सप्तशती गुरूचरित्र

हे टेंबे स्वामी लिखित सप्तशती गुरुचरित्र आहे. त्याची एक खासियत आहे. प्रत्येक ओळीतील तिसरे अक्षर वाचत गेल्यास गीतेचा संपूर्ण पंधरावा अध्याय तयार होतो. श्री टेंबेस्वामींची अफाट प्रतिभा यातून दिसुन येते. श्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.


अध्याय चौथा

बहुवित् सिद्धा पुसे द्विज । अत्रि कोण सांग मज । त्रीश केवीं हो अत्रिज । सिद्ध गुज ऐक म्हणे ॥१॥

जाण अत्रि ब्रह्मपुत्र । अनसूया तत्कलत्र । दंपती परम पवित्र । त्यांचा पुत्र दत्तात्रेय ॥२॥

निर्बाध अनसूयेचे । व्रत पाहुन ते साचें । मन भ्यालें सर्व सुरांचें । अबोधाचें बीज हें कीं ॥३॥

ते निश्चोतत्धैर्य देव । त्रिमूर्तीपाशी घेती धांव । आश्वासोनीं त्यांतें देव । भिक्षुभाव स्वीकारिती ॥४॥

ते ऊर्ध्व लोक सोडुनी । भिक्षुकसे होवुनि । तिघे आले अत्रिसदनीं। जातां रानीं मुनिवर्य ॥५॥

त्यां किंप्रयोजन ऐसें । अनसूया पुसतसे । नग्नभिक्षा दे तूं ऐसें । याचितसे देवत्रय ॥६॥

जरी सृती सोडिती ते । तरी सती वदे त्यातें । तसीच मी तुम्हा देते । स्वस्थचित्तें भिक्षा करा ॥७॥

स्वव्रताच्या सामर्थ्ये ती । अत्रिपदा चिंती चितीं । अतिथी बाळ कल्पुनी ती । सती नग्न होती झाली ॥८॥

सुदुस्तर ज्यांची माया । सहसा बालत्व ये तयां । तें पाहून अनसूया । विस्मया पावली ती ॥९॥

सुहास्यमुखी घे बालां । तंव स्तना पान्हा आला । पाजी एका एका बाला । जी विमला पातिव्रत्यें ॥१०॥

त्यांची शांत झालीं मनें । पतिव्रतास्तनपानें । पाळण्यांत घालुनि गाणें । ती प्रीतीनें गायी साध्वी ॥११॥

ती सुखानें गातां मुनि । तेव्हा आला वनांतुनि । ज्ञानें त्रिमूर्ति जाणुनी । स्तवुनी तोषवी त्याला ॥१२॥

त्यांचें गुज तें जाणुनि । राहिले सुत होउनि । निजरुपेंहि स्वस्थानीं । जाती तीनी देव हर्षे ॥१३॥

सगुणत्वा आले त्यांची । अत्रि नामें योजी साचीं । चन्द्र दत्त दुर्वासाचीं । ब्रह्म विष्णु महेश्वर ॥१४॥

चंद्र प्रणाम करुनी । चंद्रलोका गेला, मुनि । दुर्वासा फिरे भुवनीं । स्वसदनीं राहे दत्त ॥१५॥

तो निवृत्तिमार्ग दावी । भक्तांचे काम पुरवी । स्मर्तृगामी पुनः भुवि । अवतरे श्रीपादाख्य ॥१६॥

इति श्री०प०प०वा०स०वि० सारे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थो०