ॥

जयदेव जयदेव जय राधारमणा ॥

चुकवीं लक्ष योनी चौर्‍यायशीं भ्रमणा ॥जय० ॥१॥

जाणत जाणत अपुलें केलें अनहीत ॥

स्वेच्छें रतलों विषयीं त्यजूनियां विहित ॥

गेला जन्म सज्जनसंगाविरहीत ॥

त्वत्पदकमळीं मिनलें नाहीं हें चित्त ॥जय० ॥२॥

केलें अगणित पातक आतां तुज पायीं ॥

आलों शरणागत मी लक्षी लवलाही ॥

करुणा दृष्टीं पूर्ण दीनाकडे पाहीं ॥

विनवी कृष्णदास मनिं येउन राहीं ॥

जयदेव जयदेव जय राधारमणा ॥३॥